जगाच्या इतिहासात अनेक राजे, महाराजे, होऊन गेले पण त्यातील मोजक्याच राजांना जनतेच्या हृदयात कायमचे स्थान मिळाले, मोजक्याच राजांना इतिहासाने गौरविले.केवळ तलवारीच्या जोरावर सिंकंदरने जग जिंकले पण जिंकण्याच्या मोहात त्याला जनतेचे प्रेम मात्र मिळाले नाही.परंतु या पृथ्वीतलावर एक असाही सम्राट होऊन गेला ज्याने तलवारी ऐवजी , न्यायाच्या, प्रेमाच्या, विश्वासाच्या जोरावर जग जिंकले.
अशोकांच्या काळात त्यांची जगातील सर्वात मोठी सैन्य शक्ती होती. जरी कलिङ्ग युद्धात खूप सैनिक मारले गेले तरी संपूर्ण आशिया खंडात दबदबा निर्माण व्हावा एव्हढे प्रचंड सैनिकी सामर्थ्य सम्राट अशोकांचे होते.
सम्राट अशोकांनी अखंड भारताच्या बहुतांशी भागावर राज्य केले.आजचा पाकिस्तान,अफगाणिस्तान पूर्वेकडे बांग्लादेश ते दक्षिणेकडे केरळ पर्यंत तसेच नेपाळ,भूतान इराण,ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांमध्ये अशोकांच्या साम्राज्याच्या सीमा होत्या.
काबूल पासून बंगाल पर्यंत आणि काश्मीर पासून मद्रास पर्यंत ज्याच्या साम्राज्याच्या सीमा पसरल्या होत्या आणि नेपाळ, चीन, मंगोलिया इराण, इजिप्त, श्रीलंका आणि पूर्व आणि मध्य आशियात ज्याच्यामुळे भगवान बुद्धांच्या धम्मराज्याचा विस्तार झाला होता तो सम्राट अशोका शिवाय दुसरा राजा कोण असू शकेल?
ज्याने भारतीयच नव्हे तर भारता बाहेरील जनतेच्या मनात देखील शेकडो वर्षांपासून प्रेमाचे आदराचे स्थान मिळवले आहे तो सम्राट अशोका व्यतिरिक्त कोण आहे?
बुद्ध धम्म स्वीकारला
सम्राट अशोक केवळ भारताच्या नव्हे तर जगाच्या इतिहासातील सुवर्णपर्व आहे.कलिंगच्या युद्धातील प्रचंड रक्तपाताने राजपुत्र अशोक व्यथित झाला.
मानवी जीवणाची क्षणभंगुरता त्याला अस्वस्थ करून गेली आणी मग भगवान बुद्धांच्या धम्ममार्गावर जीवनाची वाटचाल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
युद्धा ऐवजी प्रेमाने प्रजेला जिंकणारा,प्रजेवर मुलांसारखे प्रेम करणारा,प्रजेची पित्याप्रमाणे काळजी घेणारा, शेजारी देशांना घाबरू नका.आपण एकमेकांवर विश्वास ठेवून आनंदाने राहू शकतो असा मित्रांप्रमाणे विश्वास देणारा देवानामप्रिय प्रियदर्शी अशोका सारखा सम्राट पुन्हा होणे नाही.
सम्राटाने बौद्ध धम्माला अनुसरून देशात लोककल्याणकारी राज्यव्यवस्था निर्माण केली.
अगदी ग्रामपंचायत पातळी पासून शासनव्यवस्था निर्माण केली,अतिशय प्रभावी अशी महसूल व्यवस्था निर्माण केली.
जनतेला शेतीसाठी जमिनीचे पट्टे वाटले,रस्ते बांधले,तलाव,विहिरी निर्माण केल्या,नदीवर बांध घालुन ही भूमी सुजलाम-सुफलाम केली.
जनतेच्या सेवेसाठी ठिकठिकाणी आरोग्यशाला, मुलांच्या शिक्षणासाठी पाठशाळा निर्माण केल्या.
मुलांचे संगोपन हि राज्याची जबाबदारी आहे असा नियम बनवला, भुकेल्यांसाठी अन्नछत्र निर्माण केले.
