झुंड सिनेमा:झोपडपट्टी मध्ये जन्मलेले जागतिक दिग्गज आणि समाजशास्त्रीय व सौंदर्यशास्त्रीय आकलनाप्रत
झुंड सिनेमा – : समाजशास्त्रीय व सौंदर्यशास्त्रीय आकलनाप्रत…….!!!!
” Opportunities given to us we are inferior to none”
– : डॉ बाबासाहेब आंबेडकर. ”
झुंड सिनेमा:झोपडपट्टी मध्ये जन्मलेले जागतिक दिग्गज
एकदा तुम्ही स्लमचा भाग बनला की कलंकीकरणाच्या प्रक्रियेखाली स्लम ड्वेलर्स बनलात की इतके दबले जाता, इतके दबले जाता की तुम्ही आपला क्रिटीकल कॉन्शयसनेस म्हणजे तर्काने विचार करण्याची शक्ती हरवता.” – : पाऊलो फ्रिअरे ब्राझीलच्या झोपडपट्टी मधून आलेला शिक्षणतज्ज्ञ.
” होय, मी एक स्लमडॉग आहे. मी झोपडपट्टीत वाढलो आहे. मला झोपडपट्टीतून बाहेर पडण्याची महत्त्वाकांक्षा होती म्हणून मी इथवर आलो आहे……!!!!!” – : माईक टायसन् जगज्जेता बॉक्सर २००८ मुंबई
“डायनामाईट ” हे निकनेम असलेला तसाच स्फोटक असलेला बॉक्सर माईक टायसन कुठून आला?? जगज्जेता बॉक्सर मोहम्मद अली कुठून आला?? अमेरिकेचे हे दोन्ही कृष्णवंशीय बॉक्सर slum dwellers म्हणून झोपडपट्टीतून आले.
झुंड सिनेमा:झोपडपट्टी मध्ये जन्मलेले जागतिक दिग्गज
अर्जेंटीनाचा महान फूटबॉलपटू “द गोल्डन बॉय” दिएगो मेरोडोना कुठून आला?? तर झोपडपट्टीतून…
तब्बल १२८१ गोल ज्याच्या नावावर आहेत व ज्याचे रेकॉर्ड जगात अजूनही कुणी मोडू शकले नाही तो महान “पेले” कुठून आला??
ब्राझीलच्या साओ पाउलो च्या झोपडपट्टीतून…
रोनाल्डो कुठून आला??
करोडो रूपयांची संपत्ती आज नावावर असूनही पाय जमीनीवर ठेवून
दोन तीनशे रूपयाचा फोन वापरुन प्रचंड दान करणारा सेनेगल माने कुठून आला?? तर झोपडपट्टीतून……!!!
वरीलपैकी जी महत्वपूर्ण उदाहरणे दिली आहेत ते सर्व खेळाडू कृष्णवर्णीय निग्रो वंशाच्या समाजातून,
ज्यांना वर्णभेदाच्या शोषणाने नाकारलेय त्या समाजातून ती पीडा भोगून वर आले व त्यांनी आपल्या उन्नयनाचं उदाहरण जगासमोर ठेवलं….!!!
घेट्टो कसे बनतात?
झोपडपट्टी बनत जाण्याची एक वर्गीय प्रक्रिया आहे. तिला Ghettonisation असे म्हटलेय. घेट्टो कसे बनतात??
तर भांडवली प्रक्रियेमुळे जे अविकसित राहतात असे अनेक वेगवेगळी सांस्कृतिक वैशिष्ठ्ये असलेले अनेक गट बाजूला फेकले जातात,
व ते शहराची गरज व या समूहाच्या स्वतःच्या अस्तित्वाची गरज म्हणून एकत्र राहतात व झोपडपट्टी बनत जाते.
Ghettonisation हि समाजशास्त्रीय टर्म जशी आहे तशीच कलंकीकरण हि दुसरी टर्म आहे.
जे अनेक कारणांचा परिणाम म्हणून व्यवस्थेने बाजूला पडलेत वा पाडलेत.त्यांच्यावर आपोआपच विविध प्रकारचे कलंक माथी मारले जातात.
ते अशा अनेक कलंकीकरणाखाली वर्षानुवर्षे अत्यंत वाईट अवस्थेत
म्हणजे त्याचं माणूस म्हणून असलेलं जीवन गृहीतच धरलं जात नाही
अशा अवस्थेत ते जीवन जगत असतात. हे कलंकीकरण सतत नेणीवेवर आपला प्रभाव गाजवत राहते.
कलंकीकरणाच्या प्रक्रियेखाली स्लम ड्वेलर्स इतके दबले जाता, इतके दबले जाता की
तुम्ही आपला क्रिटीकल कॉन्शयसनेस म्हणजे तर्काने विचार करण्याची शक्ती हरवता.”
