आजही तो दिवस लख्ख आठवतो.( नामांतर दिन ) राजवाड्यातील सर्व वातावरण अगदी आनंदमय होते.आनंद का होणार नव्हता? भीमसैनिकांच्या प्रदीर्घ लढाईला यश मिळाले होते.ज्या नावासाठी कित्येकांनी आपले रक्त सांडले होते,प्राणाची आहुती दिली होती.त्यां हुतात्म्यांचा तो विजयी दिवस होता.
पहाटे पहाटे रेडिओ वरून औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिल्याची बातमी घुमत होती. आणि त्या आनंदात सर्व भीम सैनिक न्हाऊन निघाला होता.परंतु हा आनंद मनुवादी समाजकंटकांच्या डोळ्यात खुपत होता.संध्याकाळच्या वेळी झेंड्याच्या ओट्यावर वाड्यातील महिला मंडळाची भीमगीतांची मैफिल रंगली होती.दगडा आई यांच्या पहाडी आवाजातील”ऐक राणी आकाशवाणी वदली गावो गाव, विद्यापीठाला दिले बाबा चे नाव..!”
थंड हवेत आली
हर्षाची लाट गं..
हाती घे तीळ गूळ ताट सजणी
प्रसाद वाट गं..!
नामांतराच्या लढाई मध्ये
विजयी रणशिंग गाजलं,
नाव भिमाचं, नाव भिमाचं
विद्यापीठला साजलं..!
सोन्या- मोत्याची ती अक्षर
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर
हृदयाचा घेई ठाव..
काय खुलून दिसतय राव
त्या कमानी वरती नाव…!
भीमरायाच्या नावासाठी रक्त सांडले राव …..
असेल कोणी माईचा लाल तर पुसून दावा नाव …..
पाहून भीमाची क्रांती, ती क्रांती सलत होती…
ज्ञानाचे पेरले मोती त्याचे नावच नव्हते वरती ..
नामांतराने विद्यापीठाला जगात आला भाव …
असेल कोणी माईचा लाल तर पुसून दावा नाव …..!
या सारखी अनेक भीम गीत सायंकाळच्या कुंद वातावरणाला भेदून मनुवादी लोकांच्या कानात गरम शिसं ओतत होते. वाड्यातील आम्ही बच्चेकंपनी व काही वडीलधारी मंडळी शेकोटी पेटवून भीम गीते ऐकण्यात तल्लीन होऊन गेलो होतो. विद्यापीठ कशाला म्हणतात हे सुद्धा आमच्या बालमनाला ठाऊक नव्हते.परंतु आपल्या बाबासाहेबांचे नाव औरंगाबाद च्या कोणत्यातरी मोठ्य्या शाळेला दिलं आहे. इतकंच समजत होते. कुठून तरी आवई उठली की संपूर्ण मराठवाडा पेटला आहे.
जातीवादी लोकं खेड्यापाड्यातील दलितांच्या वस्त्या जाळत फिरत आहेत,आज रात्री याआपल्या महारवाड्यावर जातीवादी लोकं चाल करून येणार आहे.तेव्हा तुम्ही सावध राहा. आम्ही सर्व भयभीत होऊन गेलो.लगेच सगळ्यांची बैठक जमली व सर्वानुमते ठराव घेतला की, वाड्यातील सर्व महिला मंडळी बच्चेकंपनी रावका मास्तर,भीमराव मामा,रंगनाथ दाजी,कडूबा अण्णा यांच्या घरात थांबतील व सर्व तरुण व पुरुष मंडळी हातात लाठ्या काठ्या घेऊन संपूर्ण महारवाड्याला जागता पहारा देतील..काही अनुचित प्रकार घडला तर मिरच्याची भुकटी करून ठेवण्यात आली होती.
आम्ही बच्चेकंपनी भयभीत होऊन गेलो होतो.एका नावामुळे हे लोकं आमच्या वस्त्या का म्हणून जाळायला येत असतील..?
