उत्तर प्रदेशचे मंत्री संजय सिंह गंगवार यांनी एक अजब दावा केला आहे. संजय सिंह गंगवार यांनी म्हटले आहे की, गौशाळेत झोपून आणि तिची साफसफाई करून कॅन्सर बरा होऊ शकतो. तसेच त्यांनी असेही सांगितले की, गायीच्या पाठीवर हात फिरवल्याने रक्तदाब कमी होऊ शकतो. रविवारी, गंगवार यांनी 55 लाख रुपये खर्चून बांधलेल्या कान्हा गौशाळेचं उद्घाटन नौगाव पकडिया येथे केलं आणि त्यानंतर एका जाहीर सभेत हे विधान केलं.
दाव्याचे समर्थन करताना गंगवार म्हणाले
गंगवार यांनी सभा संबोधित करताना सांगितले, “जर कोणाला रक्तदाबाची समस्या असेल तर येथे गायी आहेत. त्याने सकाळ-संध्याकाळ गायीच्या पाठीवर हात फिरवावा आणि तिची सेवा करावी. जर एखादी व्यक्ती 20 मि.ग्रा रक्तदाबाची गोळी घेत असेल तर 10 दिवसात ती मात्रा 10 मि.ग्रा वर येईल. हे मी पूर्णपणे टेस्टेड आहे म्हणून सांगतो.”
तसेच पुढे ते म्हणाले, “कॅन्सर असलेल्या रुग्णाने गौशाळेची साफसफाई सुरू केली आणि तिथे झोपायला सुरुवात केली तर कॅन्सर सारखा आजारही बरा होईल. जर तुम्ही गायीच्या शेणाचे उपले जाळले तर मच्छरांपासून सुटका मिळते. गाय जे काही तयार करते ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे उपयुक्त असते.”
शेतकऱ्यांना देखील फटकारले
राज्यमंत्र्यांनी मोकाट जनावरांमुळे शेतांमध्ये नुकसान होत असल्याची तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांना फटकारले.
“आपण आपल्या (गाईची) आईची सेवा करत नाही आहोत, त्यामुळे आई (गाय) आपल्याला नुकसान पोहोचवतेय,” असं ते म्हणाले.
त्यांनी मुस्लिम समाजालाही ईदच्या दिवशी गौशाळेत यावं आणि ईदच्या सवीय्या गायीच्या दुधातूनच बनवाव्यात, असा सल्लाही दिला.
या नव्याने उद्घाटन झालेल्या गौशाळेत जनावरांच्या चाऱ्याची आणि औषधोपचारांची सोय करण्यात आली आहे.
मंत्री म्हणाले, “आमचा उद्देश लोकांना गौशाळांशी जोडण्याचा आहे.
लोकांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला, मुलांच्या वाढदिवसाला गायीसोबत साजरा करावा आणि चारा दान करावा,” असे त्यांनी आवाहन केलं.
संजय सिंह गंगवार कायम चर्चेत
गंगवार यांनी 2012 मध्ये बसपाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती, पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला. 2017 मध्ये ते भाजपमध्ये दाखल झाले आणि पीलीभीत मतदारसंघातून निवडून आले. 2022 मध्ये ते पुन्हा निवडून आले आणि त्यांना मंत्रीपद मिळाले. गंगवार नेहमी चर्चेत असतात, विशेषत: ते माजी भाजप खासदार वरुण गांधींवर टीका करत असतात.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 15,2024 | 21:15 PM
WebTitle – UP Minister Sanjay Singh Gangwar Claims Petting Cows Lowers Blood Pressure and Lying in Gaushala Cures Cancer