सिनेमा क्राफ्ट पेक्षा थोडं वेगळं बोलणार आहे.12th Fail movie चित्रपटाचा नायक मनोज फायनल इंटरव्यू देताना त्याचा गेटअप पाहिला तर तुम्हाला एका महान सोशल रिफॉर्मरची आठवण येईल,हेअर स्टाईल टाय कोट हे मुद्दाम रचलेलं आहे.निदान मलातरी ते चटकन तसं जाणवलं.(ही टीका नाही,किंवा काहीच नाही. जस्ट निरीक्षण,कदाचित तुम्हाला वेगळं दिसू शकेल) त्यातही 1942 चा डायलॉग educate agitate organize विधु विनोद चोप्रा ओल्ड स्कूल दिग्दर्शक आहेत.परिंदा सारखे चित्रपट त्यांनी दिले आहेत.
हिंदी चित्रपटात आता डॉ.आंबेडकर स्विकारले जात आहेत,हे नॉर्मलाईज होत आहे ही एक समाधानकारक गोष्ट आहे.त्यांचा हा महत्वाचा कोट येणं ही गोष्ट मोठी आहे,भारतीय सिनेमा आता खऱ्या अर्थानं लिबरल होत आहे.अर्थात केवळ एक डायलॉग आहे म्हणून लगेच सगळं बदललं असं नाही पण सुरुवात तर होतेय,आणि म्हणून 12th Fail movie हा चित्रपट पाहा अशी मी जाहिरात करत नाही,अपेक्षाही नाही,पण हा चित्रपट गरीब वर्गावर भाष्य करणारा आहे.त्यामानाने तो रिसोर्स नसणाऱ्या लोकांचा अभावात जगणाऱ्या लोकांचं जगणं मांडणारा आहे.वनलाईन सांगायची तर आपल्या जगण्यातील प्रामाणिकपणा कधीही वाया जात नाही,हे जग प्रामाणिकपणावर आदर्शावर चालतं आहे.हे ठळकपणे सांगणारा हा चित्रपट आहे.
12th Fail movie या चित्रपटात गौरी भय्या आहे. जो नायकाला त्याचं ध्येय गाठायला सिंहाचा वाटा उचलतो.त्याचा डायलॉग, ये तुम्हारे एकेले की लडाई नहीं है, एक का जीत होगा तो करोडो भेड बकरीयों का जित होगा,अर्थात त्याचा दूसरा मित्रही महत्वाचा वाटा उचलणारा आहे.गौरी भय्या मागासवर्गीय चित्रपटाचा नायक ब्राह्मण,मनोज शर्मा.मी याचे क्रिटीक समीक्षा वाचल्या काही निगेटिव्ह सुद्धा वाचल्या.चित्रपट पूर्ण पाहिला नव्हता,त्यावेळी एक व्हाईट सेव्हिअर सिंड्रोम प्रमाणे हा आपल्याकडचा तथाकथित उच्च जातीय सेव्हिअर हिरो टाइप आहे का संशय आला.मात्र नंतर मी ज्या व्यक्तिरेखेवर हा चित्रपट बेतला आहे त्यांची मुलाखत पाहिली.त्यामुळे मला तसं वाटलं नाही.कारण व्यक्तिरेखा आणि त्यांनी लिहिलेलं पुस्तक यावर हा चित्रपट बेतला आहे.आणि तो प्रामाणिकपणे भाष्य करतो असं मला वाटलं. वास्तव रिअल लाईफ असो की रील लाईफ प्रिव्हीलेज्ड लोकांना मिळणाऱ्या संधी या इतरांच्या तुलनेत अभावानेच असतात.
मनोज शर्माच्या वाट्याला संघर्ष आहे.झुंज आहेच पण काही ठिकाणी कास्ट लोकेशननुसार सरळ सोपा एक्सेस आहे.हे नाकारून चालत नाही.त्यामुळे जेष्ठ पत्रकार दिलीप मंडल यांनी या संदर्भात मांडलेलं पोलिस स्टेशनमधील सीन,पोलिसांनी घरी जाऊ देणे बंदूक घेऊन ये म्हणने असो की आजीची पेन्शन असो.आयपीएस अधिकाऱ्याला रात्री थेट घरात जाऊन भेट घेणे,त्याने वेळ देणे यागोष्टी आहेत.हे एक सामाजिक वास्तव नजरंदाज करता येत नाही.मात्र रियल मनोज शर्मा यांची लल्लनटाप वर मुलाखत पाहिली की यागोष्टी सैल होतात.आहेरे आणि नाहीरे या वर्गाचा संघर्ष संधीची उपलब्धता अभाव यागोष्टी चित्रपटात ठळकपणे मांडल्या गेल्या आहेत. स्वत:रियल मनोज शर्माही त्यावर कटाक्ष टाकताना दिसतात.मनोज शर्मा यांची लाइन ऑफ थॉट सरळ आहे.हे मुलाखातीत जाणवलं.दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांडातील आरोपी समीर गायकवाडला पकडणारे मनोज शर्माच असल्याची माहिती समजली.
आहेरे नाहीरे हे दोन वर्ग असले तरी त्यातही पुन्हा कास्ट नुसार आणखी नाहीरे मध्येही हायरारकी आहे.
आणि मग नाहीरे वर्गात मनोज शर्माकडे निदान पशुधन विकायला आहे. आजीची पेन्शन आहे.वडील सरकारी नोकर आहेत.
यातलं काहीही नाहीरे वर्गातील बहुसंख्य लोकांकडे उपलब्ध नसतं.तरीही ते संघर्ष करतात,
मला इथं हा मुद्दा आरक्षण मुद्याशी याचसाठी जोडायचा आहे.
