खरंतर काल या विषयावर चार ओळी लिहिल्या होत्या परंतु विषय थांबेना म्हणून हे जरा सविस्तर..
लेखक आणि उद्योजक शरद तांदळे यांनी आपल्या एका जुन्या भाषणात तरुणांना कष्ट,जिद्द,नाविन्यपूर्ण योजना,दूरदृष्टी या सगळ्याचे महत्व सांगताना विनोदी पद्धतीने काही उदाहरणे दिली.त्यात दशक्रिया घाटांवरचे श्राद्धादी विधी करणारे ब्राम्हण किंवा कीर्तनकार महाराज आदींचे दाखले आहेत.ते पूर्ण भाषण पंधरा मिनिटांचे आहे आणि त्यातील जो एकदिड मिनिटाचा तुकडा वेगळा काढून सध्या व्हायरल केला गेलाय त्यावरून वाद सुरु आहे. संतांनी समाजाला वारकरी समाजाला जातीभेद मुक्तीची,वर्णभेद गाडून टाकण्याची,ब्राह्मणांच्या दानधर्माच्या काव्यात न अडकण्याची कर्मकांडात न अडकण्याची,सर्वधर्म समभावाची,जबाबदारीने संसार करण्याची,महिलेचा आदर राखण्याची,नैतिकता पाळण्याची शिकवण दिली.
खरंतर त्या एकदिड मिनिटांपेक्षा बाकीच्या वेळात तांदळेंनी सांगितलेले मुद्दे तरुण वर्गासाठी अतिशय उपयुक्त आहेत.परंतु त्याकडे दुर्लक्ष करून हा नाहक वाद सुरु करण्याचा नाठाळ उद्योग कोणीतरी केलाय.त्या व्हायरल झालेल्या क्लिपचा आधार घेऊन अनेक ह.भ.प.महाराज आणि तथाकथित वारकरी नेते सध्या भडकलेत.त्यातील अनेकजण तांदळेंना अर्वाच्य भाषेत शिवीगाळही करताना दिसताहेत.त्यांच्याकडून माफीची मागणी करताहेत..खरं म्हणजे कोणत्या अधिकाराने ही मंडळी अशी मागणी करताहेत ?
मागील काही वर्षांमध्ये ज्ञानदेव-तुकोबारायांपासून ते बहुतेक सर्व वारकरी संतश्रेष्ठांच्या मूळ विचारांना मूठमाती देण्याचे काम या बहुसंख्य ह.भ.प.महाराजांनी केलेय.उठताबसता ज्ञानदेव तुकोबांचा फक्त गजर करायचा आणि प्रत्यक्षात त्यांच्या विचारांशी प्रतारणा करण्याचे काम या महाराजांनी केलंय.संतांनी आपल्या आचारविचारांतून कर्मकांडात अडकलेल्या तत्कालीन समाजाला त्यातून बाहेर काढून खऱ्या ज्ञानाच्या वाटेवर आणण्याचे काम केले तर या आधुनिक संत ह.भ.प.महाराजांनी काळाची चक्रे पुन्हा उलटी फिरवून समाजाला केवळ कर्मकांडे आणि अंधश्रद्धायुक्त दैववादाकडे नेण्याचे घातक कार्य केले.
तासभर कीर्तन ऐकून ऐकणाऱ्याच्या पदरी काय पडतं तर शून्य
संतांनी समाजाला वारकरी समाजाला जातीभेद मुक्तीची,वर्णभेद गाडून टाकण्याची,ब्राह्मणांच्या दानधर्माच्या काव्यात न अडकण्याची ,कर्मकांडात न अडकण्याची,सर्वधर्म समभावाची,जबाबदारीने संसार करण्याची,महिलेचा आदर राखण्याची,नैतिकता पाळण्याची शिकवण दिली.आजचे ह.भ.प.महाराज यातील कोणत्या बाबींवर कीर्तन करतात ? तुकोबारायांचा एखादा अभंग घ्यायचा आणि त्याचा मूळ गर्भितार्थ बाजूलाच सारून सगळी चिरफाड करून टाकायची.तासभर कीर्तन ऐकून ऐकणाऱ्याच्या पदरी काय पडतं तर शून्य..!
