१९३० ते १९४० चा भारतीय चित्रपट सृष्टीतील अनमोल असा काळ होता. या काळात सामाजिक, कौटुंबिक तसेच मारधाडवाले सिनेमे बनायचे. महिलांनी सिनेमात मारामारी करणे हे आजही अतर्क्य वाटते तरी पण त्या काळात फियरलेस नादिया यांनी मारधाडीचे सिनेमे केलेत. हंटरवाली हा सिनेमा त्यांचाच होता. १९३५ साली हंटरवाली प्रसिद्ध झाला आणि या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.
सामाजिक चित्रपटांमधे देविकाराणींच्या ‘अछुत कन्या’ या चित्रपटात एका मागासवर्गीय मुलीची कथा दाखवली होती.चित्रपटात अशोककुमार यांनी एका ब्राह्मण तरूणाची भूमिका केली होती. सामाजिक पार्श्वभूमीवर बनवलेल्या या चित्रपटाला पसंती मिळाली आणि याच बरोबर अशोक कुमार चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून यशस्वी झाले. यानंतर अशोक कुमार यांनी देविकाराणींच्यासोबत बर्याच चित्रपटात काम केले. देविकाराणींच्या बॉम्बे टॉकीज या बॅनरखाली हा सिनेमा बनवला गेला होता. भारतीय चित्रपट सृष्टीतील दादामुनी म्हणजे अशोककुमार गांगुली हे या चित्रपटाचे हिरो होते. अशोककुमार यांची प्रदीर्घ कारकिर्द याच काळापासून सुरु झाली. (अछुत कन्या या चित्रपटाची लिंक )
महात्मा
याच काळात मराठी आणि हिंदी चित्रपटातील दिग्गज दिग्दर्शक व्ही. शांताराम (शांताराम वनकुद्रे) यांचा एक सिनेमा प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा पण एक सामाजिक सिनेमा होता.प्रभात चित्र या नामांकित फिल्म कंपनीच्या बॅनरखाली हा सिनेमा बनवला गेला होता. १९३५ साली हिंदी आणि मराठीत प्रसिद्ध झालेल्या या सिनेमाचे नाव म्हणजे ‘धर्मात्मा’. धर्मात्मा’ या चित्रपटात संत एकनाथांच्या जीवनातील अनेक प्रसंगांचे चित्रण केलेले होते. या सिनेमाचे मूळ नाव ‘महात्मा’ असे होते पण सेन्सॉर बोर्डाच्या आक्षेपामुळे ‘महात्मा’ ऐवजी ‘धर्मात्मा’ असे नाव बदलले गेले. हा एक मास्टरपिस सिनेमा होता. प्रभात फिल्म कंपनी, व्ही. शांताराम, बालगंधर्व, असे दिग्गज लोक या सिनेमाचा हिस्सा होते.
१९३३ साली प्रभात फिल्म कंपनी आणि व्ही.शांताराम यांचा अजून एक सिनेमा प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा पण हिंदी आणि मराठी भाषेत तयार झाला होता. १९३३ साली निर्माण झालेला हा भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिला रंगीत चित्रपट होता. या सिनेमाचे नाव होते सैरंध्री. मा.विनायक, व्ही. शांताराम, प्रभात फिल्म कंपनी आणि संगीतकार गोविंदराव टेंबे या सिनेमाचा प्रमुख हिस्सा होते. हा ऐतिहासिक पट होता. महाभारतातील कथानकावर आधारित चित्रपट होता.
न पटणारी गोष्ट
याच दशकात देविकाराणी यांची बॉम्बे टॉकीज, प्रभात फिल्म कंपनी, न्यू थिएटर, इस्ट इंडिया फिल्म कंपनी, मिनर्वा मुव्हीटोन, अशा नामांकित फिल्म प्रोडक्शन हाऊस निर्माण झाले. अनेक क्लासिक चित्रपट याच काळात निर्माण झाले. १९३० ते १९४० या दशकाचा उल्लेख करताना मराठीतील ‘कुंकू ‘ या सिनेमाचा उल्लेख करावा लागणारच. मराठीत निर्माण झालेला आणि सामाजिक आशयावर बनलेला हा चित्रपट प्रभात फिल्म कंपनी आणि व्ही. शांताराम यांचा अजून एक मास्टरपीस आहे. हाच सिनेमा हिंदीत ‘दुनिया ना माने’ या नावाने प्रदर्शित झाला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर या चित्रपटाची चर्चा झाली होती. त्यावर्षीच्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाचे स्क्रीनिंग झाले होते. प्रसिध्द लेखक ह. ना. आपटे यांच्या ‘न पटणारी गोष्ट ‘ या कादंबरीवर आधारीत हा सिनेमा होता. शांता आपटे, व्ही. शांताराम, केशवराव दाते,ह.ना.आपटे असे दिग्गज या सिनेमाचा हिस्सा होते. ( कुंकू या चित्रपटाची लिंक )
भारतीय चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ
या दशकात कुंदनलाल सहगल, जमुना बरुआ, मा. विठ्ठल, मा. विनायक, देविकाराणी, अशोककुमार, व्ही. शांताराम, पृथ्वीराज कपूर, शांता आपटे, केशवराव दाते, बालगंधर्व, फियरलेस नादिया या दिग्गज लोकांनी धुमाकूळ घातला. नवनवीन प्रयोग केले गेले. संगीत, नृत्य, गायन, दिग्दर्शन, संवाद, छायाचित्रण या सर्व क्षेत्रात अनेक प्रयोग झाले. ऐतिहासिक, सामाजिक, मारधाडपट तसेच प्रेमावरचेही चित्रपट बनवले गेले. हा काळ नवनवीन प्रयोग करण्याचा होता. मर्यादित साधनांवर, तंत्रज्ञानाच्या मर्यादित उपलबध्दतेवरही अनेक क्लासिक चित्रपट तयार झाले. चित्रपट निर्मिती संस्था कोणती आहे यावरून चित्रपट चाले. यामध्ये प्रभात फिल्म कंपनी, बॉम्बे टॉकीज, मिनर्वा मुव्हीटोन, न्यू थिएटर, इस्ट इंडिया फिल्म कंपनी अशा अनेक फिल्म निर्मिती संस्था नावारुपाला आल्या. चित्रपटात कंटेंटला महत्त्व देण्याचा तो काळ होता. भूमिका, दिग्दर्शक, फिल्म कंपनी यावर भर दिला जायचा. भारतीय चित्रपट सृष्टीतील हे दशक सुवर्णकाळ होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
क्रमशः
मागील पोस्ट सिरिज साठी खालील लिंकवर क्लिक करा
1 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने -1
2 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 2
3 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 3
Comments 3