
‘बिग बॉस मराठी’ च्या पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाण ठरला आहे. ६ ऑक्टोबरला सूरज चव्हाणला विजेता घोषित करण्यात आल्यानंतर अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याचे कौतुक केले. अभिनेता अभिजीत केळकर यांनीही सूरज चव्हाण च्या बाबतीत पोस्ट लिहून त्याची स्तुती केली होती. मात्र, या पोस्टवरून अभिजीतला ट्रोल केलं गेलं. आता अभिजीतने या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे.
काही दिवसांपूर्वी ‘मीडिया टॉक मराठी’ या यूट्यूब चॅनेलवर अभिजीत केळकर शी संवाद साधला.
यावेळी अभिजीत केळकर ने सोशल मीडियाबद्दल बोलताना सूरज चव्हाण बद्दल केलेल्या पोस्टवरून झालेल्या ट्रोलिंगबद्दल आपले मत व्यक्त केले.
त्याने सांगितलं, “माझ्या मुलांनी सोशल मीडियावर येऊच नये, अशी माझी प्रामाणिक भावना आहे. कारण सोशल मीडियावर जे काही चालले आहे, ते मला आवडत नाही. मी अभिनेता आहे, म्हणूनच माझ्या कामाचं प्रमोशन व्हायला हवं, त्यामुळे सोशल मीडियावर सक्रिय आहे.
जर मी अभिनेता नसतो, तर मी सोशल मीडियावर नसतो. कारण जी ट्रोलिंग होते किंवा एखाद्या पोस्टचा कसा अर्थ काढला जातो…
उदाहरणार्थ, ‘बिग बॉस मराठी’ चा पाचवा सीझन चालू होता, तेव्हा मी सूरज चव्हाण बद्दल पोस्ट केली होती.
त्या पोस्टचे विविध अर्थ लावले गेले. मला त्या मुलाबद्दल कौतुक वाटत होतं.”
अभिजीत केळकर पुढे म्हणाला, “मी अशी पोस्ट केली होती ज्यात लिहिलं होतं की आर्थिक आणि सामाजिक समता, जी गेल्या ७५ वर्षांत आपल्या लोकशाहीने दिली नाही, ती सूरजला सोशल मीडिया आणि एका रिअॅलिटी शोने दिली. मला त्या मुलाबद्दल कौतुक वाटत होतं. पण लोकांनी हे असं घेतलं की मला लोकशाहीचा आदर नाही, मी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान करतो. तरीही मी कोणालाही स्पष्टीकरण देत नाही. कारण मला माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकर माझ्यासाठी काय आहेत, मी कोणत्याही जातीतला असो. म्हणून मला यावर स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही.”
“पण मला दुःख होतं. कारण मी या जातीतला आहे, म्हणून मी अपमान करेन किंवा द्वेष करेन, असं जर तुम्ही मला शिव्या देऊन म्हणत असाल, तर यामुळे मला दुःख होतं. जितके बाबासाहेब तुमचे आहेत, तितकेच माझेही आहेत, जरी मी ब्राह्मण जातीतला असलो तरी. कारण मी त्यांच्या दिलेल्या संविधानाचं पालन करतो. मी त्या देशात राहतो जिथे सर्वात मोठी लोकशाही आहे. माझं फक्त इतकंच म्हणणं होतं की सूरजसारख्या गावातील मुलाला जी समता लोकशाहीने द्यायला हवी होती, ती त्याला मिळाली नाही. त्यामुळे मला एवढंच सांगायचं होतं,” असं अभिजीत केळकर म्हटलंय.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 28,2024 | 20:00 PM
WebTitle – Abhijeet Kelkar Reacts to Trolling Over Post on Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan