भारतीय-अमेरिकन इतिहासकार आणि सिनसिनाटी विद्यापीठातील प्राध्यापिका शैलजा पाईक यांना दलित स्त्रियांच्या समस्यांवर लिहिलेल्या त्यांच्या कामासाठी अमेरिकेच्या मॅकआर्थर फाउंडेशनकडून $800,000 (सुमारे ६.७ कोटी रुपये) ‘जिनियस ग्रँट’ पुरस्कार मिळाला आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार दरवर्षी असाधारण कौशल्य किंवा क्षमताधारक व्यक्तींना दिला जातो.
“दलित स्त्रियांच्या विविध अनुभवांवर लक्ष केंद्रित करून, पाईक यांनी जातीय भेदभावाच्या स्थायी स्वरूपाचा
आणि अस्पृश्यतेची मानसिकता कायम ठेवणाऱ्या शक्तींचा उलगडा केला आहे,” असे फाउंडेशनने फेलोशिपची घोषणा करताना सांगितले.
येरवडा झोपडपट्टी ते अमेरिका
सिनसिनाटी विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्राध्यापक असलेल्या शैलजा पाईक या महिलांच्या, लिंगभेदाच्या आणि आशियाई अध्ययन शाखांमध्ये संलग्न प्राध्यापक आहेत. त्यांच्या उल्लेखनीय यशोगाथेने अनेकांना प्रेरित केले आहे. पुण्याच्या येरवडा झोपडपट्टीत वाढलेल्या शैलजा पाईक यांनी जातीय भेदभावाच्या विरोधात लढा देत, सिद्धार्थ नगर झोपडपट्टीतून (University of Warwick ) युनिव्हर्सिटी ऑफ वॉरविकच्या प्रतिष्ठित परिसरापर्यंतचा प्रवास केला, जिथे त्यांनी डॉक्टरेट पूर्ण केली. त्यांनी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातून मास्टर्स पदवी मिळवली आहे. पाईक या ओहायो राज्यातील केवळ 10 मॅकआर्थर फेलोमधील एक आहेत, आणि 1981 पासून या पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या सिनसिनाटी शहरातील आणि सिनसिनाटी विद्यापीठातील पहिल्या व्यक्ती आहेत.
यूसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत शैलजा पाईक यांनी सांगितले की,
त्यांनी पूर्णपणे शिक्षणावर लक्ष केंद्रित केले कारण शिक्षण आणि नोकरी हे झोपडपट्टीतून बाहेर पडण्यासाठीचे जादूई उपाय होते.
“पाईक यांनी जातीच्या वर्चस्वाच्या इतिहासाबद्दल नवे दृष्टिकोन दिले आहेत आणि लिंग आणि लैंगिकतेच्या आधारे दलित महिलांचे शोषण कसे केले जाते,
याचे तपशीलवार वर्णन केले आहे,” असे फाउंडेशनने म्हटले आहे.
शैलजा पाईक यांचा जन्म पुण्यात झाला आणि त्या तिथेच आपल्या तीन बहिणींसह 20 बाय 20 फुटाच्या छोट्या खोलीत वाढल्या. त्यांच्या घरात नियमित पाणीपुरवठा आणि खाजगी शौचालय नव्हते. यूसी न्यूजला त्यांनी सांगितले की, त्यांचं बालपण हे कचरा, घाण आणि गल्लीतील डुकरांच्या भोवतालच्या वातावरणात गेलं.सार्वजनिक शौचालयांच्या आठवणींमुळे त्या आजही त्रस्त होतात.
त्यांनी सांगितले की, स्वयंपाकासाठी आणि साफसफाईसाठी सार्वजनिक पाण्याच्या नळावरून डोक्यावरुन मोठ्या भांड्यात पाणी आणणे हे त्यांचे नियमित काम होते. या सर्व अनुभवांचा त्यांच्यावर सामाजिक, शैक्षणिक, भावनिक आणि मानसिकदृष्ट्या खोल परिणाम झाला. त्यांनी त्यांच्या पुस्तकांद्वारे दलित जीवनावर प्रकाश टाकला. 2014 मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक “Dalit Women’s Education in Modern India: Double Discrimination” प्रकाशित केले, ज्यात महाराष्ट्रातील दलित महिलांनी तोंड दिलेल्या समस्यांवर चर्चा केली आहे. त्यांचे दुसरे पुस्तक, “The Vulgarity of Caste: Dalits, Sexuality, and Humanity in Modern India,” तमाशा कलाकारांच्या जीवनांवर आधारित आहे, ज्यांपैकी अनेक दलित महिला आहेत.
प्राध्यापक शैलजा पाईक यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले
शैलजा पाईक यांचे वडील देवोराम एफ. पाईक यांनी त्यांच्या मुलांसाठी इंग्रजी शिक्षणाला प्राधान्य दिले,
जेणेकरून त्यांना भविष्यात चांगल्या संधी मिळू शकतील.
त्यांची आई, सरिता पाईक यांनी आपल्या मुलांना त्यांच्या धोकादायक वातावरणाच्या प्रभावापासून दूर ठेवण्यासाठी योग्य काळजी घेतली.
प्राध्यापक शैलजा पाईक यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. अलीकडेच त्यांना मॅकआर्थर फेलो म्हणून सन्मानित करण्यात आले. याशिवाय त्यांना अमेरिकन कौन्सिल ऑफ लर्न्ड सोसायटीजची फ्रेडरिक बर्कहार्ट फेलोशिप, स्टॅनफर्ड ह्युमॅनिटीज सेंटर फेलोशिप, अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज फेलोशिप, आणि लुस फाउंडेशन फेलोशिपसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या “The Vulgarity of Caste: Dalits, Sexuality and Humanity in Modern India” या पुस्तकासाठी 2023 चा जॉन एफ. रिचर्ड्स पारितोषिक आणि आनंदा केंटिश कूमारस्वामी पुरस्कार मिळाला आहे.
या पुरस्कारांमधून मिळणारे अनुदान त्यांच्या चालू असलेल्या संशोधन आणि लेखन कार्यासाठी उपयोगी ठरणार आहे.
शैलजा पाईक यांनी सांगितले की,
“हे अनुदान मला माझ्या संशोधन आणि लेखन कार्यामध्ये पुढे जाण्यास मदत करेल,
ज्यातून दलितांचे जीवन आणि जातव्यवस्थेवर नवे दस्तावेज तयार करण्यास मदत होईल.”
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 05,2024 | 18:52 PM
WebTitle – Indian-American Historian Shailaja Paik Awarded $800,000 Genius Grant for Her Work on Dalit Women’s Challenges