मुंबई, दि. ११: कोरोना ची रुग्ण संख्या, बरे होणारे रुग्ण, मृत्यू यांच्या माहितीची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. त्यासाठी महाराष्ट्राची साथरोग सर्वेक्षण यंत्रणा पारदर्शकपणे काम करत असून कोणतीही आकडेवारी लपविण्याचा प्रश्नच येत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील यापूर्वीच अतिशय पारदर्शकपणे कोरोना रुग्णसंख्येची माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत. केवळ तांत्रिक अडचणींमुळे काही वेळा माहिती प्रलंबित राहते. तथापि ती अद्ययावत करण्यासाठी जिल्हा आणि मनपा यांचेकडे नियमित पाठपुरावा केला जातो.
कोरोना रुग्ण व मृत्यू संख्या यांच्या नोंदी करण्याची प्रक्रिया लक्षात घेतल्यास त्यामधील विविध टप्पे आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणी समजून येतात. रुग्ण अथवा मृत्यूची नोंद घेऊ नका, अशी कोणतीही सूचना दिली जात नसल्याचेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.
कोरोना ची रुग्ण संख्या, मृत्यूंची नोंद याची माहिती कशाप्रकारे घेतली जाते त्याची माहिती अशी :
कोरोनाची माहिती संकलन पद्धती
1) केंद्र शासन कोविड रिपोर्टिंगसाठी दोन पोर्टल वापरते.
- i) आई सी एम आर चे सी. व्ही. अनालिटिक्स पोर्टल (बाधित रुग्णांच्या माहितीसाठी)
- ii) कोविड १९ पोर्टल (मृत्यूच्या माहितीसाठी)
2) या शिवाय प्रयोगशाळांसाठी आर टी पी सी आर ॲप आणि रुग्णालयांसाठी फॅसिलिटी ॲप वापरण्यात येते.
3) प्रत्येक प्रयोगशाळा आपण केलेल्या नमुना तपासणीची व्यक्तीनिहाय माहिती आर टी पी सी आर ॲप द्वारे आई सी एम आर चे सी. व्ही. अनालिटिक्स पोर्टल वर भरत असते.
4) राज्याच्या दैनंदिन अहवालासाठी रोज रात्री बारा वाजेपर्यंतची बाधित रुग्णांची यादी आई सी एम आर च्या सी. व्ही. अनालिटिक्स पोर्टल वरुन तर मृत्यूची यादी कोविड १९ पोर्टल राज्य आणि जिल्हास्तरावर डाउनलोड करण्यात येते.
5) राज्य आणि जिल्हास्तरावर दुहेरी नोंदी असलेले रुग्ण वगळण्यात येतात. या यादीतील माहितीची खातरजमा करणेबाबत सर्व जिल्ह्यांना सूचना देण्यात आल्या असून त्यानुसार बाधित रुग्ण आणि मृत्यू बाबत माहितीची खातरजमा करुन साधारण संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्व जिल्ह्यांची अंतिम माहिती राज्य कार्यालयास प्राप्त होते. या माहितीच्या आधारेच राज्याचा अंतिम अहवाल आणि प्रेस नोट तयार केली जाते.
6) रिकॉन्सिलिएशन अर्थात ताळमेळ प्रक्रिया साधारणपणे दर पंधरा दिवसांनी दोन्ही पोर्टलवरील माहिती आणि राज्य अहवाल यातील माहितीची तुलना केली जाते आणि तांत्रिक कारणाने झालेले फरक दूर केले जातात. प्रयोगशाळा आणि रुग्णालये अनेकदा जुनी माहिती पोर्टलवर अद्ययावत करतात. ही माहिती राज्य अहवालात घेता यावी आणि राज्य अहवाल अद्ययावत करता यावा यासाठी ही ताळमेळ प्रक्रिया आवश्यक असते.
प्रलंबित माहितीची आणि माहितीतील तफावतीची कारणे
1)प्रत्येक हॉस्पिटलने त्यांच्याकडील रुग्णांची माहिती वेळेवर भरावी अद्ययावत करावी यासाठी प्रत्येक रूग्णालयाला फॅसिलिटी ॲप ही ऑनलाईन सेवा पुरवण्यात आलेली आहे.
तथापि अनेक रुग्णालये, विशेषतः खाजगी रुग्णालये या फॅसिलिटी ॲपवर त्यांच्याकडील रुग्णांची माहिती अद्ययावत करत नाहीत.
त्यामुळे किती रुग्ण बरे होऊन घरी गेले अथवा किती जणांचा मृत्यू झाला याबाबत रियल टाइम डेटा मिळण्यामध्ये अडचणी येतात.
2) हॉस्पिटल स्तरावरुन विलंब झाल्यास जिल्हा स्तरावर ही माहिती संकलित करून ती कोविड पोर्टलवर अपलोड केली जाते.
