भारतीय चित्रपट सृष्टीत दाक्षिणात्य अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री म्हणजे अभिनय आणि नृत्य यांचा सुरेख संगम असतो. अनेक दिग्गज अभिनेत्री दाक्षिणात्य चित्रपटातुन हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आपले स्थान मजबूत करतात.
दाक्षिणात्य चित्रपटातुन काम करुन हिंदी चित्रपटसृष्टीत नावलौकिक मिळवणे सर्वच अभिनेत्रींना शक्य झाले नाही.पण आज आपण अशा एका महान अभिनेत्रीविषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी बालकलाकार ते नृत्यांगना, अभिनेत्री असा प्रवास करत आपल्या अंगभूत कलागुणांनी रसिकांचे मन जिंकले आणि आजही त्या रसिकांच्या मनात घर करुन आहेत.
सिनेमा प्रवेश
13 आॅगस्ट 1936 रोजी जन्मलेल्या वैजयंतीमाला रामन यांनी वयाच्या 13 व्या वर्षी तमीळ सिनेमा “वाकझाई” याद्वारे तमीळ सिनेसृष्टीत बालकलाकार म्हणून सुरवात केली. पण नृत्य कलेची जोपासना वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्या करत होत्या. हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांनी 1951 साली “बहार” या सिनेमाद्वारे प्रवेश केला.
परंतु त्यांना 1954 साली प्रदर्शित झालेल्या “लडकी और नागीन” या चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली.
“मन डोले मेरा, तन डोले मेरे, दिल का गया करार रे, कौन बजाएँ बासुरीयाँ” हे गीत सुपरहिट झाले.आजही लोकांच्या स्मरणात हे गीत आहे.
वैजयंतीमाला यांनी त्यांच्या फिल्मी कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिले. त्या उत्तम नृत्यांगना होत्या.
कमी शिकलेल्या,दाक्षिणात्य असूनही त्यांचे हिंदी उच्चार स्पष्ट आणि सुंदर होते.
त्या मधुबाला किंवा नर्गीस इतक्या देखण्या नसल्यातरी त्यांनी आपल्या नृत्यकौशल्याने हिंदी चित्रपट सृष्टीत आपले स्थान मजबूत केले होते.
६० चे दशक
६० चे दशक त्यांच्या सिनेमांसाठी संमिश्र स्वरूपाचे होते.
त्यांचे या कालावधीत अनेक चित्रपट गाजले तर अनेक चित्रपट पडले होते.
त्याकाळातील सर्व अभिनेत्यांसोबत त्यांनी सिनेमे केले. बलराज सहानी पासून ते सुनिल दत्त पर्यंत.
त्यांच्या नृत्यकौशल्याने अनेक चित्रपट हिट झाले. “आम्रपाली” हा सिनेमा पण याच पठडीतला होता.
सुनिल दत्त आणि वैजयंतीमाला या दोन कलाकारांनी यात खूप सुंदर काम केले आहे.
आम्रपाली या सर्वसामान्य स्त्रीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.
एक सामान्य तरुणी नृत्यांगना होते, नृत्यकलेने प्रतिस्पर्धी तरुणीला हरवून दरबारातील प्रमुख नृत्यांगना होते.
आपल्या राज्याचा प्रमुख शत्रू जो असतो त्याच्या प्रेमात पडते असे कथानक असलेला हा सिनेमा तुफान चालला.
हा सिनेमा बौध्द धम्माच्या पार्श्वभूमीवर बनवला गेला होता.
या सिनेमातील भूमिकेसाठी त्या राष्ट्रीय पुरस्काराच्या प्रमुख दावेदार होत्या पण त्यावर्षी राष्ट्रीय पुरस्कार नर्गीस यांना “रात और दिन” या चित्रपटासाठी दिला गेला. नर्गीस यांची आजी दिलीपाबाई आणि मोतीलाल नेहरू यांचे मैत्रीपूर्ण संबंध इथे कामी आले असे बोलले जाते.
१९५५ साली दिलीपकुमार यांच्यासोबत वैजयंतीमाला यांनी “देवदास” सिनेमा केला.
हा हिंदी चित्रपट सृष्टीतील दुसरा देवदास सिनेमा आहे.
पहिला देवदास कुंदनलाल सहगल यांचा तर दुसरा दिलीपकुमार यांचा.या सिनेमात वैजयंतीमाला यांनी चंद्रमुखीची भुमिका केली होती.
वैजयंतीमाला यांनी पुरस्कार नाकारला
या भूमिकेला फिल्मफेअर तर्फे बेस्ट सपोर्टींग अॅक्ट्रेस पुरस्कार जाहीर झाला होता पण वैजयंतीमाला यांनी तो पुरस्कार नाकारला. सहाय्यक अभिनेत्री आणि मुख्य अभिनेत्री असा सिनेमात फरक नाही मग या पुरस्कारासाठी फरक का असे त्यांना वाटले. पुढे १९६१ ला दिलीपकुमार यांच्या सोबत असलेल्या “गंगा जमना” या चित्रपटासाठी त्यांना बेस्ट अॅक्ट्रेस हा पुरस्कार मिळाला.
वैजयंतीमाला यांनी दिलीपकुमार, राजकपूर, देव आनंद या दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. देव आनंद यांचा “ज्वेलथीफ” हा अत्यंत गाजलेला चित्रपट. “होंठोंपे ऐसी बात मैं दबाके चली आयी” हे गीत आजही सुपरहिट आहे. जसजसे वय वाढत जातं तसतशा सहकलाकार म्हणून रोल आॅफर होत राहतात.
वैजयंतीमाला यांच्या बाबतीत पण असेच झाले. १९७५ साली प्रकाश मेहरा दिवार चित्रपट बनवत होते.यामध्ये मोठी स्टारकास्ट होती. अमिताभ बच्चन, शशी कपूर होते. अमिताभ आणि शशी कपूर यांच्या आईचा जो रोल निरुपा रॉय यांनी केला तो रोल वैजयंतीमाला यांना आॅफर झाला होता पण तो त्यांनी नाकारला.
तसेच तेलगू अभिनेता चिरंजीवी यांनी पण एका चित्रपटात रजनीकांत यांच्या आईच्या भूमिकेसाठी वैजयंतीमाला यांना दोन कोटी रुपयांची आॅफर दिली होती पण ती आॅफरही त्यांनी नाकारली.
डॉ.बाली यांच्याशी विवाह
१९६० च्या दशकात दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला यांच्या प्रेमाच्या अफवा पसरल्या होत्या. नंतर त्यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले पण अबोला राहिला. दिलीपकुमार यांच्या “राम और शाम” या चित्रपटातुन वैजयंतीमाला यांची गच्छंती करण्यासाठी दिलीपकुमार यांनी दबाव टाकल्याचे बोलले जात होते.
पुढे राजकपूर यांचे फॅमिली डॉक्टर असलेले डॉ. बाली यांच्याशी त्यांनी विवाह केला. डॉ. बाली हे आधीच विवाहित होते. त्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन वैजयंतीमाला यांच्यासोबत लग्न केले. वैजयंतीमाला आणि डॉ. बाली यांच्यात कसलेही साम्य नव्हते हे विशेष.
आजही लोक वैजयंतीमाला यांना नृत्यकलानिपुण संपूर्ण अभिनेत्री मानतात. त्यांच्या नृत्यकौशल्याने अनेक चित्रपट गाजले होते. आम्रपाली,गंगाजमना,संगम,ज्वेलथीफ,नया दौर यासारखे अनेक क्लासिक सिनेमे त्यांच्या नावावर आहेत. वैजयंतीमाला यांच्या अभिनयाला आणि नृत्याला सलाम.
मागील पोस्ट सिरिज साठी खालील लिंकवर क्लिक करा
1भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने -1
2 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 2
3 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 3
4 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 4
5 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 5
6 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 6
7 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 7
8 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 8
9 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 9
भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 10
भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 11
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)