मोहम्मद रफी :आम्ही सर्वजण गर्दीतली माणसं कुठे काही प्रसंग घडला की लगेच धावत जाऊन बघ्याची भूमिका घेणारे. काहीजण मात्र गर्दीत उभे न राहता समोरच्या प्रसंगानुरूप वागणारे.वाईट घटना असेल तर मदतीला धावून जाणारे. काही जण प्रसंगाला शब्दांचा आधार देऊन लोकां पर्यंत पोहचविणारे तर काही चित्राद्वारे त्या प्रसंगाला जीवंत करणारे. आम्हाला डोळे असतात, त्यांना दृष्टी असते. काही माणसं वेड घेऊनच जन्माला येतात. अनेकदा तर या वेडाचा त्यांच्या अख्ख्या सात पिढीत मागमूसही नसतो.
आता हेच बघा नाआपल्या मोठ्या भावाच्या सलुनमध्ये त्याचा सात वर्षाचा लहान भाऊ रोज जाऊन बसतो.
एकदा तो बघतो की समोरून एक फकीर कसलेसे गाणे म्हणत जात आहे.
खरे तर असे अनेक फकीर,साधू, वासूदेव गाणी म्हणत भिक्षा मागणारे आम्हीही लहानपणी बघीतले असणार.
पण हा त्या फकीराचा पाठलाग करत जातो.नंतर तर त्याला सवयच जडते त्याच्या मागे जायची.
कारण त्या फकीराच्या सुराने त्याच्यावर जादू केलीय असे त्याला वाटू लागते.मग तो स्वत:ही त्याच्या सारखेच गुणगुणायला लागतो.
या गुणगुणण्यामधून पूढे काय घडणार हे त्या पोरसवदा मुलाला कळलं होतं का ?
हा काळ १९३१ चा म्हणजे ज्यावेळी सैगल नावाच्या संगीतातल्या अवलियाने सर्वांवर आपल्या आवाजाची जादू केली होती.
अमृतसर मधल्या त्या अवलियाचा आणि या फकीरामागे जाणाऱ्या या पोराचा नियतीने काही तरी मेळ बसविण्याचे पक्के केले असावे.
त्याने केलेल्या फकीराच्या नकलांमुळे दुकानातली गर्दी वाढू लागली.लोक बराच वेळ तिथे बसू लागले. पोरगा छान गातो की !
असे सर्वच म्हणू लागले.मोठ्या भावाला बहूतेक हे लक्षात आले असावे की “हा आपल्या कुटूंबातील इतरांपेक्षा वेगळा आहे.
आपल्या अख्ख्या कुटूंबाच्या पिढीत असा गाण्याबिण्याचा कुणाला छंद नव्हता.
मग याच्यात हे कुठून आले? कदाचित अल्लाची मर्जी असेल.त्यावेळी किराणा घराण्याचे अब्दुल वाहिद खान हे संगीतातले मोठे प्रस्थ होते.
मग मोहम्मद हमीद या त्याच्या मोठ्या भावाने याला खान साहेबाकडे संगीताचे शिक्षण घेण्यासाठी पाठवून दिले.
नतंर पं. जीवनलाल मट्टू व फिरोज निझामी यांच्याकडेही शागिर्दी केली. याचा परीणाम म्हणजे त्याच्या सुरांची बैठक भक्कम व्हायला मदत झाली.
वयाच्या 13 व्या वर्षी पहिला कार्यक्रम
ऑल इंडिया लाहोरने एकदा सैगल यांच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित केल होता. या सहा-सात वर्षाच्या काळात हा पोरगा सैगलच्या आवाजाने अत्यंत प्रभावी झाला होता. सैगलचा कार्यक्रम ऐकायला मग तो आपल्या भावा सोबत तेथे गेला. कार्यक्रम चालू असताना अचानक वीज गेली. सैगल साहब गाणे थांबवत म्हणाले – वीज आल्यावर पूढे सुरू करू. हळूहळू लोकांचा गोंधळ सुरू झाला. तशी मोहम्मद हामीद यांनी आयोजकानां विनेती केली की वीज येई पर्यंत माझ्या भावाला गायची संधी द्या म्हणजे लोकांचा गोंधळही कमी होईल. आणि मग या पोराने गायला सुरूवात केली.हळूहळू सगळेच त्याच्या आवाजाने शांत झाले. मंहमद रफी त्यावेळी १३ वर्षांचे होते आणि हा त्यांचा पहिला जाहीर कार्यक्रम होता.
