भूमिका घेऊ नका, नाहीतर…
“तुम्ही व्यावसायिक आहात; उघड भूमिका घेऊ नका, नाहीतर तुमचे व्यक्तिगत अथवा व्यावसायिक नुकसान होईल.”
हा नक्कीच माझा एकट्याचा प्रश्न नाही.
तुम्ही खाजगी किंवा सरकारी आस्थापनात नोकरी करत असाल, स्वतःचा व्यवसाय करत असाल किंवा कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असाल तर उघडपणे व्यक्त होऊ नका; अनुकूल भूमिका घ्या किंवा शांत राहा, नाहीतर तुमचे नुकसान होईल. असा सल्ला कधी आपुलकीने, कधी अनुभवाने, कधी व्यवहारज्ञान म्हणून, तर कधी भीतीच्या किंवा उपहासाच्या स्वरूपात दिला जातो.
आजचा काळही काहीसा तसाच आहे. सुरक्षित राहणे हा गुण मानला जातो. मौन म्हणजे शहाणपण, तडजोड म्हणजे परिपक्वता आणि तत्त्वांशी प्रामाणिक राहणे म्हणजे अव्यवहार्यता, असा एक नवा सामाजिक समज नकळत रुजताना दिसतो.
पण इतिहासाची पाने चाळली की वेगळेच सत्य समोर उभे राहते.
वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी एक राजपुत्र वडिलांचे स्वराज्याचे स्वप्न साकार करण्याचा निर्धार करतो. बालसवंगड्यांना सोबत घेऊन रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची प्रतिज्ञा करतो. दोन बलाढ्य सुलतानी सत्तांना आव्हान देत अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष करतो. राजपुत्र म्हणून जिथे वैभव, सत्ता आणि भौतिक सुखांची कमतरता नव्हती, तिथेही स्वतःच्या आणि स्वकीयांच्या स्वाभिमानासाठी विलासी आयुष्य नाकारून संघर्षाचा मार्ग स्वीकारतो. हे त्यांचे स्वकर्तृत्व होते. ते कोणत्याही दैववादावर किंवा नियतीवादावर ढकलून त्याचे महत्त्व कमी करता येणार नाही. ती निष्ठा होती. ते समर्पण होते. आपल्या तत्त्वांसाठी जीवनही पणाला लावण्याचे धैर्य होते. म्हणूनच महाराष्ट्राची माती आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाऊलखुणा काळजात जपून ठेवते. ते केवळ एका राज्याचे किंवा एका देशाचे प्रेरणास्थान नाहीत; तर स्वाभिमान, न्याय आणि सुशासनाची प्रेरणा देणारे वैश्विक व्यक्तिमत्त्व आहेत.
ज्या काळात स्त्रियांना शिक्षण नाकारले जात होते, शूद्र-अतिशूद्रांना ज्ञानापासून वंचित ठेवले जात होते, त्या काळात अवघ्या एकविसाव्या वर्षी एक तरुण प्रस्थापित सामाजिक व्यवस्थेलाच प्रश्न विचारण्याचे धैर्य दाखवतो. स्वतःच्या पत्नीला शिक्षित करून तिच्या हातून मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवतो. सामाजिक बहिष्कार, अपमान, आर्थिक संकटे आणि जीवघेणा विरोध सहन करूनही तो सत्य, शिक्षण आणि समतेची भूमिका सोडत नाही. सत्यशोधक समाजाची स्थापना करून जन्मावर नव्हे, तर माणुसकीवर आधारलेला समाज घडविण्याचा प्रयत्न करतो. महात्मा ज्योतिराव फुले यांची भूमिका ही केवळ शिक्षणाची नव्हती; ती प्रत्येक माणसाला माणूस म्हणून स्वीकारण्याची होती.
ज्या समाजात स्त्रीने शिक्षण घेणेही अपराध मानले जात होते, त्या समाजात एक स्त्री हातात पुस्तक घेऊन मुलींना शिकवण्यासाठी घराबाहेर पडते.
तिच्यावर शेण, दगड आणि चिखल फेकला जातो. तिचा अपमान केला जातो. तरीही ती मागे हटत नाही. तिची भूमिका ही केवळ स्त्रीशिक्षणाची नव्हती; ती मानवी प्रतिष्ठा, स्वातंत्र्य आणि समतेची घोषणा होती. म्हणूनच सावित्रीबाई फुले या केवळ भारतातील पहिल्या शिक्षिका नाहीत; त्या प्रत्येक मुलीच्या हातातील पुस्तकामागे उभ्या असलेल्या अखंड धैर्याचे नाव आहेत.
