हिंदी चित्रपटातील दिपावली गीते – २०२० हे चित्रपट इतिहासातील असे ऐकमेव वर्ष असावे ज्या वर्षात दिवाळीस कुठलाही चित्रपट ना रिलीज झाला ना रसिकांनी पहिल्या दिवशी पहिल्या शो ला गर्दी केली. असं म्हटलं जातं की जगात चित्रपटाचं वेड असणारी सर्वाधिक वेडी माणसं भारतात आहेत. अतीप्राचीन संस्कृतीचा देश म्हणूनही आमच्या देशाची ओळख जगभर आहे. खरे तर समाजातील वास्तव अनेकदा इतकं भयाण आणि अणूकुचीदार असतं की ते स्विकारणं खूप जड जातं. चित्रपटासाठी सर्वाघिक रॉ मटेरियल आपल्या प्राचीन ग्रंथानी दिलेले आहे. भारतीय चित्रपट निव्वळ वास्तव सहसा दाखवत नाही जेव्हा तसे दाखविले जाते तेव्हा तो प्रयोगशील अथवा संमातर सिनेमा म्हणून मूख्य प्रवाहाच्या किनाऱ्यावर आणून ठेवला जातो. आमच्याकडील अपवाद वगळता बहुतांशी नाटक वा चित्रपट हे प्रेक्षक शरण असतात. कारण या दोन्ही कला व्यवसायाशी निगडीत आहेत.
हिंदी चित्रपटातील दिपावली गीते
१९३० च्या दशकात पौराणिक, धर्मिक, ऐताहासिक, कॉस्ट्यूम ड्रामा, अक्शन अशा चित्रपटांची भरमार होती. त्याचे कारणही तसेच होते. चित्रपट मूक असायचे त्यामुळे ज्या कथा आगोदर प्रेक्षकानां माहित असत त्याच पडद्यावर सादर केल्या जात. मात्र या गर्दीतही सामाजिक चित्रपट अधून मधून येत असत. यात धीरेन गांगूलीचा “मिस्टर लायर’’, रमाकांत-घारेखान या जोडीचा “भोला शिकार’’, नवल गांधी यांचा “देवदासी’’, व्ही.एम. व्यास यांचा “दुखियारी’’, आर.सी चौधरी यांचा “फादर इंडिया’’, जयंत देसाई यांचा “लव्ह अंगल’’, के.पी.भावे यांचा “रात की बात’’, एस.के.भादूरी यांचा “श्रीकांता’’, प्रफ्फुल घोष यांचा “मर्द का बच्चा’’ इत्यादी सारखे मोजकेच चित्रपट सामाजिक या प्रकारात मोडणारे होते. म्हणजेच प्रेक्षक त्यांनी ऐकलेल्या वा वाचलेल्या कथा पडद्यावर बघत होते. एक गट व्यावसायिक मनोरजंनाची चटकदार भेळ पूढयात देई व दुसरा गट त्याचा आनंद घेई.
हिंदी चित्रपटातील दिपावली गीते
४० च्या दशकात मात्र चित्रपटसृष्टीत चांगलीच उलथापालथ झाली. मूख्य म्हणजे सिनेमा बोलू लागला म्हणजेच त्यातील पात्रे प्रेक्षकांशी थेट संवाद साधू लागले. ऐकमकांशी संवाद करणे हे महत्वाचे नैतिक मूल्य चित्रपटातील “ध्वनी” नावाच्या शोधाने अधिक ठसठशीत केले. या काळात चित्रपटांच्या कथानकात अमुलाग्र बदल झाला. चित्रपट भरजरी वस्त्रे सैल करत हळूहळू सामान्य माणसांचे कपडे लेवू लागला. १९४० मध्ये ज्या चित्रपटांनी सर्वाधिक कमाई केली ते चित्रपट म्हणजे- पी.सी.बरूवा यांचा “जिंदगी” (के.एल. सैगल व जमूना), एन.आर. आचार्य यांचा “बंधन”(अशोक कुमार व लिला चिटणीस), चंदूलाल शहा यांचा “अछूत”(मोतीलाल व गोहर मामजीवाला), ए.आर.कारदार यांचा “पागल”(पृथ्वीराज कपूर व सितारा देवी), देवकी बोस यांचा “नर्तकी” (लिला देसाई व नज्म) या पाचही चित्रपटात सामाजिक वास्तवाचे कथानक होते पण विषय वेगवेगळे होते. पाचही दिग्दर्शक प्रतिभावंत आणि सिने तंत्राची जाण असलेले. सामाजिक विषयाचे धागे परंपरा आणि संस्कारानी विणले जातात आणि यात सण, उत्सव, प्रथा यांचा मोठा अंर्तभाव असतो.
