सध्या तरुणांमध्ये दातांसंबंधी समस्या वाढत आहेत. जंक फूड आणि आहारात साखरेच्या वाढत्या प्रमाणामुळे भारतात जवळपास ६०% तरुण दातांच्या समस्येने हैराण आहेत. दात किंवा दाढेला कीड लागणे, हिरड्यांना सूज येणे, तोंडातून दुर्गंधी येणे या समस्यांनी तरुणाई ग्रस्त झाली आहे. वेगवेळ्या ब्रँडच्या शेकडो सिथेंटीक आणि ऑरगॅनिक टूथपेस्ट आज बाजारात उपल्बध असताना सुद्धा तरुणांमध्ये दातांसंबधी समस्या वाढत आहेत. दातांसंबंधी समस्या या केवळ दातांपुरत्या मर्यादित नाहीत तर त्याचे आपल्या आरोग्यावर इतर अनेक अनेक दुष्परिणाम सुद्धा होतात.
ऑइलपुलिंग केल्यास दातांची कीड नष्ट होण्यास नक्कीच फायदा होतो
तोंडात निर्माण होणारी लाळ जेव्हा पोटात जाते तेव्हा ती अन्नपचनास मदत करते. पण किडलेल्या दाढांमुळे अन्न योग्यप्रकारे सावकाश चावून खाणे अनेकांना शक्य होत नाही व परिणामी पुरेश्या प्रमाणात लाळ निर्माण न झाल्यामुळे अपचन, ऍसिडिटी सारख्या समस्या निर्माण होतात व त्यासाठी मग वेगळी औषधें घ्यावी लागतात. दात किंवा दाढ जास्त प्रमाणात किडल्यामूळे रूट कॅनल करणे, कॅप लावणे किंवा दात/दाढ काढून टाकण्यासारखे उपाय करावे लागतात. हल्ली दाढीचे खड्डे भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मर्क्युरीचे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होत असल्याचे समोर येत आहे. त्याविषयी अधिक संशोधन सुरु आहे.
दातांचे आरोग्य टिकवण्यासाठी आपण काही खबरदारी घेऊ शकतो. उदा. सकाळी व रात्री झोपण्यापूर्वी दातांना ब्रश करणे, हिरड्यांना बोटानी हलके मालिश करणे. काहीही खाल्ल्यानंतर चूळ भरणे, जेवणात कॅल्शियमयुक्त आहार पुरेश्या प्रमाणात घेणे व वर्षातून एकदा तरी डेंटिस्ट कडे जाऊन दातांची तपासणी करणे. साखरयुक्त आहार व सिगारेटचा दातांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो हे लक्षात घेऊन साखरयुक्त आहार व धूम्रपान टाळले पाहिजे. या खबरदारी बरोबरच नियमित ऑइल पुलिंग केल्यास दातांची कीड नष्ट होण्यास नक्कीच फायदा होतो असा अनेकांचा अनुभव आहे.
ऑइल पुलिंग म्हणजे काय?
सोप्या भाषेत सांगायचं तर ऑइलपुलिंग म्हणजे तीळ किंवा खोबरेतलं तेलाने चूळ भरणे. अनेकांना ऐकायला थोडं विचित्र वाटत असेल पण दातांच्या समस्यांवर मात करण्यासाठी तीळ किंवा खोबरेतलं तेलाने चूळ भरण्याचे प्रमाण पाश्चिमात्य देशात वाढत आहे. त्यावर अनेक पुस्तकं सुद्धा लिहिली गेली आहेत. या उपायाद्वारे दातांच्या समस्यांवर मात करणारे अनेक जण हि पद्धत आयुर्वेदात लिहिलेली आहे असे सांगत असले तरी एकही भारतीय आयुर्वेदतज्ञ हा उपाय सांगताना दिसत नाही. ऑइल पुलिंगचा शोध कोणी लावला यावर चर्चा करण्यापेक्षा ऑइल पुलिंग दातांच्या समास्यांवर मात करण्यासाठी अतिशय चांगला घरगुती उपाय आहे हा अनेकांचा अनुभव आहे हे जास्त महत्वाचे आहे.
