भारतीय संविधानाचे शिल्पकार,समाजपरिवर्तनासाठी झटणारा क्रांतिकारक, प्रखर बुद्धिवादी, तत्त्वज्ञ आणि सामाजिक क्रांतीचे नेतृत्व करणारे Dr. B. R. Ambedkar डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आपण प्रामुख्याने संविधाननिर्माते आणि विचारवंत म्हणून ओळखतो. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक कमी चर्चिला गेलेला पैलू म्हणजे माध्यमांविषयीची त्यांची दृष्टी. पुस्तकांना प्राधान्य देणाऱ्या या अभ्यासकाने सिनेमा या नव्या माध्यमाकडे केवळ मनोरंजन म्हणून नव्हे, तर समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन म्हणून पाहिले. पुढे येणाऱ्या काळात सिनेमा जनमत घडवू शकतो, याची जाणीव त्यांना खूप आधी झाली होती. बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात फक्त 10 -१२ सिनेमे पहिले असतील. तसं ते स्वतःच मान्य करतात कि ते सिनेमाचे फॅन नाहीत पुस्तकांचे आहेत पण सिनेमा हे प्रभावी माध्यम होऊ शकतं येणाऱ्या काळात असा त्यांचा विश्वास होता
पट्ठे बापूराव किंवा दिलीप कुमार यांच्याकडून पैसे किंवा देणगी घेतली नाही या एका माहितीवर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सिनेमा त्यांच्यासाठी नावडता विषय होता असा समज करून घेतला पण तो साफ चुकीचा आहे, संगीताची, गाण्याची आवड असलेल्या व्यक्तीला सिनेमा वर्ज्य कसा असू शकेल ? त्यांचा आक्षेप चित्रपट सृष्टीत नंतरच्या कालावधीत सुरु झालेल्या व्यभिचाराला होता तसेच दलित स्त्रियांना स्टेजवर नाचवून, वापर करून घेण्यावर होता तसं त्यांनी आपल्या फटकळ स्वभावाने बोलूनही दाखवलं, पण बाबासाहेबांनी बरेच सिनेमे पाहिले होते त्यावर चर्चा केली होती, समीक्षा केली होती.
“तरुणांनी सिनेमा निर्मितीकडे वळलं पाहिजे” – डॉ बाबासाहेब आंबेडकर
“तरुणांनी सिनेमा निर्मितीकडे वळलं पाहिजे …” – होय, हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य आहे.
जून 1941 सालच्या फिल्म इंडिया या साप्ताहिकात छापून आलेल्या त्यांच्या मुलाखतीत
बाबासाहेबांनी तमाम वाचकांना उद्देशून सिनेमा निर्मिती कशी सामाजिक विषयांवर असलेली हवी हे सांगितलं.
बाबासाहेब मान्य करतात कि, “मी, कोणत्याही दृष्टीने, चित्रपट क्षेत्रातील माणूस नाही, चाहतादेखील नाही. मी हे माझे दुर्दैव समजतो. परंतु आयुष्यात बरेच पुढे गेल्यावर, आपल्या सवयी आणि आवडी बदलणे शक्य नसते. माझी एकमेव आवड म्हणजे पुस्तके. मी त्यांचा अतिशय आवडीने वाचक आहे. कधीतरी, जेव्हा लिहिण्याची अनावर इच्छा होते, तेव्हा मी एखादे पुस्तक लिहितोही. पण चित्रपट ही माझी आवड असती तर बरं झालं असतं कारण शिक्षणाचे माध्यम म्हणून पुस्तकांपेक्षा चित्रपट हे निःसंशयपणे अधिक प्रभावी आणि शक्तिशाली साधन आहेत. बहुतेक लोकांना दृश्य, प्रतिमा, गोष्टींच्या चित्रांद्वारे शिकवावे लागते. चित्रपट पाहताना तुम्ही तुमच्या सर्व इंद्रियांचा पुरेपूर वापर करता, आणि त्यामुळे शिक्षण अधिक सोपे व परिणामकारक होते. फिल्म इंडिया च्या वाचकांना मी विनंती करतो की त्यांनी सामाजिक कल्याणासाठी व सामाजिक सेवेसाठीचित्रपट तंत्राचा उपयोग करावा आणि शक्य तितका वैविध्यपूर्ण आणि गहाण विषय मांडावेत.