जनतेला चोर, दरोडेखोर, लुटारू यांच्यापासून सरंक्षण दिले व्यापाऱ्याना सरंक्षण दिले,
भारताचा व्यापार देश-विदेशात सुरू करणारा पहिला भारतीय राजा
व्यापारी मार्गांवर विश्रांती स्थळ निर्माण केले, सम्राटाने व्यापा-यांना देश-विदेशात व्यापार करायला प्रोत्साहन दिले, सम्राटाच्या पाठींब्यावर भारतीय व्यापाऱ्यानी इजिप्त,ग्रीस,सीरिया,पूर्व आशिया आणि मध्य आशियातील देशांशी समुद्रमार्गे आणि भूमार्गे व्यापार केला.
म्हणतात कधीकाळी भारतात सोन्याचा धूर निघायचा पण सम्राट अशोकाच्या काळात भारतात सोन्याचा धूर निघायचा असे कोणी सांगत नाही.
अशोकाच्या काळात जागतिक व्यापारातील ४०% हिस्सा भारताचा होता आज तो हिस्सा २% इतका खाली आहे.
त्याकाळात सम्राटाच्या नेतृत्वाखालील भारत एक जबाबदार जागतिक महाशक्ती होता.
सम्राट अशोकाच्या बहुतेक शिलालेखांवर एक चक्र आहे त्यास “अशोक चक्र ” असे म्हणतात,हे चक्र स्वतः पुढे जाणाऱ्या काळाचे प्रतिक आहे,त्यावरील २४ आऱ्या ह्या सतत प्रवाहित होणाऱ्या काळाचे प्रतिनिधित्व करतात. भारताच्या राष्ट्रध्वजात हे अशोक चक्र सन्मानित करून स्वीकारण्यात आले.
बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी आपल्या मुलांना विदेशात पाठवणारा महान सम्राट
सम्राट अशोका यांनी भिक्खूसंघाला देशविदेशात धम्म प्रसारासाठी पाठवले.
बौद्ध भिक्खू बौद्ध तत्वज्ञानं चीन सहित पूर्व आशिया,इराण,मध्य आशिया,इजिप्त आणि ग्रीस पर्यंत घेऊन गेले.
स्वतः सम्राटाने स्वतःच्या मुलाला आणि मुलीला सुद्धा धम्मप्रसारासाठी दान केले.
जेव्हा बालक राहुलने आपला पिता भगवान बुद्धांकडे वारसा मागितला
तेव्हा बुद्धांनी राहुलला वारश्यात कपिलवस्तुच राज्य न देता कोणतीही संपत्ती न देता धम्माचा वारसा दिला.
तद्वत सम्राट अशोकाने सुद्धा आपली मुलगी संघमित्रा आणि पुत्र महेंद्र यांना
वारश्यात आपले अफाट साम्राज्य न देता धम्माचा वारसा दिला.
आदी कल्याणकारी,मध्य कल्याणकारी आणि जो अंतीही कल्याणकारी आहे अश्या बौद्धधम्माला अभिप्रेत लोककल्याणकारी आज्ञा असलेले ८४ हजार शिलालेख
प्रस्तरखंड, गुंफा कोरल्या आणि केवळ आज्ञा कोरल्या नाहीत तर त्यानुसार राज्यकारभार चालतोय कि नाही यावर देखरेख ठेवणारी यंत्रणा सुद्धा निर्माण केली.
अगदी इराण मधे सुद्धा हे शिलालेख सापडले आहेत.
सारनाथ येथील अशोक स्तंभ हा अशोकाचा सर्वांत प्रसिद्ध स्तंभ मानला जातो. हा वालुकाश्माचा बनला असून अशोकाने सारनाथला भेट दिल्याची त्यावर नोंद आहे. त्याच्या चारही बाजूने एकमेकांकडे पाठ केलेले सिंह आहेत. हा स्तंभ आता भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून वापरात आहे.
माधव कोंडविलकर आपले पुस्तक ‘देवांचा प्रिय राजा प्रियदर्शी सम्राट अशोक’ मध्ये म्हणतात की,
काही बाबतीत चक्रवर्ती सम्राट अशोकांची तुलना,अलेक्झांडर द ग्रेट,ऑगस्टस सीझर, चेंगीजखान, तैमूर, रशियाचा पहिला पीटर किंवा पहिला नेपोलियन यांच्याशी केली जाऊ शकते.
पण अलेक्झांडरसारखा सम्राट् अशोक अति-महत्त्वाकांक्षी नव्हता.ऑगस्टस सीझरसारखा तो एक आदर्श शासनकर्ता होता.