कुणी महाराज ते चला हवा येऊ दे चे कलाकार करणार नाहीत इतके खालच्या पातळीचे मनोरंजन कीर्तनाच्या नावाखाली करीत बसतो तर कुणी महाराज अप्रत्यक्ष राजकारणात घुसून देशाला आता कसे सोन्याचे दिवस आलेत आणि आता लवकरच कसे रामराज्य अवतरणार आहे ती भाटगिरी करीत बसतो ! कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला तर जणू काही यांच्यावर आभाळच कोसळलं.गावागावातील श्रद्धाळू नागरिकांना सरकारविरोधात भडकवण्याचे काम या महाराजांनी एखादी सुपारी घेतल्यासारखे बजावले !
जातीपातीचा वृथा अभिमान ही त्या महाराजांची वैशिष्ठ्ये
फडणवीसांनी त्यांच्या कार्यकाळात ज्या वक्ते महाराजाला प्रतिष्ठेचा ज्ञानदेव-तुकाराम पुरस्कार देऊन गौरविले त्याची काय गुणवत्ता होती ? कीर्तनात प्रचंड शिव्या,नेहरू-आंबेडकरांपर्यंत सगळ्या नेत्यांना दूषणं,जातीपातीचा वृथा अभिमान ही त्या महाराजांची वैशिष्ठ्ये ! त्या मनोहर उर्फ संभाजी भीडेसारख्यांनी वारीला,तुकोबारायांना अवमानित करण्याचा प्रयत्न केला तेव्हा यांच्यातील किती बुवा-महाराज चवताळून त्याविरोधात उभे राहिले ?
कीर्तन-प्रवचनाचे कोणतेही पैसे घेऊ नयेत,इतकेच काय तिथला अन्नाचा दाणाही स्पर्शू नये हे तुकाराम महाराजांनी अगदी रोखठोक शब्दांत सांगून ठेवलंय.प्रत्यक्षात आज काय स्थिती आहे ? माणसाच्या मृत्यूपश्चात जे काही दशक्रिया वगैरे श्राद्धादी विधी केले जातात त्यावरही तुकोबारायांनी स्पष्ट शब्दात कोरडे ओढत त्या विधींमधला आणि त्यानिमित्त होणार दानधर्म,भोजनावळी आदींमधला फोलपणा दाखवून दिलाय.प्रत्यक्षात आज काय स्थिती आहे ? गावोगावचे दशक्रिया विधी या ह.भ.प.महाराजांच्या कीर्तनाशिवाय पारच पडत नाहीत !
तुकोबांचे विचार किती ह.भ.प.महाराज जनतेला सांगताना दिसतात ?
आपण प्रत्यक्ष तुकोबारायांच्या विचारांशीच ही प्रतारणा करतोय याची काहीच लाज या महाराजांना अशावेळी वाटत नाही ? मन शुद्ध ठेवा,ते शुद्ध ठेवलं तर तुम्हाला कोणत्याही तीर्थयात्रेची गरजच नाही,भविष्य-ज्योतिष या फंदात कधीही अडकू नका,त्यात काहीही तथ्य नाही,वास्तुपूजा वगैरे सगळं थोथांड आहे,नवसाने कोणताही देव-देवी कधी पावत नसतो आदी सगळे तुकोबांचे विचार किती ह.भ.प.महाराज जनतेला सांगताना दिसतात ?
अजूनही तुकोबा हे असे रथात बसले आणि सदेह वैकुंठाला गेले हीच टेप सगळे बुवा,महाराज सतत वाजवताना दिसतात.बरं..हे असत्य कथन करत राहता तर तुकोबांच्या वैकुंठ गमनानंतर त्यांच्या कुटुंबियांना देहूत केवढा मानसन्मान मिळायला हवा होता ? त्यांना आदराचे आणि पूजनीय स्थान मिळायला हवे होते.परंतु प्रत्यक्षात तसे काहीही न होता तुकोबारायांची पत्नी,मुलं,भाऊ यांना गाव,आपला जमीन-जुमला सोडून परागंदा होण्याची पाळी आली.
संघटनांच्या उथळ,अविवेकी कृतींनी अधिक होतोय.पण हे लक्षात कोण घेणार ?
जिजाईला आपल्या लहान पोरांना घेऊन माहेरी जावं लागलं.त्यांची जमीन,राहते घर मंबाजीने बळकावले.तुकोबांचे सदेह वैकुंठ गमन खरंच झालं असतं तर देहूत त्यांच्या कुटुंबाची अशी परवड लगेच झाली असती ? देहूवासीयांनी होऊ दिली असती ? नंतर वीस-बावीस वर्षांनी तुकोबांची मुलं मोठी झाल्यावर संभाजी राजांच्या मदतीने मंबाजीशी भांडली आणि त्यानंतर त्यांची जमीन त्यांना परत मिळवता आली.हा सगळं घटनाक्रम काय दर्शवतं ? कुठला ह.भ.प.महाराज याबाबत काही विश्लेषण करतो ?
असो..लिहावं तेव्हढं कमीच अशी याबाबत अवस्था आहे.वारकरी पंथाची बदनामी किंवा अवमान बाहेरच्या कुणाच्या काही बोलण्याने होत नाही तर या आधुनिक,बुध्दीभ्रष्ट झालेल्या ह.भ.प.महाराजांच्या आणि ते डोक्यावर घेत असलेल्या तथाकथित वारकरी नेत्यांच्या,संघटनांच्या उथळ,अविवेकी कृतींनी अधिक होतोय.पण हे लक्षात कोण घेणार ?
लेखन – रवींद्र पोखरकर
संसदेत निवडुन पाठवलेले लोक/ प्रतिनिधि म्हणजे कायदेमंडळांचे सदस्य, लॉ मेकर्स हे अजुन तरी भारतीय समाजमानाच्या पचनी पडलेलं नाहीए. इव्हन देशाची संसद म्हणजे कायदेमंडळं आहेत हेच उमगायचं बाकी आहे. रस्ते, गटारी, बांधकामं याच्या पलीकडे विकासाची दृष्टि आपल्याकडे नाही. हीच कामं म्हणजे आपण निवडुन पाठवलेल्या लोकप्रतिनींधींची कामं आहेत ही नागरीकांची अगाढ श्रद्धा आहे. लोकशाही मुल्यं वगैरे हे पुस्तकात वाचण्याचे शब्द आहेत.
आपण जो कोणी व्यक्ति संसदेत म्हणजेच देशाच्या सर्वोच्च कायदेमंडळात निवडुन पाठवत आहोत, तो त्या पात्रतेचा आहे की नाही, याची तसदी आमच्या बलाढ्य लोकशाहीवादी देशाची जनता कधीच घेत नाही. स्थानिक हितसंबंध-जातसंबंध-अर्थकारण याच्या प्राबल्यावर लोक संसदेत निवडुन जातात.
लॉ मेकर्स ना किमान बोलता येऊ नये?
देशाच्या कायदे निर्मितीच्या प्रक्रियेत तुमच्या मतदारसंघाचा प्रतिनिधि सहभाग घेतो काय? तुमच्या लोकप्रतिनिधीची सभागृहातली हजेरी किती? प्रश्नोत्तरांमधला- पार्लमेंटरी डिबेट्स मधला सहभाग किती? तुमच्या लोकप्रतिनीधीला चारचौघात बोलता येतं काय? की त्याची बोबडी वळते? इथे एक शब्द दहा वेळा अडखळणारा व्यक्ती संसदेत काय बोंब पाडणारेय? लॉ मेकर्स ना किमान बोलता येऊ नये?
तुमचा प्रतिनिधी देशाच्या सर्वोच्च कायदेमंडळात फक्त पैसे कमावण्यासाठी जात असेल तर, तुमच्या मतदारसंघाला प्रतिनिधीच नाही.
बाबासाहेब नेहमी म्हणायचे, ‘लोकप्रतिनिधी हा समाजाचं प्रतिबिंब असतो, जसा समाज असतो तसेच त्यांचे लोकप्रतिनिधी ‘ तुम्ही जसे असाल तसेच तुमचे प्रतिनिधी असतील.
काही लोकांसाठी निवडणुक ही दिवाळीपेक्षा कमी नसते.
भारतातसारख्या लोकशाही देशात निवडणुकीची उमेदवारी मिळते वंशाने, वारश्याने, मतदारसंघातल्या जातींच्या प्राबल्याच्या ,जातीय समीकरणांच्या आधारावर. राजकीय लोकशाही भारतीय समाजमनात अजुन पुरती रुजलेली नाही. इथे निवडणुक काळाचा प्रस्पेक्ट प्रत्येकाच्या साठी वेगवेगळा असतो. आपल्या भाऊ दादा, आकाला निवडुन देण्यापलीकडे कार्यकर्त्यांच्या डोक्यात विचार नसतो, तर काही लोकांसाठी निवडणुक ही दिवाळीपेक्षा कमी नसते.
