‘यसन’ हि ज्ञानेश्वर जाधवर यांची ऊसतोड कामगारांच्या दुर्दैवी आयुष्याची कादंबरी २०१९ साली ऊसाच्या फ़डात प्रकाशित झाली होती. नुकताच या कादंबरीला अत्यंत मानाचा समजला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा साहित्य पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. बार्शी तालुक्यातल्या बोरगाव सारख्याअत्यंत छोट्या गावातील तरुण ज्ञानेश्वरला याआधीही यसन कादंबरीसाठी महाराष्ट्र शासनाचा स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाडःमय श्री. ना. पेंडसे पुरस्काराने सन्मानित केले आहे.
वेसण म्हणजे घोडा, बैल, रेडा इत्यादी पाळीव प्राण्यांच्या दोन नाकपुड्यांमध्ये असलेला कातडी पडदा छेदुन त्यात ओवण्यात येणारी दोरी असते. हि दोरीओढली असता या वेसणीस ताण बसतो. ताण बसल्यावर त्या प्राण्यास त्रास होतो व तो नियंत्रणात येतो.त्याच्यावर सहज नियंत्रण ठेवून ताबा मिळवता येतो. या वेसण शब्दाचा ग्रामीण भागातील प्रचलित शब्द म्हणजे ‘यसन’. तर हि कादंबरी आहे अशाच वेसणीची जी घातली जाते कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, उसतोड्यांच्या गरिबांच्या, वंचितांच्या आयुष्यात.त्यांना ताब्यात ठेवण्यासाठी, त्यांचे शोषण करण्यासाठी. शिकून, मोठे होऊन तरी अशी वेसण सुटेल असे नायकाला वाटते परंतु शिकल्यानंतरही प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे हि वेसण सुटत नाही. त्याचा ताण बसतो. त्रास होतो. वेठबिगारी वाट्याला येते.
कादंबरी आहे गेल्या तीन पिढ्यांपासून उसतोडीचे काम करणाऱ्या बार्शी तालुक्यातल्या छोट्याशा गावातल्या बप्पा, आई, नाना, काकू, आजी, सवू आणि वामनच्या कुटुंबाच्या खडतर आयुष्याची. हि माणसं अतिशय साधी आहेत आणि प्रचंड हाल अपेष्टा सहन करत आहेत. प्रयत्न करत आहेत पण मार्गच सापडत नाही.कोरडवाहू, अल्पभूधारक शेतकरी असलेलं हे कुटुंब जगण्यासाठी सतत धडपड करताना दिसतंय. बार्शीत जाऊन दूध विकणे, शेजारच्या गावात माळवं विकणे , गावात पिठाची गिरणी, छोटंसं किराणा दुकान चालवणं, खत उचलणे, खड्डे खोदणे , हिरीचा गाळ काढणे, सडक तयार करणे, डांबर टाकणे, कोंबड्या पाळणे, नर्सरीत पिशव्या भरणे, चिंचा गोळा करणे, त्या फोडणे आणि इतरही कामे करतंय तरीही त्याचे भागत नाही. कुटुंबाला पोस्ट येईल एवढे उत्पन्न मिळत नाही. शेवटी त्यांची एकूणच सामाजिक, भौगोलिक आणि आर्थिक परिस्थिती, पोट भरण्यासाठी, जगायसाठी गाव सोडायला भाग पाडते. गाव सोडून दूर साखर कारखान्यावर ऊस तोडायला पाठवते.
ऊसतोड मजुरांचे जीवन, त्यांच्या व्यथा आणि कथा आत्तापर्यंत बऱ्याच लेखकांनी प्रभावीपणे मांडलेल्या आहेत. श्रीराम गुंदेकरांच्या ‘उचल’ कथासंग्रहापासून, भास्कर बडे यांच्या ‘पाणकणसं’, नारायणराव मुंढे यांच्या ‘ मागे फिरा पतंगांनो’, सरदार जाधव यांच्या ‘कोयता’ दिनकर जायभाये यांच्या ‘हिरवा डोंगर’ योगीराज वाघमारे यांच्या ‘धुराळा’ या कादंबऱ्यांपर्यंत आणि योगीराज बागुलांच्या ‘पाचट’ या आत्मचरित्रापर्यंत लेखन यासंदर्भात पाहावयास मिळते.
आत्तापर्यंतच्या कथा, कादंबऱ्या आणि चित्रपट मुख्यतः मुकादम आणि धनदांडगे
यांच्याकडून स्रियांवर होणारे अत्याचार आणि लैंगिक शोषण याबाबत भूमिका मांडताना दिसतात.