शाळेत तर बाबासाहेब आंबेडकरांची कीर्ती गाताय आणि त्यांच्या नावाचा या लोकांना इतका रागाराग का आहे?
आता आपण थोड्या वेळापूर्वी भीम गीतात ऐकलं होतं की,पोचिराम कांबळे,गौतम वाघमारे,
जनार्धन मवाडे,हे दलित क्रांतिवीर नामांतराच्या लढ्यात शहीद झाले.पोचिराम कांबळे यांचे हात पाय तोडण्यात आले.
त्यांनाही जातीवादी सैतानांनी जर्जर करून ठार मारले..असंख्य प्रश्नांची दाहकता घेऊन भयभीत वातावरणात
आम्ही ती रात्र कशीतरी काढली..सुदैवाने आमच्या गावांत अशी कुठलीच जातीयवादी घटना घडली नाही.
त्या बाबत आमच्या गावाचा आदर्श घेण्यासारखं आहे.
पुढे कळतं झाल्यानंतर नामांतराचा इतिहास समजायला लागला,नामांतराचा लढा हा केवळ विद्यापीठाची पाटी बदलणारा नव्हता,
तर तो समता, स्वातंत्र्य, बंधूभाव पुढे नेणारा लढा होता. विद्यापीठाचं नामांतर हे केवळ आंदोलन नव्हतं,
तर त्याला सामाजिक लढ्याचे स्वरुप आलं होतं.ही चळवळ म्हणजे महाराष्ट्रातील आणि देशातील सर्वात मोठी लढाई होती.
या लढ्यात कित्येक क्रांतिकारक शहीद झाले. कितीतरी युवक – युवतींना आपले प्राण गमवावे लागले.
कित्येकांच्या घरादाराची राखरांगोळी झाली.कित्येक दलित आया-भगीनींवर बलात्कार झाले तर काही गावात दलित वस्त्यांवर बहिष्कार टाकण्यात आला.
सार्वजनिक पाणवठ्यावर दलितांना बंदी करण्यात आली.दलित आया-भगीनींच्या कित्येक गावातून भरचौकातून उघड्या-नागड्या धिंडी काढण्यात आल्या.नामांतराच्या या काळामध्ये जातीयवादी नराधमांनी अत्याचाराची सीमा ओलांडली होती.विद्यापीठ म्हणजे काय हेही ज्यांना धडपणे माहित नव्हते त्या दीनदुबळ्या दलितांवर खेडोपाडी अमानुष अत्याचार करण्यात आले.
आईच लेकरू आईविना पोरक झाल्यासारखी दलित बांधवांची अवस्था झाली होती. एवढे होत असतानाही धाडसी भीमसैनिकांनी कधीच माघार घेतली नाही. फक्त बाबासाहेबांच्या नावासाठी दलित बांधवांनी अनेक अन्याय-अत्याचार, जुलूम सहन केले. नामांतर दिन निमित्त नामांतराच्या लढ्यात शाहिद झालेल्या माझ्या सर्व ज्ञात अज्ञात भीम सैनिकांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम..!
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
लेखन – बाबासाहेब थोरात औरंगाबाद
लढा नामांतराचा – नामांतर दिन
नामांतराचा लढा केवळ बाबासाहेबांचे नाव विद्यापिठाला देण्यासाठीचा नव्हता तर त्या लढ्याचे स्वरुप जातीय माज विरुध्द नवचेतनेने भारलेल्या आंबेडकरवादी जनतेच्या अस्तित्वाचा होता. ” घरात नाही पिठ, हवे कशाला विद्यापिठ” म्हणत जातिय विखारी फुत्कार सोडणाऱ्या सेना सम्राट बाळ ठाकरेंनी हा लढा मोडून काढायचाच चंग केला होता.
विद्यापिठाच्या नावात मराठवाडा आहे. मराठवाडा नावात मराठा आहे. मराठा नाव बदलुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव देणे म्हणजे तो मराठा नावाचा अपमान आहे असल्या भंकस व भंपक विचारांनी मराठवाडा पेटता ठेवणाऱ्या जातीयवादी शक्तींचा माज उतरवणारा अस्तित्वाचा लढा म्हणजे नामांतर लढा.
