भारतीय चित्रपट सृष्टीला एक शतक होऊन गेले आहे.चित्रपट सृष्टीची सुरुवात कशी झाली हा रंजक इतिहास आहे. चित्रपट निर्माण करण्यात मुंबई, नाशिक, कोल्हापूर, मद्रास आणि बंगालच्या लोकांचा महत्वाचा वाटा आहे. 18 मे 1912 रोजी दादासाहेब तोरणे यांनी श्री पुंडलिक नावाचा पुर्ण लांबीचा पहिला चित्रपट बनवला होता. हा मुकपट एका नाटकाचे चित्रीकरण असल्याची माहिती आंतरजालावर उपलब्ध आहे. तसेच श्री पुंडलिक या चित्रपटाचे प्रोडक्शन हाऊस हे ब्रिटीश होते. पण भारतीय बनावटीचा पहिला चित्रपट म्हणून याच चित्रपटाकडे पाहिले जाते.
राजा हरिश्चंद्र
3 मे 1913 रोजी दादासाहेब फाळके यांनी ‘राजा हरिश्चंद्र नावाचा पहिला मराठी चित्रपट बनवला त्यामध्ये हिंदी आणि इंग्रजी माहितीवजा सबटायटल्स (उपशीर्षके) होती. या सिनेमात त्यांनी राजा हरिश्चंद्र आणि विश्वामित्र यांच्या जीवनावरील अनेक प्रसंग दाखवले आहेत. पौराणिक कथा असलेला हा चित्रपट या लिंकवर पाहता येईल.यानंतर दादासाहेब फाळके यांनी 1913 ते 1919 पर्यंत मोहिनी भस्मासुर, सत्यवान सावित्री,टिळक विक, लंका दहन, सत्यवादी राजा हरिश्चंद्र, श्रीकृष्ण जन्म, कालिया मर्दन असे चित्रपट बनवले.
दुर्गाबाई कामत
नोव्हेंबर 1913 साली बनवलेल्या मोहिनी भस्मासुर या सिनेमात दुर्गाबाई कामत (मराठी ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले यांच्या मातोश्री आणि ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या आजी) आणि कमलाबाई गोखले यांच्या भुमिका होत्या. दुर्गाबाई कामत यांची मुलगी कमलाबाई गोखले या होत. राजा हरिश्चंद्र या त्यांच्या पहिल्या चित्रपटात स्त्री ची भुमिका पुरुष कलावंतांने केली आहे.दादासाहेब फाळके हे नाशिकचे तर दादासाहेब तोरणे हे मालवणचे पण मुंबईत स्थायिक झालेले.
बाबुराव पेंटर
कोल्हापूरच्या बाबुराव पेंटर यांनी संपूर्ण स्वदेशी बनावटीचा कॅमेरा व प्रोजेक्टर कोल्हापूरातच बनवून त्यांनी चित्रपट निर्माण केले.
बाबुराव पेंटर हे चित्रकला, शिल्पकला, धातुकला यात पारंगत होते.सोबतच त्यांनी चित्रपट क्षेत्रातही नावलौकिक मिळवला होता.त्यांनी कोल्हापूर येथे महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. महाराष्ट्र फिल्म कंपनी ही त्याकाळी गाजलेली अग्रेसर चित्रपट बनवणारी संस्था होती.
मुंबईआधी चित्रपटसृष्टीचे माहेरघर कोल्हापूर हे होते. बाबुराव पेंटर यांच्या हाताखाली व्ही. शांताराम, दामले,बाबुराव पेंढारकर, मा. विनायक, नानासाहेब सरपोतदार यांसारखे कलाकार तयार झाले.
रंकाळा तलावाच्या पुर्व बाजूस राज कपूर यांचा पुतळा
मूकपटांतून रुबी मायर्स,मा. विठ्ठल, पृथ्वीराज कपूर, झेबुन्निसा, ललिता पवार यांच्यासारखे दिग्गज कलाकार आणि दिग्दर्शक निर्माण झाले. पृथ्वीराज कपूर यांनी देखील कोल्हापूर येथे वास्तव्य केले आहे. राज कपूर यांच्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात कोल्हापूर येथूनच झाली आहे.कोल्हापुर येथे रंकाळा तलावाच्या पुर्व बाजूस राज कपूर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.
भारतीय चित्रपट निर्माण प्रक्रियेत सत्यजीत रे, ऋत्विक घटक, मृणाल सेन, बुद्धदेव दासगुप्ता, अपर्णा सेन या बंगाली चित्रपट निर्माते दिग्दर्शक यांचे आणि गिरीश कासरावल्ली, अडूर गोपालकृष्णन,जी अरविंदन या दक्षिणभारतीय निर्माते दिग्दर्शक यांचेही योगदान मोठे आहे.
क्रमशः
पुढील पोस्ट सिरिज साठी खालील लिंकवर क्लिक करा
1 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने -1
2 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 2
3 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 3
4 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 4
5 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 5
6 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 6
7 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 7
8 चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 8
9 चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 9
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
Comments 1