निवडणुकीच्या काळात मतदार मात्र फक्त पैसा,आमिषं आणि अस्मितांवर स्वार झालेला असतो. आणि पाच वर्ष फक्त शिव्या देण्यापलीकडे काहीच न करता येण्याची हतबलता.. सद्यस्थितीत भारतीय लोकशाही म्हणजे बेभान समुद्रात हरवलेलं गलबत..
आपण देशातल्या जनतेत लोकशाहीवादी मुल्य वगैरे रुजण्याची फक्त आशा बाळगुया..
लेखन – अॅड. राहुल सावळे
काहींचा लिस्टवर्ग कामालीचा असतो ना,केवळ तो ओळखीचाच असतो असा नाही पण तो इतका ऍक्टिव्ह असतो की पोस्ट पडताच लाईक कमेंट चर्चा गप्पा दोस्ती मैत्री चेष्टा मस्करी फ़ॅनगिरी निभावत असतो.आता पहा ना एकाच्या लिस्टमध्ये 5 हजार मेंबर आहेत त्याने टाकलेली पोस्ट जरी कॉपीपेस्ट असली तरी त्यावर व्यक्त होणारे 30-40 असतात,
तीच पोस्ट कॉपी करून ज्याचे लिस्टमध्ये अडीच तीनहजार मेंबर आहेत त्याने स्वतःचे वॉलवर पोस्ट केली तर त्यास तीनशेहून अधिक लाईक व शंभर दीडशे कमेंट सहज मिळत असतात.म्हणजे पहा तुमचे लिस्ट मध्ये किती मेंबर आहेत हे महत्वाचे नसून जिवंत सजग,जागृत,सृजन आणि महत्वाचे म्हणजे तुमच्याशी कनेक्ट किती आहेत हे महत्वाचे असते…
लेखन – शाहीर दिपकभाई नतासावळाराम
ओबीसी बांधव बौद्ध धम्माच्या वाटेवर अभियानाचे प्रणेते हनुमंत उपरेकाकांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !
ओबीसीसमाजाचे पुरोगामी, परिवर्तनशील नेते स्मृतीशेष हनुमंत उपरे काकांच्या नेतृत्वाखाली वर्णवर्चव्यवादी व्यवस्थेतून बाहेर पडण्यासाठी इतर मागासवर्गातील अनेक समाज घटकांच्या संघटनांनी एकत्र येऊन राज्यभर धर्मांतर अभियान सुरु केले होते.
ओबीसी बांधव बौद्ध धम्माच्या वाटेवर
त्यालाचं ओबीसी बांधव बौद्ध धम्माच्या वाटेवर असे नांव देण्यात आले होते. मात्र, धर्मांतरापुर्वीचं १९ मार्च २०१४ रोजी उपरे काकांचे आकस्मित निधन झाले. त्यावेळी ओबीसी बांधव बौद्ध धम्माच्या वाटेवर हे अभियान फसते की काय अस वाटले होते. पण नाही, उपरे काकांचे सुपुत्र संदिप उपरे, ओमप्रकाश मौर्य, उल्हास राठोड अन् इतर मान्यवरांच्या नेतृत्वाखाली २५ डिसेंबर २०१६ रोजी, ओबीसी व इतर मागासवर्गातील समाज घटक नागपूर दिक्षाभूमीवर धर्मांतर करुन बौद्ध धम्मात प्रवेश केला.
युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली आपल्या लाखो अनुयायांसह पवित्र नागभूमीत रक्ताचा एकही थेंब न सांडता, न भूतो, न भविष्यती अशी ऐतिहासिक धम्मक्रांती घडविली, भारत भूमीत बौद्ध धम्माला पुनरुज्जीव केले. बाबासाहेबांनी नागपूर मुक्कामी बौद्ध धम्म दिक्षा दिल्यानंतर, त्यांनी चंद्रपूरमध्ये हजारो लोकांना धम्म दिक्षा दिली अन् त्यानंतर त्यांना १६ डिसेंबर १९५६ रोजी मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्सच्या अतिभव्य मैदानावर जागतीक धम्मक्रांती घडवायची होती.
