पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या कॉँग्रेसच्या सत्तेत मागासवर्गीय समाजावर बहिष्कार टाकण्याचे प्रकार वाढतात,ही चिंताजनक बाब आहे.
जगात आणि देशात कोरोनाच्या महामारीने लॉक डाउन लावण्यात आला आहे,राज्यात देखील लॉकडाउन असून ठराविक वेळेत जीवनावश्यक वस्तू मिळण्याची मुभा आहे.काही वेळेस हा लॉकडाउन कडकडित असतो.म्हणजे काहीच मिळत नाही.हे मागच्या वर्षी आपण अनुभवले.लोक एकमेकांच्या संपर्कात येवू नयेत.गर्दी होऊ नये आणि कोरोनाची लागण होऊ नये हा या लॉकडाउन मागील उद्देश.
मात्र आपल्या देशाचे वैशिष्ट्य हे आहे की या देशात काही तथाकथित उच्च जातीय समाजाकडून तथाकथित निम्न जातीय लोकांवर हजारो वर्षापासून सोशल लॉकडाउन लावण्यात आला आहे.फुले-शाहू-आंबेडकरांच्या अथक परिश्रम कष्टाने हा लॉकडाउन उठवला गेला.त्यामुळे या कमजोर समाजाला मुख्य प्रवाहात येण्यास काहीशा फटी निर्माण झाल्या.मात्र या फटी सुद्धा बंद करण्याचे काम तथाकथित उच्च जातीयांच्या मनातील आणि मेंदूतील जातीयता करत असते.
कुठे राहिलाय जातीयवाद? कुठे असते जात? आरक्षणामुळे जातीयवाद होतोय..
या आणि अशा अनेक चुकीच्या भूलथापा आणि जातीयवादी अजेंड्याना ही घटना एक सणसणीत चपराक आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा घोषणा दिल्या.केवळ या कारणावरून गावातील 30 बौद्ध कुटुंबावर गावाने सामाजिक बहिष्कार
नांदेड़ जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव येथील ही घटना,गावातील आंबेडकरी तरुणांनी 25 एप्रिल रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार सर्वांना समान हक्क समता बंधुता आणि स्वातंत्र्य मिळावे यासाठी घटनेत तरतूद केलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत जयभीम या घोषणेचा उद्घोष केला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा घोषणा दिल्या.केवळ या कारणावरून गावातील 30 बौद्ध कुटुंबावर गावाने सामाजिक बहिष्कार टाकला.
रोही पिंपळगाव मध्ये मराठा समाजाची 400 घरे असून त्यांनी या घटनेनंतर बौध्द समाजावर किराणा,दळण चक्की,भाजीपाला,दूध तसेच मेडिकल इत्यादी वस्तु खरेदीवर बहिष्कार टाकल्याची माहिती समोर येत आहे.या गावात इतर दलित आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाचीही वस्ती असल्याचे समजते.
डॉ. आंबेडकरांच्या प्रती आदर सद्भावना व्यक्त करत त्यांचा उद्घोष केल्याने मराठा समाजातील काही लोक संतापले आणि त्यांनी दोन दिवसांनी जवळपास 30 लोकांच्या जमावाने रात्रीच्या अंधारात लाठ्या काठ्या चाकू आणि (बियर) दारूच्या फुटलेल्या बाटल्या सहित गावात घुसून हल्ला केला.बौद्ध समाजातील घरांच्या दारावर लाथा मारल्या झोपलेल्या लोकाना उठवून धमकी देत दहशत निर्माण केली.
गावातील जातीयवादी समाजाकडून बहिष्कार टाकण्याच्या ही पहिलीच घटना नाही
कोरोनाच्या महामारीत देशात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती आहे. काही ठिकाणी मृतदेह जाळण्यास जागा नाही.त्यासाठी सुद्धा रांग आहे. तर काही ठिकाणी ऑक्सीजन बेड नाहीत,रुग्ण संख्या वाढल्याने आलेल्या ताणातून हे घडले हे समजू शकते परंतु या गावाने कहर करत मागासवर्गीय समाजातील मृत व्यक्तीस जाळण्यास लागणाऱ्या लाकडावर देखील बंदी घातली.त्यामुळे इतर गावातून लाकूड आणून मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.तसेच वयोवृद्ध अहिल्याबाई यांना जातिवाचक शिवीगाळ आणि मला मारहाण करण्यात आली असं किरण केळकर (स्थानिक रहिवासी तरुण) सांगतात.या संबंधीची तक्रार किरण केळकर यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे.