चित्रपटसृष्टीत सर्वच त्यांना प्रेमाने रफी साहब म्हणत असत.रफी हा मूळ अरेबिक शब्द ज्याचा अर्थ उमदा, थोर वा उच्चकुलीन असा होतो. रफीने पूढे आपल्या नावाचा हा अर्थ सिद्धही करून दाखवला.१९७८ सालातील गोष्ट. मुकेशच्या स्मृतीप्रित्यर्थ एकदा मुंबईतील किंग्ज सर्कल येथील षणमुखानंद हॉलमध्ये एका संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते.त्या काळात मी मुंबईला जे.जे. च्या पहिल्या वर्षाला होतो. कार्यक्रम रात्री १२ वाजता सुरू होणार होता जो रात्रभर चालणार होता.हा हॉल खूप मोठा.दोन मोठ्या गॅलरीज आणि प्रचंड मोठा हॉल. मला दुसऱ्या गॅलरीतले सगळयात मागचे तिकीट मिळाले. त्यावेळी माझी ऐपत तेवढीच होती.मूख्य पाहूणे म्हणून त्यावेळचे मूख्यमंत्री वसंतदादा पाटील हे हजर होते.
संगीत रजनी
संगीत रजनी पूर्वी एकेका वक्त्यांची नेहमीची भाषणबाजी सुरू झाली.शेवटी मूख्यमंत्री बोलायले उठले.
त्यांचे भाषण काही लवकर संपेना.लोकांची चूळबूळ सुरू झाली आणि अचानक कुणी तरी म्हणाले-
“ रफी साहब आये..रफी साहब आये ”अख्खे प्रेक्षक उठून उभे राहिले.
पांढरा शुभ्र हाफ शर्ट, पांढरी शुभ्र पॅन्ट आणि त्यांचं नेहमीचे प्रसन्न हास्य.
मी त्यांच्या पासून खूपच लांब होतो पण मनाने मात्र त्यांच्या अगदी जवळ.
सर्वांना हात जोडत ते स्टेजवर गेले.मी रफीला पहिल्यांदा आणि शेवटचे येथे पाहिले.
खरे तर त्या काळात किशोरदाची खूप चलती होती पण रफी साहबची लोकप्रियता त्यावेळीही तशीच होती जी ६० च्या दशकात होती.
मी ज्या लोकलने रोज प्रवास करायचो त्यावरचे किंग्ज सर्कल हे दुसरेच स्टेशन.
या स्टेशनवर लोकल थांबली की मला रफी साहब नेहमीच आठवत.
खरं तर मोहम्मद रफी साहब यांच्यावर लिखाण करायला मी ना संगीतातील जाणकार ना समिक्षक ना त्यांच्या जवळपासचा मित्र ना चित्रपटसृष्टीतला कुणी नामवर.
त्यांच्यावर अनेक दिग्गज लोकांनी भरपूर लिहून ठेवलयं आणि मीच काय असे लाखोजण असतील
की ज्यांनी रफी साहेबानां फक्त “महसूस” केलेयं आणि आजही करत आहेत.
आपल्या कुटूबींया इतकेच त्यांच्या मुलायम मधाळ सुरांनी आमची कायम सोबत केलिय सर्वच प्रसंगात आणि आजही करत आहेत.
सूर सच्चे असले की ते आपोआप कानावाटे थेट हृदयात उतरतात..
१३ वर्षांचे रफी जेव्हा गात होते तेव्हा प्रेक्षकात त्या काळातील एक प्रसिद्ध संगीतकार ही बसलेले होते. श्याम सुंदर हे त्यांचे नाव. त्यांना रफीच्या आवाजाने प्रभावित केले. त्यांनी मोहम्मद रफी ना आपल्याकडे गाण्यासाठी आमत्रणं दिले. श्याम सुंदर यानी त्यांनी सगीतबद्ध केलेल्या “गुल बलोच” या पंजाबी चित्रपटासाठी रफीला पार्श्व गायनाची पहिली संधी दिली. हे एक द्वद्वं गीत होते जे त्यांनी झिनत बेगम या गायिके बरोबर गायले आणि बोल होते- “ सोनिये नी..हिरये नी….” हा चित्रपट २८ फेब्रुवारी १९४४ ला प्रदर्शीत झाला. त्याच वर्षी त्यानां लाहोर रेडिओ केंद्राने गायक म्हणून येण्याचे आमत्रंण दिले.
रफी साहब ना त्यांचे मोठे बंधू १९४४ मध्ये मुंबईला घेऊन आले
रफी साहब ना त्यांचे मोठे बंधू १९४४ मध्ये मुंबईला घेऊन आले. मला रफी इतकाच आदर त्यांच्या मोठ्या बंधू बद्दलही वाटतो. तो काळ असा होता की गाणे बजावणे हे मुळीच प्रतिष्ठेचे समजले जात नव्हते. घरातले बहूदा सर्वजण कडाडून विरोध करत. पण मोहमंद हमीदनी मात्र आपल्या या भावाला मनापासून साथ दिली. त्यांनी जर साथ दिली नसती तर हा हिरा कुठेतरी अडगळीत पडून आपले तेज गमावून बसला असता.त्यांनी मुंबईतल्या भेंडी बाजार या गजबजलेल्या परीसरात एक दहा बाय दहाची रूम भाड्याने घेतली व तेथे रफी सोबत राहू लागले. आपल्या भावासोबत ते ही संघर्ष करू लागले.