भारतीय हिंदी चित्रपटातुन दाखविला जाणारा सर्वात लोकप्रिय सण म्हणजे दिवाळी, होळी, करवा चौथ् आणि रक्षा बंधन. १९४० मध्ये जयंत देसाई यानी दिग्दर्शीत केलेला “दिवाली” याच नावाचा चित्रपट बहूदा पहिला चित्रपट असावा ज्यात कथानक दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घडतं. चित्रपटात सण उत्सवांचा प्रवेश होणे साहजिक होता. चित्रपटात हे सण अत्यंत धूमधडाक्यात दाखवले जात याचे दोन कारणं होती. एक प्रेक्षकांना हे प्रसंग बांधून ठेवत आणि दुसरे अशा आनंदाच्या प्रसंगी एखाद्या धक्कादायक प्रसंगाची रचना केली जाई ज्यामुळे प्रेक्षक अचंबित होत. अत्यांतिक आनंद दुसऱ्या क्षणी दु:खद प्रसंगात परिवर्तीत होई, हे पटकथाकाराचे कौशल्य असे.
हिंदी चित्रपटातील दिपावली गीते
४०च्या दशकात दिवाळी सणानं बऱ्यापैकी चित्रपटसृष्टीचा ताबा घेतला. याच काळात संवेदनशील लेखक, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार यांची एक प्रतिभा संपन्न फळी तयार होऊ लागली आणि दिवाळी देखिल विविध रूपं घेत चित्रपटानां उजळू लागली. १९४४ मध्ये एम. सादीक या दिग्दर्शकाचा “रतन” हा चित्रपट तुफान गाजला. हा चित्रपट लोकप्रिय होण्यात संगीतकार नौशाद यांचा मोठा वाटा होता. यातील दोन गाणी प्रचंड लोकप्रिय झाली पैकी पहिले होते “आंखिया मिलाके जिया भरमाके” आणि दुसरे होते “आयी दिवाली आयी दिवाली” हिंदी चित्रपटसृष्टीतील हीट झालेले हे पहिले दिवाळी साँग. जोहराबाई अंबालेवाली ही गायिका या गाण्यांनी सूपरस्टार झाली.
भैरवी रागात बांधलेली ही चाल आजही मनाला भूरळ घालते.
जोहराबाईच्या आवाजात नक्कीच कसक आहे. एकदा जरूर ऐका.
स्वर्णलता नावाच्या अभिनेत्रीवर हे गाणे चित्रीत केले आहे.
सर्वत्र दिवाळीचे आनंददायी दिपक तेवत असताना नायिका मात्र अत्यंत दु:खी आहे
कारण या आनंदाच्या प्रसंगी तिचा प्रियकर जवळ नाही अशा आशयाचे हे गाणे आहे.
१९४३ मध्ये आलेल्या ग्यान मुखर्जीच्या सूपरहीट चित्रपट “किस्मत” मध्येही जोहराबाईचे असेच गाणे-
“ घर घर मे दिवाली, मेरे घर मे अंधेरा….” आहे. अर्थात लता नावाचा गाण
अविष्कार चित्रपटसृष्टीत दाखल झाला नव्हता तेव्हाचा हा सिनेमा आहे.
