नवी दिल्ली: महाराष्ट्र: नकली औषध रॅकेटचा खुलासा, सरकारी रुग्णालयांना टॅल्कम पावडरपासून बनवलेल्या गोळ्या पाठवल्या ! महाराष्ट्रातील नागपूर ग्रामीण पोलिसांनी नकली औषधांच्या एका रॅकेटचा खुलासा केला आहे, जे सरकारी रुग्णालयांना टॅल्कम पावडर आणि स्टार्चपासून बनवलेल्या नकली अँटिबायोटिक्स पुरवत होते.
२० सप्टेंबर रोजी ग्रामीण पोलिसांनी दाखल केलेल्या १,२०० पानांच्या आरोपपत्रात अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा झाला आहे. यात असं सांगितलं आहे की, देशातील अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये वितरित केलेल्या अँटिबायोटिक औषधांमध्ये काहीही नव्हतं, फक्त टॅल्कम पावडर आणि स्टार्च यांचा वापर केला गेला होता, जे हरिद्वारमधील एका पशु चिकित्सालयाच्या प्रयोगशाळेत तयार केलेले होते.
महाराष्ट्र: नकली औषध रॅकेटचा खुलासा, सरकारी रुग्णालयांना टॅल्कम पावडरपासून बनवलेल्या गोळ्यांचा पुरवठा
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणाच्या चौकशीत अनेकांना अटक करण्यात आली तसेच करोडो रुपयांच्या व्यवहारांसाठी हवाला चॅनल्सचा वापर केला गेला असल्याचं उघड झालं. या नकली औषधांचे भारताच्या विविध राज्यांमध्ये वितरण करण्यात आलं होतं.
पोलिसांच्या मते, सरकारी रुग्णालयांना नकली औषध पुरवण्यासोबतच या रॅकेटच्या सदस्यांनी मुंबईहून उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे करोडो रुपये ट्रान्सफर करण्यासाठी हवाला चॅनल्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. नकली औषध खरेदीसाठी ही रक्कम रॅकेट सदस्यांना ट्रान्सफर करण्यात आली. नंतर, त्या नकली औषधांचा पुरवठा उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील रुग्णालयांमध्ये तसेच संपूर्ण भारतात करण्यात आला.
हा धक्कादायक प्रकार मागील वर्षी डिसेंबरमध्ये उघडकीस आला होता, जेव्हा औषध निरीक्षक नितीन भंडारकर यांनी कलमेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयाला पुरवलेल्या अँटिबायोटिक्स नकली असल्याचं आढळलं. त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए)च्या औषध निरीक्षकाने गेल्या वर्षी कलमेश्वर पोलीस ठाण्यात पुरवठादार आणि वितरकांविरोधात केस दाखल केली होती. यानंतर सिव्हिल सर्जन कार्यालयाने या कंपन्यांना काळ्या यादीत टाकले होते.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, नागपूर ग्रामीण पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक तथ्य समोर आल्यानंतर
रॅकेट चालवणाऱ्या लोकांविरुद्ध वर्धा, नांदेड, ठाणे आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणीही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणाचे तपास अधिकारी सावनेरचे एसडीपीओ आयपीएस अनिल म्हास्के यांनी सांगितलं की,
सुरुवातीला हेमंत मुले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता,
ज्यांनी नागपूरच्या सरकारी रुग्णालयांना औषध पुरवण्यासाठी टेंडरमध्ये भाग घेतला होता.
मुळेसह मिहिर त्रिवेदी आणि विजय चौधरी या दोन व्यक्तींविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे.
चौधरी आधीच असाच एक फसवणुकीचा गुन्हा असलेल्या प्रकरणात तुरुंगात आहे. त्याला ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
चौधरीची चौकशी केल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी हरियाणामध्ये एक मोहीम चालवली,
कारण त्याने गगनसिंह नावाच्या व्यक्तीचं नाव घेतलं, जो नकली औषधांचा पुरवठादार होता.
म्हास्के यांनी सांगितलं की, चौधरीने नंतर सहारनपूरच्या रॉबिन तनेजा ऊर्फ हिमांशु आणि रमन तनेजाचंही नाव घेतलं. त्यांनी तपशील देताना पुढे सांगितलं, ‘तनेजा बंधूंनी अमित धीमानचं नाव सांगितल्यानंतर आम्ही हरिद्वारच्या पशु चिकित्सालय प्रयोगशाळेत पोहोचलो. धीमान उत्तराखंड एसटीएफकडून अटक झाल्यानंतर तुरुंगात होता. नंतर त्याला आमच्या प्रकरणातही अटक करण्यात आली.’
त्यांनी सांगितलं की, रॅकेट चालवणाऱ्यांचे बँक तपशील आणि व्यवहारांमध्ये करोडो रुपयांचे व्यवहार उघड झाले आहेत.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 25,2024 | 17:02 PM
WebTitle – Fake Medicine Racket Exposed in Maharashtra: Talcum Powder Pills Supplied to Government Hospitals