बाबासाहेबांनी पाहिलेलं सिनेमे –
1) 1927 साली आलेला अमेरिकेतील वर्ण भेदावर आधारित सिनेमा “Uncle Tom’s Cabin” त्यांनी पहिला होता,याचा संदर्भ त्यांनी बऱ्याचदा दिला होता
2) 1935 साली आलेला व्ही शांतारामांचा संत एकनाथांवरील “धर्मात्मा” हा सिनेमा त्यांनी पहिला
3) 1937 साली आलेल्या शांता आपटे आणि बाळ गंधर्व अभिनित, व्ही शांताराम दिग्दर्शित “कुंकू” हा सिनेमा त्यांनी पहिला होता,
या सिनेमाचा संदर्भ त्यांनी माईसाहेबांना लिहिलेल्या पात्रात आहे
4) 1936 साली आलेला “अछूत कन्या“ हा सिनेमा त्यांनी पहिला होता, अशोक कुमार यामध्ये अभिनेते आहेत
5) 1935 सालचा tale of two cities”
6) 1938 सालचा : The Birth of a baby”
7) 1948 सालचा “ऑलिव्हर ट्विस्टर” त्यांनी माईसाहेबांसोबत पहिला होता
8) 1955 सालचा आचार्य अत्रे निर्मित “महात्मा फुले” त्यांनी माईसाहेबांसोबत पहिला होता
“तरुणांनी सिनेमा निर्मितीकडे वळलं पाहिजे” – डॉ बाबासाहेब आंबेडकर
मुलाखतीत ते खेदाने व्यक्त होतात, “आपल्या देशातील लोकांचे आयुष्य नीरस, कंटाळवाणे आहे.जणू काही लादलेलेच. मला असे वाटते की आपण या जगात जन्म घेणे ही देवाने दिलेली शिक्षा आहे. आपल्या लोकांना जीवनाकडे पाहायला शिकवण्याचे, जीवनावर हसण्याचे, स्वतःवर हसण्याचे, आत्मपरीक्षण आणि आत्मटीका करण्याचे चित्रपट हे सर्वोत्तम माध्यम आहे.…चित्रपट सर्वांच्या आवाक्यात आहेत आणि ते देशाच्या कानाकोपऱ्यात पसरावेत अशी माझी इच्छा आहे, कारण आपल्या अतिशय तणावग्रस्त लोकांना विरंगुळा देण्याचे हे अत्यंत आवश्यक कार्य ते पार पाडतात. भारत देशाचं ब्राह्मणीकरण होत चाललं आहे ही मक्तेदारी मोडायची असेल तर प्रभावशाली सिनेमा तयार केले पाहिजे, फक्त पौराणिक विषय आणि कालबाह्य कल्पना न दाखवता सत्य परिस्थिती दाखवली गेली पाहिजे ज्याचा लोकांवर प्रभाव पडेल आणि बदल घडून येईल . बाबासाहेबांच्या मते “प्रगतीशील कथानक ही केवळ कला नव्हती,तर ती एक जबाबदारी आहे.