हिंदी चित्रपटातील दिपावली गीते
१९५० मध्ये निर्माता-दिग्दर्शक सोहराब मोदी यांचा “शीश महल” हा चित्रपट प्रदर्शीत झाला. या माणसाच्या नावात, व्यक्तीत्वात, निर्मितीत, संवाद म्हणण्याच्या शैलीत एक जबरदस्त भारदस्तपणा होता. स्वत: सोहराब मोदी, सौंदर्यवती नसीम बानो(सायरा बानो व सुलतान अहमदची आई), गजानन जहागिरदार, पुष्पा हंस यांच्या दमदार भूमिका या चित्रपटात होत्या. यातील गीता दत्त आणि शमशाद बेगम यांनी गायलेले व वंसत देसाई यांनी संगीतबद्ध केलेले “आयी है दिवाली” हे गाणे गाजले ते त्यातील भव्य चित्रीकरणामुळे. राजमहालाचा भला मोठा सेट हजारो दिव्यांच्या सजावटीने उजळून टाकलेला तर अनेक नर्तीका आपल्या हातात दिव्यांचे ताट घेऊन नृत्य करताना दिसतात. या चित्रपटातील दिवाळी एका राजघराण्यातील कुटूंबाची आहे त्यामुळे दिवाळीचा संदर्भ बदललेला दिसतो.
हळूहळू मग दिवाळी गाण्यांनी चांगलाच जोर धरला
हळूहळू मग दिवाळी गाण्यांनी चांगलाच जोर धरला. कौटुबिंक चित्रपटातील दिवाळी कथानकाला पूढे नेण्यास मदत करू लागली. १९५१ मधील “स्टेज” या चित्रपटात आशा दीदीचे “जगमगती दिवाली की रात आ गयी”, १९५५ मधील “सबसे बडा रूपैया” या चित्रपटातील काहीशा कव्वाली अंगाने जाणारे “इस रात दिवाली कैसी आयी है” रफी आशा शमशाद यांचे हे गाणे म्हणजे घरात दिवाळीच्या दिवशी घरात आलेल्या गोड पाहूण्याचं स्वागत आहे. १९५७ मधील “पैसा” या चित्रपटात गीता दत्तने गायलेले “दीप जलेंगे दीप दिवाली आयी हो” हेही गीत सुंदर आहे. १९५८ मधील आशादीदीने गायलेले “खजांची” चित्रपटातील मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेले “आयी दिवाली आयी कैसे उजाले लायी” हे श्यामा या अभिनेत्रीवर चित्रीत केले गीत मात्र नायिकेच्या आनंदी मनाचे प्रतिक दाखविले आहे. या गाण्यात रोषणाई बरोबरच फटाके, आकर्षक प्रकाश उधळण आणि सुंदर आरास याची पार्श्वभूमी वापरण्यात आली. या चित्रपटातील दिवाळीची गाणी पारंपारीक आहेत. म्हणजे दिवाळी ही सण म्हणूनच यात आली.
१९५९ मध्ये एस.एस. वासन यांचा “पैगाम” आला. दिलिप कुमार राजकूमार, वैजयंती माला, जॉनी वॉकर यांच्या सुंदर अभिनयाने नटलेल्या या चित्रपटात दिवाळी वरील वेगळ्या आशयाचे एक गाणे आहे. कवी प्रदीप यांनी लिहलेले हे गाणे अत्यंत मार्मिक आहे. चित्रपटाचे कथानक मिल मालक विरूद्ध मिल कामगार असे असल्यामुळे गरीबांनी दिवाळी साजरी कशी करायची? हा प्रश्न कवीला पडतो आणि मग तो लिहतो- “कैसी दिवाली मनाए हम लाला, अपना तो बारा महिने दिवाला” जॉनी वॉकर वर चित्रीत झालेले हे गाणे रफी यांनी खास ढगांत गायले आहे.सी. रामचंद्र याचे संगीतकार आहेत. पाहिल्यांदाच या चित्रपटात दिवाळीचे गाणे विषमतेचे वस्त्र लेऊन आले. हे गाणे त्याकाळी चांगलेच लोकप्रिय झाले.