परंतु आपण हुकूमशहा म्हणून ओळखलं जावं असं जे सीझरला वाटायचं तसं अशोकाला कधीच वाटलं नाही. आपली तशी ओळख व्हावी अशी त्याची कधीच इच्छा नव्हती.
अशोक एक सामर्थ्यवान सेनापती होता.पण आपल्या पराक्रमाबद्दल, विजयाबद्दल पहिला नेपोलियन जसा सदैव असंतुष्ट असायचा तसं अशोकाचा बाबतीत नव्हतं.
प्रजाजनांनी आपल्यावर प्रेम करावं,असं त्याला मनापासून वाटत असे.
चेंगीसखान, तैमूर आणि रशियाच्या पहिल्या पीटरने त्यांच्या प्रजेवर जशी दहशत बसवली होती, तशी दहशत सम्राट अशोकने कधीच बसवली नाही.
मनाचा मोठेपणा किंवा उमदेपणा, मनातला शुद्ध भाव, स्वभावातला प्रामाणिकपणा, स्वत:च्या प्रतिष्ठेबद्दलची किंवा मानमरातबाबद्दलच्या स्पष्ट स्वच्छ कल्पना आणि मनातलं सर्वांबद्दलचं प्रेम या अशोकाच्या, इतरांपेक्षा वेगळेपणाने जाणवणाऱ्या वैशिष्ट्यांमुळे त्याला गौतम बुद्धांच्या किंवा येशू ख्रिस्ताच्या पंक्तीत नेऊन बसवले होते.
भारताच्या इतिहासात एकच असा ‘एकमेव’ म्हणण्यासारखा कालखंड आहे, जो स्वातंत्र्याचा काळ, अतिशय महत्त्वाचा काळ आणि वैभवाचा काळ म्हणता येईल आणि तो काळ म्हणजे मौर्य सम्राट अशोकांच्या राज्यकारभाराचा काळ होय.
— डॉ. बाबासाहेब आंबेडकर (ग्रंथ – ॲनिहिलेशन ऑफ कास्ट)
जगाच्या इतिहासात असे हजारो राजे आणि सम्राट होऊन गेले जे स्वत:ला ‘हिज हायनेस’, ‘हिज मॅजेस्टीज’, ‘हिज एक्झॉल्टेड मॅजेस्टीज’ आणि अशा त्यांचे उच्चपद दर्शवणाऱ्या इतर अनेक पदव्या लावून घेत असत. हे सगळेजण काही काळापुरते प्रसिद्ध झाले आणि मग झटकन विस्मृतीतही गेले पण सम्राट अशोक! ते मात्र एखाद्या तेजस्वी ताऱ्यासारखे सतत तळपतच राहिले आहे, अगदी आजपर्यंत.
— एच्.जी. वेल्स (ग्रंथ – आऊलटाईट ऑफ हिस्टरी)
इतिहासातल्या पानापानांवर हजारो राजांच्या नावांची अक्षरश: गर्दी झाली आहे; पण त्या गर्दीमध्येही सम्राट अशोकांचे नाव झळकत असलेले दिसते. खरं तर त्यांचे एकट्याचेच नाव एखाद्या ताऱ्यासारखे चमकते आहे.
— एच्.जी. वेल्स (ब्रिटीश इतिहासतज्ज्ञ)
आजपर्यंत होऊन गेलेले सम्राट आणि इतर प्रभावशाली व्यक्तींमध्ये सम्राट अशोक हे नक्कीच असे एकमेव सम्राट होते, ज्यांनी युद्ध जिंकल्यानंतर असा निश्चय केला होता की, भविष्यात एकाही शत्रूशी परत युद्ध करायचे नाही.
— जवाहरलाल नेहरू (ग्रंथ- द डिस्कव्हरी ऑफ इंडिया)
लेखन – प्रशिक धांदे , नेर
(लेखक पत्रकार आहेत)
( काही संदर्भ – विकिपीडिया )
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
हे ही वाचा.. गौतम बुद्ध – एक निसर्गवादी : बुद्ध आणि आजचा महाविद्यालयीन तरुण
हे ही वाचा.. ON RECORD: डॉ. आंबेडकरांच्या संविधान निर्मिती योगदानाबद्दल
अनुसुचित जातीजमातींच्या आरक्षणाचे विरोधक वल्लभभाई पटेल-प्रा.हरी नरके
डॉ.आंबेडकरांचा जगातील पहिला पुतळा स्थापन करणारा मराठा
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on APRIL 20 , 2021 15 :57 PM
WebTitle – Samrat ashok 2021-04-20