प्रोपोगंडा फाइल्स सिनेमा बद्दल दूरदृष्टी असलेले डॉ.आंबेडकर
बाबासाहेब एक आठवण सांगतात, “काही काळापूर्वी मी ‘द बर्थ ऑफ अ बेबी’ नावाचा एक चित्रपट पाहिला. शैक्षणिक आणि प्रचारात्मक चित्रपट कसा असावा याचे ते माझ्या मते उत्तम उदाहरण आहे. त्या चित्रपटात एकही प्रसिद्ध तारा नव्हता. डॉक्टर, नर्स, रुग्ण, पती-पत्नी अशा भूमिका करणारे सर्व लोक अगदी सामान्य होते. किशोरवयीन मुला-मुलींनी विवाहपूर्व, विवाहोत्तर आणि वैवाहिक जीवनाच्या टप्प्यांमध्ये कसे वागावे आणि नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी हे तो चित्रपट किती प्रभावीपणे शिकवतो ! अवांछित प्रकारच्या गर्भपाताविरुद्ध आणि योग्य प्रकारच्या संततिनियमनाविषयी किती प्रभावी प्रचार त्या चित्रपटात होता ! भारतीय परिस्थितीला अनुरूप थोडेफार बदल करून तो चित्रपट कॉपी करण्याची परवानगी इथल्या एखाद्या निर्मिती कंपनीला मिळावी अशी माझी इच्छा आहे. ती एक अत्यंत आवश्यक सामाजिक सेवा ठरेल” (या सिनेमात पहिल्यांदा बाळाची डिलिव्हरी दाखवली असल्याने अमेरिकेत हा सिनेमा नंतर बॅन करण्यात आला होता)
1915 साली अमेरिकेत प्रदर्शित झालेल्या आणि तितकीच वादग्रस्त ठरलेल्या “द बर्थ ऑफ या नेशन ” फिल्ममध्ये कृष्णवर्णीय अमेरिकन लोकांच्या वर्णद्वेषी चित्रणासाठी आणि कु क्लक्स क्लॅनच्या उदात्तीकरणासाठी ज्याचा मोठ्या प्रमाणावर निषेध केला गेला. यामुळे विशेषतः NAACP सारख्या नागरी हक्क संघटनांकडून व्यापक निषेध नोंदवला गेला, आणि सिनेमा कला आणि प्रचार (प्रोपागंडा) अशा दोन्ही भूमिका कशी बजावू शकतो याचे हे एक अस्वस्थ करणारे उदाहरण म्हणून आजही राहिले आहे, याच काळात बाबासाहेब म्हणजे 1913 ते 1916 दरम्यान बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेत होते, त्याकाळी अमेरिकेत या सिनेमावरून खूप गदारोळ झाला होता, अभ्यासकांच्या मते बाबासाहेबानी हा सिनेमा नक्की पहिला होता कारण पुढच्या काही प्रसंगात, चर्चेत बाबासाहेब या सिनेमाबद्दल बोलत असत.
बाबासाहेबांच्या शेवटच्या काळात म्हणजे 1931 ते 1955 या कालखंडात व्ही शांताराम, आचार्य अत्रे या सिनेक्षेत्रातील मंडळी बाबासाहेबांच्या संपर्कात होत्या.
१९३० च्या सुरुवातीच्या काळात व्ही. शांताराम (शांताराम वाणकुद्रे) यांच्यासारखे महान चित्रपट निर्माते उदयास आले, ज्यांनी भारतीय सिनेमाची शैलीच बदलून टाकली.बाबासाहेबांना अपेक्षित असलेले सामाजिक विषय, नाविन्यपूर्ण दृश्ये आणि कथानकं (Storytelling) एकत्र आणणारे शांताराम हे सिनेमाकडे केवळ कला म्हणून नाही तर समाजपरिवर्तनाचे साधन म्हणून पाहणारे पहिले दिग्दर्शक होते. त्याकाळात म्हणजे 1925 मध्ये “सावकारी पाश” सिनेमा काढून त्यांनी सेनेविश्वाला हादरा दिला होता. व्ही शांताराम आणि बाबासाहेबांचे सलोख्याचे संबंध यासाठी देखील होते कारण व्ही शांताराम बौद्ध धर्माला फार मानत असे, मुंबई दादर इथे असलेल्या प्लाझा सिनेमागृहाचे बांधकाम आधी बौद्ध सांची स्तूपाप्रमाणे होते (आता ते बदलले आहे) मजेची बाब म्हणजे शांताराम यांची मुलगी, राजश्री हि बाबासाहेबांच्या सिद्धार्थ महाविद्यालयाची विद्यार्थी होती तसेच सुपरस्टार जितेंद्र सुद्धा सिद्धार्थ कॉलेज मध्ये होता. आणखी एक महत्वाचं, व्ही शांताराम यांच्या “अमृत मंथन” सिनेमात शांतीप्रिय, सुज्ञ बुद्धिस्ट राजाचा खून प्रतिगामी हिंदू राजपुत्र कसा फसवून करतो वगैरे दाखवलं आहे.