परंतु ऊसतोड कामगारांच्या आयुष्यात सरसकट पणे असे शोषण होतेच असे नाही
उलट त्यांच्या आयुष्यात इतर सामाजिक आणि आर्थिक प्रश्न आहेत ज्यावर अधिक बोलणे आणि लिहिणे गरजेचे आहे.
‘यसन’ नेमके हेच मांडत आहे.
‘यसन’ असंख्य घटना आणि प्रसंग जसेच्या तसे उभी करते.अनुभवाच्या आणि एकूणच लेखनाच्या पातळीवर ती अधिक जवळची वाटते. म्हणूनच कदाचित अतिशय कमी काळात मराठीतील अभिजात साहित्यात ‘यसन’ महत्वाचे स्थान निर्माण करू पाहते आहे.
संपूर्ण कादंबरीत वामन अर्थात बबड्या आपली कथा स्वतःच्या, गावच्या शब्दात आपल्यासमोर मांडतो आहे. बलामत, हबाडं, इतराशी, समसम, हेळकुंबा, सावड, आंबळ, संडेल, टमटम, इस्टी, कलई इत्यादी खरेखुरे शब्द चपखलपणे वापरले आहेत. हेच या कादंबरीचे सौंदर्य आहे. अजून एक विशेष आणि महत्वाची बाब म्हणजे पारंपरिक ग्रामीण कथा, कादंबऱ्यांमध्ये ग्रामीण भागाचे आणि जीवनाचे, वातावरण निर्मिती पोटी नको तितके वर्णन केले जाते. म्हणजे दिवस उगवला होता, चिमण्यांचा चिवचिवाट सुरु झाला होता, देवळाच्या घंटा वाजत होत्या, गाई म्हशी शेताकडे निघाल्या होत्या, वगैरे वगैरे. ‘यसन’ कादंबरी असे कोणतेही वर्णन करत नाही तर ती सहजपणे सांगत राहते ऊसतोड कामगारांचे वास्तव त्यांच्या आयुष्यातील बलामत, समसम आणि हेळकुंबा.
कादंबरीत बोरगाव, चारा, कुसळंब, बार्शी, बांगरवाडी, अरणगाव, सोनेगाव, बोरगाव, पाथरी फाटा, भालगाव, धानोरा, जिवाचीवाडी, पिंपळगाव, कळंब हि गावं येत राहतात. अशी गावे प्रत्यक्षात या भागात असल्यामुळे नकळत वाचकांच्या नजरेसमोर तिथला भूगोल उभा राहतो आणि तो त्या संदर्भाने वाचायला लागतो. ह्या गावांची जशीच्या तशी घेतलेली नावे, आणि त्यांचे वर्णन कादंबरीला वास्तविकतेची झालर देतात. ऊसतोड मजुरांचे आयुष्य मी अगदी जवळून माझ्या आजूबाजूला पाहत आलेलो आहे. मागील काही वर्षांपासून संशोधनाच्या माध्यमातून नेहमी उसतोड्यांशी संबंध येतो त्यावरून त्यांचा पट बऱ्यापैकी माहितीचा आहे. त्यामुळेच ज्ञानेश्वर ने जेंव्हा हि कादंबरी लिहिली तेव्हा त्याने या सर्व गोष्टींचे किती बारीक निरीक्षण केले आहे याची कल्पना आल्यावाचून राहत नाही.
कारखान्यावर जाणारे ऊसतोडे हे मुख्यतः अल्पभूधारक असतात. हाताला वर्षभर काम देईल एवढी शेती आणि मजुरी त्यांच्या गावात नसते म्हणून दरवर्षी रब्बीची आणि मुख्यतः ज्वारीची पेरणी झाल्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत ते गाव सोडतात. कारखान्यावर चार महिने काम केले कि साधारणपणे फेब्रुवारी-मार्च मध्ये ज्वारी काढायला येते तेव्हा उसतोड्या पैकी कुणीतरी एकजण गावाकडे आठ-दहा दिवस ज्वारी करायला येतो. झालेली ज्वारी चुंगडी बांधून वर्षभर खाण्यासाठी घरी ठेवतो आणि थोडीबहुत कारखान्यावर सोबत घेऊन जातो. इथे सुद्धा बप्पा त्यांच्या भावाला म्हणजेच नानाला बरोबर चार महिने झाले कि रानातली ज्वारी काढायला गावाकडे पाठवतात.