हा प्रश्न फार काही मोठा पण नव्हता जर तो चिघळत ठेवला नसता तर. पण तत्कालीन सत्ताधारी व विरोधी पक्षांना यातुन राजकिय पोळ्या भाजायच्या होत्या. विरोधकांना मराठवाडा व महाराष्ट्र धगधगत ठेवायचा होता व सत्ताधाऱ्यांना आश्वासने देवुन आंबेडकरी चळवळीला अजून संघर्ष करायला लावायचा होता.
दोन्ही एकाच माळेचे मणी होते. हा प्रश्न सतत पेटता ठेवुन सत्ताधारी व विरोधकांनी राजकारण केले. नामांतर चळवळीला १७ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर सिरीयस घेतले गेले. १९५० ला बाबासाहेबांनी औरंगाबादला मिलींद महाविद्यालयाची स्थापना केली तेव्हा बाबासाहेबांना गोविंदभाई श्रॉफ व माणिकचंद पहाडिया यांचे एक शिष्टमंडळ भेटायला आले होते.
त्यांनी बाबासाहेबांना विचारले होते की याठिकाणी हे महाविद्यालय चालेल का? तेव्हा बाबासाहेबांनी औरंगाबादला महाविद्यालयापेक्षाही विद्यापिठाची गरज असल्याचे बोलले होते. याच विचारातुन १९५८ ला मराठवाडा विद्यापिठाची स्थापना करण्यात आली. या विद्यापिठाला नाव काय द्यावे याविषयी तत्कालीन सरकारने एक समिती स्थापन केली होती.
त्या समितीने औरंगाबाद, पैठण,शालिवाहन,सातवाहन,देवगीरी ईत्यादी नावे सुचविली होती तसेच शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही नावे पण सुचविली होती. पण शिवाजी विद्यापिठ १९६० ला कोल्हापुरला झाले असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव पुढे आले. १९७८ ला बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापिठाला द्यावे असा ठराव विधीमंडळाने केला होता.
या ठरावानंतर तत्कालीन मनुवादी पक्षांनी याचा विरोध केला. विरोधाची धार ईतकी तिव्र होती की या लोकांनी अनन्वित अत्याचार केले. घरे जाळली, मागासवर्गीय मुलींवर बलात्कार केले,जाळपोळी केल्या. पाणवठा बंदी केली, मागासवर्गीय बायकांच्या नग्न धिंडी काढण्यात आल्या. तत्कालीन सत्ताधारी पक्षांने याला आवर न घालता बघ्याची भुमिका घेतली.
नामातंरासाठी गौतम वाघमारेंनी भरचौकात स्वताला जाळुन घेतले. परभणीत पोचीराम कांबळेचे हातपाय तोडण्यात आले.नंतर त्यांना अनंत यातना देवुन ठार मारले.जनार्धन मवाडे, संगीता बनसोडे, प्रतिभा तायडे, अविनाश डोंगरे, चंदन कांबळे, दिलीप रामटेके, रोशन बोरकर असे कितीतरी लोक या लढ्यात शहिद झाले.
नामांतर होत नाही म्हणुन प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी नागपुर ते औरंगाबाद लॉंगमार्च काढला. आंबेडकरवादी जनतेच्या दबाव वाढला. या दबावाला शेवटी सरकार झुकले व नामांतराऐवजी १९९४ ला मराठवाडा विद्यापिठाचा नामविस्तार “डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ”असा करण्यात आला.
या लढ्यातुन जी हानी झाली ती अकल्पित होती. अनेकांना जिवानिशी जावे लागले,अनेकांची घरे जाळली गेली, बलात्कार केले गेले, गावबंदी,पाणवठा बंदी,सामाजिक बहिष्कार टाकले गेले. पण या सर्वांना न जुमानता बाबासाहेबांच्या लेकरांनी ही लढाई जिंकली. आज आमच्याकडे पिठही आहे व बाबासाहेबांच्या नावाची अनेक विद्यापिठेही.