तन्वीर नकवी नावाचे एक उर्दू शायर त्यावेळी रफीच्या संपर्कात आले.
त्यांनी त्यावेळचे प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक ए.आर. कारदार, मेहबूब खान आणि निर्माते अभिनेते नजीर यांच्या भेटी घालून दिल्या.
त्यावेळी श्याम सुंदर हे संगीतकारही मुंबईत होते.त्यांनी पुन्हा एकदा रफी साहबना संधी उपलब्ध करून दिली.
पाहिलं गाणं
त्यावेळचे एक प्रसिद्ध गायक जी.एम. दुर्रानी यांच्या सोबत रफी साहबनी जे गाणे गायले त्याचे बोल होते-
“अजी दिल हो काबू मे तो दिलदार की ऐसी तैसी ”चित्रपट होता “गाँव की गोरी”.
रफी साहेबांचे रेकॉर्ड झालेले हे पहिले हिंदी चित्रपट गीत होते.
अमृतसरजवळच्या कोटला सुलतान सिंघ या छोट्याशा गावातल्या हाजी अली मोहमद यांच्या सहा मुलांपैकी रफी हे दुसऱ्या क्रमांकाचे अपत्य….लहानपणी सर्वजण रफीला “फिको” या टोपण नावाने बोलवत.
“फिको” या शब्दाचा ज्योतिष्य आणि आकडे शास्त्रात ढोबळ अर्थ असा की बदल स्विकारा,
लगेच निर्णयाप्रत येऊ नका, एखाद्याचे ऋण विसरू नका व परिस्थितीनुसार जुळते घ्या.
आपल्या संबंध आयुष्यात हेही नियम रफी साहेबांनी पाळले.
कोटला सुलतान सिंघ मधल्या गल्लीतल्या फकीरा मागे धावणाऱ्या या मुलाने मग अख्ख्या देशालाच नाही
तर जगालाही आपल्या मागे धावायला विवश केले.
रफीच्या आवाजाचा पल्ला आणि त्यांची सर्वच सप्तकातुन लिलया फिरण्याचे कसब खरे ओळखले ते संगीतकार नौशाद अली यांनी.
संगीताच्या वेडापायी घरदार सोडून नौशादही मुंबईला पळून आलेल्यापैकी एक होते.
खरं तर ही सर्व माणसे आपाल्या छंदापायी अक्षरश: झपाटलेली होती म्हणूनच यांच्या कडून अजरामर निर्मिती होऊ शकली.
त्यांच्यासाठी पैसा हा कधीच प्रथम क्रमांकावर नव्हता. नौशादनी रफीच्या आवाजाचा सर्वप्रथम वापर केला तो एका कोरस गाण्यात.
चित्रपट होता ए.के. कारदार यांचा “पहिले आप” गायक श्याम कुमार,अल्लाऊद्दीन यांच्यासोबत त्यांनी “हिंदूस्तान के हम है” हे गाणे गायले. शिवाय सैगल साहेबा बरोबर “शहाजहान” या चित्रपटासाठीही ते कोरस मध्ये होते.
काय योगायोगा आहे बघा,ज्या आवाजाचा तो स्वत: भक्त होता
त्या सैगल बरोबर कोरसमध्ये का होईना गाण्याची संधी रफीला मिळाली.म्हणजेच त्यांचा प्रवास योग्य दिशेने सुरू झाला होता.
१९४५ मध्ये त्यांना दोन चित्रपट मिळाले.त्यापैकी लैला मजनू या चित्रपटातील “तेरा जलवा जिसने देखा”
हे गाणे पडद्यावर ही त्यानीच गायले. १९४६ मधील “अनमोल घडी” या चित्रपटातील “तेरा खिलौना टूटा बालक”
आणि १९४७ मधील “जुगनू” चित्रपटातील नूरजहाँ यांच्या सोबतच्या द्वंद्व गीताने मात्र खऱ्या अर्थाने रफीने रसिकांचे लक्ष वेधून घेतले.
देशाच्या फळणी नंतर नूरजहाँ पाकिस्तानला गेल्या मात्र रफीसाब येथेच राहिले.
