एसटी काय दिलं तुमच्या लाल डब्यानं?
” काय दिलं तुमच्या लाल डब्यानं???” असं मी रागाच्या भरात म्हणताच कधी नव्हे ते बापाच्या डोळ्यात राग, अश्रू सगळंच भरून आलं.
” हरामखोर त्या लाल डब्याचीच कृपा म्हणून तू आयुष्यभर जगत आला आहेस….!!!”
मी एस टी चा लाल डबा म्हणून केलेला उपरोधिक उल्लेख बापाला अजिबात आवडला नाही उलट तो अधिक दुखावला.
जग काही म्हणते जगाच्या तोंडाला थोडंच हात लावता येतो?? पण एस टी नं आम्हाला भाकरी दिली त्याच्याच लेकरांनी असं बोलावं?
साला मलाच मग लै अपराधी वाटू लागलं, तरीही “सुरक्षित प्रवासाची दहा वर्षे” या पाच पंचवीस रूपयाच्या पितळी बिल्ल्याला छातीवर लटकवून ड्रायव्हर्स तसेच आयुष्य काढतात तरीही एस टी बद्दल ते कातर कातर होतात. ती जगावी टिकावी असं त्यांना मनोभावे वाटते.
“रानात गटाडं टाकायला जावा पण एस टी त जाऊ नका” असं बाप काळजीपोटी सांगायचा तेव्हा त्यामागे बापाची काळजी होतीच. रिटायरमेंटच्या कार्यक्रमात जेव्हा गेलो तेव्हा आयुष्य एस टी खाली घुसून पानं घेऊन नट बोल्टला झटणाऱ्या बापाबद्दल जे वाटलं ते शब्दात सांगू शकत नाही.
भाई एस एम पाटिल हे एस टी महामंडळाचे अध्यक्ष होते तेव्हा ते महामंडळाने दिलेल्या गाडीतून पुण्याला जाताना बाहेर बघत होते. हडपसरजवळ त्यांनी अचानक ड्राइव्हर ला गाडी थांबायला सांगितली, उतरले आणी रस्त्यावर चालत गेले. त्यांचं गाव वरवड्याच्या मांगवाड्यातल्या एका पोराला त्यांनी ओळखलं. तो रस्त्यासाठी खडी फोडत होता. तात्यांनी त्याला तसाच मळकुट्या कपड्यावर आणला व दुसऱ्या दिवशी त्याची अॉर्डर काढली!
तशी आदर्शवादी माणसं आता राहिली नाहीत. एसेम तात्यांसारखा महामंडळाला एकही अध्यक्ष मिळाला नाही.
एस टी चे खरे लाभार्थी कोण आहेत? तर मी आहे एस टी चा खरा लाभार्थी…..!!!
महिला कंडक्टरांची व्यथा
महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली महिला कंडक्टर भरल्या. फक्त सहा महिने प्रसूती रजा दिली. त्या महिलांमध्ये ६२ % गर्भपाताचे प्रमाण आहे. याची कोणती कारणमीमांसा आहे. महामंडळ या काळात या महिलांना साधा कार्यालयीन जॉब सुद्धा पुरवू शकलं नाही.
कोरोना काळात अठरा हजार बसेस पैकी फक्त दोन हजार बसेस चालल्या.
दिवसाला तीस कोटी देणारी एसटी दोन तीन कोटी वर आणून ठेवली. पॅकेजेस रडक्याचं डोळे पुसणारी असतात.
दर दिवाळी च्या तोंडावर कामगारांच्या असंतोषाचा भडका उडतो
तरीही कोणतंच सरकार एस टी जगावी म्हणून ठोस उपाय करत नाही. एसटीचे उत्पन्नाचे मार्ग कापले जातात.
उदा. एस टी महामंडळाकडे हजारो एकर्स जमीन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहेत
तिथे बीओटी तत्त्वावर गाळे बांधले तर त्यातून एस टीस उत्पन्न वाढू शकते पण सरकार ते करत नाही.
३३ % सवलती सरकार एस टी प्रवाशांसाठी देते.त्याची रक्कम एसटी महामंडळास कधीच वेळेवर दिली जात नाही.
दंगलीच्या वेळी सामाजिक रोषाची पहिली बळी एस टीच होते.एसटीच फोडली जाते.पेटवली जाते. तिला कोणतेही महत्वपूर्ण संरक्षण नाही.
बारा बारा वर्षे काम करूनही सोळा सतरा हजारापेक्षा कर्मचाऱ्यांना पगार नाहीत.
एसटी ज्या मार्गावर फायद्यात धावत होती. ते सगळे महत्वपूर्ण मार्ग सरकारने खाजगी भांडवलदाराकडे दिले. त्यांनी एस टीचेच इनपुट, कर्मचारी वापरून “प्रवाशांच्या सेवेसाठी” वरून ” प्रवाशांना कापण्यासाठी” पर्यंत गेले.
एसटी ला सरकार टोल फ्री करू शकले नाही.
एस टी ला सरकार टोल फ्री करू शकले नाही.डिझेलचे वाढते दर आणि एस टी तिकिटाचे दर याची टोटल महामंडळाला कधीच घालता आली नाही. एस. टी चे अध्यक्षच असे येतात की त्यांना एस टी प्रश्नांची माहितीही नसते, गांभीर्यही नसतं आणि संवेदनाही नसते.
समाज म्हणून हे पब्लिक ट्रान्सपोर्ट जिवंत राहावं असं का वाटतं नाही?? विकसित देशात पब्लिक ट्रान्सपोर्टला इतका सन्मान आहे. तिथे एस टी कडे बघण्याकडे इतका कोरडा आणि घृणास्पद दृष्टीकोन का आहे???
आगारातच कितीतरी कर्मचारी दिवाळी साजरी करतात. कसंतरी सजावट करतात. आठ आठ तास एस टी चालवणारा ड्रायव्हर मोडक्या तोडक्या सीटवरून एस टी हाकतो तरीही त्यानं सुरक्षितच प्रवास केला पाहिजे. त्यांच्या बुडाला साधं सीट एस टी पुरवू शकली नाही.
बँक कर्मचाऱ्यांना बोनस, फरक, महागाई भत्ता एवढं सारं दिवाळीला मिळून तो कुटुंबात दिवाळी साजरी करतो तरीही लोक त्यालाच मिठाईचं बॉक्स घेऊन जातात पण मी एकदाही एखाद्या एस टी कर्मचाऱ्याला कुणी मिठाईचा बॉक्स भेट म्हणून देताना कुणी बघितलेला नाही.
आपल्या देशात श्रमाला सन्मान नाही हेच जास्त खरं आहे. सन्मान फॅनखाली बसणाऱ्याला आहे.
एस टी जगवणे किंबहुना स्वस्त साधं आणि सुरक्षित सार्वजनिक ट्रान्सपोर्ट जगणे हे आपल्या सगळ्यांच्या हिताचं आहे!
एस टी तून आलेल्या भाकरी खाल्लेल्या पिढीतील मीही एक आहे……!!!!!
राम मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दलित कुटुंबावर प्राणघातक हल्ला
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
किरण गोसावी चा अटक होण्यापूर्वी आला नवा व्हिडिओ
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त; जामिनावर नवाब मलिकांची प्रतिक्रिया
आर्यन खान प्रकरण; वानखेडेंवर आरोप;पंच चा धक्कादायक गौप्यस्फोट!
फॅक्ट चेक : शाहरुख खानचे वडील स्वातंत्र्यसैनिक नव्हते का?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 30, 2021 13:45 PM
WebTitle – What did your lal daba give you? The agony of our darling ST