मनुवादी विचार, जातीय माज गाडण्यासाठी जो लढा लढला गेला तो नामांतर दिन भारताच्या ईतिहासात नेहमीच प्रेरणादायी असेल यात शंका नाही.
लेखन – सतीश भारतवासी, कोल्हापुर.
जय भीम.जय भारत. जय संविधान.
ज्याचं नावं जगात गाजतयं आणि ज्याने शिक्षणाच्या जोरावर जगभर देशाचं नावं उंचावलं,
त्या व्यक्तींचं नावं इथल्या एखाद्या विद्यापीठाला दिलेलं चालत नाही. त्यासाठी दोनपिढ्यांना अखंडपणे लढा द्यावा लागतो.
दंगलीचा सामना करावा लागतो,आख्या वस्त्या बेचिराख होतात,कित्येक आया-बहीणींवर बलात्कार होतात,
अगणित लहान थोरांचे मुडदे पडतात.
१७ वर्ष अखंड चाललेल्या या संघर्षानंतर तेव्हा कुठे ‘डाॅ बाबासाहेब आंबेडकर’ हे नावं ठळक होतं ..!
नामांतर दिन साजरा होतो. अर्थातच,दलितांवर हा निरंतर अत्याचार करणारा वर्ग कुठला असू शकतो..?
हे वेगळं सांगायची गरज नाही.आजही कित्येक वर्ष शांततेत भिमाकोरेगावला अभिवादन करायला जाणाऱ्या
समाजावर दगडफेक केली जाते,जाळपोळ केली जाते, दंगल घडवली जाते …हि मंडळी कोण असतात ..?
जपुन ठेवा राख जळलेल्या घरांची, सैनिक हो संपली नाही लढाई अजुनही अस्तित्वाची
नामांतरात शहिद झालेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंम्र अभिवादन …! ????
लेखन – गणेश चव्हाण सातारा
शिक्षण हे मागासवर्गीय समाजासाठी अन्य कोणत्याही भौतिक लाभांपेक्षाही सर्वाधिक महत्वाचा लाभ आहे.
दबलेल्या नि पिचलेल्या मागासवर्गीय समाजाने शिक्षण घेतले तरच त्यांचा उत्कर्ष आहे व तेही सर्वोच्च शिक्षण.
उच्च शिक्षण घेतले तरच ते प्रगतीपथावर जाऊ शकतात, अन्यथा त्यांचे जीवन असुरक्षित नि कष्टप्रदच राहील.
उच्चशिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे.
उच्चशिक्षण हे बुद्धीजीवी वर्गाचे क्षेत्र असले तरी या क्षेत्रात गरीब व दुर्बल घटकाच्या माणसास
संधी मिळायला हवी असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्पष्ट मत होते.
हजारो वर्षापासून शिक्षणापासून वंचित असलेल्या आणि निजामाच्या राजवटीत जे मागासलेपणाच्या यातना भोगत होते
त्यांना शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी १९५० ला औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी
मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. बाबासाहेबांच्या प्रयत्नाचे फलित म्हणून १९५८ साली मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बहुतांश लेखन हे इंग्रजीत, काही मराठीत आणि बाकी इतर भाषेतील आहे.
ज्या महामानवाने देशाची राज्यघटना लिहिली. ज्यांनी एकूण २२ ग्रंथ आणि पुस्तिका, १० अपूर्ण राहिलेले ग्रंथ,
१० निवेदने किंवा साक्षीपुरावे, १० शोधनिबंध, लेख आणि परिक्षणे लिहिली. मराठवाड्यात उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ असावे
ही सर्वप्रथम कल्पना मांडली त्या महापुरुषाचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी १७ वर्ष संघर्ष करावा लागला.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ” नामांतर दिन चिरायू होवो.
