नागपूर: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (मविआ)ला समर्थन देताना ‘निर्भय बनो’ चळवळीने काही अटी ठेवल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते ॲड.असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांनी मंगळवारी नागपुरातील पत्रकार परिषदेत या अटींची स्पष्ट व्याख्या केली. यामुळे मविआचे युतीचे गणित थोडेसे गुंतागुंतीचे झाले आहे.
लोकसभा निवडणुकीतील योगदान आणि विधानसभा रणनीती
लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘निर्भय बनो’ चळवळीने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सभा घेतल्या, ज्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर संविधानाच्या उल्लंघनाचे आरोप लावण्यात आले होते. यामुळे मविआला लोकसभा निवडणुकीत काही प्रमाणात फायदा झाल्याचे मानले जात आहे. तथापि, आगामी विधानसभा निवडणुकीत ‘निर्भय बनो’ च्या समर्थनासाठी मविआला ठोस अटी पाळाव्या लागतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अटींची यादी
पत्रकार परिषदेत बोलताना ॲड. आसीम सरोदे यांनी सांगितले की, मविआ सत्तेत आल्यास राज्यातील नागरिकांना योग्य न्याय मिळावा, याची काळजी घेण्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रमुखतः सत्याची कदर करणे, धर्मांधतेला आळा घालणे, पर्यावरण रक्षण, आरोग्य व शेतीसह विविध क्षेत्रांत गरीब व मध्यमवर्गीयांना न्याय मिळवून देणे, हे अपेक्षित आहे.
राज्यपालांच्या भूमिकेवर गंभीर टीका
राज्यपाल नियुक्त सात आमदारांच्या मुद्द्यावरूनही सरोदे यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. त्यांनी म्हटले की, राज्यातील पूर्वीच्या सरकारने आमदार नियुक्तीसाठी यादी दिल्यानंतरही तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी काहीच निर्णय घेतला नाही. मात्र, विद्यमान सरकारने यादी दिल्यानंतर तत्काळ शपथविधी पार पाडला गेला. हा पक्षपातीपणा असल्याचे सरोदे यांनी स्पष्ट केले.
विश्वंभर चौधरींनी शिक्षण व आरोग्यावर दिला भर
सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी मविआला सत्तेवर आल्यास शिक्षणासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून १२ टक्के
आणि आरोग्यासाठी १२ टक्के निधी राखून ठेवण्याची मागणी केली.
यासोबतच, दलित, आदिवासी आणि वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि सुविधांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली.
विधानसभेसाठी ‘निर्भय बनो’ चे नियोजन
लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा ‘निर्भय बनो’ च्या सभा कमी प्रमाणात होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
सभांचे जिल्हा स्तरावर आयोजन करण्याचे नियोजन सुरू आहे, तसेच भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि अजीत पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस विरोधातील धोरणात्मक योजना आखली जात असल्याचे ॲड. सरोदे यांनी सांगितले.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 15,2024 | 21:45 PM
WebTitle – Nirbhay Bano Sets Conditions for Supporting MVA, Asim Sarode Clarifies Stance