सैगल आणि दुर्राणी यांचा प्रभाव
सैगल आणि दुर्राणी या गायकांचा रफीवर सुरूवातीस खूपच प्रभाव होता. म. गांधीच्या खूना नंतर देश दु:खात बुडाला. याचवेळी संगीतकार हुस्नलाल-भगतराम, गीतकार राजेंद्र कृष्ण आणि मोहम्मद रफी यांनी रातोरात “सुनो सुनो ए दुनियावालो, बापूजी की अमर कहानी….” या गाण्याची निर्मिती केली आणि या गाण्याने सर्वांवर मोहिनी घातली. पंतप्रधान पं. नेहरूनी या टीमला बोलावून घेतले आणि समोर बसून हे गाणे ऐकले. १९४८ च्या स्वातंत्र्य दिना दिवशी पं. नेहरूनी २४ वर्षांच्या मोहम्मद रफी साहेबाचा चांदीचे पदक देऊन गौरव केला.
१९५० ते ६० हे दशक पूर्णपणे रफीचे होते असे म्हणायला हरकत नाही. अर्थात या काळात मुकेश, मन्नाडे, हेंमत कुमार, किशोर कूमार, तलत मेहमूद हे मूख्य प्रवाहात होते पण त्यांच्या आवाजाच्या काही मर्यादा होत्या त्यामुळे बरीचशी विभागणी झाली होती. रफीचा आवाज कोणत्याही अभिनेत्याला सूट होत असे. उलट मी तर असे म्हणेन की रफीसाहब प्रत्येक अभिनेत्याचा अभ्यास करून त्याला चपखल बसेल अशा आवाजात गात. त्यामूळे राजेंद्र कुमार, दिलीप कूमार, प्रदीप कूमार, भारत भूषण, शम्मी कपूर, धर्मेंद्र, राजकूमार, जॉनी वॉकर, मेहमूद, विश्वजीत, जॉय मुखर्जी या सर्वांसाठी हा आवाज फिट बसत असे.
किशोर कुमार यांना दिला होता आवाज
गंमत म्हणजे १९५८ मधील “रागिनी” नावाच्या चित्रपटात किशोर कूमारला रफी साहेबानी उसना आवाज दिला होता.गाणे होते –“मन मोरा बावरा” आणि संगीतकार होते ओ.पी.नय्यर. आणखी एक चित्रपट “प्यार दिवाना’’ यामध्ये पण किशोरदा रफीच्या आवाजात गायले. गाणे होते-“अपनी आदत हे सबको सलाम करना ” १९७२ मध्ये आलेल्या व लाला सत्तार यांचे संगीत असलेल्या या कृष्णधवल चित्रपटात मूमताज किशोरदाची नायिका होती. स्वतंत्र नायक म्हणून हा किशोरदाचा शेवटचा चित्रपट होता. शरारत (१९५९), बागी शहजादा (१९६४) या चित्रपटात देखील रफी साहेबाचा आवाज किशोरदाला दिला आहे. सुरूवातल्या त्यांनी घेतलेल्या शास्त्रीय संगीताच्या रियाजामुळे मुळातच मधूर असलेल्या आवाजाला आणखी धार चढली.
गाणे कुठलेही असो मोहम्मद रफी त्यात आपलं सर्वस्व पणाला लावत. शम्मी कपूरसाठी गायलेल्या उडत्या चाली, दिलीप कुमार साठी गायलेली विरह गीते, भारत भूषणसाठी गायलेली कव्वाली, प्रदीप कुमार साठी स्वप्नाळू गाणे, मेहमूदसाठी गायलेले हैद्राबादी ढंगाचे गाणे, जॉनी वॉकरसाठी दारूड्याचे गाणे, राजेंद्र कूमारसाठी गायलेले प्रेम गीते सर्व़त्र त्यांचा आवाज कान तृप्त करीत असे. नौशादनी तर त्यांच्याकडून सर्वच प्रकारची गाणी गाऊन घेतली.
बैजू बावराने इतिहास रचला
१९५१ मध्ये आलेल्या “बैजू बावरा” या चित्रपटासाठी खरे तर त्यांची पहिली पसंद तलत मेहमूद होती. पण त्याच्या हातातली सिगारेट बघून त्यांनी रफीला सर्व गाणी दिली. आणि मोहम्मद रफी साहेबांनी त्यात सर्वस्व ओतले.खरं तर या चित्रपटाचे निर्माते एकदा नौशाद साहेबांकडे गेले आणि म्हणाले “मला कंपनी बंद करायची आहे, पण टाळे तुमच्या हाताने लावायचे आहे.’’ यावर नौशाद म्हणाले आपण एक शेवटचा चित्रपट काढू नाहीच चालला तर कंपनी बंद करा.
नंतर बैजूच्या कथेवर चित्रपट बनवायचे ठरले आणि नंतर बैजू बावराने इतिहास निर्माण केला.