राजसत्ता उपभोगण्याचे सर्व अधिकार असतानाही एक राजा सत्तेला विशेषाधिकार नव्हे, तर सामाजिक न्यायाचे साधन बनवतो. शिक्षण सर्वांसाठी खुले व्हावे, मागास समाजाला शासनात प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी तो धाडसी निर्णय घेतो. प्रस्थापित व्यवस्थेचा विरोध होतो. टीका होते. दबाव येतो. पण तो मागे हटत नाही. कारण त्याच्यासाठी राज्यकारभार म्हणजे सत्तेचा उपभोग नव्हता; तो समाजातील शेवटच्या माणसापर्यंत न्याय पोहोचवण्याचा प्रयत्न होता.
म्हणूनच राजर्षी शाहू महाराजांचे कार्य केवळ कोल्हापूर संस्थानापुरते मर्यादित राहत नाही; ते आधुनिक भारतातील सामाजिक न्यायाच्या विचारांचा भक्कम पाया ठरते.
ज्या देशात समुद्र ओलांडणे पाप मानले जात होते, जिथे तथाकथित शूद्रांना शिक्षण निषिद्ध होते, त्याच समाजात एक तरुण जगातील श्रेष्ठ विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी निघतो. ज्ञान त्याच्यासाठी पदवी मिळवण्याचे साधन नव्हते; ते समाजमुक्तीचे शस्त्र होते. जगातील विविध धर्म, तत्त्वज्ञान आणि राज्यव्यवस्थांचा चिकित्सक अभ्यास करून तो परततो. त्याच्यासमोर वैयक्तिक यश, सत्ता आणि सुखाचे अनेक मार्ग खुले असतात; पण तो संघर्षाचा मार्ग निवडतो. करोडो वंचित, शोषित आणि उपेक्षितांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा म्हणून आयुष्य वेचतो. भारतीय राज्यघटना घडविताना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांना केवळ कायद्याच्या पुस्तकात लिहित नाही; तर लोकशाही भारताच्या नैतिक अधिष्ठानात कोरून ठेवतो. शेवटी समता, बंधुता, करुणा, विवेक आणि नैतिकतेवर आधारलेल्या बौद्ध धम्माचा स्वीकार करून आपल्या जीवनदृष्टीला अंतिम स्वरूप देतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका ही एखाद्या समाजघटकापुरती मर्यादित नव्हती; ती प्रत्येक माणसाच्या स्वाभिमानासाठी होती.
ज्या काळात जगातील सर्वात मोठ्या साम्राज्याविरुद्ध उभे राहणे म्हणजे स्वतःच्या आयुष्यावर संकट ओढवून घेणे होते, त्या काळात एक साधा माणूस सत्य आणि अहिंसेला संघर्षाचे प्रभावी शस्त्र बनवतो. कारावास, अपमान, टीका आणि अखेर प्राणांची आहुती.. हे सर्व स्वीकारूनही तो आपल्या तत्त्वांशी तडजोड करत नाही. त्यांची भूमिका सत्ता मिळवण्याची नव्हती, ती अन्यायाविरुद्ध नैतिक प्रतिकाराची होती. महात्मा गांधींची वाट सर्वांना मान्य असेलच असे नाही; परंतु सत्य आणि अहिंसा यांना राजकारणाच्या केंद्रस्थानी आणण्याचे धैर्य त्यांनी दाखवले, हे इतिहास नाकारू शकत नाही.
अवघ्या तेवीसाव्या वर्षी एक तरुण आपल्या विचारांसाठी हसत-हसत फासावर चढतो. मृत्यू समोर उभा असतानाही माफी मागण्यापेक्षा विचारांशी प्रामाणिक राहणे तो निवडतो. त्याच्यासाठी विचार हे घोषणांपेक्षा मोठे होते. म्हणूनच भगतसिंगांचे नाव आजही निर्भयतेचे आणि वैचारिक निष्ठेचे प्रतीक म्हणून घेतले जाते.