परंतु या प्रक्रियेमध्ये अनेकदा बराच वेळ लागतो.यामुळे काही मृत्यूची माहिती बर्याच कालावधी करता प्रलंबित राहते.
3) आयसीएमआर पोर्टल वर प्रयोगशाळा आपली माहिती भरतात. परंतु अनेकदा प्रयोगशाळाकडील तपासलेल्या नमुन्यांची सर्व माहिती वेळेवर भरली जात नाही. तपासलेल्या नमुन्याबाबत माहिती प्रलंबित राहिली तर ते पॉझिटिव्ह रुग्ण पोर्टलवर दिसत नाहीत. त्यामुळे अशा रुग्णांच्या डिस्चार्ज किंवा मृत्यू विषयक माहिती देखील वेळेत भरण्यामध्ये अडचणी येतात.
4) दोन पोर्टलमधील माहिती एकत्रित होण्यासाठी लागणारा वेळ (Synchronization) आणि इतर तांत्रिक कारणामुळे देखील माहितीमध्ये तफावत आढळते.
5) राज्यांमध्ये एप्रिल व मे महिन्यामध्ये रुग्णांची संख्या खूप जास्त होती. या कालावधीत जिल्ह्यांची सर्व यंत्रणा रूग्ण व्यवस्थापन, खाटांचे व्यवस्थापन ऑक्सिजन व औषध पुरवठा या बाबींमध्ये व्यस्त असल्यामुळे या काळातील नोंदी या प्रलंबित राहिलेल्या असून जिल्हा व रुग्णालय स्तरावरून त्याचे अपडेशन सध्या करण्यात येत आहे.
सुयोग्य माहिती व्यवस्थापनासाठी करण्यात येणारी कार्यवाही –
1) सर्व जिल्ह्यांच्या आकडेवारीचा दैनंदिन आढावा घेतला जातो आणि आकडेवारीतील फरक दूर करण्याबाबत जिल्ह्यांना वेळोवेळी सूचित करण्यात येते.
उदाहरणार्थ – २६ मे ते १० जून या कालावधीत राज्यातील एक आठवडयापूर्वीच्या कालावधीतील ८,०७४ मृत्यू अद्ययावत करण्यात आलेले असून त्याची नोंद राज्य प्रेस नोट मध्ये घेण्यात आलेली आहे. तपशील खालीलप्रमाणे –
सुधारित करण्यात आलेली मृत्यूसंख्या
26-05-2021 – 539
27-05-2021 – 459
28-05-2021 – 549
29-05-2021 – 389
30-05-2021 – 412
31-05-2021 – 316
01-06-2021 – 377
02-06-2021 – 268
03-06-2021 – 336
04-06-2021 – 1088
05-06-2021 – 441
06-06-2021 – 385
07-06-2021 – 186
08-06-2021 – 407
09-06-2021 – 400
10-06-2021 – 1522
एकूण 8074
2) आकडेवारीतील तफावत दूर करण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आय.टी. सेल मधील मनुष्यबळ जिल्ह्यांना मदत करते.
3) सध्या जिल्ह्यांची बरे झालेल्या रुग्णांची दैनंदिन यादी मोठी असल्याने एनआयसी, नवी दिल्लीच्या मदतीने एपी आय (Application Programme Interface) ची मदत घेऊन बल्क अपलोड करण्यात येते. त्यामुळे दैनंदिन डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची माहिती कमी वेळात अद्ययावत करण्यास मदत होते.
4) कोरोना रुग्ण, डिस्चार्ज, मृत्यू याबाबतच्या आकडेवारीचे नियमितपणे रिकॉन्सिलिएशन (ताळमेळ प्रक्रिया) करण्यात येते.
5) राज्य स्तरावरून सर्व पातळीवरून जिल्हे व मनपा यांचा आढावा घेऊन या नोंदी अद्ययावत करण्याबाबत नियमित सूचना दिल्या जातात. वरील सर्व बाबींवरून रुग्ण व मृत्यू यांच्या नोंदी करण्याची प्रक्रिया लक्षात घेतल्यास त्यामधील विविध टप्पे आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणी समजून येतात. रुग्ण अथवा मृत्यूची नोंद घेऊ नका, अशी कोणतीही सूचना दिली जात नाही. अत्यंत पारदर्शीपणे सर्व रिपोर्टिंग करण्यात येत आहे. तसेच मृत्यू किंवा रुग्णसंख्या लपविण्यात येत नसून विविध कारणांमुळे रिपोर्टिंगसाठी काही कालावधी अथवा विलंब लागत आहे. मागील वर्षी मार्च २०२० पासून सुरू झालेल्या या कोविड साथीमधील प्रत्येक रुग्ण आणि मृत्यूचे रिपोर्टिंग होईल या दृष्टीने आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे.
निर्बंध बाबत प्रशासनाने पुढील दोन दिवसांनी परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा – अजित पवार
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)