या चित्रपटात १३ गाणी होती आणि सर्वच्या सर्व गाणी सूपरहिट झाली.
हा चित्रपट यशस्वी होण्याचे सर्व श्रेय नौशाद, रफी आणि शकील बदायुनी या तिघानांच जाते.
या चित्रपटाने रफीतील सर्वच प्रतिभा बाहेर आणली. “मन तरपत हरी दर्शन को आज” आणि “ओ दुनियाके रखवाले”
या गाण्यात त्याचा टीपेतला तार सप्तकातला आवाज आजही गायकासाठी खुले आव्हान आहे.
नौशादकडे रफीनी गायलेल्या जवळपास १५० गाण्यापैकी ८० गाणे सोलो आहेत.
नौशाद नंतर शंकर जयकिशन या जोडीनेही रफीच्या आवाजाचा पोत लक्षात घेऊन असंख्य गाणी तयार केली.
राज कपूरचा खरा आवाज मुकेश पण तरीही अनेकदा रफीचा आवाज त्यांच्यासाठी वापरण्यात आला.
माझ्या यशात सर्वात मोठा वाटा रफी साहेबाचा आहे -शम्मी कपूर
शम्मी कपूरने तर एकदा मुलाखतीत सांगितले होते की “रफी अभिनेत्याचा सुक्ष्म अभ्यास करतो.त्याच्या ओठांच्या हालचाली, त्याचा घशावर पडणारा ताण,अभिनय करतानाचे हावभाव याचा पूर्ण अभ्यास करून रफी आपल्या आवाजात योग्य ते बदल करीत असत.माझ्या यशात सर्वात मोठा वाटा रफी साहेबाचा आहे”
शंकर जयकिशन यांच्या चित्रपटातील तेरी प्यारी प्यारी सुरत को, बहारो फूल बरसाओ, दिल के झरोकोमे, चाहे कोई मुझे जंगली कहे, अजिब हे दाँस्ता तुम्हारी(किशोर कुमारसाठी),याद न जाए बिते दिनों की, लाल छडी मैदान खडी, दिल तेरा दिवाना है सनम, आवाज दे के हमे ना बुलाओ, ए गुल बदन, मै गाँऊ तूम सो जाओ, ए मेरे शाहे खुबा, आसमान से आया फरीश्ता, बदन पर चमकते सितारे, शिकार करने को आए, यकीन कर लो, सौ साल पहले मुझे तुमसे,अशा एका पेक्षा एक गाण्यांचा रत्नहारच त्यांनी पेश केला. शंकर जयकिशन यांच्या कडे रफी साहबनी ३४३ गाणी गायली ज्यातील २१६ गाणी ही सोलो होती.
रफी नसता तर मी ही नसतो ओ.पी नय्यर
ओ.पी नय्यर यांनी देखील रफी कडून सुंदर गाणी गाऊन घेतली आहेत. कश्मीर की कली, आरपार, सीआयडी, नया दौर, तुमसा नही देखा..वगैरे. ओ.पी.नी रफी साहब कडून जवळपास २०० गाणी गाऊन घेतली. ते ही म्हणत की रफी नसता तर मी ही नसतो.
आशा व रफीचे वेगळे कॉम्बिनेशन घेऊन ओपीनी अनेक प्रयोग केले व ते यशस्वीही झाले. सचीनदांचा आवडता गायक तसा किशोर कूमार पण त्यांनी देव आनंदसाठी रफी कडून अप्रतिम गाणी गाऊन् घेतली.गाईड मधील मोहम्मद रफी यांची सर्वच् गाणी माईल स्टोन आहेत. त्यांच्या जवळपास ३७ चिपटांसाठी रफी साहब गायले. ७३ मध्ये किशोर कुमारची धूम सुरू असताना “अभिमान” मधले रफी लताचे “रे हाय हाय तेरी बंदीया रे” भाव खावून गेले. संगीतकार रवीकडे गायलेल्या “चौदहवी का चाँद हो” या गाण्याने त्यांना पहिला फिल्म फेअर (१९६०) पुरस्कार मिळवून दिला तर त्यांच्याचकडील बाबूल की दुवाँए लेती जा (१९६८) या गाण्याने त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला.
गाणे हे त्यांच्यासाठी अल्लाची ईबादत आणि धर्म होता
चित्रपटातील संगीत वा पार्श्वगायन आणि इतर कुठलेही संगीत वा गायन यात एक मूलभूत फरक आहे. चित्रपट ही तंत्रज्ञान आणि कला यांचा अनोखा संगम आहे हे विसरता कामा नये. चित्रपटात वेळेला खूप महत्व असते. सबंध चित्रपट एका ठराविक वेळेत बसवायचा असतो. त्यातील गाण्यानां किती वेळ द्यायचा याचेही एक ढोबळ गणित असते. ३ ते ५ मिनीटात गायकाला गाण्यात किती आणि कसे रंग भरायचे याचे भान ठेवावे लागते.