असं ब्राझीलच्या रिओ द जानीराओ मधल्या झोपडपट्टीतून आलेला पाऊलो फ्रिअरो का म्हणतो?
झुंड सिनेमा:झोपडपट्टी मध्ये जन्मलेले जागतिक दिग्गज
तर तुम्हाला आता इतकंच माहिती आहे की सकाळी उठायचं आणि कामाला जायचंय.
हेच पिढ्यांपिढ्या करत रहायचंय. मी जे करतोय तेच आता मेंदूवर अधोरेखित झालंय.
अशा दहा वीस लाख लोकातून उठून कुणीतरी संघर्ष करून हळूच भांडवली प्रदेशात प्रवेश करतो
याचा अर्थ काय आहे तर ज्योतीराव फुले जसं म्हणतात की बरंवाईट विचार करण्याची तर्कबुद्धी अविद्येने गेली.तसंच इथंही घडतं.
तुम्ही अशा घेट्टोत गेलात की तुमची अशी तर्क करण्याची शक्ती संपते, गायब होते.
त्यामुळं तुम्ही कशालाच नकार देण्याच्या मानसिकतेत नसता. तुमचा मेंदू हे स्विकारत राहतो. हे सर्वात मोठं कारण आहे.
या घेट्टोतून वर उठणंच हेच सर्वात महान आव्हान आहे. असं नाही की स्लम सॉकर हि संकल्पना जगात सर्वप्रथम प्रो. विजय बोरसे यांनी वापरली तर ती जगात अगोदरच वापरली आहे, याआधीही जगभरातल्या झोपडपट्ट्यातून क्वालिटीचे स्लम सॉकर आलेच आहेत. वर त्यांची उदाहरणेही आलीत, पण भारतात मात्र बोरसे सरांनी हि संकल्पना वापरली. त्यांचा ग्रेटनेस यात आहे की त्यांनी झोपडपट्टीतल्या निम्नजातवर्गीय तरूणांना हि स्वतःचा उत्कर्ष करण्याची, उन्नयन करण्याची संधी दिली. त्यांच्यात वर उभरण्याची आस साजिवंत ठेवली.
झुंड सिनेमा:झोपडपट्टी मध्ये जन्मलेले जागतिक दिग्गज
कोणत्याही देशाचा इलिट क्लास जगभरात त्याची एक वेगळी प्रतिमा, जी त्याला हवी आहे तशी त्याच्या प्रचारप्रसारमाध्यमातून उभी करत असतो व साधनसंधानाचे खरे लाभ घेत असतो. यातच फूटबॉल, बास्केटबॉल व अन्य खेळ भांडवली दाखवले /बनवले आहेत, इथपर्यंत ठीक आहे पण ९० मिनिटे मैदानावर उर फुटस्तोवर पळायला जे गटस् लागतात, जी जिगर असते ती कशी कमावणार??
ती त्या त्या देशातील शोषिताकडूनच आली ना….!!! म्हणून तर झोपडपट्टीतून आलेल्या पेलेचं १२८१ गोलचं वर्ल्ड रेकॉर्ड अजूनही अबाधित आहे. ते “भूतो न भविष्यती” आहे. आज स्लम सॉकरला जगभरातील पाच अपेक्स संघठनांनी मान्यता दिली आहे. हे कशाचे प्रतीक आहे?
तर या स्लम सॉकरने मेनस्ट्रीममध्ये त्यांना आपली दखल घ्यायला भाग पाडली याचे…!!! जेव्हा फूटबॉल तो शोषितांच्या हाथी आला तेव्हाच खऱ्या अर्थाने तो भांडवली फूटबॉल समाजवादी बनला.
झुंड चे अब्राम्हणी सौंदर्यशास्त्रीय विश्लेषण – :
भारतात पहिल्यांदा विजय बोरसे सरांनी हि संधी उपलब्ध करून दिली यात त्यांचा महत्तम ग्रेटनेस आहे. विश्वास दिला. उमेद दिली. अमिताभ बच्चन यांनी जो बोरसे सरांचा रोल केला आहे त्यात ते कॅरेक्टर या स्लम ड्वेलर्सच्या सगळ्या गोष्टी स्विकारते. इव्हन आठ दहा वर्षाचा बारका पोरगा खर्रा खातो काय तेही…. (त्याचे केस बघून मला लहानपणीच पोतराज सोडलेल्या निरागस लेकरांची आठवण आली.) तर ते कॅरेक्टर लेक्चर देत बसत नाही, टोकत बसत नाही. तर हळू हळू कौशल्याने, सातत्याने “जागे” व्हायला शिकवते.