भलरी म्हणत म्हणत ज्वारी काढली जाते, सर्व गुड गोळा करून खळ्यावर आणले जाते. मग दिवसभर खळ्यावर ज्वारीचे कणसं खुडायचे कामे चालायची. रात्री वामन आणि नाना मस्त चांदण्यात झोपायची. सुरुवातीला वामन ला रानात झोपायला भीती वाटायची पण आजूबाजूला बबन अण्णा, अंकुश भाऊ आणि बाकीच्यांचे खळे असल्यामुळे त्याला बरं वाटायचं. साऱ्या वावरत माणसंच माणसं असायची. शेजार्यांचा, माणसांचा आधार, रानातलं चांदणं आणि त्यातलं झोपणं ; हे ग्रामीण जिव्हाळ्याचे चित्रण अतिशय सुंदरपणे केल्याचे जाणवत राहते. ज्ञानेश्वर जाधवर यांचे कौतुक वाटते ते त्यांनी केलेल्या अशा वास्तविक नोंदींमुळे आणि मांडणीमुळे. १९८० ते १९८५ च्या दरम्यान जन्मलेल्या आणि त्यांनतर २००० च्या दरम्यान कॉलेज, नोकरी, व्यवसाय यासाठी संघर्ष करणाऱ्या पिढीचे आणि त्याच्या अवती भोवती घडणाऱ्या समाजाचे, गावाचे, व्यवस्थेचे अस्सल वर्णन हि कादंबरी करते आणि म्हणूनच माझ्यासारख्या ग्रामीण तरुणाला ती जास्त वास्तवदर्शी, परिणामकारक आणि जवळची वाटते.
उसतोड्यांच्या आयुष्यात सगळ्यात जास्त ओढाताण होते ती लहान मुलांची आणि म्हाताऱ्या आजीची.
मुलं, मुली अडीच तीन वर्षांची होईपर्यंत कशीबशी आई वडिलांसोबत कारखान्यावर पाठवली जातात.
त्यानंतर त्यांना गावाकडे आजीकडे ठेवले जाते. एका वेळी अशी पाच-सहा भावंडं आजी जवळ राहतात.
वय झालेल्या आजीला त्यांची आई होऊन राहावे लागते. घरात खाण्यापिण्याची आबाळ, खर्चायला पैसे नाहीत,
कुणी उधार देत नाही अशा अवस्थेत त्या बिचाऱ्या आजीला सहा महिने हि लेकरं मोठ्या मुश्किलीने सांभाळावी लागतात.
दुसरीकडे घरातले बघून थोडीफार असलेली शेती देखील तिला करावी लागते. यात तिची प्रचंड ओढाताण होते. परंतु लेकरांसाठी तीहे सगळे सहन करते. उतारवयात एखादा सुखाचा घास खाऊन आरामदायी जगण्याची कल्पना तिच्या साठी नाही . कादंबरीतली माय सुद्धा अशीच अपार कष्ट करून नातवंडांना सांभाळते, शेती बघते, जनावरांचे बघते. वामनला देखील आईपेक्षा जास्त लळाआजीचाच लागलेला दिसतो. मुलांच्या आजारपणात त्यांची आणि आजीची ससेहोलपट होते. त्यातच कुटुंबात असलेली अंधश्रद्धा आणि त्यातून निर्माण होणारे कौटुंबिक आणि सामाजिक प्रश्न पुढे येताना दिसतात.
मुली जसजशा मोठ्या व्हायला लागतात तशा त्या गावाकडे, नातेवाईकांकडे असुरक्षित व्हायला लागतात.
फडावर, कारखान्यावर देखील त्या सुरक्षित असत नाहीत.
अशावेळी आईवडील कमी वयात आपल्या मुलींचे लग्न करण्यासाठी नाईलाजाने का होईना तयार होतात.
सोयी अभावी, पैशा अभावी, कसेतरी करून, लवकरात लवकर तिचे हात पिवळे करणे भाग पडते.
इथे बप्पा इतरांप्रमाणेच सवू अक्काची सातवी नंतर शाळा बंद करतात आणि लग्नासाठी स्थळं बघायला सुरुवात करतात.
आपण आयुष्यभर ऊस तोडला आहे. उसतोडीचे काम लय वंगाळ आहे ते आयुष्यभर करावे लागते
म्हणून ऊसतोड्याला मुलगी दयायची नाही असे ते ठरवतात. परंतु चांगली स्थळं आली तरी ती जास्त हुंडा मागायची
किंवा सगळ्याच गोष्टी जुळून येत नसत. शेवटी असेच बिना नोकरीच्या मुलासोबत लग्न करून द्यावे लागते.
