सावित्री माई विषयी काय काय लिहावं आणि किती लिहावं असा प्रश्न मनाला पडतो. १८४८ साली जेव्हा जोतिबांनी मुलींची पहिली शाळा सुरु केली तेव्हा सावित्री माई फक्त १७ वर्षांची होती. या वयात ती केवळ लिहायला वाचायला शिकली असे नाही तर नॉर्मल स्कुल मधून शिक्षक प्रशिक्षण सुद्धा पूर्ण केले.
वयाच्या १७ वर्षी शेण, दगडगोटे अंगावर घेत सावित्री माईने मुलींना शिकवण्याचे सुरू काम केले. तिच्या पाठीशी होते केवळ २१ वर्षांचे जोतिबा. कल्पना करा १७ वर्षाची बायको तिचा २१ वर्षांचा नवरा सामाजिक रूढी, परंपरांना आव्हान देतात, धर्ममार्तंडांना शिंगावर घेतात. जोतिबाला सावित्रीमाई ऐवजी एखादी कजाग बायको मिळाली असती तर?
नाभीकांचा ऐतिहासिक संप
जोतिबांच्या प्रत्येक कार्यात सावित्री माईने तोलामोलाची साथ दिली. मुलींची शाळा, अस्पुश्य मुलींची शाळा, प्रौढांसाठी रात्रशाळा, ब्राह्मण विधवांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह, अनाथाश्रम असो वा दुष्काळग्रस्तांसाठी अन्नछत्र असो वा विद्यार्थी हॉस्टेल असो किंवा अस्पृश्यांसाठी घरचा हौद खुला करण्याचे धाडस असो. या सर्व कामांमध्ये जोतिबांना सावित्री माईंची तोलामोलाची साथ लाभली.
ब्राह्मण विधवा स्त्रियांच्या केशवपनाच्या अपमानास्पद प्रथे विरोधात भारतातील ट्रेड युनियनचे जनक समजले जाणारे सत्यशोधक कामगार चळवळीचे नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी २३ मार्च १८९० साली नाभीकांचा ऐतिहासिक संप घडवला. या मागे सावित्री माईंची प्रेरणा होती.
फुले पती पत्नीने जनसेवा करताना कधीही जात,गोत्र पाहिलं नाही. आज स्वतःला पुरोगामी समजणारे परंतु दलितांकडे पूर्वग्रहदूषित नजरेने पाहणारे लोक पाहिले की सावित्रीमाई आणि जोतिबांच्या निर्मळ मनाची खात्री पटते. साऊजोती महारमांगांचा मुलांना शिकवतात म्हणून जोतिबांचे वडीलच नव्हे तर सावित्री माईचा भाऊ सुद्धा लोकनिंदेच्या भयाने त्यांना विरोध करत होता.
भाऊ तुझी बुद्धी कोती असून भट लोकांच्या शिकवणीने दुर्बल झाली आहे
१० ऑक्टोबर १८५६ रोजी जोतिबांना आपल्या माहेरावरून लिहिलेल्या पत्रात आपण आपल्या भावाच्या विरोधाचे खंडन कसे केले यावर सावित्री माई लिहितात “भाऊ तुझी बुद्धी कोती असून भट लोकांच्या शिकवणीने दुर्बल झाली आहे. तु शेळी, गाय यांना जवळ घेऊन कुरवाळतोस, नागपंचमीस विषारी नाग पकडून त्यास दूध पाजतोस. महंत, मांग तुजसम मानव असतात. त्यास अस्पृश्य समाजतोस त्याचे कारण सांग?”
पुढे त्या भावाला महार मांगना शिकवण्या मागची भूमिका स्पष्ट करताना म्हणतात “भट लोकांच्या श्रेष्ठत्वास आधारभूत विद्या हीच होय. तिचा महिमा मोठा आहे. जो कोणी तिला प्राप्त करील त्याची नीचता दूर पळून उच्चता त्याचा अंगीकार करील”. ईथे एक गोष्ट नमुद करावीशी वाटते ती म्हणजे सवित्रीमाईंची आई तिच्या पाठीशी होती. आपल्या मुलीच्या या क्रांतिकार्याचे तिला कौतुक वाटत असे.
