बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे वर एन्काउंटरनंतर ५ दिवसांनी अखेर अंत्यसंस्कार करण्यात आले. बदलापूर, ठाणे, कळवा आणि अंबरनाथमध्ये शिवसेना शिंदे गट आणि स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर, कडेकोट पोलीस बंदोबस्तात उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत न्यायालयाच्या आदेशानुसार दफनविधी करण्यात आला. संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अक्षय शिंदेचा दफनविधी पार पडला. स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे स्मशानभूमीच्या परिसरात तणाव निर्माण झाला होता, ज्यामुळे परिसराला पोलीस छावणीचं रूप मिळालं होतं.
सुरुवातीला, बदलापूर येथील स्मशानभूमीत अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार केले जातील अशी अपेक्षा होती, परंतु स्थानिकांच्या विरोधामुळे ते शक्य झालं नाही. नंतर, अंबरनाथ येथे हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचा विचार होता, पण तिथेदेखील शिवसेनेनं विरोध केला. दरम्यान, अक्षयचा मृतदेह जे. जे. रुग्णालयातून उपचारांनंतर कळवा येथील रुग्णालयात आणण्यात आला होता, जिथं सहा दिवसांपासून तो ठेवण्यात आला होता. कळवा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्याचं समजताच मनसेकडून विरोध दर्शवण्यात आला.
सर्वत्र होत असलेल्या विरोधामुळे प्रशासन अडचणीत आलं होतं. अखेर उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार होणार असल्याचं ठरलं. त्यानुसार, रविवारच्या पहाटेच पोलिसांनी तिथे खड्डा खोदला होता. मात्र, माहिती मिळताच स्थानिक लोक घटनास्थळी आले. शिवसेना पदाधिकारी आणि महिलांनी मिळून खोदलेला खड्डा बुजवला. पोलिसांनी आंदोलकांना हटवलं आणि पुन्हा खड्डा खोदला.
अखेर, संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अक्षय शिंदेचा दफनविधी मोठ्या पोलीस बंदोबस्तात करण्यात आला.
शववाहिनीद्वारे मृतदेह उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत आणण्यात आला होता.
यावेळी उपस्थित असलेल्या अक्षयच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या साक्षीने विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.
अक्षय शिंदे वर अंत्यसंस्कार म्हणून ‘दफनविधी’ करण्याचं कारण
मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर अक्षय शिंदेच्या वडिलांचे वकील अमित कटारनवरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी स्पष्ट केलं की, पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून अक्षयच्या मृतदेहाचं दहन न करता दफन करण्याचा निर्णय घेतला. भविष्यात जर काही पुरावे आवश्यक ठरले, तर मृतदेह पुन्हा बाहेर काढता येईल, म्हणून दहन न करता पुरण्यात आलं आहे. कुटुंबाला मुलाला न्याय मिळवून द्यायचा आहे, आणि मृतदेह जतन करून ठेवणं हा त्यांचा प्रयत्न आहे.
कोर्टाच्या प्रश्नांची सरबत्ती
अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारी वकिलांवर सवालांचा भडिमार केला.
एन्काउंटर झालंच कसं, असा प्रश्न कोर्टानं उपस्थित केला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ३ ऑक्टोबरला होणार आहे,
आणि कोर्टानं एन्काउंटरमधील फॉरेन्सिक अहवाल आणि सर्व पोलिसांचे सीडीआर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 30,2024 | 08:45 AM
WebTitle – Akshay Shinde’s Final Rites Discover Why a Burial Ceremony Was Performed Instead of Cremation