लेखन – सचिन जयश्री जयकुमार जयसिंगपूर
नामांतर दिन विशेष
१४ जानेवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा नामांतर दिन
पण या नामांतराच्या दिवसाची वाट पाहण्यासाठी आंबेडकरवादी जनतेला १७ वर्ष संघर्ष करावा लागला.
शिक्षण हे मागासवर्गीय समाजासाठी अन्य कोणत्याही भौतिक लाभांपेक्षाही सर्वाधिक महत्त्वाचा लाभ आहे.
दबलेल्या नि पिचलेल्या मागासवर्गीय समाजाने शिक्षण घेतले तरच त्यांचा उत्कर्ष आहे
व तेही सर्वाच्च शिक्षण , उच्च शिक्षण घेतले तरच ते प्रगतीपथावर जाऊ शकतात.
अन्यथा त्यांचे जीवन असुरक्षित नि कष्टप्रदच राहील. उच्चशिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे.
उच्चशिक्षण हे बुद्धीजीवी वर्गाचे क्षेत्र असले तरी या क्षेत्रात
गरीब व दुर्बल घटकाच्या माणसास संधी मिळायला हवी असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्पष्ट मत होते.
हजारो वर्षापासून शिक्षणापासून वाचत असलेल्या आणि निजामाच्या राजवटीत जे मागासलेपणाच्या यातना भोगत होते
त्यांना शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी १९५० ला औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. मिलिंद महाविद्यालयाच्या पायाभरणी प्रसंगी
श्री गोविंदभाई श्रॉफ आणि माणिकचंद पहाडिया यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ बाबासाहेबांच्या भेटीला आले होते.
बाबासाहेबांशी बोलताना त्या शिष्टमंडळाने “आपण हे जे महाविद्यालय सुरु करीत आहात ते या ठिकाणी चालेल का?” असा प्रश्न केला.
त्यावेळी बाबासाहेब उद्गारले येथे फक्त एक महाविद्यालय उभारून चालणार नाही तर
येथे एक विद्यापीठही उभारले जावे अशी माझी तीव्र इच्छा आहे आणि बाबासाहेबांच्या प्रयत्नाचे फलित म्हणून १९५८ साली मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली.
या विद्यापीठाला नाव काय द्यावे हा प्रश्न समोर आला. तेव्हा महाराष्ट्र सरकारने नाव निश्चित करण्यासाठी एक समिती गठीत केली.
शासननियुक्त समितीने विचारार्थ घेतलेल्या व गाभिर्याने चर्चा केलेल्या नावांमध्ये मराठवाडा, औरंगाबाद,
पैठण, प्रतिष्ठान, दौलताबाद, देवगिरी, अजिंठा, शालिवाहन, सातवाहन, अशी सर्व स्थळ व भूमी-राज्यावाचक नावे होती.
फक्त दोनच व्यक्तींची नावे सुचविली होती – छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे.
यातील शिवाजी महाराजांच्या नावाने आधीच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे पुढे १९६० साली स्थापन झाले, त्यांचे उचित विद्यापीठीय स्मारक झाले पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विद्यापीठीय स्मारक झाले नाही.
म्हणून औरंगाबाद विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचे राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने ठराव २७ जुलै इ.स. १९७८ ला संमत करण्यात आला. महाराष्ट्रातील आंबेडकरवादी जनतेसह सर्वांनाच आनंद झाला. परंतु ह्याने मनुवादी लोकांचे पीत खवळले. त्यांनी विद्यापीठाच्या नामांतराला कडाडून विरोध केला.
या विरोधाला आंबेडकरी जनता मुळीच डगमगली नाही. नामांतराची लढाई पुढे जोमाने चालूच ठेवली. विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव मिळावे म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या बलिदानाची पर्वा केली नाही. आंबेडकरी जनता आपल्या पित्याच्या (बाबासाहेबांच्या) नावासाठी वाटेल ते करण्यास तयार होती.
नामांतराची लढाई ही दीन दलितांच्या अस्मितेची लढाई होती. ही चळवळ म्हणजे महाराष्ट्रातील आणि देशातील सर्वात मोठी लढाई होती. या लढ्यात कित्येक क्रांतिकारक शहीद झाले. कितीतरी युवक – युवतींना आपले प्राण गमवावे लागले. कित्येकांच्या घरादाराची राखरांगोळी झाली.
कित्येक दलित आया-भगीनींवर बलात्कार झाले तर काही गावात दलित वस्त्यांवर बहिष्कार टाकण्यात आला. सार्वजनिक पाणवठ्यावर दलितांना बंदी करण्यात आली. दलित आया- भगीनींच्या कित्येक गावातून भरचौकातून उघड्या – नागड्या धिंडी काढण्यात आल्या. नामांतराच्या या काळामध्ये जातीयवादी नराधमांनी अत्याचाराची सीमा ओलांडली होती.
पोलीसांनीही लहान बालके, स्त्री, वृद्ध,पुरुषांवर बेसुमार लाठीचार्ज केले तर काही वेळा बंदुकीचाही वापर केला.विद्यापीठ म्हणजे काय हेही ज्यांना धडपणे माहित नव्हते त्या दीनदुबळ्या दलितांवर खेडोपाडी अमानुष अत्याचार करण्यात आले. आईच लेकरू आईविना पोरक झाल्यासारखी दलित बांधवांची अवस्था झाली होती.
एवढे होत असतानाही धाडसी भीमसैनिकांनी कधीच माघार घेतली नाही. फक्त बाबासाहेबांच्या नावासाठी दलित बांधवांनी अनेक अन्याय – अत्याचार, जुलूम सहन केले. गावोगावी, शहरात आणि खेड्यापाड्यापर्यंत नामांतराच्या आंदोलनाची ठिणगी पडलेली होती. जिकडे-तिकडे एकाच नारा गुंजत होता “नामांतर झालेच पाहिज”’. नांदेडमध्ये दलित पेंथरच्या गौतम वाघमारे या कार्यकर्त्याने सरकार नामांतर करत नाही म्हणून स्व:ताला भरचौकात जाळून घेतले.
अखेरच्या श्वासापर्यंत एकाच नारा होता, “नामांतर झालेच पाहिजे” बाबासाहेबांच्या नावासाठी त्याने आपल्या प्राणाचे बलिदान केले . परभणी जिल्हातही पोचिराम कांबळे यांचे हात-पाय तोडण्यात आले. त्यांनाही जातीयवादी सैतानांनी जर्जर करून ठार मारले. जनार्धन मवाडे, संगीता बनसोडे, प्रतिभा तायडे, अविनाश डोंगरे, चंदन कांबळे, दिलीप रामटेके, रोशन बोरकर असे कितीतरी दलित क्रांतिवीर नामांतराच्या लढ्यात शहीद झाले.
जातीयवादी सरकार नामांतर करत नाही म्हणून दलित मुक्ती सेनेचे सरसेनापती आणि लॉंगमार्च प्रणेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दलित बहुजन समाजाची फौज जमा करून नागपूर ते औरंगाबाद असा लॉंगमार्च आयोजित करून “जिंकू किंवा मरू “, जळतील नाहीतर जाळून टाकतील ” अशी आक्रमक भूमिका घेतली.
लॉंगमार्च मधील निष्पाप लोकांवर इंग्रजानाही लाजवेल अशा क्रूरपणे लाठीहल्ले केले. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, कित्येकांना तुरुंगात डांबले. या निष्पाप दलितांचा गुन्हा काय? तर आपल्या पित्याचे (बाबासाहेबांचे) नाव विद्यापीठाला द्यावे हि (सरकारी) मागणी. ज्यांनी दीनदलित , पिचलेल्या आणि उच्चभ्रू समाजाने वाळीत टाकलेल्या समाजातील माणसाला माणूसपण मिळवून दिले, जगण्याचा हक्क दिला, त्या उत्तरदायीत्वापोटी बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला द्यावे ही रास्त व न्यायपूर्ण मागणी गुन्हा ठरवून अमानुष्य वागणूक देणा यांचा निषेध केला पाहिजे.
