नाशिक- कष्टकरी, शोषितांचा आवाज, स्त्री मुक्ती चळवळीला नेहमीच प्रोत्साहन देणार्या, शेतकरी आंदोलनांत सक्रिय असणार्या आणि आपल्या लेखणीतून सामाजिक भान जोपासणार्या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अनिता पगारे यांचे कोरोनामुळे रविवारी (दि. २८) निधन झाले. अरुण ठाकूर, सुनील पोटे यांच्या निधनानंतर अनिता पगारे यांच्या जाण्याने नाशिकच्या सामाजिक चळवळीला मोठी हानी पोहचली आहे.घंटागाडी कामगारांच्या प्रश्नांवर लढा उभा करणारे मनोहर आहिरे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली असा परिवार आहे.
त्यांची ‘वस्तीवरची पोरं’ ही मालिका आणि त्यानंतर प्रसिद्ध झालेला कथासंग्रह विशेष गाजला होता. त्यांच्या निधनाने ‘वस्तीवरची पोरं’ पोरकी झालीत अशा शब्दात सामाजिक क्षेत्रातून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. ‘आपलं महानगर’मध्ये रविवारी प्रसिद्ध होणार्या सारांश पुरवणीच्या त्या नियमीत लेखिका होत्या.
त्यांच्या निधनावर काही निवडक शोकसंदेश
अनिता पगारे
अरुण ठाकूर- वसा आणि वारसा या पुस्तकाची संकल्पना, संपादन, प्रकाशन आणि वितरण या कामांमध्ये कमालीच्या उत्साहाने अनिता सहभागी झाली होती. या पुस्तकात तिने अरुणवर लिहीलेला लेखाचा पहिला खर्डा वाचून मी तिला काही सूचना केल्या. तिने तो लेख पुन्हा लिहीला. मित्र-मैत्रीणीने दाद दिल्यावर ती म्हणाली, सुनीलचे आभार मानायले हवेत, त्याने सांगितलं म्हणून मी तो लेख नव्याने लिहून काढला.समता आंदोलनातली तरुण कार्यकर्ती म्हणून मला अनिताचा परिचय होता. कोणत्याही भाषणाच्या आधी त्या विषयाचा वा प्रश्नाचा नीट अभ्यास करूनच अनिता भाषणाला उभी राह्यची.
नाशिकमधील गरीब वस्त्यांची सामाजिक पाहाणी तिने केली आणि गरीबांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न नाशिक महापालिकेपुढे मांडला. त्यावरील उत्तरांसह. “माझ्यासारखी वस्तीत जन्मलेली, दलित असलेली, कायम काठावर पास होणारी, घरात कुठलाही राजकीय वारसा नसलेली एक मुलगी, परदेशात शिकण्यासाठी जाऊ शकली नसती, कार्पोरेटमध्ये मोठ्या पदावर काम करू शकली नसती आणि राजकीय उमेदवार म्हणून माझ्या नावाचा विचारही कधी झाला नसता. मी कॉर्पोरेटमध्ये नोकरी करत असताना एकदा माझ्या बॉसला विचारले होते की, मी एमबीए नसताना तुम्ही मला या एवढ्या वरच्या पदावर का घेतले.. तो म्हणाला, सामाजिक विश्लेषण करण्याची तुझी कुवत आणि पद्धत खूपच चांगली आहे, अभ्यासाशिवाय तू बोलत नाहीस आणि एकदा तू काम घेतलेस की ते पूर्ण झाल्याशिवाय तू सोडत नाहीस.”
नाशिकची तोफ थंडावलीय
अनिता तडफदार होती, कर्तबगार होती. अरुण ठाकूर तिचा मार्गदर्शक होता. ती त्याला टीचरच म्हणायची. अनेकजण तिला अरुणची मुलगी समजायचे. २१ मार्चला अरुण-वसा आणि वारसा, या पुस्तकाचं प्रकाशन झालं. त्या ऑनलाईन कार्यक्रमाची आखणी आणि संचलन अनिताने केलं. त्यावेळीही तिची प्रकृती ठीक नव्हती परंतु कार्यक्रम पार पडेपर्यंत मला काहीही माहीत नव्हतं. तिला कोविडची लागण झाल्याचं कळलं. लवकरच बरी होईल या समजुतीत मी होतो.
आज सकाळी निशा शिवूरकरचा फोन आला. अनिताला व्हेंटिलेटरवर ठेवलं आहे. छातीत धस्स झालं पण आशा वाटत होती. मात्र तासाभरात निरोप आला अनिताचं निधन झालं. माझ्या डोळ्याचं पाणी खळेना. अरुणचा वसा अभिमानाने चालवणारी त्याची वारसदार गेली.
– सुनील तांबे ( जेष्ठ पत्रकार)
कोणताही संघर्ष असो की आंदोलन, Anita Pagare असली की आधार असायचा.पोलिसांना तर धारेवर धरायची…
सूत्रसंचलन असो की विषयाची मांडणी.. तिचा एक वेगळाच बाज असायचा.
आता हे वादळ अकस्मातपणे शांत झालंय! नाशिकची तोफ थंडावलीय.
जाण्याची ही वेळ होती का अनिता ?
फायटर लेडीने अशी हिंमत हरावी का?
तुझ्या स्मृतिला सलाम !
Kalyani, मनोहर आहिरे तुम्हाला बळ मिळो!!!!
– युवराज मोहिते ( पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते)
हक्काचे घर पोरके झाले
खूप धक्कादायक आणि दुःखद बातमी
चळवळीतील कार्यकर्त्याचे हक्काचे घर पोरके झाले…. साथी अनिता पगारे, NAPM ची महाराष्ट्र समन्वयक, लोकशाही उत्सव समितीचीही नाशिकच्या कार्यकर्त्या यांचे आज अकल्पित, अकाली निधन झाले….मनोहर आहिरे दादा यांची पत्नी व परिवर्तन विचार चळवळीचे प्रमूख नाव अनिता पगारे स्त्री सक्षमीकरणासाठी अहोरात्र झटणारे संवेदनशील व्यक्तिमत्व आपल्या सोबत नसणार यांचे शल्य आयुष्यभर राहील.
भावपुर्ण आदरांजली …
अमोल आनंद ( सामाजिक कार्यकर्ते)
संयुक्त शेतकरी समितीच्या वतीने मागच्या दोन महिन्यांपूर्वी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्व पुरोगामी चळवळीतील व समविचारी पक्षातील व्यक्ती उपस्थित होते त्यामध्ये माजी आमदार /नगरसेवक व इतर अनेक प्रतिष्ठित महिला व पुरुष होते.
आमच्या साधारण चर्चा चालू असताना शहरातील महिला नेत्याच्या वर एक टिप्पणी कानावर पडली – “ह्या महिला म्हणजे फक्त बायोलॉजिकल महिला आहेत!!!!”.
अशी टीका करणारी सडेतोड व्यक्तीमत्व म्हणजे अनिता ताई पगारे…… स्त्रीदास्यत्वच्या बद्दल जागृती करणारीच होती.
होती म्हणावं लागतंय आज पण स्मृतीनी सर्व पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांमध्ये जिवंत राहील.
स्मृतिशेष अनिताताई पगारे यांना विनम्र अभिवादन ….
– भीमा पाटील ( सामाजिक कार्यकर्ते)
टीम जागल्या भारत कडून अनीता पगारे यांच्या स्मृतींना विनम्र आदरांजली
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published on March 28 , 2021 14:10 PM
WebTitle –social activist anita pagare passed away at nasik 2021-03-28