इतिहास हा सामान्य माणसाचाही तितकाच असतो—ज्याच्याकडे सत्ता नसते, पद नसते, प्रसिद्धी नसते; पण स्वतःच्या तत्त्वांवर उभे राहण्याचे धैर्य असते. 1/2
ब्रिटिश सत्तेविरुद्ध स्वदेशीचा संघर्ष सुरू होता. परदेशी कापडाने भरलेला ट्रक मुंबईच्या रस्त्यावरून जात होता. त्या ट्रकसमोर एक सामान्य गिरणी कामगार उभा राहिला. त्याचे नाव—बाबू गेनू. त्याला बाजूला होण्यास सांगितले गेले. धमक्या दिल्या गेल्या. पण तो हलला नाही. कारण त्याच्यासाठी स्वदेशी हा केवळ घोषणांचा विषय नव्हता; तो आत्मसन्मानाचा प्रश्न होता. शेवटी ट्रक त्याच्या अंगावरून गेला. पण त्याच्या बलिदानाने इतिहासासमोर एक असामान्य प्रश्न उभा केला— “जीवन मोठे की तत्त्व?
अत्यंत कठोर कारावास, अमानुष छळ आणि आयुष्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता समोर असतानाही एक क्रांतिकारक आपल्या राष्ट्रवादी विचारांपासून मागे हटत नाही. अंदमानच्या सेल्युलर तुरुंगातील यातना सहन करतानाही त्याची लेखणी थांबत नाही; त्याचे चिंतन थांबत नाही. विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांशी अनेकांचे मतभेद असू शकतात; परंतु वैयक्तिक किंमत मोजण्याची तयारी आणि आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहण्याचे धैर्य त्यांनी दाखवले, ही इतिहासातील नोंद आहे. कारण इतिहास एखाद्या व्यक्तीभोवती निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात देत नाही; तो त्या व्यक्तीच्या प्रवासातील धैर्य, मर्यादा आणि परिणाम यांचाही विचार करतो.
१९४२ च्या भारत छोडो आंदोलनाच्या काळात एक वृद्ध स्त्री हातात तिरंगा घेऊन मोर्चाच्या अग्रभागी चालत होती.
ब्रिटिश सत्तेने गोळीबार सुरू केला.
गोळ्या लागल्या. तरीही तिच्या हातातून ध्वज खाली पडला नाही. ती शेवटच्या श्वासापर्यंत पुढे चालत राहिली.
ती होती मातंगिनी हाजरा.वयाने शरीर वृद्ध झाले होते; पण स्वातंत्र्यावरील तिचा विश्वास तरुण होता. धैर्याला वय नसते, हे तिच्या आयुष्याने दाखवून दिले. काही लढाया शस्त्रांनी जिंकल्या जातात.काही विचारांनी. आणि काही अशा असतात, ज्या निःशस्त्र हातातील ध्वजाने जिंकल्या जातात.
जगाच्या दुसऱ्या टोकाला वर्णद्वेषाविरुद्ध संघर्ष करणारा एक नेता तब्बल सत्तावीस वर्षे तुरुंगवास भोगतो.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सूड घेण्याची संधी असूनही तो सूडाऐवजी सलोखा निवडतो. द्वेषाऐवजी संवाद निवडतो.
नेल्सन मंडेला यांनी जगाला शिकवले की खरे नेतृत्व हे विरोधकांचा नाश करण्यात नसते; तर विभागलेल्या समाजाला पुन्हा एकत्र आणण्यात असते.
अमेरिकेत वर्णभेदाविरुद्ध संघर्ष करताना आणखी एक नेता हिंसेऐवजी अहिंसेचा मार्ग स्वीकारतो. धमक्या, अटक, अपमान आणि अखेर हत्या
हे सर्व सहन करूनही तो समानतेची भूमिका सोडत नाही.
मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांचे “I Have a Dream” हे भाषण केवळ एका देशाचे स्वप्न नव्हते;
ते प्रत्येक त्या समाजाचे स्वप्न होते, जिथे माणसाचे मूल्य त्याच्या त्वचेच्या रंगाने, जन्माने किंवा ओळखीने ठरत नाही.
इतिहासाकडे नीट पाहिले तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. या सर्व व्यक्तींचे जातधर्म वेगळे होते. भाषा वेगळी होती. देश वेगळे होते.
विचारसरणी वेगळी होती. संघर्षाची साधने वेगळी होती. पण एक धागा त्यांना जोडत होता,स्वतःला योग्य वाटलेल्या मूल्यांसाठी किंमत मोजण्याची तयारी.
स्वातंत्र्यलढा संपला. देश स्वतंत्र झाला. पण न्यायासाठीचा संघर्ष संपला नाही.
