आग्रा: आग्र्यातील सरकारी शाळेतील शिक्षिका मालती वर्मा वर्ग घेत असताना त्यांना एक कॉल आला – “मी अमुक पोलिस स्टेशनमधून बोलतोय, तुमची मुलगी ‘सेक्स रॅकेट’मध्ये सापडली आहे. तिला अटक केली आहे, आणि जर तुम्ही 1 लाख रुपये दिले, तर तिच्याविरुद्ध कोणतंही प्रकरण दाखल केलं जाणार नाही.” हे ऐकून मालती वर्मा घाबरून गेल्या आणि त्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. मात्र, मालती यांची मुलगी कोणत्याही सेक्स रॅकेटमध्ये अडकली नव्हती. काही लोक त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ करण्याचा प्रयत्न करत होते, ज्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली.
डिजिटल युगात, तंत्रज्ञानाने जरी आपलं जीवन सोपं केलं असलं तरी सायबर गुन्ह्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. असाच एक नवा प्रकार म्हणजे ‘डिजिटल अरेस्ट’. नावावरून हे काहीतरी तांत्रिक किंवा कायदेशीर प्रकरण वाटतं, परंतु प्रत्यक्षात ही फसवणुकीची नवीन पद्धत आहे, ज्यामध्ये निष्पाप लोकांना फसवलं जातं. आग्र्यातील शिक्षिकेचा मृत्यू हे याच फसवणुकीचं उदाहरण आहे.
पोलिस वर्दीत फोटो आणि सेक्स रॅकेटमध्ये अडकलेली मुलगी…
आग्र्यातील जगदीशपुरा सुभाष नगर अलबतिया येथे राहणाऱ्या 58 वर्षीय मालती वर्मा, अछनेरा कन्या उच्च माध्यमिक शाळेत शिक्षिका होत्या.
त्यांच्या कुटुंबात निवृत्त पती, एक विवाहित मुलगा आणि दोन मुली आहेत.
30 सप्टेंबर रोजी त्या शाळेत शिकवत असताना त्यांच्या मोबाइलवर व्हॉट्सअॅप कॉल आला.
कॉलवर पोलिस वर्दीत फोटो होता आणि तिकडून आवाज आला,
“तुमच्या मुलीला सेक्स रॅकेटमध्ये पकडलं आहे. जर तुम्ही 1 लाख रुपये पाठवलेत तर तिला सोडून देऊ.”
डिजिटल अरेस्टने घेतली एका आईची जान
हे ऐकून मालती वर्मा हादरून गेल्या. त्यांचं मन खचलं आणि त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला. असा कॉल वारंवार येत राहिल्यामुळे त्यांना मानसिक त्रास झाला. त्यांच्या मुलीला सेक्स रॅकेटमध्ये पकडल्याचं ऐकून त्या स्वतःला सावरू शकल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला ही गोष्ट सांगितली, जो लगेचच आपल्या बहिणीशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांची मुलगी आग्र्यात बी.फार्मा करत होती. मुलीने सांगितलं की ती कॉलेजमध्ये आहे. मुलाने आईला समजावलं की हे फसवे कॉल्स होते, घाबरण्याचं काही कारण नाही. मात्र, मालती यांचा ताण कमी झाला नाही, आणि त्या शाळेतून घरी आल्या. घरी आल्यानंतर त्यांना छातीत वेदना होऊ लागल्या. त्यांना तत्काळ आग्र्यातील सरोजिनी नायडू मेडिकल रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेमुळे कुटुंबात शोककळा पसरली.
फसवणूक करणाऱ्या डिजिटल सापळ्यात अडकू नका
डिजिटल अरेस्टमुळे शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची बातमी पोलिसांना कळल्यावर त्यांनी तपास सुरू केला. मालती यांच्या फोनवर आलेल्या कॉल्सची चौकशी केली जात आहे, आणि कुटुंबाच्या माहितीनुसार प्रकरण दाखल करण्याची तयारी सुरू आहे. आग्रा लोहा मंडीचे एसीपी मयंक तिवारी म्हणाले, “डिजिटल अरेस्टच्या नावाखाली अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. सतर्कता आणि जागरूकतेनेच अशा घटना टाळता येऊ शकतात. डिजिटल फसवणुकीपासून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी डिजिटल जगात सतर्क राहणं अत्यावश्यक आहे.”
जागल्याभारत आपल्या वाचकांना सावध करत आहे.आणि अशाप्रकारे कोणतेही कॉल आल्यास न घाबरता सर्वात अगोदर पोलिसांना कळवावे.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 04,2024 | 16:35 PM
WebTitle – Agra Mother Dies After Fake Call About Daughter in Sex Racket Beware of Digital Arrest Scam