उपलब्ध संदर्भानुसार बाबासाहेबानी व्ही शांताराम यांच्या 2 फिल्म्स पहिल्या होत्या, त्या म्हणजे संत एकनाथांवर आधारित 1935 ची बाल गंधर्व यांची पहिली पुरुष भूमिका असलेली “धर्मात्मा” आणि 1937 साली आलेली शांत आपटे अभिनित फिल्म “कुंकू”. धर्मात्मा सिनेमावर बाबासाहेबानी कठोर शब्दात समीक्षा केली होती, संत एकनाथ यांचा जाती व्यवस्थेला, जातिभेदाला विरोध म्हणून ते अस्पृश्यांना जवळ घेतात आणि सहभोजन करतात असं नाही तर जातीय विटाळ गंगेच्या पवित्र पाण्याने शुद्ध करता येतो असा त्यांचा समाज होता अशी खरमरीत टीका बाबासाहेबांनी केली आणि त्यामुळेच वर नमूद केल्याप्रमाणे फक्तपौराणिक कथांत सिनेमा अडकता काम नये तर नवनवीन आणि जागृती करणारे विषय सेने निर्मात्यांनी घ्यायला हवेत असं त्यांना वाटायचं बाबासाहेबांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नी माईसाहेबांना लिहिलेल्या पत्रात “कुंकू” सिनेमाचा उल्लेख आहे (सविता आंबेडकर यांचे ” बाबासाहेबांच्या सहवासात” पुस्तक वाचतोय त्यावर वेगळा लेख लिहीन)
मास्टर कृष्णा फुलांब्रीकर हे त्यावेळचे सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक, ज्यांनी अतिशय वेगळ्या बंदिशी, राग तयार केले होते, सिनेसृष्टीत आघाडीचे संगीतकार, गायक म्हणून त्यांची ख्याती होती. “वंदे मातरम” ची चाल मास्टर कृष्णा यांनीच लावली. ते त्यांनी संपूर्ण संविधान सभेसमोर त्यांनी सादर केले त्यावेळी बाबासाहेबांनी मास्टर कृष्णा यांना विनंती केली कि त्यांनी बुद्ध वंदनेला संगीतबद्ध करावं, कृष्णा यांनी बाबासाहेबांच्या विनंतीला मान देऊन पाली भाषा शिकली आणि सुमधुर संगीतासह बुद्ध वंदना तयार केली, 78 rpm ची रेकॉर्ड बाबासाहेबांनी तयार करून घेतली जी बाबासाहेबांच्या नागपूरच्या धर्मांतर कार्यक्रमात लावण्यात आली होती (यु ट्यूबवर उपलब्ध आहे), याच कृष्णा यांनी व्ही शांताराम यांच्या धर्मात्मा सिनेमात भूमिका केली होती.
आंबेडकर सिनेमा पाहायला आले अन दंगल होता होता राहिली..
1936 मध्ये आलेल्या हिमांशू राय यांच्या निर्मित आणि अशोक कुमार अभिनित “अछूत कन्या” सिनेमाच्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता,या सिनेमात अस्पृश्य पात्र आणि जातीय भेदभाव अधोरेखित केलेले चित्रीकरण दाखवल्याने लोक चिडले होते,हा वाद इतका वाढला कि दंगल सदृशपरिस्थिती निर्माण झाली होती. बॉम्बे टॉकीज सिनेमागृहात सिनेमावर लोकांनी बंदी घालण्याची मागणी केली गेली होती, सिनेमा सुरळीत प्रदर्शित व्हावा म्हणून निर्मात्याने तसेच तत्कालीन गव्हर्नर यांनी डॉक्टर बाबासाहेबांना सांगून सिनेमा पाहायला आमंत्रित केले होते,त्यानुसार बाबासाहेब हा सिनेमा पाहायला गेले. बाबासाहेब आले म्हणजे सोबत त्यांचे इतर सहकारी अन शेकडो कार्यकर्ते आले.ही बातमी समजल्यावर दंगलीची मानसिकता बाळगून आलेले लोक माघारी फिरले.त्यानंतर कुठल्याही प्रकारचे आंदोलन झाले नाही सिनेमा सुरळीत सुरु झाला, अशी माहिती सेन्सर बोर्डच्या एका कर्मचाऱ्यांनी सांगितली.