सावित्री माईने जोतिबांना लिहिलेल्या दुसऱ्या एका पत्रानुसार गणेश नावाच्या एका ब्राह्मणापासून सारजा नावाच्या महार समाजातील मुलीला प्रेमप्रकरणातून दिवस गेले. या बातमीची गावात बोंबाबोंब झाल्यावर त्या दोघांना गावात जगणे कठीण झाले. अश्या वेळेस सावित्री माई त्यांच्या पाठीशी उभी राहिली व त्यांची पुढील व्यवस्था करण्यासाठी तिने या जोडप्याला पुण्याला जोतीबांकडे पुण्याला पाठवून दिले.
लहुजी मांग आणि राणबा महार हे जोतिबा आणि सावित्री माईचे गुंडपुंडांपासून रक्षण करत होते शिवाय आपापल्या जातीतल्या लोकांना शिक्षणाचे महत्व सुद्धा समजावून सांगत होते.जोतिबांच्या शाळेत सावित्री माई, फातिमा शेख यांच्यासह गणू शिवजी मांग आणि धुराजी आप्पाजी चांभार हे अस्पृश्य जातीतील जोतिबांचे सहकारी सुद्धा शिक्षक म्हणून काम करत. शिवाय सखाराम परांजपे हे जोतिबांचे शाळकरी मित्र सुद्धा जोतिबांच्या शाळेत शिकवीत असत.
प्लेगची साथ
१८८८ साली जोतिबांना अर्धांगवायूचा त्रास झाला. शरीराची उजवी बाजू जायबंदी झाली. मागील ४० जोतिबांच्या खांद्याला खांदा लावून समाजाच्या उद्धाराच अविरत काम करणारी सावित्री माई यामुळे काही काळ नक्कीच, दुःखी झाली असेल पण ती खचली मात्र नाही. सत्यशोधक समाजाची धुरा सावित्रीमाईने स्वतःच्या खांद्यावर घेतली. १८९३ सासवड येथे पार पडलेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षस्थान सवित्रीमाईंनी भूषविले.
१८९६ च्या दुष्काळात सावित्री माईंनी अन्नछत्र चालविले. ७७-७८च्या दुष्काळात जोतिबा सोबत होते यावेळेस मात्र जोतिबा सोबत नव्हते. या दुष्काळानंतर पुण्यात प्लेगची साथ आली. मुलगा डॉ.यशवंत याच्या मदतीने सावित्री माईने दवाखाना सुरू केला.
सावित्री माई स्वतः आजारी माणसांना दवाखान्यात ऊपचारासाठी घेऊन येत असे, त्यांची सेवा करत असे. मुंढव्याच्या महारवाड्यातील पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्री माई तिथे गेल्या. त्या मुलाला पाठीवर घेऊन त्यांनी दवाखाना गाठला. यातच सावित्री माईला प्लेगची लागण झाली. १० मार्च १८९७ रोजी सावित्रीमाईचे महापरिनिर्वाण झाले.
फुले दाम्पत्याचे आयुष्य आणि जीवन संघर्ष अद्भुत आहे. समाजाच्या उद्धारासाठी केवळ धर्ममार्तंड नव्हे तर घरच्यांच्या रोषास सुद्धा साऊजोतीला तोंड द्यावे लागले. ही जोडी सलग ४० वर्ष एक एक सामाजिक रूढी परंपरा ध्वस्त करत पुढे जात होती.
सत्यशोधक
वयाच्या १७ आणि २१ व्या वर्षी मुलींसाठी आणि मग अस्पृश्य मुलींसाठी शाळा सुरू करून
त्यांनी स्त्री आणि अस्पृश्यांवरील शतकानुशतकांची ज्ञानबंदी उठवली.
