म्हाराच्या हातच आम्ही पाणी बी पेत नाय, आणि ह्या पोरान मला त्येंच्या घरात निऊन ठेवलं. एका स्टाफ मेंबरच्या रूमवर आलेली त्याची आज्जी मला सांगत होती.आमच्या जालन्यात आम्ही अजून बाटलो न्हाय आणि मेलो तरी बाटणार नाय. त्या आज्जीचे शब्द चराचर काळजात जखम करत घुसनाऱ्या गोळी सारखे घुसत जात होते.
मनातून संताप येत होता. माझा मित्र संदीप त्याला माझी जात माहीत असल्याने मला डोळा मारून आजीला गप्प करत होता. मी त्याला खूनावून गप्प राहायला सांगितलं.खरं आहे आज्जे तुझ ही जातच लय बेक्कार मी म्हातारीच्या सुरात सुर मिसळला.
तिच्याशी संवाद सुरू केला.संदिप कडून तिला माझी जात न सांगण्याचे प्रॉमिस घेतले. मी आठवड्यातून वेळ मिळेल तेंव्हा त्या आजीकडे जाऊ लागलो. तिची काळजी घेऊ लागलो. तीच बोलणं ऐकू लागलो. तिने हळू हळू तिच्या नातवाच्या कागाळ्या मला सांगायला सुरवात केली.
मी तिचं मन हळू हळू जिंकलं माझ्याशी बोलताना तिला सुरक्षित वाटायचं.मी गेलो नाही की म्हातारी माझी आठवण काढायाची मग मला माझा मित्र फोन करून आमचं बोलणं घडवून आणायचा.म्हातारीचा इतका जीव बसला होता की घरात काही बनवलं की ती आवर्जून मला बोलवायची.
म्हाताऱ्या माणसांना कुणी वेळ देत नाही ती जे सांगू पाहतात ते कुणी ऐकून घेत नाही त्यांना जे खावसं वाटत ते ते सांगत नाहीत.पण एखाद ice cream मुलांचा खाऊ जबरदस्तीने खाऊ घातला तर त्यांचा नकार हा लटका असतो एनकेन प्रकारे मी म्हातारीला जीव लावला.
म्हातारीला देवदर्शन घडवून आणले
एक दिवस मी आणि माझा तो मित्र संदीप याने चपराळा मार्कंडा येथे म्हातारीला फिरायला घेऊन जायचा बेत आखला.
आम्ही बाईकवरून झिरमिरया पावसात फिरलो.म्हातारीला देवदर्शन घडवून आणले.
म्हातारीचा सेल्फी घेतला. छत्री घेऊन वेगवेगळ्या पोजमध्ये आजी चा फोटो घेत मोहरुन जात होती लाजत होती.
आम्ही भेळ खाल्ली ice cream खाल्लं घरी आल्यावर मी स्वतः संदिपच्या मदतीने जेवण बनवले.आणि म्हातारीला खाऊ घातले.
दुसऱ्या दिवशी ही आज्जी तिच्या गावी जाणार होती मी निघताना तिचा हात हातात घेतला
आणि मी बौद्ध जयभिमवाला आणि पूर्वाश्रमीचा महार असल्याचे तिला खणखणीतपणे सांगितले.
म्हातारीनं मला पोटाशी धरलं. तिला हुंदका आला होता.ती रडवेली झाली होती.
पुन्हा कधी भेटणार लेकरा म्हणून तिनं आवंढा गिळला.
ती माझा निरोप घेत होती आणि करुणेने टपकत असलेल्या अश्रूमध्ये जात पेट घेत होती
हेही वाचा.. इंडिया दॅट इज कास्ट
वाचा.. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ मराठवाडा नामांतर दिन निमित्ताने..
हेही वाचा.. रोमन साम्राज्य आणि भारतीय समाज
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 16, 2021 13:35 PM
WebTitle – Caste in india 2
Comments 1