टिम बांधत असताना पहिल्यांदा फूटबॉल दिला जातो तेव्हा एका दृश्यात दिग्दर्शक अचानक एका सेकंदासाठी एक पोलिओग्रस्त लुळा पाय लोंबताना दाखवतो. तोंडातून आहा, अॉसम आले, कारण फूटबॉल आणि पोलिओग्रस्त लुळा पाय हे भयंकर दुःखद कॉन्ट्रॅस्ट तो कॉशियसली दाखवतो.
एका निम्नजातवर्गीय मुस्लिम मुलीची बंडखोरी कुठवर गेलीय?? तर तिचा नवरा तिला झालेल्या तिन्ही मुलीचा दोष तिच्यावरच ढकलतो, वर तिलाच व्यभिचारी ठरवतो तेव्हा ती बंडखोरी करून त्यालाच तलाक देते आणि तिन्ही मुली घरात आणून सृजनाचा फोटो लावते. हि राहत बागवान अशी बंडखोर नायिका दिग्दर्शक दाखवतात. हे स्त्रीप्राधान्यवादी आहे.
अदिवासी मुलीची तर तिहेरी फरफट आहे. तिला तर तिच्या गावचा पोलिस पाटिल ही ओळखत नाही. तिचा जो प्रवास आहे तो पाड्यापासून ते एअरपोर्टपर्यंतचा तो इस्टॅबिलिश करणे हे या चित्रपटाचे भावलेले अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ठ्य आहे. तुमच्या प्रतिभेला सामाजिक संदर्भातली अशी सहानुभूती नसेल तर तुमची प्रतिभा वांझोटी ठरते.
मागे एकदा झारखंडमधल्या अनवाणी अदिवासी पोरींनी फूटबॉलची स्टेट लेव्हल मॅच चिवट जिद्दीने खेचून आणली तेव्हा स्थानिक आमदार मोठे हारतुरे घेऊन त्यांच्या पाड्यावर सत्काराला गेला. सत्काराच्या या कार्यक्रमात या मुलींनी नम्रपणे हारतुरे स्विकारायला नकार दिला. तुम्हाला काही द्यायचेच असेल तर गोडेतेल, गूळ आणि गहू द्या असे सांगितले.अशी या देशातील प्रतिभेची परिस्थिती आहे
म्हणून काय पाहिजे तर संधी पाहिजे. संधी मिळाल्यासच तुम्हाला तुमच्या क्षमता पणाला लावता येतात, म्हणून संधीबाबतचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वर आलेले वाक्य महत्वपूर्ण आहे. विजय बोराडे सर जेव्हा म्हणतात यांच्या हातात बॉल दिला ते विश्वात अव्वल खेळाडू बनतील याचा अर्थ काय आहे??
संधी मिळाल्यावरच क्षमता पणाला लागत असतात. गुणवत्ता हि सापेक्ष गोष्ट असते. प्रत्येकाची गुणवत्ता त्याच्या त्याच्या ग्राउंडवर बघावी लागते. प्रत्येकाच्या एक्स्पर्टीजचे वेगवेगळे ग्राउंड असते. तुम्ही विद्वान आहात अन पाण्यात गटांगळ्या खात आहात, तुम्हाला पोहायला येत नाही मग तिथं तुमची विद्वत्ता कामाला येत नाही. तर जो तुम्हाला वाचवतो त्याची पोहोण्याची एक्स्पर्टीच कामाला येते.
महत्त्वपूर्ण काय आहे?
कलंकीकरणाचा कलंक तोडून पुढे सरकण्याचा अंकुश मसरामचा संघर्ष महत्वपूर्ण आहे. ( मै सुधरना चाहता हूं, पर ये लोग सुधरने नहीं दे रहे…) जो भयंकर पीडादायक आहे. त्याची गुन्हेगार म्हणून कलंकीत केलेली पार्श्वभूमी त्याचा पिच्छा एअरपोर्टपर्यंत सोडत नाही. त्या मेटल डिटेक्टरमधून बाहेर आलेला रडलेला अंकुश या चित्रपटाचे शिखर आहे असं मी समजतो.
झुंड कलंकीकरण तोडूनच टीम बनते
आता हे उन्नयन दलित, अदिवासी व मुस्लिमांतील निम्नजातवर्गीयाची “टीम” होत असेल तर हाच चित्रपटाच्या अब्राम्हणी सौंदर्यशास्त्राचा अविष्कार आहे.