तत्कालीन मुख्यमंत्र्याला समजले कि बाबासाहेबांची ही लेकरे बाबासाहेबासाठी प्राण द्यायलाही मागेपुढे पाहात नाहीत. जर यांच्या संयमाचा अंत झाला तर हेच लोक दुसरांचा प्राण घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाहीत. त्यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकच आवाज होता नामांतर–नामांतर… चारही बाजूने सरकारच्या नाड्या आवळल्या जात होत्या.
त्यांच्यासमोर नामांतराशिवाय पर्याय उरला नाही. १७ वर्षाच्या कडव्या संघर्षानंतर शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली व १४ जानेवारी इ.स. १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद’ असा नामविस्तार करण्यात आला. ज्या महामानवाने देशाची राज्यघटना लिहिली, मराठवाड्यात उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ असावे हि सर्वप्रथम कल्पना मांडली त्या महापुरुषाचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी १७ वर्ष संघर्ष करावा लागला.
नामांतर झाले परंतु अर्धवट नामांतर झाले, हि खंत आजही भिमसैनिकांच्या मनात आहे. विद्यापीठाचे पहिले नाव ‘मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद’ असे होते. नामांतरानंतर “डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ , औरंगाबाद” एवढेच झाले.
नामांतराची लढाई हि प्रतीकात्मक सामाजिक समतेची लढाई होती. १४ जानेवारी १९९४ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रवेशद्वार हे आंबेडकरी समाजाचे प्रेरणास्थान बनले आहे.
दरवर्षी १४ जानेवारी यादिवशी आंबेडकरी जनता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या ‘ प्रवेशद्वाराची ’ची नामांतर दिन निमित्ताने मनोभावे पूजा करते. जणूकाही साक्षात आपण बाबासाहेबांपुढेच नतमस्तक होत आहोत या श्रेद्धेने गेटपुढे नतमस्तक होतात.
नाममात्र शुल्कात उच्च शिक्षण देणारे देशातील हे पहिले विद्यापीठ आहे. मराठवाडा, विदर्भ, खान्देश, भागातील शेतकरी, शेतमजूर, दलित, कष्टकरी वर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक भूमी म्हणून विद्यापीठाने नाव लौकिक मिळविला व लाखो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देऊन त्यांच्या आयुष्याला आकार दिला.
लेखन – अमर तायडे मलकापूर
नामांतर दिन
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्याला आज 25 वर्षे झाली.आज माझ्यासहित अनेक तरुणांना हा लढा अस्मितेचा वाटू शकेल.हकनाक माणसे बळी गेली.घरादाराची राखरांगोळी झाली वगैरे वस्तुस्थिती आहे.हे खरेच.
परंतु केवळ नावासाठी आम्ही भावनिक झालो होतो?
हे सत्य नाही.आम्ही गांधी विद्यापीठात शिकतो.नेहरू विद्यापीठात शिकतो.
टिळक सावरकर शिवाजी महाराज एवढेच काय बनारस हिंदू विद्यापीठातही शिकतो.
आम्ही बाटत नाही आम्हाला जातीयवाद शिवत नाही.
आमची मने शुद्ध आहेत मेंदू शुद्ध आहेत.तुम्हाला विद्यापीठ अन गुणपत्रिकेवर
डॉ.बाबासाहब आंबेडकर नाव आल्याने मनात आणि डोक्यात जातीयकीडा वळ्वळू लागला होता.
हाच तो मनु जो आजही अधूनमधून आपले डोके वर काढत असतो.इतर जातीधर्माचे तुम्हाला नावही सहन झाले नाही.
