जयभीम हा सिनेमा बनवण्याचे धाडस तमीळमधील निर्मातेच करु शकतात. काला, असुरण, कर्णन आणि त्याच्याही पुढचे पाऊल म्हणजे जय भीम हा चित्रपट आहे. या सिनेमाचा नायक रुढ अर्थाने जरी सुर्या (अॅड. चंद्रु)असला तरी खरा नायक म्हणजे चित्रपटात असलेली नायिका संगीनी( लिजो मोल जोस) हीच आहे. प्रकाशराज (पेरुमलासामी) , सुर्या या अत्यंत टॅलेंटेड अभिनेत्यांच्या समोर ही नायिका कुठेही कमी पडत नाही तर सिनेमाचा संपूर्ण भार ती तिच्या अभिनयाने पेलते. सोबत राजीशा विजयन हिने पण छान अभिनय केलाय. या सिनेमात राजाकानू (मनीकंडन) यांच्यावर चित्रित करण्यात आलेली दृश्ये अत्यंत भयानक आहेत.
“इरुला” नावाच्या तमीळमधील आदिवासी जातीच्या व्यथा
तमीळ सिनेमा हा टिपीकल साऊथ सिनेमांचे माहेरघर आहे पण वर दिलेल्या काही सिनेमांमधून साऊथ फिल्म इंडस्ट्रीत प्रायोगिक बदल दिसत आहेत. साऊथ सिनेमा म्हणजे प्रणयदृश्ये, मारधाड, एकाचवेळी दहा/बारा गुंडांना मारणारा हिरो असे काहीसे असते. पण हा चित्रपट याला अपवाद आहे. चित्रपटात असलेली अनेक हिंसक दृश्ये अंगावर शहारे आणणारी आहेत. टि जे ग्नानवेल यांचे दिग्दर्शन अत्यंत सुंदर आहे, चित्रपटाचे छायाचित्रण, बॅकग्राऊंड म्युझिक पण तितकेच ताकदीचे आहे.
“इरुला” नावाच्या तामीळमधील आदिवासी जातीच्या व्यथा या चित्रपटात मांडली आहे. “इरुला” आदिवासी जातीसारख्या समस्या भारताच्या कानाकोपऱ्यात दिसून येतात. महाराष्ट्रातदेखील काही जातींवर गुन्हेगारी जातीचा शिक्का बसला आहे तो आजही तसाच आहे, पारधी, फासेपारधी, बेरड, रामोशी या जातींना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या जाती समजले जाते. पोलिस दफ्तरी तशी नोंद असते. पोलिस ठाण्याच्या भागात या जातीतील लोक राहत असतील तर चोरीच्या घटनेत पहिले संशयीत म्हणून या जातीतील लोकांना पकडले जाते.अमानुषपणे मार दिला जातो, या जातीतील निरपराध लोकांवर गुन्हे नोंदवले जातात, अनन्वित अत्याचार केले जातात हे सगळे वास्तव जसे महाराष्ट्रात आहे तसेच याच पद्धतीने सर्व राज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या आदिवासी आणि मागासवर्गीय जातींचे आहे. हे कटू वास्तव समोर आणण्याचे धाडस दाखविले गेले आहे.
चित्रपटावर मार्क्सवादाचा प्रभाव
फँड्रीत नागराज मंजुळे यांनी गावठी डुक्कर खाणाऱ्या समाजाचे(नाव मुद्दाम लिहीत नाही) दुःख मांडण्याचा प्रयत्न केला होता त्याचप्रमाणे या चित्रपटात विषारी साप पकडणाऱ्या आणि रानटी उंदीर खाणाऱ्या इरुला आदिवासी समाजाचे दुःख सांगितले आहे. सुर्या या अभिनेत्याने चंद्रु नावाचा वकील साकारला आहे. सुर्या अक्षरशः ही भूमिका जगला आहे. तो कुठेही ओव्हर अॅक्टींग करत नाही, नैसर्गिक अभिनय कसा करतात हे साऊथमधील अभिनेत्यांकडून बॉलीवूड आणि मराठीतील “मोदकछाप” नटांनी शिकायला हवे.