जगाला युध्दाची नव्हे तर बुध्दाची आवश्यकता
परंतु तत्पुर्वीचं त्यांचे अकाली महापरिनिर्वाण झाल्यांने हा जागतीक ऐतिहासिक सोहळा होऊ शकला नाही.
त्यानंतर सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराचे देशभर अनेक कार्यक्रम आयोजित करुन,धम्म चळवळीला गती दिली.
आज संपूर्ण जग हिंसाचार अन् अनैतिकतेने ग्रासलेले असून, जगाला युध्दाची नव्हे तर बुध्दाची आवश्यकता आहे,
अशा परिस्थितीत जगाला बुध्द धम्मचं तारु शकतो याची सर्वांना जाणीव होत आहे.
कारण, बुध्द धम्म हा जीवन जगण्याचा, समतेचा मार्ग आहे. संपूर्ण जगात बुध्दाला ‘लाईट ऑफ एशिया’ म्हणतात.
जगात बुध्द धम्म वैभवाने मिरवत असला तरी, सार्या जगाचे लक्ष हे विश्ववंदनीय तथागत गौतम बुध्द यांच्या भारतभूमीकडे लागलेले असते.
जगात भारतभूमीला बुध्दाची पवित्र भूमी म्हणून ओळखतात.
२००७ मध्ये बौद्ध धम्म दिक्षा सुवर्ण महोत्सव समितीच्या षण्मुखानंद सभागृहात झालेल्या
उद्घाटकीय सोहळ्यात अवघ्या विश्वातील बौद्ध भिक्खू प्रातिनिधीक स्वरुपात उपस्थित होते.
भारतातील काही समाज घटकांनी आपला मुळ वारसा ओळखून तो स्विकारण्याकडे कल दिला आहे.
बौद्ध धम्म दिक्षा सुवर्ण महोत्सवी वर्षांत भटक्या विमुक्त समाजातील ४२ जातींमधील लाखों बांधवांनी भटक्या विमुक्त समाजाचे नेते,
उपराकार लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली २७ मे २००७ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख,
उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, खासदार रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्सवर धम्मक्रांती घडविली होती.
त्यानंतर, २५ डिसेंबर २०१६ रोजी हनुमंत उपरे काकांचे सुपुत्र संदिप उपरे
अन् सहकार्यांनी ओबीसी बांधवांच्या धर्मांतरांने हे धम्मक्रांतीचे चक्र पुन्हा गतीमान केले.
प्रतीवर्षी २५ डिसेंबर रोजी वालधुनी कल्याण अन् दिक्षाभूमीवर हजारों बांधव धम्माची दिक्षा घेतात, धर्मांतर करतात.
‘कल्चरली करेक्ट’ या ग्रंथाव्दारेही विविध समाज घटकातील, विविध क्षेत्रातील महिलांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत.
माहे डिसेंबर २०१२ मध्ये मुंबई येथे पहिली राज्यव्यापी निष्ठांतर परिषद आयोजीत करण्यात आली होती.
अन् त्या परिषदेला ओबीसी, आदिवासी, आगरी, कोळी, भटके विमुक्त, दलित जाती जमातींच्या प्रतिनिधींनी
बुध्द धम्माकडे जाण्याची गरज प्रतिपादन करुन, लाखोंच्या संख्येंने बौद्ध धम्म स्विकारण्याचा निर्धार व्यक्त केला होता.
त्यानुसार, हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधवांनी धर्मांतर केले अन् पुढेही धर्मांतराचे हजारो कार्यक्रम होतचं राहणार..
ओबीसी बांधव बौद्ध धम्माच्या वाटेवर अभियानाचे प्रणेते हनुमंत उपरे काकांच्या ७ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !
लेखन- मिलिंद कांबळे चिंचवलकर
‘नक्षलवाद्यांचा पाठीराखा’ असा शिक्का बसला तरी ‘प्रज्ञाशील करुणा मला समजते,’ असे उद्गारही आंबेडकरांच्या या बौद्ध अनुयायाने काढले आहेत.एकनाथ साळवे गेले.
