कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास अठरा महिन्याची सक्तीची दीर्घ सुट्टी अनुभवून महानगरात व शहरात आज दिनांक चार ऑक्टोबर पासून मुले प्रत्यक्ष शाळेत येणार ही बाब शिक्षक म्हणून खूप आनंद देणारी आहे.दिनांक ,२४ सप्टेंबर २०२१ रोजी शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयात ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते सातवी व शहरात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश जारी केले आहेत. या शासन आदेशात विद्यार्थ्यांच्या मनोसामाजीक स्वास्थ्यासाठी शाळा व शिक्षक यांच्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोसामाजिक स्वास्थ राखण्यासाठी फक्त शिक्षकच नाही तर शिक्षण क्षेत्राशी संबंधित शासन, शाळा, मुख्याध्याक, स्थानिक शासकीय यंत्रणा, शिक्षक यांनी आपापल्या स्तरावर काही बाबींची निश्चितच काळजी घ्यायला हवी त्यासाठी हा लेख प्रपंच!
कोरोना काळ आपल्या सर्वांसाठी खूप कठीण होता. आपली मुलंही त्याला अपवाद नाहीत. त्यामुळे शाळेत येणाऱ्या मुलांनी आणि त्यांच्या कुटुंबाने भावनिक, मानसिक, सामाजिक व आर्थिक झळ सोसली आहे. या सर्व बाबींचा विचार करता आताचा काळ विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शिक्षकांची जबाबदारी वाढविणारा आहे. शिक्षक नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असतात. साने गुरुजीचे छान शब्द आहेत.
‘ वारा वदे कानामध्ये
गीत गाईन तुला
ताप हरीन शांती देईन
हस रे माझ्या मुला ‘
शाळेत येणाऱ्या मुलांना अधिक आनंददायक वातावरण निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक काही गोष्टी कराव्या लागतील. त्यासाठी हा लेखन प्रपंच!
सकारात्मक संवाद
कोरोना काळात मुले घरात होती. या काळात त्यांनी घरात अनेक चढ उतार अनुभवले. काही विद्यार्थ्यांच्या पालकांना कोरोना आजाराला सामोरे जावे लागले असेल. त्यामुळे काही मुलं विलगीकरणात राहिली असतील. काही मुलांच्या पालकांना आर्थिक झळ सोसावी लागली असेल. त्यामुळे सुमारे अठरा महिन्यांनी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांशी शिक्षकांचा संवाद हा सकारात्मक व विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणारा असावा. ‘तुम्ही घरी राहून काहीच अभ्यास केला नाही.’ ‘तुम्ही ऑनलाइन तासाला सहभागी का झाला नाही?’ ‘आता तुम्हाला पुढील अभ्यासक्रम खूप अवघड असेल.’ असा नकारात्मक संवाद नसावा. अगदी गोड शब्दात शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. नव्याने शाळा सुरू झाल्या म्हणून हा सकारात्मक संवाद एक ते दोन दिवसापुरता मर्यादित नसावा तर शिक्षकांनी कायमच असा संवाद ठेवायला हवा.
विद्यार्थ्यांना व्यक्त होऊ द्या
वर्गात शिक्षकांनी स्वतः अधिक बोलण्यापेक्षा विद्यार्थ्यांना अधिक बोलते करावे. कोरोना काळात विद्यार्थ्यांनी जे जे काही अनुभले त्याविषयी शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून जाणून घ्यावे. काही मुलांनी लॉकडाऊन काळाचा आनंद घेतला असेल तर त्यांनी तो आनंद कसा घेतला ? कोणकोणत्या गोष्टी त्यांना आनंद देणाऱ्या ठरल्या ? तर काही मुलांनी एखादा दुःख द प्रसंग अनुभवला असेल तर याविषयी विद्यार्थ्यांना बोलते करून त्यांना व्यक्त होऊ द्यावे. सुट्टीच्या काळात मुलांचा दिनक्रम कसा होता ? आईला घरकामात मुले काही मदत करत होती का ? काही मुले टीव्ही पाहण्यात दंग होती का? थोडक्यात मुलांचे अनुभव ऐकणे ही शिक्षकांसाठी पर्वणी असेल, पुढे वर्ग अध्यापनात शिक्षकांना विद्यार्थीकेंद्री अध्यापन करण्यास या अनुभवांचा फायदा होईल. आपल्या मनातील गोष्टी आपण वर्गात सांगितल्या, याचा आनंद मुलांना होईल.
अध्यापनाची घाई नको
शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी शिक्षकांनी अध्यापन करण्याची घाई करू नये. कोरोनाचा खूप वाईट काळ बघून मुले शाळेत येत आहेत. त्यांच्या मनात कोरोना, लॉकडाउन याविषयी भीती आहे. . शाळेच्या पहिल्याच दिवशी आपण अभ्यासाचे ओझे मुलांवर टाकले तर अडचणीचे ठरू शकेल. त्यासाठी सुरुवातीचे किमान पाच ते सात दिवस भाषिक खेळ, नावांच्या भेंड्या, कविता गायन, पूर्वज्ञानावर आधारित काही शाब्दिक खेळ, गणिती कोडी घ्यावीत, जेणेकरून शाळेत येणे हा विद्यार्थ्यांसाठी रंजक अनुभव ठरेल.