ज्या काळी अस्पृश्यांना सार्वजनिक विहिरीवर पाणी भरणे महापाप समजले जात
आणि त्यासाठी जीव सुद्धा गमवावा लागत असे त्या काळी या दांपत्याने स्वतःच्या घरचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
दुष्काळात गरिबांसाठी अन्नछत्र चालवले. ज्या ब्राह्मण विधवांना दिवस जात
त्यांना जीव देण्याशिवाय पर्याय नसे त्या स्त्रियांसाठी या दांपत्याने बालहत्या प्रतिबंधक गृह निर्माण करून त्या विधवांची बाळंतपणे केली.
स्वतः अश्याच एका विधवेचा मुलगा दत्तक घेतला. आज सुद्धा सुद्धा स्त्रियांनी नवऱ्याच्या,
बापाच्या प्रेताला अग्नी देण्याची बातमी होण्याच्या काळात सावित्री माईने जोतिबांना अग्नी दिला.
जोतिबा नंतर सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.
जोतिबा आणि सावित्री माई म्हणजे सामाजिक क्रांतीची न विझणारी मशाल आहे.
पंडिता रमाबाई, डॉ.आनंदीबाई सारख्या तत्कालीन बंडखोर स्त्रिया सावित्री माईला भेटायला येऊन तिचे मार्गदर्शन घ्यायच्या.
क्रांतीची ही मशाल आजही तेवत आहे. सामाजिक क्रांतीचा संदेश देत आहे.
शेवटच्या श्वासापर्यंत तिचे क्रांतिकार्य सुरूच
महार मांगांना आपल्या मुलांसारखे वागऊन त्यांना शिक्षित करण्यासाठी
स्वतःचे आयुष्य वेचणारी सावित्री माई आणि जोतिबांचे आपल्यावर असलेले उपकार कधीही आणि कश्यानेही फिटणार नाहीत.
मनात आणलं असत तर जोतिबा आणि सावित्री माई सामान्य लोकांप्रमाणे
सामाजिक रूढी परंपरांकडे दुर्लक्ष करत एक सुखी-समृद्ध आयुष्य जगू शकले असते.
स्वतःच्या वैयक्तिक अपमानाचा बदला घेऊन जोतिबा स्वस्थ बसू शकले असते
पण तसे न करता त्यांनी भटशाही विरोधात बंड पुकारले.
नवऱ्याच्या समाजसेवेच्या कार्यात अवघ्या १७व्या वर्षी सहभागी होऊन
शेण,दगडगोटे अंगावर घेण्याऐवजी सावित्री माई घरी स्वस्थ बसून
गुरवारचे उपवास, मार्गशीर्ष, व्रतवैकल्य यातच वेळ घालवू शकली असती पण ती सुद्धा जोतिबांच्या बंडात सामील झाली.
अगदी जोतिबांच्या निधना नंतरही तिने घेतला वसा टाकला नाही.
शेवटच्या श्वासापर्यंत तिचे क्रांतिकार्य सुरूच होते.
सावित्री माईने केलेल्या त्यागाविषयी वाचताना, लिहिताना आजही मन भरून येत, डोळे पाणावतात.
हे ही वाचा महात्मा जोतीबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1
आज जयंतीदिनी सावित्री माईला विनम्र अभिवादन!
(संदर्भ: सावित्री बाई फुले-कार्य आणि कर्तृत्व, संपादक-मा.गो. माळी, निर्मलकुमार फ़डकूले व ईतर
सावित्रीबाई फुले समग्र वांङ्मय, संपादक मा.गो. माळी)
हे ही वाचा..क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले : जीवन आणि कार्य
हे ही वाचा..महात्मा जोतीबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक समन्वय
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 02 , 2020 13 : 47 PM
WebTitle – Savitri Phule Mahatma Phule