एन्काउंटर
केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या य दि फडके प्रगत संशोधन केंद्रासाठी ‘कोंडी नक्षलवाद्यांची आणि आदिवासींची’ (मनोविकास प्रकाशन) हे पुस्तक लिहिण्याच्या निमित्ताने मी चंद्रपूरला जाऊन ॲडव्होकेट एकनाथ साळवे यांना भेटलो होतो. नक्षलवाद्यांची दहशत हा गडचिरोली जिल्ह्यात मोठाच विषय होता. इतका मोठा, की अनेकांना या विषयावर कादंबऱ्या लिहाव्याशा वाटल्या. त्यांच्यापैकी ज्यांना गडचिरोलीत रहाण्याचा अनुभव होता, त्यांच्या कादंबऱ्यांमधले तपशील वास्तवाच्या जास्त जवळ जाणारे होते. साळवेंनीसुद्धा ‘एन्काउंटर’ या नावाची कादंबरी लिहिली.
नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्याचं कारण सांगत पोलीस आदिवासी तरुणांना पकडून बंद करत आणि जंगलाबाहेरच्या जगाच्या नियमांची माहिती नसलेल्या त्या आदिवासी तरुणांना ना जामीन मिळत असे, ना खटला लढता येत असे. साळवेंनी हे काम अंगावर घेतलं. कोणाही आदिवासी व्यक्तीला पोलिसांनी अटक केली, की ते धावून जात. खटला लढवत. त्यातून त्यांना कमाई अर्थातच होत नसे; पण अन्यायाने कोणा व्यक्तीच्या आयुष्यातली वर्षंच्या वर्षं गजाआड खितपत पडण्यात वाया जाऊ दिली नाही, याचं फार मोठं समाधान त्यांना मिळत असे.
आणि पुरत असे.
आदिवासींना नक्षलवाद्यांचा आधार का वाटू लागला
त्यांनी लढलेल्या सर्व खटल्यांची कात्रणं, त्या खटल्यांच्या वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बातम्या, सगळं त्यांनी व्यवस्थित फाइल करून ठेवलेलं होतं. तारीखवार माहिती आयती उपलब्ध. नक्षलवाद आणि नक्षलवादी हे शब्द आता पूर्ण बदनाम झाले आहेत. पण थोडी माहिती मिळवली की जंगलात शांतपणे रहाणाऱ्या आदिवासींना नक्षलवाद्यांचा आधार का वाटू लागला, त्यांच्यातल्या काहींना नक्षलवाद्यांना सामील का व्हावंसं वाटलं, हे समजेल.
शहरात रहाणाऱ्यांच्या जगण्यातली सारी चैन आदिवासींच्या पिळवणुकीवर कशी उभी आहे, हेसुद्धा कळू शकेल. साळवेंना याची भयंकर तिडीक होती. आज त्यांच्या बोलण्यावरून त्यांना नक्षलवादी ठरवून विनचौकशी, विनाफिर्याद तुरुंगात सडवत ठेवलं गेलं असतं. पण आपण एक पुण्याचं काम करतो आहोत, याची त्यांना खात्री होती आणि असल्या परिणामांची त्यांनी कधी पर्वा केली नाही.
सत्यशोधक किसान समिती
‘पुण्याचं काम’ हा शब्दप्रयोग एकनाथ साळवे यांच्या संदर्भात खरं तर वापरू नये. ते जोतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे सच्चे आणि पक्के अनुयायी होते. फुले-आंबेडकरांचं सर्व लिखाण त्यांनी वाचलं होतं, ते त्यांच्या जिभेवर होतं. विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी ‘सत्यशोधक किसान समिती’ स्थापन केली होती. दलित-बहुजन-आदिवासी यांची पिळवणूक करणाऱ्या उच्चवर्णीय हितसंबंधांचा त्यांना प्रचंड राग होता. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांना इतके पटले की त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला होता. ‘जय भीम, जय जोती’ हे शब्द त्यांच्या तोंडात होते.
साळवे नक्षलवादी होते का? अजिबात नव्हते. नक्षलवादी असण्याच्या आरोपावरून पकडलेल्या अनेकांचे खटले त्यांनी चालवले, कारण त्यांना आदिवासींबद्दल आपुलकी होती आणि ‘सर्व विएतनामी हे अमेरिकन सैनिकांची हत्या करणारे विएतकाँग गनीम’ असं धरून वागणारे अमेरिकन सेनाधिकारी, किंवा ‘सर्व काश्मिरी हे सैनिकांच्या जिवावर उठलेले पाकिस्तानधार्जिणे शत्रू’ असं गृहीत धरणारे दिल्लीकर राज्यकर्ते, तसंच गडचिरोलीमध्ये काही काळ होतं.
