राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आणायची आहे का ?
वादग्रस्त वक्तव्य करण्यात प्रसिध्द असलेली अन् प्रसिध्दीच्या झोतात राहणारी अभिनेत्री कंगना राणावत यांनी स्वातंत्र्य लढ्याबद्दल अवमानकारक वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर देशभरातून तिव्र प्रतिक्रिया उमटल्या. स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र सैनिकांचा अन् स्वातंत्र्य रणसंग्रामाचा अपमानाबद्दल अनेकांनी कंगनाचा निषेध करुन, पद्मश्री परत घ्या अशी मागणी केली.
तुमच्या वक्तव्यात संविधानाची कर्तव्ये मुलभूत तत्वेही कुठेचं दिसली नाहीत
कंगना राणावतने स्वातंत्र्य रणसंग्रामाचा अवमान केलेला असतांना जेष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंनी मात्र, कंगनाचं समर्थन करुन, ‘भारत कधीही हिरवा होणार नाही याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. हा देश भगवाचं राहिला पाहिजे’ अशी वादग्रस्त भंपक वक्तव्ये केली. पण, अशी वादग्रस्त वक्तव्यं करुन लोकांच्या भावना भडकवू नका किंवा परिस्थिती चिघळवण्याचा पोरकटपणा करु नका.
तुमच्या वादग्रस्त वक्तव्याने भुवया उंचावल्या नसल्या तरी, वयाच्या अमृतमहोत्सवी वर्षात त्यांनी पद्मश्री पुरस्कारासाठी आपली इनामदारी तर दाखवली नसेल ना अशी चर्चा मात्र सुरु झाली. गोखले साहेब, कलाकाराला जात नसते असे म्हणतात. पण, कलाकार म्हणून तुम्ही केलेल्या वक्तव्याला देशप्रेम नव्हे तर देशद्रोह म्हणावा लागेल.
तुम्ही कलाकार म्हणून चांगले असाल पण, तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हे अखंड भारत देशांने अनुभवले. तुम्हांला बेजबाबदार विचारवंत नट म्हणूनही ओळखले जाते. कलाकार म्हणून तुम्हांला देशाबद्दल, संविधानाबद्दल नितांत प्रेम असते तर तुम्ही अशी बेताल वक्तव्ये केलीचं नसती. संविधानातील मुलभूत तत्वांचे अन् वक्तव्यांचे प्रामाणिकपणे पालन करणे म्हणजे खरे देशप्रेम. पण, तुमच्यात जाती अहंकार ठाचून भरलेला आहे.तुमच्या वक्तव्यात संविधानाची कर्तव्ये सोडून द्या पण, मुलभूत तत्वेही कुठेचं दिसली नाहीत.
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व धर्मनिरपेक्षता
तुम्ही कंगनाचं समर्थन करुन, ‘भारत देश संपुर्ण हिरवा व्हावा यासाठी कटकारस्थान’ असे वक्तव्य केलात यातूनचं तुमचं संविधानाविषयी अज्ञान अन् एका जबाबदार कलाकाराचा खरा चेहरा समोर आला. कारण, आधुनिक अखंड भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी आपल्या भारत देशाला संविधान अर्पण केले अन् २६ जानेवारी १९५० पासून, पुर्वीची सर्व व्यवस्था संपुष्टात येऊन भारतात संविधानिक लोकसत्ताक कार्यप्रणाली अस्तित्त्वात आली.
बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व धर्मनिरपेक्षता या संविधानिक तत्वांवर देशाची एकता, अखंडता अन् राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे महान, अनमोल कार्य केले. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा सन्मानपुर्वक मुलभूत अधिकार दिला. त्याचं संविधानिक लोकशाहीव्दारे आपण गेली ७१ वर्षे अनेक क्षेत्रात दमदार वाटचाल करत आहोत, जागतिक स्पर्धेत आहोत.
धर्मांध समाजकंटक
केंद्रात भाजपाचं सरकार असून इतर बहुसंख्य राज्यातही भाजपाची सत्ता असतांना
भारत देश संपुर्ण हिरवा व्हावा यासाठी कटकारस्थान सुरु असल्याचा भास तुम्हांला कसा झाला तेचं कळत नाही.गोखले काका, काही जातीवादी बेगडी देशभक्त व बिनडोक बांडगुळे संविधान अन् देशातील सामाजिक परिस्थितीबद्दल सतत गरळ ओकतचं असतात, त्यामुळे तुमच्या वक्तव्याबद्दल तस आम्हांला काही आश्चर्य वाटलं नाही.
भारतात अनेक जाती, धर्म, रुढी, परंपरा, पंथ, वर्ण व्यवस्था अशी विभिन्न परिस्थिती अस्तित्त्वात असतांना
संविधानाने भारताचे अखंडत्व राखले आहे हे मात्र तुम्ही विसरु नका.
मात्र, काही धर्मांध समाजकंटक जातीय मानसिकतेतून देशांतर्गत सामाजिक सलोखा बिघडविण्यासाठी
सतत उचापती करतांना दिसून येतात. म्हणजे संविधानाची मुलभूत तत्वे त्यांना मान्य नाहीत हेच सिध्द होते.
देशात काय अराजकता, हिंसाचार माजेल याचा विचारही न केलेला बरा
त्यामुळेचं सनातनी प्रवृत्तीची बांडगुळे संविधानाचा सातत्यांने अवमान करुन मनुस्मृतीचे समर्थन करतात हा देशद्रोह नाही का गोखले काका ? त्यांना संविधान बदलण्यामागे चातुर्वण्य, मनुवादी व्यवस्था अपेक्षित आहे का ? संविधान नाकारणे म्हणजे माणूस म्हणून जगण्याचा मुलभूत अधिकारचं नाकारण्यासारखे आहे हो.
सामाजिक विषमता, जातीयता, निर्दयता, उचनिचता, अन्याय अत्याचार
अशा अनेक भ्रामक गोष्टींचे प्रतिक असलेल्या मनुस्मृती ग्रंथाच्या (चातुर्वण्य) आधारावर भारतीय राज्य घटना निर्माण झाली तर,
अनेक जाती, धर्म, रुढी, परंपरा, पंथ, वर्ण व्यवस्था, विषमता असलेल्या भारत देशाची अवस्था काय होईल
अन् देशात काय अराजकता, हिंसाचार माजेल याचा विचारही न केलेला बरा.
भारतीय आपली ओळख व राष्ट्रीयत्व
इथल्या जातीवादी व्यवस्थेला विषमता, जाती व्यवस्था महत्वाची असल्यानेचं, पुरीच्या जगन्नाथ मंदिरात राष्ट्रपतींना भेदभावाची वागणूक मिळते, शबरीमल मंदिरात महिलांना प्रवेश नाकारला जातो तर, सनातनी अंध भक्तांना अभिप्रेत असलेली घटना अस्तित्त्वात आली तर, उपेक्षित घटकांच जीणंच मुश्किल होईल. त्यामुळे बेताल वक्तव्ये करुन अन् समाजकंटकांच्या माध्यमातून अनुचित प्रकार घडवून, सामाजिक सलोखा दुषीत करुन संविधानाला धक्का लागला तर, बाबासाहेबांनी महत् प्रयासाने उभारलेला लोकशाहीचा डोलारा उध्वस्त होऊन देशात सामाजिक विषमता, हुकूमशाही, धर्मसत्ताक प्रणाली निर्माण होऊन अराजकता माजेल, राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येईल. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला जाती, धर्म, प्रांतापेक्षा स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय तसेच देशाची एकता, अखंडता अन् धर्मनिरपेक्षता अत्यंत महत्त्वाची आहे. जाती धर्मापेक्षा भारतीय हीच आपली ओळख व राष्ट्रीयत्व निर्माण झाले पाहिजे.
अराजकता माजेल अशी परिस्थिती निर्माण करण्याचा विचार देखील मनात आणू नये.
९ ऑगस्ट २०१८ रोजी जंतर मंतरवर दिपक गौडने आरक्षण हटाव, देश बचाव असा नारा देत संविधानाच्या प्रती जाळल्या, २२ ऑगस्ट २०२० रोजी मराठी दिग्दर्शक, अभिनेते प्रविण तरडे यांनी गणपती डेकोरेशनसाठी पुस्तकांचा वापर करुन, गणेश मूर्ती संविधानावर विराजमान केल्यांने भारतीय संविधान प्रेमींनी चौफेर टिका करताचं अखेर त्यांनी व्हिडीओव्दारे माफीनामा सादर केला. तर त्याचं गणपती डेकोरेशनवरुन विश्व हिंदुत्व पेजवर ऐन गणेश चतुर्थीच्या दिवशी हे कसले रद्दीचे उपद्याप ? अशा अश्लाघ्य शब्दांत संविधानाचे अवमुल्यन करण्यात आले होते.
त्यावेळी किती बेगडी देशभक्तांनी निषेध व्यक्त केला ? दिपक गौड, विश्व हिंदुत्व पेजवर काय कारवाई झाली ? तुम्ही तरी कधी निषेध केला का गोखले काका ? त्यामुळे, एक भारतीय जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही केलेली वक्तव्ये किती योग्य आहेत त्याचं वयाच्या अमृतमहोत्सवी वर्षात आत्मचिंतन अन् आत्मपरिक्षण केलं तर बरचं होईल. कारण, देशासमोर आज अनेक प्रश्न असतांना देशात अराजकता माजेल अशी परिस्थिती निर्माण करण्याचा कोणत्याही जाती धर्माने किंवा राजकिय पक्षांने विचार देखील मनात आणू नये.
क्षुद्र राजकारणासाठी तणाव निर्माण करण्याची वक्तव्यं का करता ?
आपले संविधान सक्षम व सर्वसमावेशक नसते तर, जाती व्यवस्थेने आपल्या देशाची अवस्था अफगानिस्तान, पाकिस्तानपेक्षाही भयानक अन् भयावह करुन टाकली असती. पण, संविधानांने सर्वांनाचं स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय तसेच देशाची एकात्मता, अखंडता, धर्मनिरपेक्षता राखण्याची जबाबदारी दिली आहे. मात्र, संविधान दिनी उद्दिशिकेचे वाचन करुन, स्तुतीसुमने उधळायची अन् त्याचं संविधानाच्या उद्दिष्ठाना छेद द्यायचा हे देशप्रेमाच्या कक्षेत बसणार नाही.
जागतिक कोरोना महामारीने तर सर्वांनाचं माणूसकी शिकविली.
त्यावेळी कोणी जात, धर्म न पाहता एकमेकांना माणुसकीच्या दृष्टिकोणातून मदत केली.
अहो, रक्ताची अत्यावशकता लागते त्यावेळी आपण रक्ताचा रंग पाहत नाही मग,
सोयीच्या शुद्र राजकारणासाठी माणसा माणसांमध्ये तणाव निर्माण करण्याची वक्तव्यं का करता ?
एकता,अखंडता अन् राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आणून काय साध्य होणार आहे ?
जातीव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्यांना समतावादी घटना नको आहे हे सर्व भारतीयांना माहित आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेत न्याय, व्यक्ती, स्वातंत्र्य, समानता, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता, बंधुता या मानवी मुल्यांचा घटनाकारांनी उल्लेख, पुरस्कार केला आहे. ही घटना आम्ही स्विकारली, ही किती अभिमानास्पद बाब आहे. पण, हे प्रास्ताविकही काही जातीवादी बेगडी देशभक्तांना मान्य नाही अन् संविधानही मान्य नाही. मग त्यांना जाती धर्माच्या आधारे घटना अपेक्षित असून, देशावर जाती व्यवस्था लादण्याचा, हुकूमशाही निर्माण करण्याचा, जाती व्यवस्था घट्ट करण्याचाचं कुटील डाव, षडयंत्र, अजेंडा आहे ना ?
राज्यघटनेव्दारे धर्मनिरपेक्षता स्विकारणारा देश ही जागतिक ओळख पुसण्याचा प्रयत्न चालू आहे ना ? घटनेत धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना मांडली असतांना, धार्मिक अन् जातीय राजकारण केले जाते हा देशद्रोह नाही का ? संविधान सभेत प्रत्येक मुद्द्यांवर सखोल, अभ्यासपुर्ण चर्चा करुन, एकेक मुद्दा तपासूनचं संविधानाची निर्मिती केली. संविधानांने स्वतःला आधुनिक वैज्ञानिक जगाशी अन् भारताच्या प्राचीन परंपरा यांच्याशी समतोल साधण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला असतांना, सतत वादग्रस्त विधानाव्दारे देशातील सामाजिक वातावरण गढूळ करुन देशाची एकता, अखंडता अन् राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आणून काय साध्य होणार आहे ? तुम्ही देशात कितीही जाती धर्माचे राजकारण केलात तरी, परदेशात जाता तुमची भारतीय म्हणूनचं ओळख असते एवढ मात्र विसरु नका गोखले साहेब.
एनसीबीची मोठी कारवाई नांदेड मध्ये 1127 किलो गांजा जप्त
गया मध्ये नक्षलवाद्यांचे तांडव, एकाच कुटुंबातील चार जणांना फाशी
“जय भीम” फिल्म पाहिल्यानंतर अभिनेत्याने “पार्वती” साठी घर देण्याचे ठरवले
जय भीम चित्रपट:पोलिसांनी बॅग भरून लाच देण्याचा प्रयत्न केला न्या.चंद्रू
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 16, 2021 08:51 AM
WebTitle – Want to jeopardize national unity?