ज्यात पुढे तिचे हाल होतात.ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते.
सातवी आठवीत शिकणारा वामन म्हणजेच बबड्या सुट्टीच्या दिवशी रानात गुरे चारायला घेऊन गेल्यावर त्याला दैवशाला भेटते.
तिथे त्यांची ओळख होते. रानात दैवशाला दिसली कि त्याला भारी वाटायचं. दिवस संपूच नये असं वाटायचं.
त्यातूनच तो तिला चिट्ठी लिहितो. ती घरी तक्रार करते. मग त्याला बप्पाचा मार मिळतो.
पुढे दैवशालाचे लग्न होते आणि ती उचल घेऊन नवऱ्यासोबत ऊस तोडायला जाते.
निष्पाप बबड्याला वाटते लग्न झालेली सगळीच कशी ऊस तोडायला जातात?
आपल्यालाही लग्नानंतर ऊस तोडायलाच जावं लागणार असेल तर लग्नच नको… !!
बबड्याचा हा निष्पाप प्रश्न उसतोड्यांच्या आयुष्यातली स्थलांतराची अनिवार्यता
आणि जगण्याची इतर साधने उपलब्ध नसल्याची सुन्न करणारी अगतिकता दाखवतो.
आमच्या घरी मुलगा जन्मला म्हणजे ऊस तोडायला कोयता जन्माला आला.
आमच्या घरी लग्न झाले म्हणजे ऊसतोडीसाठी एक जोडी तयार झाली. असे आहे का ?
पिढ्यांपिढ्यांचे हे दुष्टचक्र थांबणार आहे का? कुणी याचा विचार करणार आहे का? हा सगळा त्यामागचा आशय आहे असे मला वाटते.
फडावर असताना विहिरीत पडलेला सादु बैल, दारू पिऊन पडणाऱ्या आजोबाला शोधणारी आजी आणि पावसाळ्यात घराची भिंत कोसळून मरण पावलेली मामाची छोटी मुलं संवेदनशील वाचकांच्या डोळ्यात अश्रू उभे करतात. मामाची दोन्ही मुले गेल्यावर त्याच्या पहिल्या बायकोच्या सांगण्यावरून तो मुलांसाठी दुसरे लग्न करतो. पुढे दोन्ही बायकांची सतत भांडणे होतात. ताणतणाव वाढतो. त्यात मामा विष पिऊन आत्महत्या करतो हे सगळे मन विषन्न करणारे आहे. ऊसतोड मजुरांच्या जीवनात कष्ट, आर्थिक आणि सामाजिक ताणतणाव असल्यामुळे आत्महत्येसारखे प्रकारही पाहायला मिळतात. याच अनुषंगाने माझ्या एका संशोधनासाठी मी, सर्वात जास्त ऊसतोड मजूर असलेल्या डोंगरपट्टयातील, केज धारूरच्या डॉक्टरांशी जेव्हा बोलतो तेव्हा असे लक्षात येते कि विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ऊसतोड कामगारांची संख्या काळजी करण्यासारखी आहे.
दहावी नंतर पुढे कॉलेज शिकून नोकरी लागेपर्यंतचा वामन चा संघर्ष खूप मोठा आहे. काम करत करत त्याला शिकावे लागते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कशी बशी त्याला पॉलीटेकनिक च्या नॉन ग्रॅण्ट महाविद्यालयात नोकरी लागते. आता सारे काही ठीक होईल असे वाटत असतानाच तिथले अनुभव आणि परिस्थती पाहून तो चक्रावून जातो. आजच्या बरबटलेल्या खाजगी शिक्षण व्यवस्थेचे तो जे चित्रण करतो ते अत्यंत क्लेशदायक आणि निराशा जनक आहे. पोषक शिक्षण व्यवस्थेमध्ये विद्यार्थी केंद्रबिंदू आणि प्राध्यापक मानबिंदू असणे अत्यंत आवश्यक असताना, खाजगी विनाअनुदानित संस्था मात्र अशा विचारला तिलांजली देत आहेत. मराठी संस्थाचालकांच्या साम्राज्यात अमराठी प्राचार्य आणि अधिकारी यांची लॉबी तयार होताना दिसतेय आणि ती इतरांना पिळून काढत आहे.
शिक्षणाच्या बाजारीकरणात , इमारत, लॅब्ज, साधन सामुग्री, कॅम्पस, बसेस यावरच जास्त भर दिला जातो.
प्राध्यापक हा शिक्षणव्यवस्थेचा कणा आहे हे सोईस्करपणे दुर्लक्षित केले जाते.
यातूनच प्राध्यापक, स्टाफ अत्यल्प आणि अनियमित पगारात राबवून घेतला जातो.याचे परिणाम दूरगामी असल्याने
अशा संस्था चालकांच्या ते आत्तातरी लक्षात येत नाहीत.तिकडे उसाच्या फडात आणि
इकडे खाजगी शिक्षणाच्या वेढ्यात असंख्य होतकरू वामन भरडले जातात.
त्यांच्या आयुष्याचे पाचट होते. तिकडे साखर सम्राट इकडे शिक्षण सम्राट; तिकडे मुकादम इकडे प्राचार्य; तिकडे टन, इकडे टार्गेट; तिकडे कोयता, इकडे चरखा, तिकडे पाचट इकडे चोथा अशी सगळी अवस्था आहे आणि लेखक नेमकी तीच मांडत मांडत आपल्याला अस्वस्थ करतो.खाजगी, बेभरवशाची नोकरी , गावाकडची बिकट अवस्था, अवलंबून असलेली घरातील माणसं अशा कात्रीत सापडलेल्या तरुणांची लग्न जुळणे सुद्धा जिकिरीचे होऊन बसते. पुण्यात बड्या पगाराची नोकरी, स्वतःचा फ्लॅट, चार चाकी गाडी, गावाकडे पंधरा वीस एकर शेती, एकुलता एक मुलगा आणि आई वडील राहायला गावाकडे असावेत अशा मुलींकडच्या अपेक्षा असतात. मग वामन सारख्या मुलांसोबत कोण लग्न करणार?
एवढ्या सगळ्या अपेक्षा २५ वर्षाच्या मुलाकडून करणाऱ्या मुलीच्या वडिलांकडे वयाच्या पन्नासाव्या वर्षी तरी ह्या सगळ्या गोष्टी असतात का?
प्रेम करून लग्न करावे तर समाज स्वीकारत नाही आणि जमवून करावे तर कुणी मुलगी देत नाही.
हीच अवस्था वामन ची देखील होते कितीतरी जणांकडून त्याला नाकारले जाते.
शेवटी कसेतरी लग्न जमते तर महाविद्यालयातून लवकर सुट्टी मिळत नाही.
खिशात पैसे नाहीत, नातेवाईक मानपानासाठी रुसून बसले आहेत. यातून कसे तरी लग्न पार पडते.
शिक्षणातून काही तरी भले होईल या अपेक्षेने मेहनत करणारा वामन मात्र या सगळ्यातून कोलमडून पडतो.
त्याच्या आयुष्यातली यसन काही सुटत नाही.
मुळात लेखक स्वतः ऊसतोड कामगारांचा मुलगा आहे. त्याचे आई-वडिल, चुलते-चुलती यांनी दहा पंधरा वर्षे ऊस तोडला आहे. त्याने या सर्व गोष्टी जवळून पहिल्या आहेत , भोगलेल्या आहेत आणि म्हणून तो इथल्या ऊसतोड मजुरांच्या मुलांचे खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व करतोय असे वाटते. वामन या नायकाच्या माध्यमातून तो स्वतः मूकनायक होऊन आपल्या भावना मांडतोय हे समाधानाचे आणि खूप महत्वाचे आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे वामन सारख्याच इतरही उसतोड्यांच्या मुलांनी आपल्या भावना बोलताना कोणतेही दडपण आपल्या मनावर न येऊ देता लिहिले पाहिजे, मांडले पाहिजे. जगात मुक्याची कोणी दखल घेत नाही. त्याच्यामागे उभे रहात नाही. तेव्हा लाज, भीड या गोष्टी सोडून धीट होऊन योग्य ते उत्तर निःशंक होऊन दिले पाहिजे.
काय करू आता धरुनिया भीड । निःशंक हे तोंड वाजविले ।। नव्हे जगी कोणी मुकीयांचा जाण । सार्थक लाजोनी नव्हे हित ।। आले ते उत्तर बोले स्वामीसवे । धीट नीट जीवे होऊनिया ।। तुका म्हणे मना समर्थासी गाठी । घालावी हे मांडी थोपटुनि ।।
पुस्तकाचे नाव: यसन
लेखक: ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर
प्रकाशक : स्वयंदीप प्रकाशन , पुणे
एकूण पाने : २६०, किंमत : २५० रुपये
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 02, 2022, 19:50 PM
WebTitle – ‘Yasan’ the survival of sugarcane workers