सुचरीताची ही स्क्रीप्ट पहिल्यांदा सुचरीतानेच ऐकवली तेव्हाच स्त्री म्हणून माझे स्वत:मधले कितीतरी हुंकार प्रकर्षाने उसळून वर आले होते. सुचरीताची ( रमा नाडगौडा ) प्रगल्भ लेखणी आणि शिवकन्या सुतार या गुणी अभिनेत्रीची स्त्री भावनांचे अनंतरंगी शिवधनुष्य पेलण्याची क्षमता या दोन्ही मजबूत बाबी एकत्र येणे म्हणजे आवर्त.
एखादी स्त्री आयुष्य जगताना तिचे संपूर्ण मनोविश्वही उघडपणे जगून घेते, असे क्वचीतच घडते. बहुतांश स्त्रीया त्यांच्या मनात असलेल्या जगण्याच्या कल्पनांपैकी एक चतुर्थांश कल्पनाही प्रत्यक्ष जगत नाहीत. त्यांना हवं ते पूर्ण जगणं नेमकं काय हे स्वत:च्या जोडीदारापर्यंतही पोहचवण्यातही त्या अपयशी ठरतात.जोडीदार स्त्रीमन समजून घेणारा असेल तर थोडंबहूत जमतं. पण नसेल तर मात्र मातीच सगळी.
सहजीवन हा तसाही भासच
आवर्तची ‘ सरी ‘ ही अशीच एक जरा जास्तच साधी स्त्री. तिचे संसारीक स्वप्नही साधेच. तिला स्त्री पुरुष किंवा नवरा बायकोमधील शरीर संबंधांची माहितीच त्रोटक. नवरा किंवा पुरुषाला रिझवण्याचे काही वेगळे मार्ग असतात किंवा पुरुषाची स्त्रीकडून सहज समागमाच्या पुढे जाऊन आणखीही काही चित्रविचित्र मागणी असू शकते याची तिला जाणच नाही. तिचे याबाबतीतले वाचन, अभ्यास, अनुभव सारेच तोकडे.
शरीर मानसिक पातळीवर सहज एकरुप होणे या तिच्या निरलस समागमाच्या अपेक्षा.
दोघांतले संबंध हळूवार, सुलभ आणि प्रेमळ असावेत इतपतच मागणी तिची देहीक आणि मानसिकही.
उच्छृंखल स्वभावाच्या नव-याचे अर्थातच त्यामुळे समाधान अशक्य. त्याची चिडचिड, आग्रह यामुळे साध्या सरळ सरीला अनेक गोष्टींची किळसच निर्माण होते. त्यातून मग सतत हात धुणे, घर स्वच्छ करणे, त्याही पुढे जाऊन सतत बाथरुममध्ये जाऊन असतील नसतील ते कपडे धुणे, वाळत घालणे, वाळलेले परत घरात घेणे अशा विचित्र सवयी जडतात. या सवयींचे रुपांतर व्यसनात कधी होते ते तिलाही कळत नाही.
दुर्दैव म्हणजे सरीला अपत्यही होत नाही
एकूणच,
सरीमधला नव-याचा रस संपण्यास आणि तो इतर कुठेतरी रमण्यास इतकी कारणे पुष्कळच.
तो त्याच्यामते निरस असणा-या सरीकडे संपूर्ण दुर्लक्ष करायला लागतो. तिला एकटं टाकून मजेत जगतो.
एकटेपणातच पुढे सरीच्या देहाला कधीतरी तिच्या ‘ देहाच्या ख-या हाका ‘ ऐकू येऊ लागतात.
त्या हाका योग्य की अयोग्य या द्वंद्वातही ती इतकी गुरफुटते की तिला मानसिक तज्ञांची मदतही शेवटी तोकडी पडते.
शरीर – मन पातळीवर थकलेली सरी स्वभावाने साधी असली तरी मुळात बुध्दीमान असतेच.
तिला तिच्या माहेरची ब-यापैकी आर्थिक सुरक्षितताही लाभलेली असते.त्या आधारावर शेवटी ती स्वत:पुरता एक योग्य मार्ग शोधतेच.
पण आजुबाजूच्या अनेक सरींना अशी ‘ मुक्ती’ मिळते का? हा प्रश्न मागे ठेवून.
आवर्त ………..स्त्रीला तिच्यात दडलेल्या असंख्य हुंकांराची स्पष्ट जाणिव करुन देण्याचा एक यशस्वी प्रयत्न.
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 21, 2022, 18:46 PM
WebTitle – Avart Marathi Drama : The innumerable, inescapable, unrelenting roars of women’s senses