मुंबई, दि. 8 : कोराडी (नागपूर) येथे उभारण्यात येणारा ‘ऊर्जा शैक्षणिक पार्क’ हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा आणि देशातील सर्वोत्कृष्ट तसेच एकमेवाद्वितीय व्हावा यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींचा त्यामध्ये समावेश करावा, अशा सूचना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या. कोराडी येथे प्रस्तावित ‘ऊर्जा शैक्षणिक पार्क’ बाबत आढावा बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे डॉ. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या बैठकीस ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, ‘महानिर्मिती’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, ऊर्जा विभागाचे सहसचिव उद्धव वाळुंज हे मंत्रालयातून तर नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी आणि प्रकल्पासाठी नियुक्त वास्तुशास्त्रज्ञ अशोक मोखा दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी श्री. मोखा यांनी ऑनलाईनरित्या प्रकल्पाचे संगणकीय सादरीकरण केले.
ऊर्जा पार्कचा प्रकल्प राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
अर्थसंकल्पीय भाषणात समावेश केलेला हा ऊर्जा पार्कचा प्रकल्प राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे असे सांगून डॉ. नितीन राऊत यावेळी म्हणाले, हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावा यासाठी देशातील विविध ऊर्जा पार्क प्रकल्प, विज्ञान पार्क आदी प्रकल्पांना भेट देऊन तेथील रचना आणि संरचना समजून घ्यावी. त्यानुसार कोराडी येथील प्रकल्प हा देशातील अन्य प्रकल्पांपेक्षा वेगळेपण दर्शवणारा असावा अशा स्वरुपाचे त्याचे डिझाईन करावे. या प्रकल्पाला लहानमोठे सर्वच भेट देणार असले तरी बालकांची जिज्ञासा केंद्रस्थानी ठेऊन प्रदर्शन आणि मनोरंजनात्मकता लक्षात घेऊन तशी रचना करावी. भविष्यात कमी होत जाणारे ऊर्जा स्रोत पाहता ऊर्जा बचतीचे महत्त्व सांगणारा इंटरप्रिटेशन कक्षावर अधिक भर दिला जावा. जेणेकरुन भावी पिढी ऊर्जा बचतीद्वारे एक जबाबदार नागरिक म्हणून देशाच्या विकासात भर घालतील.
हे पार्क ऊर्जा शिक्षण पार्क व्हावे
या ऊर्जा पार्कमध्ये औष्णिक ऊर्जा प्रकल्प, जलविद्युत प्रकल्प अशा पारंपरिक प्रकल्पांसोबतच भू- औष्णिक, समुद्राच्या लाटांवर आधारित (टायडल एनर्जी) प्रकल्प, अपारंपरिक ऊर्जा अंतर्गत बायो-मास, बायोगॅस वरील ऊर्जा प्रकल्प, हरित ऊर्जा अंतर्गत सौर ऊर्जा, पवन ऊर्जा तसेच सौर आणि पवन ऊर्जा निर्मितीचे हायब्रीड प्रकल्प, छतावरील सौरऊर्जा प्रकल्प आदींच्या मॉडेल्सचा समावेश करावा. त्याशिवाय याद्वारे निर्मित होणारी वीज विद्युत निर्मिती प्रकल्प ते ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रवास दर्शवण्यात यावा. स्मार्ट मीटर, स्मार्ट होम ज्यामध्ये घरातील स्मार्ट इलेक्ट्रिक उपकरणे आदींची दालनेही ठेवण्यात यावी.
येथे येणारे पर्यटक, बालके यांनी प्रदर्शनाच्या पाहणीनंतर खरेदीसाठी ठेवलेल्या वस्तू,
कपड्यांवर ऊर्जा बचतीचे महत्त्व दर्शवणारे संदेश प्रदर्शित करावेत,असे सांगत
डॉ. राऊत यांनी प्रकल्पाच्या डिझाईनबाबतही विविध सूचना केल्या.
प्रधान सचिव श्री. वाघमारे यांनी पारंपरिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पांसोबतच अपारंपरिक ऊर्जास्रोत
आणि अपारंपरिकमधीलच नवीन स्रोत उदा. बॅटरीद्वारे विद्युत उर्जा साठवणूक, वीजेवर चालणारी वाहने आदींचाही
या ऊर्जा पार्कमध्ये समावेश करावा अशा सूचना दिल्या.हे पार्क ऊर्जा शिक्षण पार्क व्हावे, असेही ते म्हणाले.
अपारंपरिक ऊर्जेला केंद्र शासन तसेच राज्य शासनाने अधिक महत्त्व देण्याचे ठरवले असल्याने
यामध्ये सौरऊर्जा आदी अपारंपरिक ऊर्जा स्रोतांना अधिक महत्त्व द्यावे.
त्यासाठी ‘महाऊर्जा’ आणि नवीकरणीय ऊर्जा स्रोत क्षेत्रातील तज्ज्ञांचे सहकार्य घेण्यात यावे, असेही ते म्हणाले.
श्री. खंदारे म्हणाले, मुलांना हसत- खेळत आणि स्वत: सहभाग घेण्याची संधी उपलब्ध करुन देत उर्जेचे विविध स्त्रोत
आणि त्याचा मानवी जीवनाला होणारा उपयोग लक्षात यावा,
अशी या पार्कमधील दालनांची रचना करावी. खूप तांत्रिक आणि क्लिष्ट बाबींमध्ये न जाता
मूलभूत बाबींचे ज्ञान यातून दिले जावे जेणेकरुन मुले ते आयुष्यभर विसरणार नाहीत, असेही ते यावेळी म्हणाले.
शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यातून हसत-खेळत शिक्षण मिळावे, त्यांना उर्जेचे स्त्रोत प्रत्यक्ष प्रकल्प स्थळी हाताळता यावे,
सोबतच मनोरंजन व्हावे आणि पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा या ऊर्जा पार्क उभारण्यामागचा उद्देश आहे.
खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र कोर्टाकडून रद्द;खासदारकी धोक्यात
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचक हो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,आपल्या मित्रांना सांगा)