गावातील जातीयवादी समाजाकडून बहिष्कार टाकण्याच्या ही पहिलीच घटना नाही,2001 मध्ये सुद्धा अशाच प्रकारे गावातील मागासवर्गीय समाजावर बहिष्कार घालण्यात आला होता.हा बहिष्कार अनेक महीने सुरू होता.हा बहिष्काराचा निर्णय मागे घेण्यासाठी सामाजिक-राजकीय गटांकडून दबाव आणला गेला. जिल्हा प्रशासनाचा हस्तक्षेप करण्यास भाग पाडण्यात आल्यानंतर हा बहिष्कार मागे घेण्यात आला.मात्र मागासवर्गीय लोकांवर सामाजिक बहिष्कार केल्याबद्दल मराठा समाजाच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.असे आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष राहुल प्रधान यांनी सांगितले.
रोही पिंपळगाव बौद्ध समाजावरील बहिष्कार आणि शिवदास ढवळे यांची आत्मदहन प्रकरणी जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.वरील दोन्ही प्रकरणातील पिडीतांचे तातडीने पुनर्वसन करा. त्याच बरोबर बौद्ध समाजावरील बहिष्कार प्रकरणी पी.आय.शर्मा यांची तात्काळ बदली करून त्यांच्यावर कारवाई करावी. यासह अनेक विषयांवर चर्चा झाली असून जिल्हाधिकारी यांनी पिडीतांना नक्की न्याय देऊ आणि दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन दिल्याचे राहुल प्रधान यांनी सांगितले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भाऊ इंगोले, महासचिव शाम दादा कांबळे,
रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ शिरसे, बबन जोंधळे, शिवदास ढवळे यांचे भाऊ आणि मुलगा, रोही पिंपळगावातील कार्यकर्ते उपस्थित होते.
सामाजिक बहिष्कार घालणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
सामाजिक बहिष्कार घालणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.यावेळी वंचीत बहुजन आघाडीचे निवडणूक निरीक्षक प्रा राजू सोनसळे, युवा नेते राहुलभाऊ चिखलीकर, AMKKS मराठवाडा प्रमुख इंजि राज आटकोरे, सुनील सोनसळे, इंजि. कपिल वाठोरे, राहुल सोनसळे, राहुल घोडजकर, आतिश ढगे, अभय सोनकांबळे पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष भीमराव भुक्तरे अहिल्या बळवंते, अरुणाबाई क्षीरसागर , अंजनाबाई हाटकर, पुष्पाबाई हणमंते, प्रवीण केळकर, राहुल केळकर, देवानंद क्षीरसागर, नागेश निखाते नरहरी बुक्तरे पांडुरंग केळकर, प्रमोद कोलते, विनोद नरवाडे, सचिन भावे, तुषार वाघमारे, राजू वावळे, आकाश आदमाणे, राष्ट्रपाल गच्चे आदींची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना खालीलप्रमाणे प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
1) जात पंचायत,खाप पंचायत मजबूत करणारी तंटामुक्ती समिती बरखास्त करण्यात यावी.
2) सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा 3 जुलै 2017 पासून महाराष्ट्रात लागू झाला आहे,तरी त्यानुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.
3) अट्रोसिटी ऍक्ट मधील फरार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी.
4) रोही पिंपळगाव येथील बौद्ध वस्तीत प्रशासनांच्या वतीने बोअर पाडण्यात यावे.
5) बौद्ध वस्तीत विजेचा स्वतंत्र डी पी बसविण्यात यावा.
6) रोही पिंपळगाव येथील पोलीस चौकीत कर्मचारी तैनात करण्यात यावे.
7) रोजगार हमी योजने अंतर्गत बौद्धांना रोजगार निर्मिती करण्यात यावी.
8) गुरे ढोरांना चरण्यासाठी व जमीन कसण्यासाठी गायरान जमीन उपलब्ध करून देण्यात यावी.
नांदेड हा कॉँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला समजला जातो.
विशेष म्हणजे मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव हे गाव खासदार अशोक चव्हाण यांनी संसद आदर्श ग्राम योजनेत निवडले आहे.
त्यामुळे त्यांची या ठिकाणी नैतिक जबाबदारी जास्त आहे असे दिसत असताना
अशोक चव्हाण यांनी आजतागायत या गावास भेट दिलेली नसून ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंबेडकरी समाजातून होताना दिसतो.
यामुळे आंबेडकरी समाजात रोष निर्माण झाला असून सोशल मिडियातूनही संताप व्यक्त केला जात आहे.
टीम जागल्या भारत
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published on MAY 04, 2021 09: 18 AM
WebTitle – maharashtra-over-30-families-face-social-boycott-for-praising-ambedkar-in-nanded 2021-05-4