आजही २० ते ३० कोटी जनतेच्या घरात दिवाळीची अंधूकशी पणती पेटलेली नाही
२०१२ च्या जनगणणेनुसार देशातील २३.६ टक्के जनता दारिद्र्य रेषेच्या खाली आहे.आजही २० ते ३० कोटी जनतेच्या घरात दिवाळीची अंधूकशी पणती पेटलेली नाही अशावेळी ५८ वर्षापूर्वीचे हे गाणे अतंर्मूख करायला भाग पाडते. या अर्धपोटी लोकांचे आनंदाचे क्षण चुकून वा जाणून बुजून आपण हिसकावून तर घेत नाहीत ना अशी एक बोच मनाला लागते.असो,तर चित्रपटातील हे गाणे संवेदना असणाऱ्या कलावंताची अभिव्यक्ती होती जी मनाला भावून गेली.
१९६१ मध्येही दिवाळी वरील दोन गाणी गाजली. श्रीधर या दिग्दर्शकाचा नजराना या चित्रपटात राजेंद्र कृष्ण यांनी लिहलेले व संगीतकार रवीनी संगीत दिलेले लता दीदीच्या आवाजातील एक गाणे आहे- “मेले है चिरागोंके रंगीन दिवाली है, महका हुवा गुलशन है हसंता हुआ माली है….” वैजयंतीमालाच्या सुंदर पदन्यासाने या गाण्याची गोडी वाढवली आहे. यातील दुसरे गाणे मुकेशनी गायले आहे जे राज कपूरवर चित्रीत केले आहे, बोल आहेत- “एक वो भी दिवाली थी, एक ये भी दिवाली है “ एकाच चित्रपटात दोन रंग घेऊन आलेली ही दोन्ही गाणी लोकप्रिय झाली. १९६२ मधील “हरीयाली और रास्ता” या चित्रपटातील मुकेश आणि लताजीचे-“लाखो तारे आसमान मे एक मगर ढुँढे ना मिला, देखके दुनियाकी दिवाली दिल मेरा चूपचाप जला” शैलेंद्र यांच्या अजरामर लेखणीतुन उतरलेले व शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे आजही अत्यंत कर्णमधूर न् ऑल टाईम हिट आहे.
६० नंतर ही संगीतमय प्रवास सूरूच राहिला.
सण, उत्सव वा आनंदाचे कोणतेही प्रसंग असोत मात्र अनेकानां आपल्या कर्तव्याच्या पालनासाठी या आनंदाला मुकावे लागते.
सिमेवर आहोरात्र पहारा देणारे आमचे जवान असोत की आमच्या गाव शहराची रक्षण करणारी पोलिस यत्रंणा ….
आमचे सण उत्सव आनंदात जावे म्हणून यांना आपल्या कौटुबिंक आनंदी क्षणाला पारखे व्हावे लागते.
या क्षणाचं अत्यंत हृदयस्पर्शी शब्दचित्र शायर कैफी आझमी यांनी १९६४ मध्ये आलेल्या “हकिकत” या चित्रपटात केले आहे.
गाणे आहे “आयी अब के साल दिवाली,मूंहपर अपने खून मले,
चारो तरफ हे घोर अंधेरा, घर मे कैसे दीप जले”
जवानांच्या मन:स्थितीचे इतके काव्यमय सुंदर चित्रण नंतर कोणत्याच चित्रपटात बघायला नाही मिळाले.
खरे तर दिवाळीच्या दिवशीही अनेकजण आपले नित्याचे काम करतच असतात.
रेल्वे इंजिन ड्रायव्हर व टीसी, बस ड्रायव्हर व कंडक्टर, ट्रक ड्रायव्हर, वैमानिक, दूध वाटप करणारे, पेपर वाटप करणारे,
किरकोळ दुकानदार, भाजीपाला विक्रेते, रिक्षाऑटोवाले, चित्रपटगृहातील तिकीट फाडणारे,
प्रोजेक्शन ऑपरेटर, टपाल पोहचविणारे, रेडिओ व दूरर्शनवरील कर्मचारी वगैरे……
या सर्वानीच जर दिवाळीची सुट्टी एकाच दिवशी घेतली तर काय होईल ????
देवानंदच्या “गाईड” मधील सचिनदाचे अस्सल भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारीत बांधलेले
“पिया तोसे नैना लागे रे” या तब्बल साडे आठ मिनीटाच्या गाण्यात तर अनेक सण एकत्र गुंफले आहेत.