A ऑइल पुलिंगसाठी कोणते तेल वापरावे?
ऑइल पुलिंगसाठी तिळाचे किंवा खोबऱ्याचे शुद्ध तेल वापरावे.
दुकानातून हे तेल विकत घेताना त्यात्या इतर तेल मिसळले गेले नाहीत याची खात्री करावी.
तीळ आणि खोबऱ्याच्या तेलात अँटी-बॅक्टरीयल आणि अँटी-इन्फ्लमेटरी गुणधर्म असल्यामुळे हे तेल वापरले जाते.
B ऑइल पुलिंग कसे करावे?
सकाळी झोपेतून उठल्यानंतर १ टेबलस्पून तीळ किंवा खोबऱ्याचे तेल घेऊन चूळ भरावी. तेल न गिळता तोंडात दात व दाढांच्या मधून फिरऊन साधारण १५ ते २० मिनिटे गुळण्या कराव्यात. सुरवातीला ५ मिनिटे चूळ भरली तरी चालेल. हळू हळू सवई झाल्यास वेळ वाढवत न्यावी. जास्तीत जास्त २० मिनिटे चूळ भरावी. सुरवातीला फार वेगाने किंवा जोर लावून चूळ भरू नये. चूळ भरताना तेल तोंडात जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. १५ ते २० मिनिटांनी तोंडातील तेल थुंकून टाकावे व स्वच्छ पाण्याने भरपूर चूळ भरावी. तोंडातील तेलाची चव संपूर्ण जाई पर्यंत पाण्याने चूळ भरावी व त्यानंतर दातांना ब्रश करावे.
C नियमित ऑइल पुलिंगचे फायदे.
१ ते ३ महिने नियमित आली पुलिंग केल्यास पुढील फायदे होऊ शकतात.
१)हिरड्यांची सूज कमी होते.
२)तोंडातील जखमा बऱ्या होतात.
३)दातांचे किटण साफ होते.
४)दात पांढरेशुभ्र होतात.
५)हिरड्या मजबूत होतात.
६)मुख दुर्गंधी दूर होते.
D ऑइल पुलिंग किती वेळ करावे?
ऑइल पुलिंग सकाळी झोपेतून उठल्यावर ब्रश करण्याआधी व रात्री झोपण्याआधी ब्रश केल्यानंतर करावे. रात्री ऑइल पुलिंग केल्यानंतर काहीही खाऊ नये…
E ऑइल पुलिंग कोणी करू नये?
ऑइल पुलिंग हे केवळ प्रौढांसाठी असून लहान मुलांना, वृद्ध आजारी व्यक्तींना ऑइल पुलिंग करण्यास मुळीच सांगू नये कारण ते ऑइल पुलिंग करताना तेल गिळू शकतात. तसेच दाढांना कॅप लावणारे, दातांना ब्रेसेस लावणाऱ्यानी सुद्धा ऑइल पुलिंग करू नये. कारण ऑइल पुलिंगमुळे दाढांच्या कॅप आणि ब्रेसेस सैल होतात हा अनेकांचा अनुभव आहे.
F ऑइल पुलिंग करताना काय काळजी घ्यावी?
सर्वसामान्य व्यक्ती मात्र ऑइल पुलिंग करू शकत फक्त ते करताना तेल गिळले जाणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी. ज्यांचे दात हलत आहेत त्यांनी ऑइल पुलिंग करताना फार जोर लावू नये.
(वैधानिक इशारा: वरील लेख हा फक्त माहितीसाठी असून ऑइल पुलिंगचे आरोग्यविषयक अनेक फायदे सांगितले जात असेल तरीही त्यावर प्रमाणित संशोधन अजून झालेलं नाही. वाचकांनी दातांच्या आरोग्यासाठी डेंटिस्टचा सल्ला घ्यावा.)
by sakya Nitin
अवतार सिंह पाश…. सबसे ख़तरनाक होता हैं अपने सपनो का मर जाना..
महाश्वेता देवी, शोषित-उत्पीडित वंचिताच्या वेदनेचा आवाज
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)