या बाबतीत रफी साहेब लतादीदी व आशाताई खूप निष्णात. आम्ही कुणीही यांचे थेट आवाज कधी ऐकू शकलो नाही. आम्ही जे ऐकतो त्यानां “मॅटॅलिक व्हाईस” असे म्हटले जाते. त्या काळातल्या जाणत्या संगीतकारांचे कान हे अतिशय तिक्ष्ण होते म्हणून त्यांनी गायकांच्या आवाजाची प्रत ओळखून प्रत्येकाला योग्य न्याय दिला. मोहम्मद रफी साहेबांच्या आवाजातच एक माधूर्य होते ते कोणत्याही सप्तकात गेले तरी सूर कधीच बेसूर होत नसत म्हणूनच त्यांचे गाणे दुसरे कोणी गाऊ शकत नसत. मन्नादानी अत्यंत मोकळेपणाने त्यांच्या सूरानां सलाम केला आहे. मोहम्मद रफी साहेब रोज तानपुऱ्यावर रियाज करीत असत. रियाजाने सूर कमालीचे परीपक्व होतात यावर त्यांची श्रद्धा होती. ते स्वत:ही अत्यंत साधे व सरळ इन्सान होते. गाणे हे त्यांच्यासाठी अल्लाची ईबादत आणि धर्म होता.
मदन मोहन यांचेही आवडते गायक
संगीतकार मदन मोहन यांचेही आवडते गायक मोहम्मद रफी साहब होते.
मदन मोहन वाद्यांचा वापर कमी करत त्यामुळे त्यांच्याकडे गातानां गायकाचा कस लागत असे.
आवाजतले सर्व बारकावे मदन मोहन सहज काढून घेत.
मेरी आवाज सुनो,कर चले हम फिदा, तूम जो मिल गये,ये दुनिया ये मैफिल मेरे काम की नही,तेरी आंखो के सिवा.
अशी अनेक अप्रतिम गाणी रफीनी त्याच्याकडे गायली.रफी साहेबानी सगळ्यात जास्त गाणी गायली ती लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासाठी.
“पारसमणी” या चित्रपटातील नितांत सुंदर गाणे जे आजही मनाला प्रफ्फुलित करते-
“सलामत रहो’’ आणि “वो जब याद आए” या गाण्यांनी लक्ष्मीप्यारेचा आवाज रफी साहब बनले ते अगदी शेवटा पर्यंत.
त्यांनी त्यांच्याकडे ३६९ गाणी गायली पैकी १८६ गाणी सोलो होती.
१९६५ सालातील “दोस्ती” या चित्रपटातील “चाहूंगा मै तुझे” हे गाणे रफी साहेबानां प्रचंड आवडले होते
आणि त्यांनी हे गाणे अल्प मानधन घेऊन् गायले होते.या गाण्याने त्यांना तिसरा फिल्म फेअर पुरस्कार मिळवून दिला.
१९६६ सालातील “सुरज” या चित्रपटातील “बहारो फूल बरसाओ” या गाण्याने चौथा
तर “ब्रहमचारी” या चित्रपटातील “दिल के झरोके मे” या गाण्याने पाचवा फिल्म फेअर पुरस्कार मिळवून दिला.
५१ वर्षांपूर्वीचे “बहारो फूल बरसाओ” हे गाणे आजही लग्नात बँडवर वाजवले जाते,ही त्या गायक, गीतकार आणि संगीतकाराला मिळालेली दाद आहे.
मोहम्मद रफी साहेबांनी आपल्या त्यावेळच्या सर्व गायक सहकाऱ्या सोबतही गाणे गायले.
१९७७ मधील लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिलेल्या “अमर अकबर अंथनी” या चित्रपटात रफी,मुकेश आणि किशोर बहुदा पहिल्यांदाच एकत्र गायले.