यातील एक कडव्यात वहिदा रेहमान मराठमोळ्या पेहरावात दिवाळी गीतातुन आपले अंत:करण उलगडते.
६० नंतर ही संगीतमय प्रवास सूरूच राहिला. चित्रपट आता सप्तरंगी झाले आणि दिवाळीच्या सणाची खूमारी आणखी वाढवू लागले.
१९७३ मधील धमेंद्रच्या “जुगनू” मध्येही एक दिवाळी गाणे आहे.
किशोरदाने गायलेल्या- “छोटे छोटे नन्हेमुन्हे प्यारे प्यारे रे….दिप दिवाली के झुठे” या गाण्यात दिवाळी आणखी हायफाय झाली.
याच वर्षीच्या अंग्रीमॅन अमिताभच्या “जंजीर” मध्ये दिवाळी वेगळ्या रूपात दाखविली गेली.
दिवाळीच्या फटाकेबाजीत खलनायक अजित अमिताभच्या घरात घुसतो
आणि त्यांच्या पिस्तुलाचा आवाज खऱ्या फटाक्याच्या आवाजात दबून जातो.
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिवाळीची गाणी भरपूर आहेत.
चित्रपटाचे तंत्र आणि कथा जसजशा बदलत गेल्या तसतसे सांस्कृतिक संदर्भही वेगळ्या प्रकारे सादर होऊ लागले.
चित्रपटातील दिवाळी गाणी नवनवीन साज लेवून येतच राहिली.
होम डिलेव्हरी, आमदानी अठ्ठनी खर्चा रूपया, तारे जमीन पर, मोहबबते, कभी खुशी कभी गम वगैरे चित्रपटातुन दिवाळीची गाणी अधिक भरजरी व लखलखीत रूपात अवतरली. दिवाळी गाण्याचं हे भव्यदिव्य रूप मात्र स्वप्नां सारखं वाटू लागलं….लेड इलेक्ट्रीक दिव्यांच्या चकचकीत रोषणाईत पणत्यांचा उजेड हरवला. दिव्याने दिवा पेटवणाऱ्या संस्कृतीतलं तेवणारं मन आता मात्र शोधताना अडचण येत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिवाळीची गाणी भरपूर आहेत.
मनातला अंध:कार या प्रकाशाने नाहीसा व्हायला हवा
मी फक्त काही नमूने लेखासाठी घेतले. या लेखाचा समारोप करताना माझ्या ओठावर एक गाणे मात्र प्रकर्षाने रेंगाळतयं. खरे तर हे दिपावलीचे गाणी नाही आहे. मात्र यात एक सार आहे माणसाला जोडण्याचं…१९६४ मध्ये मणिभाई व्यास यांचा “संत ज्ञानेश्वर” हा चित्रपट प्रदर्शीत झाला. हा चित्रपट यातील एका गाण्यामुळे प्रचंड चर्चेत राहिला. रसाळ कवी भरत व्यास यांच्या या गाण्याला लक्ष्मी प्यारे या जोडीने अत्यंत सुंदर चाल बांधली. मुकेश आणि लता या दोघांनीही हे गाणे गायले आहे. मला स्वत:ला मुकेशने गायलेले अधिक भावते- “ज्योत से ज्योत जगाके चलो, प्रेम की गंगा बहाते चलो” यातील ही प्रेमाची ज्योत खूप महत्वाची. एक पणती लाखो पणत्या पेटवू शकते. तथागत भगवान गौतम बुद्ध तर स्पष्टच म्हणतात- “ स्वत:च्या अंत:करणातील ज्ञानाचा दीप पेटवला की अज्ञानाचा अंधकार नाहीसा होईल”. वर्तमान झाकोळू द्यायचा नसेल आणि दिवाळी जर प्रकाशाचे पर्व आहे असे आपण मानत असू तर मनातला अंध:कार या प्रकाशाने नाहीसा व्हायला हवा.
हेही वाचा… दिलीप कुमार ; भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – भाग – 5
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 30, 2021 20:15 PM
WebTitle – Diwali songs from Hindi movies