सिनेमा – अण्णादुराई आणि आंबेडकर
आणखी एक संदर्भ इथे नमूद करावा वाटतो, तो म्हणजे तामिळनाडूतील DMK पक्षाचे संस्थापक
आणि तामिळनाडूचे एकेकाळचे आघाडीचे जननायक तसेच फिल्म निर्माते अण्णादुराई यांचे 1940 च्या दरम्यान बाबासाहेबांशी मैत्रीपूर्ण संबंध होते,
त्यांच्यात सिनेमा आणि सिनेमाचे विषय, सिनेमाचा प्रभाव यावर बरीच चर्चा होत.
अण्णादुराई पेरियार स्वामींचे शिष्य असल्याने त्यांच्या मध्यस्थीने बाबासाहेब आणि पेरियार यांची भेट झाली.
आणि दोघांची मुंबई धारावी इथे सभा भरवण्यात आली होती,बाबासाहेबांच्या बौद्ध धर्मांतरास अण्णादुराई यांनी भलं मोठं पत्र लिहून शुभेच्छा दिल्या होत्या.
अण्णादुराई यांनी 10 -१२ सिनेमे तसेच बरेच साहित्य लिहून ठेवले आहे.
अण्णादुराई यांनी बाबासाहेबांचे इंग्लिश भाषणे तामिळ मध्ये भाषांतर करून सादर केली आहेत.
आचार्य अत्रे यांच्या बहुचर्चित अशा भालजी पेंढारकर आणि सुलोचना अभिनित सिनेमा “महात्मा फुले” च्या शूटिंग दरम्यान
आणि सिनेमाच्या उदघाटनाला बाबासाहेबांना बोलावण्यात आले होते,
या सिनेमात साक्षात गाडगे बाबा दिसतात तसेच प्रबोधनकार ठाकरे यांची मजेशीर खलनायकी भूमिका आहे.
बाबासाहेब आणि माईसाहेब यांनी सिनेमा पाहून कलाकारांना शाबासकी दिली होती. बाबासाहेबांनी आचार्य अत्रेंना पात्र लिहून सिनेमाबद्दल कौतुक केले होते.
आपल्या आठवणीतील बाबासाहेब सांगताना माईसाहेब सांगताना महात्मा फुले सिनेमा पाहताना बाबासाहेब भावनिक झाले आणि रडले होते.

सिने अभिनेता दिलीप कुमार यांचे बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आदरयुक्त मत
बाबासाहेबांच्या नंतर महाराष्ट्र सरकारने त्यांच्या आयुष्यावर आधारित चरित्रपट काढण्याचे ठरवले, त्याचं दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी केले त्यात बाबासाहेबांची भूमिका प्रसिद्ध साऊथ अभिनेते मामुटी यांनी तर रमाई ची भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी केली होती, या सिनेमाच्या उदघाटनाला सुपरस्टार दिलीप कुमार आमंत्रित होते, यावेळी त्यांनी बाबासाहेब आणि त्यांच्या भेटीचा किस्सा सांगितला आणि त्यांच्या मनात बाबासाहेबांविषयी आदर आणि सन्मान आहे हे नमूद केले. दिलीप कुमार प्रमाणे राज कपूर, देवानंद यांच्यावर सुद्धा बाबासाहेब आणि त्यांच्या चळवळीचा, संघर्षाचा कायम प्रभाव होता हे त्यांच्या सिनेमातील कथानके आणि मध्यवर्ती भूमिकेतून दिसून येते.
भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांनी सुद्धा त्यांच्या आणि बाबासाहेबांच्या भेटीबद्दल नमूद केले आहे
आणि त्यांच्या प्रति आदर सन्मान व्यक्त केला आहे.