हेच लोक यांचेच पूर्वज यांची आजची पिढी मुलेबाळे (तन्मयचिन्मय) आजही हीच मानसिकता घेऊन जगत आहेत.अपवादांना सलाम.तुमच्या मागील पिढीची पापे चुका आम्ही तुमच्या माथी मारत नाही.फक्त एवढीच अपेक्षा करतो कि तुम्ही त्याच मार्गाने जावू नका.माणूस बना.माणुसकीने वागा.हे तुमच्या कृतीत दिसले पाहिजे.
डॉ.बाबासाहेब ब्राह्मण असते तर या देशात त्यांची मंदिरे बांधली गेली असती.परंतु बाबासाहेबाना आजही जातीयदृष्टीकोनातून पाहिले जाते.दलितांचे नेते म्हणून पोट्रेट केले जाते.कुणीतरी शास्त्री फास्त्री बरळतो बाबासाहेबानी घटना लिहिली नाही.कुणीतरी गावखेड्यात पुतळ्याची विटंबना करतो कुणी बाबासाहेबानी भीमा-कोरेगांवची लढाई मिथक म्हणून रचली म्हणून गरळ ओकतो.
अहवेलना आजही सुरु आहे.जातीयवाद आजही तोच आहे टोकदार आहे.काही गोष्टी जरूर बदल्या.काय तर शारीरिक ‘अस्पृश्यता’ कायदा करून गेली.मात्र मनमेंदुवर अजूनही मनूचा अज्रस्त विळखा आहे.नामांतर लढ्याने आम्हाला संघर्ष शिकवला.स्वाभिमान शिकवला.चिवटपणा शिकवला.प्रतिकूल परिस्थितीत तग धरायला शिकवले.अन राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेण्याचे आत्मभान दिले.त्याजागी इतर समाज असता तर देश सोडून परागंदा झाला असता.आम्ही इथेच झुंज देत आहोत.आम्ही या मातीत जन्मलो आहोत.
एवढे हाल या देशात कोणत्याच समाजाच्या वाट्याला आलेले नाहीत.याचा एकदा माणुसकीच्या नात्याने विचार करावा.नाही केला तर गिल्ट घेऊन जगणे नशिबी येते त्याला इलाज नाही.माणूस बनणे हाच अंतिम इलाज.आता परिस्थिती बदलली आहे.समीकरणे बदलली आहेत.यापुढे अशी आंदोलने नाही झाली तर समाजाच्या हिताच्या दृष्टीने ती होणार नाहीत याची काळजी घ्यावी.आज स्मारक नामांतर हे समाजाचे विषय होऊ शकत नाहीत.
विद्यापीठ कॉलेज हॉस्पिटल्स वसतिगृह शिक्षण नोकरी ऍट्रॉसिटी हेच मुद्दे प्राधान्याने अगत्याने लढणे सोडवणे गरजेचे आहे.
असो नामांतर दिन निमित्ताने नामांतर लढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात शहिदांना विन्रम अभिवादन
सदियों रहा है दुश्मन, दौर-ए-ज़माँ हमारा।
कुछ बात है कि हस्ती, मिटती नहीं हमारी।
जयभीम जय भारत जय संविधान !!
लेखन – मिलिंद धुमाळे मुंबई
हेही वाचा.. इंडिया दॅट इज कास्ट
हेही वाचा.. रोमन साम्राज्य आणि भारतीय समाज
तस्नीम मीर: Tasnim Mir अशी बनली जागतिक क्रमवारीत अव्वल
टेलीप्रॉम्प्टर म्हणजे काय? कसे काम करते? नरेंद्र मोदी यांचे भाषण चर्चेत
जय भीम पिक्चर आणखी एक विक्रम,ऑस्कर अकादमी कडून सन्मान
जयभीम चित्रपट थांबायचे नाव घेईना ,चीन मध्ये ठरतोय लोकप्रिय
जयभीम चित्रपट:नोंदवला आणखी एक विक्रम आंतरराष्ट्रीय सन्मान
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा, )
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 21, 2022 11: 44 AM
WebTitle – dr-babasaheb-ambedkar-marathwada-vidyapeeth