भारतीय चित्रपट सृष्टीत अनेक दिग्गज अभिनेत्री होऊन गेल्या आहेत. पण एक अभिनेत्री अशी होऊन गेली आहे जिच्या सौंदर्याची, अदाकारीची आजही लोक प्रशंसा करतात. प्रत्येक अभिनेत्रीला तिच्यासारखे बनण्याची इच्छा असते. तिच्या सौंदर्याची तुलना आजवर कोणाशीही केली जात नाही. आरस्पानी सौंदर्याची खाण , मोहक हास्य आणि आपल्या जीवंत अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री विषयी वर्णन करेल तितके कमीच आहे. खुप कमी आयुष्य लाभले असतानाही तिने संपूर्ण भारतवर्षावर अदाकारी आणि सौंदर्याने राज्य केले ती अभिनेत्री म्हणजे मधुबाला.
मधुबाला हे नाव देविकाराणी यांनी दिले
मधुबाला अर्थात मुमताजजहाँ बेगम देहलवी यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९३३ रोजी दिल्ली येथे झाला. मुमताजजहाँ बेगम यांना बेबी मुमताज या नावाने पण ओळखले जायचे. १९४२ साली बालकलाकार म्हणून बेबी मुमताज यांनी “बसंत” या चित्रपटात काम केले. तत्कालीन प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्मात्या देविकाराणी यांच्यावर मधुबाला यांच्या सौंदर्याची छाप पडली. बाबूराव पटेल आणि देविकाराणी यांनाही बेबी मुमताज यांचा विशेष लळा लागला होता. बेबी मुमताज यांचे नाव मधुबाला हे नाव देविकाराणी यांनी दिले.
आरस्पानी सौंदर्याची खाण असून पण मधुबाला यांना १९५० ते १९५७ पर्यंतचा काळ अनुकूल नव्हता. सुरवातीच्या काळातील त्यांचे चित्रपट फारसे चालले नाहीत. सुरवातीच्या काळात त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. १९५८ साली किशोर कुमार, अशोक कुमार आणि अनुप कुमार यांच्यासोबत “चलती का नाम गाडी ” हा सिनेमा तुफान चालला. हा तीन भावांच्या जीवनातील गमतीजमती असलेला सिनेमा होता. अशोककुमार, किशोर कुमार आणि अनुपकुमार हे दिग्गज कलाकार असूनही त्यात मधुबाला यांच्या अभिनयाचा ठसा होता. “एक लडकी भिगी भागीसी” या गाण्याने अक्षरशः लोकांना वेड लावले. त्याच वर्षी मधुबालाचे “हावडा ब्रिज “, “कालापानी”,”फागून ” हे पण चित्रपट चांगले चालले.
अनारकलीची भूमिका मधूबालासाठीच होती
मधुबाला आणि दिलीप कुमार हे ” तराना” या सिनेमावेळी एकत्र आले होते. दिलीपकुमार यांच्यावर मधुबाला मनोमन प्रेम करत होत्या. मधुबालाने आपल्या ड्रेस डिझायनर कडून एक गुलाबफुल आणि प्रेमपत्र दिलीपकुमार यांना पाठवले होते आणि सांगितले होते की जर दिलीपकुमार यांचे त्यांच्यावर प्रेम असेल तर त्यांनी गुलाब आणि प्रेमपत्र ठेवून घ्यावे. दिलीपकुमार यांनीही ते प्रेमपत्र आणि गुलाबफुल ठेवून घेतले.
मधुबाला यांचा उल्लेख झाला आणि “मुघलेआझम” या सिनेमातील अनारकलीचा उल्लेख येणार नाही असे होत नाही.
के. आसिफ यांच्या मुघलेआझम चित्रपटात अनारकलीची भूमिका मधूबालासाठीच होती असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.
मुघलेआझम हा चित्रपट इतका भव्यदिव्य होता आणि त्यातील अनारकलीची भूमिकाही खूप सुंदर आणि महत्त्वाची होती.
किशोर कुमार यांनी आपला धर्म बदलून मुस्लिम धर्म स्वीकारला.
हा चित्रपट करताना त्या आजारी होत्या. पाण्याशिवाय त्यांना काही खाता येत नव्हते.चित्रपटाचे शूटिंग राजस्थानात होते. आजारामुळे अशक्त झालेल्या आणि तशातच आऊटडोअर शूटिंग, शूटिंगसाठी मोठ्या वजनाच्या साखळदंडाने बांधले जाणे हे सर्व सहन केले. अनारकलीसारखी भुमिका पुन्हा पुन्हा मिळत नाही असे त्या म्हणत.याच कालावधीत मधुबाला आणि किशोर कुमार यांची जवळीक वाढली.
किशोर कुमार यांनी त्यांची पहिली पत्नी रुमा गुहा यांना घटस्फोट दिला होता. मधुबाला यांना मानसिक आधाराची गरज होती.सततचे आजारपण, ह्रदयाला असलेल्या होलमुळे त्या जास्त दिवस जगतील असे त्यांना वाटत नव्हते. किशोर कुमार आणि मधुबाला हे मानसिक आणि भावनिक पातळीवर एकत्र आले होते. आजारावरील उपचारासाठी त्या इंग्लंडला जाऊन आल्या. नंतर किशोरकुमार आणि मधुबाला यांचा विवाह झाला. विवाहासाठी किशोर कुमार यांनी आपला धर्म बदलून मुस्लिम धर्म स्वीकारला. पण नियती खूप क्रुर होती. मधुबाला आजारातून उठल्याच नाहीत. दिवसेंदिवस आजार बळावत गेला. वयाच्या अवघ्या ३५/३६ व्या वर्षी म्हणजेच २३ फेब्रुवारी १९६९ रोजी त्यांचे निधन झाले. आजही आपल्या मनात जेव्हा मधुबाला येते तेव्हा ” प्यार किया तो डरना क्या ” हे गीत आठवते.
मागील पोस्ट सिरिज साठी खालील लिंकवर क्लिक करा
1 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने -1
2 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 2
3 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 3
4 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 4
5 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 5
6 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 6
7 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 7
8 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 8
9 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 9
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)