सेतू अभ्यासक्रम
विद्यार्थ्यांच्या मागील इयत्तेतील अभ्यासक्रमातून अध्ययन निष्पत्तीवर आधारित शासनाने ४५ दिवसांचा सेतू अभ्यासक्रम तयार केला आहे. दिनांक १४ ऑगस्ट रोजी हा ४५ दिवसांचा सेतू अभ्यासक्रमाचा कालावधी पूर्ण होत असला तरी, ऑनलाइन शिक्षणाची साधणे नसणारे, शिक्षकांच्या संपर्कात येऊ न शकणारे विद्यार्थी या अभ्यासपासून वंचित राहिले आहेत. त्या विद्यार्थ्यांसाठी शाळेने नियमित अध्यापनातून अधिकचा वेळ काढून सेतू अभ्यासक्रम पूर्ण करून घ्यावा. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा अभ्यासक्रम खूप उपयुक्त आहे.
अध्यापनाचे शिक्षकांना स्वातंत्र्य द्यावे
विद्यार्थ्यांच्या कलाने त्यांना वर्गात अध्यपन केले जावे. त्यासाठी निश्चित केलेले पाठय घटकांचे वार्षिक नियोजन, घटक नियोजन थोडे बाजूल ठेवावे लागेल. विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जागृत करून करून मागील इयत्तेतील शिकायच्या राहून गेलेल्या काही क्षमता व संकल्पना याचे अध्यापन करून त्या ज्ञानाची आजच्या अभ्यासाशी सांगड घालण्याचे काम शिक्षकांना करायचे आहे. मुख्याध्यापक व पर्वेक्षणीय यंत्रणेने प्रचलित व निर्धारित अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करायचा(संपवायचा) आग्रह धरू नये. वर्ग अध्यापनाचे शिक्षकांना स्वातंत्र्य द्यावे. या सर्व काळात मुख्याध्यापक ,शासकीय यंत्रणेने शिक्षकांवर विश्वास दाखवायला हवा.
मुल्यमापन योजने विषयी स्पष्टता हवी
यंदा १५ जून रोजी शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलै पासून सुरू आहेत. शहरात चार ऑक्टोबर पासून शाळा सुरू होत आहे.आज ऑक्टोबर महिना आला आहे. या काळात राज्य शासन , राज्य मंडळ यांनी मार्च /एप्रिल २०२२ मध्ये येणाऱ्या परीक्षा व एकूणच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय स्तरावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन नेमके कसे केले जावे याबाबत लवकरच स्पष्टता आणायला हवी. आज शाळा सुरू होताना मुल्यमापन योजना शिक्षक व विद्यार्थ्यांच्या समोर असली की अध्ययन व अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावीपणे पुढे नेता येईल. त्यामुळे शासन व राज्य मंडळातील धुरीणी यांनी शहरी व ग्रामीण भागातील मुलांसाठी एकच सर्व समावेशक मुल्यमापन योजना वेळेत जाहीर करायला हवी.
शासनाने आकडेवारीत शिक्षक व शाळांना गुंतवू नये
शाळा सुरू झाल्या वर्गात मुलं आली की, शासन स्तरावरून व्हाट्सएपच्या माध्यमातून
अगदी आयत्या वेळी वेगवेगळी आकडेवारी मागविली जाते.
हल्ली ऑनलाइन कामाची सवय झाल्यामुळे आशा स्वरूपाच्या माहितीचे प्रमाण थोडे वाढले आहे.
आता खूप मोठया काळानंतर मुले शाळेत येत आहेत.
त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना अध्ययन व अध्यापनाचा निखळ आनंद घेऊ द्यायला हवा.
त्यात आशा शाळा व शिक्षक यांच्या कडून वेगवेगळ्या आकडेवारीची मागणी करून व्यत्यय आणू नये.
अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरळीत होई प्रयत्न शासनाने थोडी उसंत घ्यायला हवी.
शिक्षकांना अशैक्षणिक कामे सध्या तरी नकोत
शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या नंतर महसूल विभाग, निवडणूक विभाग,आरोग्य विभाग,महापालिका,नगर पालिका,
जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा यांनी काही काळ शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत.
शाळेतील एक जरी शिक्षक या अशैक्षणिक कामांसाठी गेले तरी मुलांच्या अध्यापनावर त्याचा परिणाम होतो.
त्यामुळे काही तरी शाळा, शिक्षक,विद्यार्थी यांच्यात अशैक्षणिक कामांचा अडसर आणू नये.
शाळा हे मुलांचे आनंदस्थळ व्हावे
लॉक डाउन काळात ऑनलाइन शिक्षण किंवा मोबाईल वरील गेम खळणे, व्हिडीओ पाहणे अशा काही कारणांमुळे अधिक काळ मुलांच्या हाती स्मार्टफोन सारखी साधने राहिली आहेत. ती साधने बाजूला ठेवून घरच्या वातावरणातून मुले आता शाळेत येणार आहेत. तर काही मुलांमध्ये आता शाळा सुरू झाल्या, अभ्यास सुरू होईल, पालक शिक्षक अभ्यासासाठी आपल्या मागे रेटा लावतील,अशीही भावना असेल. तेव्हा शाळा हे मुलांना आनंद स्थळ वाटावे,यासाठी शाळांनी सुरुवातीला गृहपाठ, दैनंदिन अध्यापनावर मूल्यमापन चाचण्या, प्रकल्प अशा गोष्टींसाठी सध्यातरी आग्रही राहू नये. “मुलांनी गृहपाठ पूर्ण नाही केला तर पालकांना माहिती देऊ “, अशा वाक्यांचा वापर शाळेने टाळायला हवा.मुलं शाळेत नियमित आले पाहिजे, शाळा मुलाला आपली वाटेल असे सकारात्मक वातावरण हवे.एक कवीचे छान शब्द आहेत.
असा नको एकही हात
आता पाटीला पारखा
दप्तराचा स्पर्श व्हावा
मुलाला आई सारखा
शाळा सुरू ; मुलांना शाळेत पाठवताय ? एकदा ही बातमी वाचा
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 06, 2021 15 :00 PM
WebTitle – Schools should be ‘happy places’ for children