नागपूरला झालेला ऐतिहासिक बौद्ध धर्मांतरानंतर बाबासाहेब 16 डिसेंबर 1956 रोजी मुंबईत तशाच प्रकारची धर्मांतर सभा घेणार होते,
त्यासाठी ते कुमारसेन समर्थ (शोभना समर्थ – तनुजा आणि नूतन यांच्या आई) यांच्या घरी राहणार होते.
परंतु त्याआधीच त्यांचे ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण झाले.
नाटक आणि बाबासाहेब
बाबासाहेबांनी नाटकांवर सुद्धा विचार मांडले आहेत, शाळेत असताना त्यांना शेक्सपिअर च्या लिखाणाची, नाटकांची भुरळ होती, त्यांनी जमेल तितकं शेक्सपिअरचं साहित्य वाचून काढलं होतं, शाळेत असताना शेक्सपिअरच्या “किंग लियर” या सर्वोत्कृष्ट कलाकृतीचा मराठी अनुवाद करून त्यांनी हे नाटक स्वतः बसवलं होतं. हरिभाऊंच्या कादंबऱ्या तर अधाशासारख्या वाचून काढत असत. विलायतेला असताना त्यांनी केलेल्या कित्येक पत्रात त्यांनी “गडकरींची नाटके पाठवण्यास विसरू नये” अशी विनंती केली आहे. लोकसाहित्याकडे किंवा “लावणी’ वाग्मयाकडे मराठीच्या अभ्यासकांचे लक्ष नाही, अशी त्यांची नेहमीची तक्रार होती, “लावणी आणि गाऱ्हाणे” कमी प्रतीची असे जरी मानले तरी लालित्य आणि नवलाई यांच्या दृष्टीने अशा प्रकारच्या वांग्मय प्रकाराला कमी मानता येणार नाही असे चाळोबाचे गाऱ्हाणे बद्दल बोलताना “जुन्या वाङ्मयाचा जीर्णोद्धार” या लेखात त्यांनी म्हंटले आहे
संगीत आणि हास्य यासंबंधात आपल्या प्रतिक्रिया नोंदवताना ते म्हणाले,
“संगीत आणि हास्य प्रत्येक माणसाला आवडलं पाहिजे, संगीतामुळे जीवनात नवजीवन निर्माण होते तसेच हास्यानेही …
माणसाला पोटभरून हसता यायला हवं. आमच्या भारतीयांना अश्रू निर्माण करता येतात पण हसता मात्र येत नाही … ” असा अभिप्राय त्यांनी नोंदवला आहे
प्रबोधनकार ठाकरे यांच्या ” खरा ब्राम्हण” या नाटकावर त्यांनी जहाल समीक्षा केली होती
आपल्या समीक्षेत ते म्हणतात, ” नाटकाची सजावट, पात्रांचे गुणावगुण यासंबंधाने आम्हाला विशेष कर्तव्य नाही, नाटक कर्त्याच्या विचारसरणीशी आमचे मुख्य कर्तव्य आहे.
सिनेमा निर्मितीतील लोकांना तसेच सिनेविश्वात येणाऱ्या भावी पिढीला बाबासाहेब सांगतात,
“मनोरंजनाचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण चित्रपटाच्या तंत्राचा सत्तेच्या जोरावर गैरवापर करण्याचा अधिकार कोणालाही नाही. (Propaganda films) याचा उपयोग शिक्षणासाठी, उन्नतीसाठी, एकतेसाठी करूया“

अमोल गायकवाड
आंबेडकरी विचारवंत आणि सिने समीक्षक
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
आरएसएस ज्या पद्धतीने गुरुदक्षिणा स्वीकारतो—ना व्यक्ती, ना नोंदणीकृत संघटना—त्याच धर्तीवर, तुम्हीही जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 06,2026 | 13:00 PM
WebTitle – young-people-should-enter-film-making-dr-b-r-ambedkar






















