रॉयल्टी मिळाली पाहिजे या मुद्दयावरून लतादीदी आणि रफी साहेब यांच्यात वाद
१९६२-६३ च्या काळात गायकांना पूढेही रॉयल्टी मिळाली पाहिजे या मुद्दयावरून लतादीदी आणि रफी साहेब याता दुरावा निर्माण झाला. मोहम्मद रफी साहब म्हणत आम्ही एकदा गाण्याचे पैसे घेतले आहेत तर मग रॉयल्टी का? हा वाद बराच काळ चालला. लतादीदीनी त्यांच्या सोबत गाणे गायला नकार दिला. शेवटी जयकिशन यांनी दोघात समेट घडवून आणला. चित्रपटाच्या या मायावी नगरीत रफी साहब मात्र सर्व व्यसनांपासून खूपच लांब राहिले. स्वभावानेही ते खूप लाजाळू होते. संगीतकारानां ते स्वत:हून कधी हे विचारत नसत की मला किती पैसे मिळणार आहेत. येत आणि गाणे रेकॉर्ड करून जात. अनेकदा त्यांनी फक्त एक रूपये मोबदला घेऊन गाणे गायले आहे. नील कमल चित्रपटातील “बाबूल की दुवाँए लेती जा’’ हे गाणे रेकॉर्ड करण्यापूर्वी एक दिवस आगोदर त्यांच्या मुलीची सगाई झाली होती. त्यामुळे हे गाणे गातानां ते खूप भावूक झाले होते. याच गाण्याला त्या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
रफी आणि किशोर यांची मैत्री
गाणे मना सारखे झाले की ते घराच्या छतावर जाऊन पतंग उडवत असत आणि त्यांचा पतंग कटला की लहान मुलांसारखे खिदळत पण असत. सोबतच्या सर्वच गायकाबद्दल ते खूपच अदराने बोलत असत. विशेषत: मन्नादाच्या गायकी विषयी भरभरून बोलत. किशोर कुमारला ते किशोरदा म्हणत. स्वत: किशोर कुमार यानां त्यानी दा म्हटलेले आवडत नसे.ते म्हणतही असत की- “मी तुमच्या पेक्षा लहान आहे, तुम्ही गायकीत माझ्यापेक्षा मोठे आहात मला फक्त किशोर म्हणत जा.’’
यावर रफी म्हणत की “मी सर्वच बंगाली लोकानां मग ते लहान असो की मोठे मी दा म्हणतो.’’
ते किशोर कुमारचे गाणे मनापासून ऐकत असत व त्यांची स्तूतीही करत असत.
७० च्या दशकात किशोरदा पुन्हा फर्मात आले आणि रफी साहब मागे पडू लागले पण त्यां दोघांच्या मैत्रीत अजिबात खंड पडला नाही. आरडी बर्मनचा उदय आणि संगीतातील प्रेक्षकांची रूची यामुळे पचंम किशोर कुमार कडून गाणे गाऊन घेऊ लागले.
दुसरी इनिंग
१९७४ मध्ये “तेरे गलियोंमे ना रखेगें कदम…”.या गाण्याने त्यांनी पुन्हा दमदार कमबॅक केले. पुन्हा रफी साहबची गाणी वाजू लागली. या काळातील त्यांची लैला मजनू, दोस्ताना, हम किसीसे कम नही, नसीब, सुहाग, अपनापन, सरगम, कुर्बानी, बर्नींग ट्रेन, अमर अकबर अंथनी, जमाने को दिखाना है,शान वगैरे चित्रपटातुन गात राहिले.
१९७९ मध्ये लंडनच्या अल्बर्ट हॉलमध्ये आपला त्यांनी आपला लाईव्ह कार्यक्रम केला. अनेक देशांचे त्यांनी दौरे केले. त्यांच्या ४० वर्षांच्या संगीतमय कारकिर्दीत त्यानीं रसिकांचे कान अक्षरश: तृप्त केले. अगदी १० ते ८० वयाच्या प्रत्येक माणसाला त्यांच्या आवाजाने भारून टाकले. त्यांनी हिंदी व्यतिरीक्त कोकणी, भोजपूरी, उडीया,पंजाबी, बंगाली, कन्नड,तेलुगू,गुजराथी, मैथिली, उर्दू, इंग्लिशख् फार्सीअरेबिक, सिंहली,डच अश सर्वच भाषेतली गाणी गायली.
मराठी गीते
मराठीत श्रीकांत ठाकरे यांच्या संगीत दिग्दर्शनातील गाणी खूप गाजली,शोधीशी मानवा देवूळी,हा छंद जीवाला लावी पिसे,हसा मुलानो हसा,हा रूसवा सोड सखे प्रभू तू दयाळू अशी किती तरी सुंदर मराठी गाणी रफी साहबनी गायली.
रफी साहबचा पहिला निकाह त्यांच्या काकाची मुलगी बशीरन बेगम यांच्याशी वयाच्या १३ वर्षीच झाला होता.फाळणीच्या दंग्यात तिचे अनेक नातेवाईक मारल्या गेल्यामुळे तिने रफी बरोबर भारतात रहाण्यास नकार दिला व लाहोरला निघून गेली.त्यांच्या पासून त्यांना एक मुलगाही झाला. रफी साहबचा दुसरा निकाह बिल्किस बेगम बरोबर झाला. पहिल्या पत्नी पासून एक मुलगा आणि दुसऱ्या पत्नी पासून खालिद, हामिद ,शाहिद ही तीन मुलं तर परवीन, नसरीन आणि यास्मिन या तिन मुली. मात्र त्यांची तीनही मुलं आज जगात नाहीत. एवढ्या महान गायकीचा १ टक्काही अंश रफीच्या एकाही मुलांत का बरे आला नसेल? म्हणजे रफीसाहबच्या मागच्या पिढ्यात आणि पूढच्या पिढीतही संगीत नाही असे का? नियतीला फक्त एकच मोहम्मद रफी हवा होता का?
