अशा निर्घृण घटना का घडतात ? लोकशाहीच्या प्रगल्भतेसाठी मतदान करण्याचा अत्यंत महत्त्वाचा अधिकार भारतीय राज्यघटनेने सर्वांना दिलेला आहे. मतदान हा केवळ अधिकार नसून राष्ट्रीय कर्तव्य आहे. आपण मतदान करुन आपला देश अन् आपली लोकशाही अधिक सशक्त व प्रगल्भ करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. निवडणूक म्हटली की हारजीत ही ठरलेली आहे. त्यामुळे सत्ताधारी अन् विरोधकांनी कुरघोडी करण्यापेक्षा विविध योजनांच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कोणाला हरविण्यासाठी नव्हे तर, गावचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण निवडणूक लढविली होती एवढं तरी त्यांनी कायम लक्षात ठेवून लोकभावना अन् कर्तव्य यांचा अचूक मेळ साधला पाहिजे. कारण, बदल झाला म्हणजे परिवर्तन होत नाही.
तुमच्या गावचा सर्वांगीण विकास झाला असला तरी, तुमच्या गावात सामाजिक परिस्थिती काय आहे, सामाजिक परिवर्तन किती झाले यावरुन विकासाचा दर्जा ठरवला जाऊ शकतो. त्यातच गावात सुडाच अन् कुरघोडीच राजकारण असेल तर सगळंच अवघड होऊन जाते. मतदान कोणाला करायचं हे सुध्दा राज्यघटनेने आपल्याला स्वतंत्र दिलेले असतांना, आपल्या बाजूने मतदान केले नाही म्हणून पराभूत गटाकडून जातीवाचक शिवीगाळ करुन दहशत निर्माण केली जाते.हे लोकशाहीच्या कोणत्या कक्षेत बसते ?
महाराष्ट्रात अन्याय अत्याचाराच्या अशा घटना जास्त प्रमाणात अहमदनगर जिल्ह्यातच घडत असतात. त्यामुळे, अहमदनगर जिल्ह्यातील सर्व जाती धर्माची मंडळी आपला जिल्हा अन्याय अत्याचार मुक्त करण्यासाठी समंजसपणे सामाजिक सलोखा राखण्यासाठी पुढाकार घेतील का ? पण, महाराष्ट्रात अशा निर्घृण घटना सातत्याने का घडतात ?
माणसे मारण्या इतपत यांच्यात धाडस कसे निर्माण होते
सन २०१९ मध्ये आंतरजातीय विवाह केला म्हणून आपल्या गर्भवती मुलीसह जावयाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील आहे. १४ एप्रिल २०२३ रोजी नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावामध्ये सवर्ण समाजाचा विरोध असतांनाही थाटामाटात जयंती साजरी केल्याचा राग मनात ठेवून, सवर्ण समाजाच्या गावगुंडांनी १ जून २०२३ रोजी निष्पाप अक्षय भालेरावची भोसकून निर्घृण हत्या केली. यापुर्वीही बौद्ध वस्तीवर हल्ले झाले असून, २०१६ मध्ये विहाराचीही तोडफोड करण्यात आली होती, तसेच भीम जयंती साजरी करु दिली जात नव्हती.
राष्ट्र निर्माते, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जगभरात जल्लोषात जयंती साजरी होत असतांना, नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावामध्ये जयंतीला विरोध करणाऱ्या दळभद्री लोकांवर इतकी वर्षे कारवाई का झाली नाही ? स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या अशा निंदनीय घटना खरंच आम्हांला अभिमानास्पद आहेत का ? खैरलांजी भोतमांगे वंश संहार प्रकरणी सर्व आरोपींना कठोर शिक्षा झाली असती तर अशा घटना करण्याचे कोणी धाडस नव्हे तर, मनात विचारही केला असता का ?
कायद्याचा धाक अन् कायदाच नसल्यासारखी परिस्थिती
काही वर्षापुर्वी नागपूरच्या अरविंद बनसोडच्या निर्घृण हत्येनंतर, पिंपरी चिंचवड येथे विराज जगताप या २० वर्षीय तरुणाला अमानुषपणे मारहाण करुन हत्या करण्यात आली तर साळापुरी, ता. पुर्णा, जि. परभणी व जळगांव येथे बौद्ध तरुणांवर सामुहिक जीवघेणा हल्ला करण्यात आला. माणसे मारण्या इतपत यांच्यात धाडस कसे निर्माण होते त्यातच आश्चर्य वाटते.
असा राजरोसपणे हिंसाचार करतांना यांना कायद्याचा धाक अन् कायदाच नसल्यासारखी परिस्थिती का वाटते ?
अशा घटना बघून महाराष्ट्रात जी काही प्रबोधन करणारी मंडळी आहेत त्यांनी बौद्ध वस्त्यांमध्ये प्रबोधन करण्यापेक्षा,
आपल्या समाजात प्रबोधन करायला पाहिजे असे त्यांना वाटत नाही का ?
आज त्यांनाच खरी प्रबोधन अन् मानसिक परिवर्तनाची नितांत गरज आहे.
गेली अनेक वर्षे राजरोसपणे वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या पातळ्यांवर राज्यात अनेक भयानक, अमानुष अन्याय अत्याचार आंबेडकरी समाजासह, इतर उपेक्षित समाजावर निर्दयपणे होत आहेत. खैरलांजी भोतमांगे वंश संहार प्रकरण, सोनई, नितीन आगे, स्वप्निल सोनावणे, जवखेडा, मोबाईल रिंगटोन, जयंती मिरवणूकांवर दगडफेक, मिरवणूकीतून जयंतीवर दगडफेक, भीमाकोरेगांव हिंसाचार अशा अनेक अन्याय अत्याचारांने क्रौर्याचे कळस कोणत्या मानसिकतेतून गाठले आहेत ?
