मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सुनावणी सुरु आहे. हायकोर्टाने बुधवारी त्यांना चांगलंच फटकारत ताशेरे ओढले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची आणि त्यांच्या कारभाराची केंद्रीय अन्वेषण विभागाद्वारे (सीबीआय) चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी परमबीर यांनी फौजदारी जनहित याचिकेद्वारे केली आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु आहे.
सुनावणीदरम्यान परमबीर सिंह यांच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले. गृहमंत्र्यांकडून गुन्हा घडत असल्याचे दिसत असताना तुम्ही गप्प का बसलात? तुम्ही गुन्हा दाखल का केला नाहीत? अशी विचारणा हायकोर्टाने परमबीर सिंह यांना केली. एक वरिष्ठ अधिकारी म्हणून तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरला आहात असे खडे बोल सुनावले. तक्रार किंवा एफआयआरशिवाय सीबीआय चौकशीच्या आदेशाची मागणीच कशी करता? असाही प्रश्न कोर्टाने यावेळी उपस्थित केला.
तुम्ही जे आरोप करत आहात त्याचा पुरावा काय? गृहमंत्र्यांकडून पैशांची मागणी केली जात असताना वा पैसे जमा करण्यास सांगितले जात असताना तुम्ही स्वतः तिथे होता का? अशी विचारणा करत तुमच्या आतापर्यंतच्या म्हणण्यावरून तुम्ही केलेले आरोप ऐकीव महितीवर आधारित आहेत, असेही कोर्टाने सुनावले.
सीबीआय चौकशीची मागणी
दरम्यान अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी केलेली याचिका ही जनहित याचिका कशी, अशी विचारणा हायकोर्टाने मंगळवारी परमबीर सिंह यांना केली होती. पोलिसांच्या नियुक्ती, बदल्यांसाठी देशमुख पैशांची मागणी करतात, तपासकार्यात वारंवार हस्तक्षेप करतात, असे आरोप परमबीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केले होते. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात फौजदारी याचिका करून देशमुख यांच्यावरील आरोपांच्या सीबीआय चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली.
मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर परमबीर यांच्या वतीने वरिष्ठ वकील विक्रम नानकानी यांनी याचिका सादर केली. तसेच याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्याची विनंती केली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही फौजदारी जनहित याचिका करण्यात आल्याचे नानकानी यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर परमबीर यांनी केलेल्या याचिकेतील मागण्यांबाबत न्यायालयाने विचारणा केली. तसेच ही याचिका जनहित याचिका असू शकते का, असा प्रश्नही केला. त्यावर एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या गंभीर आरोपांच्या सीबीआय चौकशीची मागणी याचिकेत करण्यात आल्याचे नानकानी यांनी न्यायालयाला सांगितलं. तसेच न्यायालयाने उपस्थित केलेल्या प्रश्नाचे युक्तिवादाद्वारे समाधान केले जाईल, असंही स्पष्ट केलं.
परमबीर सिंग यांच्या वकिलांनी काय म्हटले?
परमबीर सिंग यांच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडताना म्हटले की एका पोलीस आयुक्तांने राज्याच्या गृहमंत्री यांच्यावर आरोप केले हे गंभीर आहेत.या अगोदर असे काही ऐकीवात नाही. महिन्याला 100 करोड म्हणजे वर्षला 1200 करोड आणि सरकार 5 वर्षे असते म्हणजे 6000 करोडचा आरोप आहे.जर एका मंत्र्यांवर असा आरोप आहे तर किती जण यात सहभागी आहेत याची चौकशी व्हायला हवी असे परमबीर सिंग यांच्या वकिलांनी म्हटले.
कायद्यापेक्षा मोठे आहात का?
तुम्ही जर एक पोलीस अधिकारी आहात तर कायद्याचं पालन करणं तुमच्यासाठी महत्त्वाचं नाही का? पोलीस अधिकारी, मंत्री आणि नेते हे कायद्यापेक्षा मोठे आहेत का? कायद्यापेक्षा तुम्ही मोठे आहात हे समजू नका, अशा शब्दात न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी सिंग यांच्यावर ताशेरे ओढले.
उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
दरमहा १०० कोटी वसूल करून द्यावेत म्हणून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मागणी केली होती या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलास चांदीवाल यांची एक सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीला सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
“चांदीवाल चौकशी समिती म्हणजे निव्वळ धूळफेक”, देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर टीका
“राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील आरोपांची चौकशी करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या न्या. के. यू. चांदीवाल समितीला साध्या समितीचा दर्जा देण्यात आला असून, न्यायालयीन आयोगाचे अधिकार देण्यात आलेले नाहीत”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच, कमिशन्स ऑफ इन्क्वायरी अॅक्ट 1952 अंतर्गत ही समिती गठीत करण्यात आलेली नाही, ना त्यांना या कायद्यानुसार अधिकार प्रदान केले, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा.. रश्मी शुक्ला रडल्या म्हणून…- जितेंद्र आव्हाड
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on March 31, 2021 19:12 PM
WebTitle – Mumbai High Court Hearing on Parambir Singh allegations 2021-03-31