प्रतिकांचा आत्यंतिक वापर होतो हेच प्रतिगाम्यांसाठी मूळव्याधीचे दुखणे आहे परंतु तुम्हाला तुमचा डिस्कोर्स प्रतिकामधूनच चिन्हांकित करावा लागतो. कधी कधी कलाकृतीत प्रतिकांचा अतिवापर ती कलाकृती बटबटीत बनवतो परंतु भारतातला अॉडियन्स हा काही युरोपातील अॉडीयन्ससारखा प्रगल्भ नाही ज्याला किंचितही दाखवलेली प्रतीके कळतात म्हणून प्रतीके येतातच, ती चित्रपटभर पसरतातच, ती कथा प्रेक्षकांच्या मनात ठसवतात. कर्णन मध्ये, काला करिकालनमध्ये सतत वेगवेगळ्या संदर्भात प्रतिके येत राहतात. कर्णन मधली गुलामी गाढवाच्या पायात बांधलेल्या रश्शीने चिन्हांकित होते म्हणून नायक एल्गार पुकारताना सगळ्यात अगोदर त्या गाढवाच्या पायातली दोरी तोडून पुढे सरकतो.
झुंड मध्ये सिक्युरिटी गार्ड झोपडपट्टीच्या टीमबरोबर मनोमन नातं बांधतो. ती टीम जिंकावी असे त्याच्या चेहऱ्यावर दिसत राहते. तो सिक्युरिटी गार्ड नॉर्थ इस्ट मधला आसामी वगैरे दाखवलाय. आता त्या लोकांचे फूटबॉलवरचं अतीव प्रेम ज्यांना माहित आहे त्यांनाच या दृश्याचा अर्थ कळू शकतो. दिग्दर्शकाचा हा दृष्टिकोन मला खूप भावला.
जयंतीला वर्गणी न देणारा किराणा दुकानदार स्वतःहून नोटांची गड्डी आणून विजय सरांनी ते स्विकारावी अशी विनंती करतो, त्याच्या डोळ्यात आनंदी चमक दिसते. कलंकीकरण तोडण्याचं हे रहस्य आहे.
अशा कितीतरी कारणांनी झुंड उच्चस्थानी जातो. काला करिकालन व झुंड हे दोन्ही चित्रपट झोपडपट्टीच्या समाजवास्तूवर उभे आहेत, पण दोन्हीचे जॉनर वेगवेगळे आहेत. काला शेवटपर्यंत ब्राम्हणी – अब्राम्हणी संघर्ष सतत दाखवत नेतो, काळा, निळा व लाल रंग उधळून दाखवतो. झोपडपट्टीतल्या सर्वहारांची काउंटर हेजिमनी उभारण्यापर्यंत तो गेला आहे. तसं झुंड हा झोपडपट्टी जरी प्लॉट असला तरी कलंकीकरण तोडून उन्नयनापर्यंत जाण्यात झुंड यशस्वी ठरला आहे.
सदर लेखात झुंडचे समाजशास्त्रीय व सौंदर्यशास्त्रीय दृष्टीकोनातून चर्चा करण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाच्या तांत्रिक अंगावर चर्चा करणे, गाणी व संगीत हा वेगळ्या चर्चेचा भाग राहिल.
आपण आपल्या अपेक्षा दिग्दर्शकावर ढकलने योग्य नाही. समाजाभिमुख कलाकृती देणे हेच या काळातील मोठे आव्हान असणार आहे. हे आजूबाजूला दिसणाऱ्या राजकीय सामाजिक परिस्थितीवरून म्हणता येईल.
कोणत्याही कलाकृतीकडून थेट क्रांतीची अपेक्षा करणे हे चुकीचे असते. कोणतीही कलाकृती वा साहित्यकृती क्रांती करत नसते पण ती क्रांतीपूरक मात्र असू शकते. तुम्ही तुमच्या चळवळीसाठी त्यातून काय कंटेट घेता व रिवॉल्यूशनरी मूव्ह घेता यावरच कलाकृतीचे क्रांतीदर्शीपण अधोरेखित होत असते त्यामुळे नागराज मंजुळे यांच्यासारख्या प्रतिभावान दिग्दर्शकाकडून अवास्तव अपेक्षा ठेवणे चुकीचे वाटते.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
झुंड चित्रपट बजेट:किती करोडमध्ये बनला? आतापर्यँतचे कलेक्शन
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
झुंड मुव्ही: रितेश देशमुख यांची पोस्ट व्हायरल; दोन भारताचा विचार..
झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”
Jhund film।झुंड चित्रपट,आंबेडकरांचे पोस्टर व्हायरल,पाहा रिलीज डेट
जयभीम चित्रपट थांबायचे नाव घेईना ,चीन मध्ये ठरतोय लोकप्रिय
Pushpa movie box office collection|पुष्पा फिल्म बॉक्स ऑफिस
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 13, 2022 13: 13 PM
WebTitle – Jhund Film A world-class veteran who born in the slums