महापुरुषांनाही सोडले जात नाहीत, एवढे हिंस्र होतात.
3यांना हिंसाचार घडवण्यासाठी, माणसे मारण्यासाठी कोणी प्रमाणपत्र तर दिलेली नाहीत ना ?
मग, सातत्याने असे अन्याय अत्याचार का अन् कशासाठी घडतात ? समाजा समाजामध्ये एवढी टोकाची द्वेषाची भावना का निर्माण होते ?
जातीय मानसिक विकृतीपायी हे लोक रानटी का बनतात ?
जातीय विकृत मानसिकतेतून पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात सातत्याने हिंसाचार घडत आहेत.
एवढी टोकाची भूमिका घेण्याइतपत यांची जातीय अस्मिता, पोकळ अहंकार इतक्या पराकोटीचा धारदार बनल्यांने
सामाजिक प्रतिष्ठा उफाळून येत असतील तर, डॉक्टर, वकिल, इंजिनिअर, राजकीय नेते व इतर प्रतिष्ठीत,
उच्च क्षेत्रात कार्यरत असलेल्या काही समाज घटकातील मंडळी जेव्हा आंतरजातीय विवाह करतात तेव्हा
त्यांच्या जातीय सामाजिक प्रतिष्ठा, अस्मिता, अहंकार कधी उफाळून का येत नाहीत ?
अशा सुशिक्षित, परिवर्तनवादी, पुरोगामी कुटुंबांना जातीय सामाजिक प्रतिष्ठा, अस्मिता, अहंकार नसतो का ?
तेव्हा तुम्हाला जात, धर्म दिसत नाही का ? हिंसक, रानटी होण्याइतपत सामाजिक प्रतिष्ठा पाशवी होणार असेल तर,
तीला शूद्र, विकृत, रानटी जातीय मानसिकताच म्हटली पाहिजे. अशा खोट्या, ग्रासलेल्या सामाजिक प्रतिष्ठेचा शेवट काय होतो ?
तरी सुध्दा सामाजिक प्रतिष्ठा नव्हे तर, जातीय मानसिक विकृतीपायी हे लोक रानटी का बनतात ?
जातिव्यवस्थेवर जेवढी चर्चा झाली तेवढी जाती निर्मुंलनावर चर्चा होत नाही
अमेरिकेत वर्णभेदावरुन झालेल्या काळ्या व्यक्तीच्या हत्येच्या निषेधार्थ गोर्या लोकांनीही रस्त्यावर येऊन आंदोलन केले अन् आपल्याकडे आरोपीच्याच समर्थनार्थ, त्याला वाचविण्यासाठी एकत्र येतात. याला न्याय, माणूसकी म्हणता येईल का ? रक्त पेढीमध्ये रक्ताची विभागणी जाती, धर्मानुसार केली जात नाही पण, अत्यावश्यक वेळी ते रक्त चालतेचं ना सर्वांना ? मग जातीचा एवढा माज का ?
जातिव्यवस्थेवर जेवढी चर्चा झाली तेवढी जाती निर्मुंलनावर चर्चा होत नाही. कारण, जातीयता ही मानसिकता बनली असून भविष्यात त्याचे उघड उघड भयानक दुष्परिणाम दिसून येणार आहेत. व्यसनमुक्ती, हगणदारीमुक्त गांव अभियानाबरोबरच, शासन अन् सर्व राजकीय पक्ष जातीयतेचे निर्मुंलन करण्यासाठी जातमुक्त गांव अभियान का राबवत नाहीत ?
स्वतःला पुरोगामी, परिवर्तनवादी समजणारे जाती निर्मुंलनाच्या लढ्यात, अन्याय अत्याचाराच्या लढ्यात मौन बाळगून निष्क्रिय राहिले
अस्पृश्यता निवारणार्थ आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून अर्थसहाय्य दिले जात असले तरी
आंतरजातीय विवाह करणार्यांच्या संरक्षणासाठी विशेष तरतूद करण्यात आलेली नाही.
राजकीय नेते व राजकीय पक्षांकडे सकारात्मक दृष्टीकोन अन् इच्छाशक्तीचा अभाव असल्यानेचं जातीयता नष्ट न होता,
राजकीय सोयीसाठी ती जोपासली जात आहे. ते ज्या समाज घटकामध्ये जातात तिथे त्यांची भूमिका नेहमीच वेगळी वेगळी असते.
जातीपातींच्या जीवघेण्या चक्रव्यूहाला छेद न देता, त्यांनी नेहमीचं मौन बाळगले आहे. तसेच, काही राजकीय पक्षांचे मागासवर्गीय सेल सुध्दा आहेत. पण, त्यांनी अशा प्रकरणी कधी तोंड उघडले नाही. अन् स्वतःला पुरोगामी, परिवर्तनवादी समजणारे जाती निर्मुंलनाच्या लढ्यात, अन्याय अत्याचाराच्या लढ्यात मौन बाळगून निष्क्रिय राहिले आहेत. त्यांच्या कधी भूमिका अथवा प्रतिक्रिया कधीच स्पष्ट होत नाहीत. त्यामुळे, अन्याय अत्याचार प्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल होत असले तरी आरोपींवर कठोर कारवाई झाली तरच अशा निर्घृण घटनांना निर्बंध बसेल..
मिलिंद चिंचवलकर
लेखक,अभ्यासक
संविधान दिन : सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 10,2023 | 13:11 PM
WebTitle – Why do Dalit massacres happen?