9 जुलै 1925 रोजी कर्नाटकातील बेंगळुरू येथे वसंतकुमार शिवशंकर पाडुकोण यांचा जन्म झाला. ज्यांनी काही मोजके चित्रपट केले पण ते आजही हिंदी चित्रपट सृष्टीतील अमूल्य ठेवा म्हणून ओळखले जातात. हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रगल्भ अभिनेता म्हणून त्यांना ओळखले जात होते. त्यांनी निर्माण केलेले चित्रपट मैलाचा दगड ठरले असे महान अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक , छायाचित्रकार म्हणजे गुरुदत्त.
प्रभात फिल्म कंपनीत सहायक दिग्दर्शक
गुरुदत्त यांचे कुटुंबीय बेंगळुरू येथे राहत होते नंतर ते भवानीपुर (पश्चीम बंगाल) येथे स्थायिक झाले. मुळचे कारवार येथील असलेले गुरु अनेक कलांमध्ये पारंगत होते. नृत्य, बॅडमिंटन, वाचन, लेखन यात गुरुदत्त यांची रुची होती. सुरवातीच्या काळात त्यांनी महान नृत्यसम्राट पंडीत उदयशंकर यांच्याकडे नृत्याचे धडे घेतले. काही काळ त्यांनी टेलिफोन ऑपरेटर कंपनीत काम केले. 1944 साली त्यांच्या काकांनी त्यांना पुण्याला आणले. पुण्यात त्यांनी प्रभात फिल्म कंपनीत सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले.
जेव्हा ते प्रभात फिल्म कंपनीत काम करत होते तेव्हा त्यांची मैत्री प्रसिद्ध अभिनेते देव आनंद यांच्याशी झाली. देव आनंद आणि गुरुदत्त हे खूप घनिष्ठ मित्र होते. दोघांची मैत्री संपूर्ण बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध होती. दोघांनी ठरवले होते की जेव्हा देव आनंद चित्रपट निर्मिती करतील तेव्हा दिग्दर्शक म्हणून गुरुदत्त असतील आणि जेव्हा गुरुदत्त चित्रपट निर्मिती करतील त्यात प्रमुख भूमिका देव आनंद करतील. अतुट मैत्रीचे हे चांगले उदाहरण आहे.
कागज के फूल
अभिनेता म्हणून त्यांनी चाँद (1944) साली एका छोट्या भूमिकेने डेब्यू केला. त्यानंतर गुरुदत्त मुंबईत आले. छायाचित्रकार म्हणून त्यांनी काही काळ काम केले. 1951 साली नवकेतन फिल्म कंपनी च्या “बाजी” या चित्रपटात काम केले. “जाल”, “C. I. D” “आरपार”, प्यासा”, साहेब बिवी और गुलाम, ” सैलाब”, “Mr. And Mrs 55″ ,”चौदवीं का चाँद” ,”बाज”,”हम एक है” हे त्यांचे गाजलेले चित्रपट.
गुरु दत्त यांनी बंगाली गायिका गीता रॉय चौधरी यांच्याशी 1951 साली विवाह केला. गीता दत्त आणि गुरुदत्त यांना तीन मुले झाली. अरुण, तरुण आणि निना. काही काळानंतर गुरुदत्त आणि गीता दत्त यांच्यात वाद होऊ लागले. दोघांचे एकमेकांशी पटेनासे झाले. वादाचे कारण गुरुदत्त आणि अभिनेत्री वहिदा रेहमान यांची असलेली जवळीक हे होते.गीता दत्त यांनी दत्त यांना सोडून दिले. त्या वेगळ्या राहू लागल्या.गुरु हे मानसिक तणावाखाली गेले. अशातच त्यांचा “कागज के फूल ” चित्रपट पडला. त्याचाही तणाव होता. एकाकी जीवन जगणे कठीण झाले. यात त्यांना दारूचे व्यसन लागले. कालांतराने दोघांनी घटस्फोट घेतला.
अनेक कलाकारांना मदत
गुरुदत्त यांनी अनेक कलाकारांना नावारुपाला आणले.त्यामध्ये कॉमेडियन जॉनी वॉकर होते.
जॉनी वॉकर यांचे नाव गुरुदत्त यांनीच दिलेले आहे. जॉनी वॉकर नावाचा एक व्हिस्कीचा ब्रँड आहे त्यावरून ते नाव बद्रुद्दीन काझी यांना दिले.बद्रुद्दीन काझी यांचा जॉनी वॉकर झाला. तसेच लेखक दिग्दर्शक अबरार अल्वी, छायाचित्रकार व्ही. के. मुर्ती यांना पण ब्रेक दिला.
दारूचे व्यसन, मानसिक तणाव यामुळे त्यांना झोप येत नसे. ते झोपेच्या गोळ्या घेत असत.
10 आॅक्टोबर 1964 रोजी झोपलेल्या अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला.
या मृत्यूला कोणी हत्या बोलते तर कुणी आत्महत्या.मृत्युनंतर देव आनंद सर्वात आधी गुरुदत्त यांच्या घरी गेले होते.
त्यांनी सांगितले होते की मृत गुरुदत्त यांच्या पार्थिवाजवळ निळे द्रव्य असलेला ग्लास होता.
टाईम मॅगेजीनने गुरुदत्त यांचे “प्यासा” आणि ” कागज के फूल ” या दोन सिनेमांना 100 आॅल टाईम फेव्हरिट सिनेमा यादीत समाविष्ट केले आहे. त्यांना फिल्मफेअर पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार पण मिळाला आहे. भारतीय चित्रपट सृष्टीतील अत्यंत सफल अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक म्हणून गुरुदत्त यांच्याकडे पाहिले जाते आणि नेहमी पाहिले जाईल.
by सतिश भारतवासी – कोल्हापूर
(लेखक चित्रपटक्षेत्रातील अभ्यासक आहेत.)
मागील पोस्ट सिरिज साठी खालील लिंकवर क्लिक करा
1 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने -1
2 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 2
3 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 3
4 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 4
5 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 5
6 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 6