कारण अन्याय केवळ परकीय सत्तेकडूनच होत नाही; तो स्वकीयांकडूनही होऊ शकतो.
संघर्ष ही कोणाची हौस नसते. प्रत्येकालाच शांततापूर्ण, सन्मानाचे आणि सुरक्षित आयुष्य जगायचे असते.
पण जेव्हा आपल्या हिताचे रक्षण करणारी व्यवस्था उलट आपल्या स्वातंत्र्यावर, सन्मानावर किंवा अधिकारांवरच गदा आणू लागते,
तेव्हा संघर्ष हा पर्याय राहत नाही; तो कधी कधी अपरिहार्य ठरतो.
मात्र संघर्ष म्हणजे नेहमी रस्त्यावर उतरणेच असे नाही. कधी तो सत्य बोलण्यात, कधी अन्यायाला प्रश्न विचारण्यात,
कधी विवेक जपण्यात., कधी दुर्बलाच्या बाजूने उभे राहण्यात, कधी स्वतःच्या चुकाही मान्य करण्यात
आणि कधी सर्वांच्या हक्कांचे रक्षण करणाऱ्या मूल्यांशी प्रामाणिक राहण्यात असतो.
इथे अमरत्वाचा वर घेऊन कोणी जन्माला आलेला नाही. भूमिका घेणारे आणि भूमिका न घेणारे दोघेही काळाच्या ओघात नश्वर आहेत.
पण जे तत्त्वासाठी उभे राहिले… ज्यांनी अन्यायाला प्रश्न विचारला…मानवी प्रतिष्ठेचे रक्षण केले…स्वतःच्या स्वार्थापेक्षा समाजहिताला प्राधान्य दिले…
ते एखाद्या मिणमिणत्या दिव्यासारखे का होईना, पिढ्यान्पिढ्या तेवत राहतात.
त्यांची नावे केवळ इतिहासाच्या पुस्तकांत नाहीत; ती लोकांच्या स्मरणात, प्रेरणेत आणि कृतीत जिवंत राहतात.
ही सगळी माणसे तुमच्या-माझ्यासारखीच हाडामांसाची होती. त्यांनाही भीती वाटली असेल. त्यांनाही कुटुंब होते. स्वप्ने होती. मर्यादा होत्या.
फरक एवढाच होता, त्यांनी भीतीपेक्षा विवेकावर विश्वास ठेवला. सोयीपेक्षा तत्त्वांची निवड केली. आणि मौनापेक्षा भूमिका निवडली.
आज प्रश्न इतिहासाचा नाही. प्रश्न आपला आहे. आपल्या मुलांना आपण कोणता वारसा देणार? सुरक्षित मौनाचा? की विवेकपूर्ण धैर्याचा?
आपण कोणत्याही विचारसरणीचे असू…कोणत्याही जाती-धर्माचे असू… भाषेचे किंवा पक्षाचे असू…
पण अन्याय समोर दिसत असताना, सत्य माहीत असतानाही केवळ स्वतःच्या फायद्यासाठी गप्प राहणे, हीदेखील एक भूमिका असते..
इतिहासाला प्रेक्षकांची नावे फारशी आठवत नाहीत.इतिहास लक्षात ठेवतो ते त्यांनाच, ज्यांनी आपल्या काळातील कठीण प्रश्नांना सामोरे जाण्याचे धैर्य दाखवले.
भूमिका घेण्याची किंमत कदाचित एखाद्या व्यक्तीला चुकवावी लागते. पण भूमिका न घेण्याची किंमत अनेकदा संपूर्ण समाजाला, देशाला आणि कधी कधी मानवजातीलाही चुकवावी लागते. आणि जीवनाचे मोजमाप आपण किती सुरक्षित जगलो याने होत नाही; तर आपण योग्य वाटलेल्या मूल्यांसाठी किती प्रामाणिकपणे उभे राहिलो याने होते. कारण इतिहास केवळ भूतकाळ नसतो. तो प्रत्येक पिढीसमोर उभा राहणारा आरसा असतो. आणि त्या आरशात उद्या आपल्या पिढीचा चेहरा कसा दिसेल, हे आज आपण घेतलेल्या भूमिकेवर ठरणार आहे.

विकास रंगनाथ ओव्हाळ
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 24,2026 | 13:00 PM
WebTitle – history-remembers-those-who-take-a-stand























