सरकारने परिषद होऊ दिली नाही
आदिवासींची सहानुभूती पोलिसांच्या दिशेने का नाही, नक्षलवाद्यांच्या दिशेने का आहे, हा विचारही न करता बारीक संशयाने आदिवासी तरुणांची धरपकड चालू होती. या विषयावर बोलताना साळवेंचा संताप बाहेर येत असे. अहेरी तालुक्यात सर्व कम्युनिस्ट चळवळ्यांची एक जाहीर परिषद कमलापूरला होणार होती. तिथे मंडप घालण्यात आला होता, बाहेरच्या राज्यातूनही येणाऱ्या प्रतिनिधींच्या रहाण्याखाण्याची तयारी चालू होती आणि आयत्या वेळी सरकार लटपटलं. परिषदेत एका मोठ्या परिसरातले चळवळे एकत्र आले, तर सरकारविरोधाला अधिक जोर चढेल, असं सरकारला वाटलं आणि सरकारने परिषद होऊ दिली नाही.
परिणामी चळवळे कम्युनिस्ट भूमिगत झाले. ‘परिषद झाली असती, तर कोणी कोणी भाषणं केली असती, राग व्यक्त झाला असता, अन्याय चव्हाट्यावर आला असता, हिंसा कमी झाली असती आणि सरकारचा फायदाच झाला असता,’ असं साळवेंना ठामपणे वाटत होतं.
‘नक्षलवाद्यांचा पाठीराखा’ असा शिक्का बसला तरी ‘प्रज्ञाशील करुणा मला समजते,’ असे उद्गारही आंबेडकरांच्या या बौद्ध अनुयायाने काढले आहेत. त्यांना भेटून आपल्यालाही थोडा मोठेपणाचा स्पर्श झाल्यासारखं मला झालं. एकनाथ साळवे गेल्याची बातमी वाचली आणि सगळं आठवलं. शक्य तेवढं पुस्तकात घातलं आहे; पण एकनाथ साळवे यांना प्रत्यक्ष भेटण्याचा अनुभव शब्दांत कसा मावणार?
लेखन – हेमंत कर्णिक
#एक कोट घराचे स्वप्न
एक कोट घराचे स्वप्न पाहण्यात
होतोय चिखल
वावरतायत शहरातील घोडे
ह्या स्वप्नांचं जितं मढं घेऊन
रेसकोर्स च्या शर्यतीत
ह्या घोड्यांना मिळत नाही संधी
त्यांच्यावर कोणी लावत नाही सट्टा
शहराचा नवरदेव ‘एसआरए’ च्या नावानं
नुसताच उड उड करतो
दाखवतो सपान आभाळात उडण्याच
एक कोट स्वप्नाची हिस्ट्री
घोड्याला माहीत असावी असं काय नाय
घामाचा वासय त्या हिस्ट्रीला
शहरातल्या कोतवालाने मांडलाय त्याचा बाझार
बाजारात तो फसला
धाडला त्याला बाझारा बाहेर
घामाची वाफ गेली ढगात
दिला खर्चापानी त्याला
एक कोट घरासाठी
घोडा पळालाच असेल असं नाय
बापाच्या स्वप्नांचं बोजकं
तो वावरतोय जन्मापासून
बाप, आजा , पंजाचा घाम
त्या समुद्रात पोहण्याच पितृसत्ताक प्रिविलेज
एक कोट स्वप्नाचा घोडेबाजार
घोडा खेळतो भावबंदा भनी सोबत
कधी आईचा दवापानी
बापाला वटनात चादरीची वळकुटी
स्वप्न हे स्वप्नच असते
एक कोट घराचे साबण पाण्यातले बुडबुडे
फोडतात शहरातले वॉचमन
त्याच पोट त्यावर
हूं
मिळालं एक कोट घर
उंच झोपडपट्टीत
कोट मिळालं तरी मिळत नाय स्वप्न
त्याचे होतात बुडबुडेच
घोड्याच पोरग हळूच पकडत बुडबुडा
त्याला तेच स्वप्न म्हणून वावरायचय
पुढल्या रिडेव्हलमेंट पर्यंत
लेखन – अविनाश उषा वसंत
सार्वजनिक मालकीचे उपक्रम कमकुवत होण्याला आयएएस लॉबीचे आक्रमण अंशतः कारणीभूत ठरले आहे !