शेवटचे गीत
रफी साहबचे शेवटचे गाणे होते- “शाम क्यूँ उदास है दोस्त, तू कही आसपास है दोस्त” लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी हे गाणे रेकॉर्ड केले होते. १९८१ मधील “आसपास’’ या चित्रपटातील हे गाणे होते. त्यांच्या मृत्यू नंतर हा चित्रपट प्रदर्शीत झाला. या मोठ्या कलावंताच्या बाबतीत अनेक योगायोग घडत रहातात.
“शाम क्यूँ उदास है दोस्त, तू कही आसपास है दोस्त” जग सोडण्यापूर्वी असे उदासीचे गाणेच का गावे? संगीतकार जयकिशननेही “यहाँ कल क्या होगा किसने जाना” म्हणून का निरोप घ्यावा? साहिरने “मै पल दो पल का शायर हूं” असे का बरे म्हटले?
मुकेशनेही “कल खेलमे हम हो न हो” असे म्हणून जग का सोडले.गीतादत्तही “वक्तने किया क्या हंसी सितम” असं म्हणालीच होती की !!!
३१ जुलै १९८० दिवस आजही मी विसरलेलो नाही. आमचे जे.जे.चे होस्टेल बांद्रा पूर्वला कलानगर जवळ. ३० जुलैच्या रात्री पासूनच पाऊस् चालू होता. मी कॉलेजला गेलो नव्हतो. एका मित्राने सकाळी सांगितले रफी साहब गेले. मनावर एकदम उदासीचे मळभ दाटून आले. मी तर कधी भेटलो नाही त्यांना, जवळून बघितलेही नाही कधी,जात धर्म प्रांत कशातच सारखेपणा नाही मग इतकी बोच का लागते?
शेवटचा निरोप
मी लगेच उठलो. रफी साहब बांद्रा पश्चीमला रहात असे मी ऐकले होते.मी बांद्रा स्टेशन गाठले क्रॉस करून पश्चीमेला आलो.बाहेर लोकांचा प्रचंड जमाव. पावसानेही खूप जोर पकडलेला.पश्चिमेला एक मोठी मशिद आहे तिथे त्यांचे पार्थिव ठेवल्याचे समजले.लोकांचा पूर त्या दिशेने जात होता. मी त्या गर्दीत सामिल झालो.पूढे सर्व ट्रॅफिक जाम झालेली. एवढया पावसातही लोकांचे जथ्थे चारही बाजूने येत होते. चित्रपट जगातील सर्वच मोठ्या व्यक्ती रफी साहबच्या जनाजात सामिल झाल्या होत्या.
मशिदीच्या चारही बाजूने उंच भितींचे मोठे कुंपण त्यावर कुणी क्रॉस करू नये म्हणून काचेचे तुकडे लावलेले पण त्या भितींवरूनही लोक आत जाण्याचा प्रयत्न करत होते.त्या काचेच्या तुकड्यांची भींत तितकी जखमी करणारी नव्हती जितकी रफीच्या जाण्यामुळे झाली.
मला त्या गर्दीत चालता येईना म्हणून बाजूच्या इराणी हॉटेलाच्या ओसरीत उभा राहिलो.
त्यांची शेवटची जनाजे की नमाज या मशिदीत होत आहे असे कुणी तरी म्हणाले.शेवटच्या नमाजचा तरजमा असा आहे-
“ ऐ अल्लाह…हम पर इल्मो हिक्मत के दरवाजे खोल दे और हम पर अपनी रहमत नाजिंल फरमा ऐ अ-जमत और बुजर्गीवाले”
अशा वेळी रफीची दोन गाणी मला नेहमीच अस्वस्थ करतात पहिले “ ये जिंदगी के मेले, दुनिया मे कम ना होंगे,
अफसोस हम ना होंगे” तर दुसरे “तूम मुझे यूं भूला ना पाओगे……” आपने सही कहा रफी साहब हम तुम्हे कभी भूल नही पाएगे.
या महान गायकला दिलसे सलाम!
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 28, 2020 16 :26 PM
WebTitle – tum-mujhe-yu-bhula-na-paoge-Mohammad-Rafi