या चित्रपटावर मार्क्सवादाचा प्रभाव आहे हे अनेक फ्रेममधून दिसते. काही ठिकाणी तर संवादातूनही स्पष्ट जाणवते.
मग या चित्रपटाचे नाव जय भीम का असेल? या सिनेमात बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव फक्त एकाच संवादात येते.
बाकी सिनेमात कुठेही तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष दिसणार नाही किंवा तशा फ्रेम्स दिसणार नाहीत.
चित्रपटाचा मूळ गाभा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा
पण चित्रपटाचा मूळ गाभा जो आहे तो बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचारांचा जयघोष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेताही कसा करता येईल हे या चित्रपटाद्वारे दाखवले आहे. एकीकडे रस्त्यावरच्या लढाईत मार्क्सवादाचा प्रभाव दाखवला गेलाय तर दुसरीकडे कायदेशीर लढाईत आंबेडकरवादाचा जयघोष आहे.जय भीम या सिनेमा चे दिग्दर्शक टी जे ग्नानवेल हे मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी यांनी एकत्रित येणे आवश्यक आहे असे सुचवले आहे का याचे उत्तर आपण शोधायचे आहे.
सिनेमाचा प्लॉट न्यायालयीन कामकाज आणि एका गर्भवती महिलेच्या संघर्षाचा
सिनेमाच्या पहिल्याच दृश्यात एक वृध्द व्यक्ती आपल्या तरुण मुलाची तुरुंगातून सुटका होण्याची वाट पाहत आहे. तुरुंगातून बाहेर येणाऱ्या कैद्यांना पोलिस जात विचारत आहे. ज्या कैद्यांची जात तथाकथित उच्चजातीय आहे त्यांना सोडून दिले जात आहे आणि जे आदिवासी, मागास जातीतील कैदी आहेत त्यांना बाजूला उभे केले जात आहे. नंतर त्या आदिवासी आणि मागास कैद्यांवर खोट्या आरोपांखाली पुन्हा अटक केली जाते. अटक करण्याचे कारण म्हणजे पोलिसांना खरे गुन्हेगार सापडत नाहीत आणि त्यांना त्यांच्या केसचा बॅकलॉग भरुन काढण्यासाठी या आदिवासी आणि मागासवर्गीय जातीतील कैद्यांना वापरले जाते. खूप विदारक सत्य आपल्याला पाहायला मिळते. आणि हे चित्र भारतात सगळीकडेच पाहायला मिळते हे दिग्दर्शकाला सांगायचे आहे. अशी अनेक दृश्ये या सिनेमात आहेत ज्यामध्ये मन हेलावून जाते.
जय भीम या सिनेमा चा प्लॉट जो आहे तो न्यायालयीन कामकाजाचा आणि एका गर्भवती महिलेच्या संघर्षाचा आहे. सिनेमाचे कथानक मी सांगत नाही पण या सिनेमाद्वारे तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. दोन विरोधी टोके (विचारधारा) एकत्र आल्यावर सकारात्मक बदल कसा होऊ शकतो हे पाहायला मिळेल. अन्याय, अत्याचारांचे थैमान सुरू असताना, आयुष्यातील सर्व काही हरवले तरीही, समोर अनेक प्रलोभने असताना देखील स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो हे आंबेडकरवाद शिकवतो. हेच या सिनेमाचे सार आहे.
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जय भीम मुवी मधील प्रकाश राजच्या ‘झापड मारण्याच्या’ सीनने नवा वाद
मागील पोस्ट सिरिज साठी खालील लिंकवर क्लिक करा
1भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने -1
2 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 2
3 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 3
4 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 4
5 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 5
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 04, 2021 09 :43 AM
WebTitle – surya Jayabhim movie review in marathi