माळेवाडी अंत्यविधीस स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता न देणे हे तसं प्रथमदर्शनी कारण आहे. तत्कालिन कारण आहे. या अॅट्रोसिटी आहे काय?? होय २०० % हि अॅट्रोसिटी आहे.
कारण या घटनेत हेतुपुरस्सर क्रौर्य आहे, हिंसा आहे, द्वेष आहे, अत्याचार आहे ,
आणि सगळ्यात महत्वाचे जे स्पष्टपणे दिसत आहे ते हे की जसं महाराष्ट्रातील कोणत्याही गावात प्रामुख्याने दोन पार्ट्या दिसतात तशा या माळेवाडी गावातही आहेत.
पार्श्वभूमी
माळी या दुय्यम शेतकरी जातीचे प्रभुत्व या गावात आहे. जमिनीची मालकियत प्रचंडपणे त्यांच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे गावात या साठे कुटुंबियांचे एकच घर आहे. गावाच्या लांब बाजूला अगदी कोपर्यात, जुन्या ओढ्याच्या वरती, चिलारी बाभळीला सारत सारत वरती गेले कि टेकाडावरती यांचे घर आहे जे की यांनी काबाडकष्ट करून, गावात सालं धरून एक एक काटूक गोळा करून बांधले आहे. मयत धनाजी साठे हे अंध अपंग होते. त्यातच प्रचंड दारिद्र्य घरात स्पष्टपणे दिसत आहे. ते ‘कसंतरी’ करून दिवस ढकलतात हे दिसतंय.
थोडक्यात गावाच्या बाजूला राहून गावगाड्यात हे लोक परावलंबी जीवन जगत होते.मयत धनाजी साठे यांनी त्यांच्या दोन्ही भावांना गावकीत न राबता शहर गाठा. तिकडं काही काम करा पण इथं टाचा घासून मरू नका असा सल्ला दिला, आणि जसं की महाराष्ट्रातील मांग जिथं सर्वात जास्त स्थलांतरित झाले तिथंच हे कुटुंबिय जगण्यासाठी गेले.
इथवर सगळं ठिक म्हणण्यापर्यंत चाललं होतं पण त्या गावात सरपंचपदासाठी नेमकं अनुसूचित जातीला आरक्षण पडलं आणि या प्रवर्गात बसणारं फक्त हेच एकमेव कुटुंबिय असल्याने दोन्ही पार्ट्याचा या निरूपद्रवी कुटुंबियावरती डोळा पडला आणि तिथूनच संघर्षाला सुरूवात झाली.

आरोपी आत तीन महिने बसले व बाहेर आल्यावर परत माळेवाडी गावात येऊन तोफा उडवून आनंद साजरा केला
दशरथ कसबे हे गावातील माळी एकता पॅनेलकडून निवडून आले. तिथेच द्वेष वाढीला लागला.सरपंच झाला तरी या लोकांच्या सामाजिक आर्थिक स्थानात फरक पडणारच नव्हता. एके दिवशी जनावरांसाठी गवत कापून घेऊन येताना कुरापत काढून आरोपी रवि पाटिल याने दशरथ साठे व त्यांच्या पत्नी या बेदम मारहाण केली. त्यांच्या पत्नीचे केस जोरात ओढले व त्यांची विटंबना केली. गावात येऊन त्याने जिंकून आलेल्या पैलवानासारखा शड्डू ठोकला ” बघा मी तुमच्या सरपंचाला कसा ठोकला ते
यावर दशरथ साठे यांनी पोलिसात अॅट्रोसिटी गुन्हा नोंदवावा म्हणून तक्रार दाखल केली.आरोपी आत तीन महिने बसले व बाहेर आल्यावर परत माळेवाडी गावात येऊन तोफा उडवून आनंद साजरा केला व या कुटुंबाला परत दहशत दाखवली.त्यानंतर हि २० तारखेच्या रात्री दोन वा. साठे यांचे मयत झाल्यावर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपर्यंत साठे यांचा अंत्यसंस्कार या लोकांनी होऊ दिला नाही.
आम्ही स्मशानभूमी पाहिली ती गावापासून फार दूर एका ओढ्याच्या शेजारी आहे. तिथवर जाण्यासाठी दुसऱ्यांच्या शेतातूनच जावे लागते, म्हणजे या स्मशानभूमीला जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही.मयत साठे यांच्या अंत्यविधीसाठी लाकूडफाटा मिळू दिला नाही.एक जणाने दशरथ साठे यांच्या संबंधापोटी ट्रॅक्टर दिला तोही नंतर ‘जातबंधूच्या दबावापोटी’ माघारी नेला.लाकूड अड्डेवाला व ट्रॅक्टरवाला हे दोघेही माळी असूनही त्यांनी दशरथ साठेंना सहकार्य देऊ केलं होतं पण त्यांच्या जातीच्या उच्चभ्रूच्या दबावाला ते बळी पडले.
निष्कारण गावकीच्या राजकारणात साठे कुटुंबियाला ओढून त्यांना ओरबडले.
अॅट्रोसिटी माघारी तरच तुला स्मशानभूमीला जाऊ देतो म्हणाल्यावरही दशरथ साठे त्यांना बधले नाहीत.
त्यांनी तिथून चौदा कि. मी असलेल्या अकलूज स्मशानभूमीत ते प्रेत नेण्याची तयारी केली
पण तिथंही पोलिसांनी त्यांना गाडी आडवी लावून त्यांना अडवले व ते प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला.
पण या घटनेत सलाम दशरथ साठे व त्यांची विनाअनुदानित शाळेत नोकरी करणारी बहिण
सुमन साठे यांना कि ज्यांनी शेवटपर्यंत हिम्मत दाखवली.
पोलिस व गावगुंड दोघांनाही ते झुकले नाहीत. त्यांनी हिम्मतीने थेट ग्रामपंचायतीसमोरच सरण रचले व मयत धनाजी साठे यांना भडाग्नी दिला.

तोवर शेजारच्या आजूबाजूच्या गावातून बौद्ध सामाजिक कार्यकर्ते, मांग बांधव मोठ्या प्रमाणात आले होते
ज्यामुळे तो अंत्यसंस्कार होऊ न देण्याचा गावगुंडाचा व पोलिसांचा डाव उधळला गेला.
गावगाड्यात अनु. जाती जमातीला असलेल्या राजकीय आरक्षणाची काय स्थिती आहे हा एक वेगळा विषय आहे.
या प्रवर्गातून निवडून आलेल्या सरपंचाचा राग विद्रोह गावातले उच्चभ्रू कधी गोड बोलून,
कधी अमिष देऊन, कधी दमन करून, कधी आर्थिक नसबंदी करून कसा संपवतात.एका चहाच्या कपावर ते तुमचा राग थंड करतात.
असो या घटनेत पहिल्यांदा पोलिस प्रशासन व नंतर ते गावगुंड यावर कारवाई व्हावी असं आमचं म्हणणं आहे.
मी महेंद्र लंकेश्वर,अशिया सदर्न रिसर्च टीम व बहुजन सत्यशोधक संघ यांच्या वतीने
या घटनेचा तीव्र निषेध करतो व कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करतो.
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)