त्यामुळे आरक्षण का गरजेचे आहे हे पुन्हा पुन्हा अधोरेखित होते,
हा चित्रपट त्यावर थेटपणे भाष्य करत नसला तरी त्याची निकड तो निर्माण करण्यात यशस्वी ठरतो.
गरीब म्हणून जेव्हा संभावना करतो,कोट करतो तेव्हा जातीचा मुद्दा इथं कळीचा आहे.
जर आरक्षण आर्थिक निकषावर द्यायचं तर सर्वात जास्त गरीब हे मागासवर्गीयच आहेत.
यासोबतच चित्रपटातील नायक हा ब्राह्मण असला तरी तो ध्येय गाठण्यासाठी लोकांचे शौचालय साफ करताना दाखवणे हे हिंदी चित्रपटात पहिल्यांदा घडलं असावं,त्यामुळे हा चित्रपट कसोटीवर उतरला आहे,तो त्याच्या सादरीकरणावर प्रामाणिक आहे.ही जमेची बाजू आहे. खरं सांगतो तो सीन मी अगोदर प्रमोशनल मध्ये पाहिलेला तेव्हा वाटलं होतं ही एक मागासवर्गीय व्यक्तिरेखा असावी.आमच्याकडे घाटकोपरला एका सुलभ शौचलयात एक जानवे घालणारा उत्तरेकडील ब्राह्मण कर्मचारी होता.त्याला पाहून मीही आवाक झालो होतो.पण मेट्रो शहरात हा एक मुद्दा आहे की इथं तुमची जात धर्म हे मुद्दे काही वेळेस गौण ठरतात,जगण्याच्या लढाईत तुम्हाला जे वाट्याला येईल ते स्वीकारावे लागते.विदेशात सुद्धा अशी कामे करणारे असतीलच.असो.
मनोज शर्मा चा मित्र प्रीतम पांडे जो त्याला बस स्टँडवरून घेऊन येतो,तोही यात महत्वाचा वाटेकरी आहे,
मनोज शर्मा यांची पत्नी श्रद्धा शर्मा यांनी दिलेली साथ निभावलेलं प्रेम खऱ्या आयुष्यात
आणि रीलमध्ये अभिनेत्रीने साकारलेली व्यक्तिरेखा ही महत्वाच्या आहेत.
आणि या प्राध्यापक विचारवंत व्यक्तीचे नाव घेणे हा आपलाच बहुमान,ज्यांनी मनोज शर्मा घडवले,
डॉ.विकास दिव्यकीर्ती रिल्स आणि युट्यूबच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली,त्यांचे लेक्चर ऐकत गेलो.
त्यांनी असे हजारो मनोज शर्मा घडवले आहेत.त्यांचा इतिहासाचा वर्ग तुम्हाला समृध्द करणारा आहे.
मला अनेक मोटीवेशनल लोक माहिती आहेत,जे नंतर इतिहास अन इतर गोष्टी सांगताना स्वत:ची मतं स्वत:चा अजेंडा घुसडून त्याची वाट लावतात. अन एक वेगळा नॅरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात.विकास दिव्यकीर्ती मला याउलट वाटले.प्रामाणिक वाटले.आरक्षण संदर्भातही त्यांची मतं तार्किक आहेत.त्यांनी मनोज शर्माला घडवलं.आणि चित्रपटात सुद्धा ते त्यांच्याच भूमिकेत आहेत.विशेष म्हणजे या भूमिकेसाठी त्यांनी नाममात्र 101 रु. मानधन घेतलं.समाजाला मनोज शर्मा अन विकास दिव्यकीर्ती सारखे हजारो लोक हवे आहेत.
हा चित्रपट तुम्हाला पुन्हा संघर्ष करायला उभा करतो.प्रामाणिकपणा कधी वाया जात नाही हेही दाखवून देतो.
विधु विनोद चोप्रा यांचे या चित्रपटासाठी आभार.
“गरीब अडाणी राहील तेव्हाच भेड बकरी प्रमाणे नेत्यांच्या इशाऱ्यावर चालेल.आणि सगळे जाणतात हेच अडाणी लोक आहेत जे या नेत्यांना धर्माच्या जातीच्या नावाने मतदान करत आले आहेत.जर जनता शिकली तर नेत्यांना मोठी समस्या निर्माण होईल.”
हा चित्रपटातील डायलॉग आजच्या राजकीय परीप्रेक्षात तेवढाच महत्वाचा आहे.
दूसरा डायलॉग- ज्यांच्याकडे पावर आहे ते पावर कधी सोडायला तयारच होत नाही.
आजचं देशातील वास्तव आणि देशातील एका मोठ्या संख्येला संधी अभावी जगायला भाग पाडणारं दुखणं
हा चित्रपट मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.ज्या दिवशी पावरवर कुंडली मारून बसलेले लोक
तीचे विकेंद्रीकरण करतील त्या दिवशी आपला देश राष्ट्र बनायला महासत्ता बनायला सुरुवात करेल.
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
मिलिंद धुमाळे
संपादक जागल्याभारत,आघाडीच्या विविध वृत्तपत्रामधून स्तंभलेखन,ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा 10 वर्षांचा अनुभव,मी मराठी दैनिकात यशस्वी स्तंभलेखन,युवा कार्यकर्ता पाक्षिकाचे माजी कार्यकारी संपादक,जनरल बातम्यासोबतच राजकीय आणि सामाजिक विषयांमध्ये अभ्यास.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 08,2024 | 14:44 PM
WebTitle – 12th Fail movie is class struggle haves have nots
खूप छान लिहिले आहे. चित्रपट कुठल्या प्लॅटफॉर्म वर आहे ?
हा चित्रपट डिस्ने हॉस्टार वर उपलब्ध आहे.