केंद्र व राज्य सरकराची विविध मंत्रालये, जिल्हा प्रशासन हि आयएएस अधिकाऱ्यांचे हक्काचे अंगण राहिले आहे
तर बंदरे , विमानतळ, रस्ते , वीज , पाणी , नागरी पायाभूत सुविधा , दूरसंचार , पेट्रोलियम , संरक्षण साधनसामुग्री , रेल्वे
अशा अनेक क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम हे त्या क्षेत्रातील विशेषज्ञांचे / तंत्रज्ञांचे (टेक्नोक्रॅट्स ) अंगण राहिले आहे.
तरुण वयात प्रोबेशनरी ऑफिसर वा तत्सम पदावर रुजू होऊन अनेक दशके त्या क्षेत्रात प्राविण्य मिळवणे हे खूप चिकाटीचे काम आहे
आपण विविध आव्हाने स्वीकारत , ती यशस्वी रित्या पार पाडली तर आपल्या उपक्रमात आपल्याला वरच्या जागांवर बढत्या मिळत जातील
हि महत्वाकांक्षा , हा ड्रायव्हिंग फोर्स अतिशय मानवी आहे , त्यात काही गैर नाही.त्याप्रमाणे स्वंतंत्र्यानंतर अनेक दशके सार्वजनिक उपक्रम टेक्नोक्रॅट्स चालवत
_________________
पण झाले काय (आणि हे गेले काही दशके सुरु आहे हे मुद्दामहून अधोरेखित करण्याची गरज आहे )
गेल्या काही दशकात सार्वजनिक उपक्रमांतील टेक्नोक्रॅट्सच्या अंगणावर आयएएस लॉबीने अतिक्रमण करायला सुरुवात केली
ज्या सार्वजनिक उपक्रमाच्या प्रमुखपदी त्याच उपक्रमात अनेक दशके काम केलेल्या वरिष्ठ टेक्नोक्रॅटची वर्दी लागायची तेथे आता “लॅटरल एंट्री” घेत आयएएस अधिकारी बसवले जाऊ लागले.अर्थात त्याला त्या काळातील राजकीय नेतृत्वाचा , मंत्र्यांचा पाठिंबा होता म्हणूनच
________________________
ते देखील ३ किंवा तत्सम छोट्या कालावधीसाठी ; त्या कालावधीत राजकीय नेत्यांचा त्या सार्वजनिक उपक्रमाशी संबंधित अजेंडा पार पाडण्याची जबाबदारी त्या लॅटरल एंट्री घेतलेल्या प्रमुखाची असते
अनेक दशके आपल्या क्षेत्रात प्राविण्य मिळवण्यासाठी कष्ट घेतले , आपल्या संस्थेबरोबर एकनिष्ठ राहिलो त्याचे चीज झाले नाही
अशा कटू भावनेने मनात घर केलेले टेक्नोक्रॅट्स त्या क्षेत्रात नव्याने प्रवेश करू पाहणाऱ्या खाजगी उद्योग समूहाला सल्लागार म्हणून , प्रमुख म्हणून जॉईन होऊ लागले
त्यात भर पडली सार्वजनिक क्षेत्राविरुद्ध पद्धतशीरपणे मने कलुषित करण्याच्या मोहिमेची त्यात भर पडली आपण राष्ट्रउभारणी मध्ये हातभार लावत आहोत याचा अभिमान गाळून पडण्याची त्यात भर पडली खाजगी क्षेत्राकडून दिल्या जाणाऱ्या काही पटींच्या पॅकेजची
___________________________
खूप खोलात जाऊन अंतदृष्टी कमवावी लागेल तरच सार्वजनिक विरुद्ध खाजगी वाल्या चर्चातून काही ऍक्शन पॉईंट्स मिळतील , नाहीतर परस्परांवर भौ भौ सुरूच राहील
लेखन – संजीव चांदोरकर
मातंग समाज अन तरुणांच्या अधोगतीला जबाबदार कोण?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on March 19 , 2021 14:00 PM
WebTitle – Social media corner latest & viral post in social media