कोणत्याही वस्तूची किंमत बाजारपेठ ठरवते. मी वडापावची किंमत २० रुपये ठरवली आणि लोकांनी त्या किंमतीला वडापाव विकत घेतला तर वडापावची किंमत २० रुपये.माझ्या शेजारच्या दुकानदाराने १५ रुपयाला वडापाव विकला तर त्याच्या वडापावची किंमत १५ रुपये. वडापावची किमान आधारभूत किंमत नसते. १५ आणि २० रुपयातल्या वडापावमधील फरक ग्राहकांनी ओळखलेला असतो. माझा ग्राहक कोणता यानुसार माझा धंदा होतो. कमी वा अधिक. ग्राहक संख्या कमी असली तरी नफ्याचं प्रमाण अधिक असा धंदा करता येतो वा ग्राहक संख्या प्रचंड असूनही नफ्याचं प्रमाण किमान ठेवलं तरीही धंद्याची व्याप्ती वाढल्याने एकूण नफा वाढतो.
सुगी पश्चात तंत्रज्ञानाची गरज
वडापाव हे प्रक्रिया उद्योगाचं उत्पादन आहे.शेतमाल हा कच्चा माल समजला जातो. त्यात मूल्यवर्धन होत नाही असं आधुनिक अर्थशास्त्र मानतं. कांदे वा बटाटे यांची चाळणी करणं, आकार वा गुणवत्तेनुसार वा वाणानुसार ह्याला मूल्यवर्धन म्हणतात पण कागदोपत्री. उदाहरणार्थ, सोयाबीन वा मका यांच्यातील आर्द्रतेचं प्रमाण प्रक्रिया उद्योगाच्या गरजेप्रमाणे दहा टक्के असायला हवं.त्यासाठी सोयाबीन वा मका उन्हात वाळवायला हवा. याचा अर्थ सुगी पश्चात तंत्रज्ञानाची गरज आहे. कारण उन्हात वाळवायचा तर बिगर मोसमी वा अचानक येणार्य़ा पावसामुळे शेतमाल खराब होऊ शकतो. म्हणजे शेतकर्याने सुगी पश्चात तंत्रज्ञानात भांडवल गुंतवणूक करायला हवी.
कोणत्याही शेतमालाची किंमत त्या शेतमालापासून किती उत्पादनं तयार होतात, त्या उत्पादनांना किती मागणी आहे यावर ठरते. म्हणजेच शेतमाल हा कच्चा माल असतो.कच्च्या मालाचं उत्पादन नेहमीच आतबट्ट्याचं ठरतं.त्यामुळे किमान आधारभूत किंमत सर्व प्रकारच्या शेतमालाला देता येणार नाही, किमान आधारभूत किंमतीने सरकारने शेतमालाची खरेदी करणं परवडणार नाही कारण सरकार हे काही उद्योजक नाही. किमान आधारभूत किंमतीने शेतकर्य़ांकडून खरेदी केलेला माल सरकारला बाजारभावानेच विकावा लागतो.
भारतात लोक पोटासाठी शेती करतात
कोणतंही सरकार हा तोटा सहन करू शकत नाही.त्यावर दोन उपाय असतात.पहिला, शेतमालाच्या उत्पादनाला प्रक्रिया उद्योगाची जोड देणं आणि दुसरा, शेतीला अनुदान देणं. अमेरिकेत हे दोन्ही उपाय योजले जातात.अमेरिकेला ते परवडतं कारण तिथे मोठे नाहीत तर प्रचंड मोठे शेतकरी असतात. एक हजार गाईंचा कळप एका शेतकर्य़ाकडे असतो.त्यापासून होणार्या शेती उत्पादनांची– दूध व दूग्धजन्य पदार्थ, मांस, कातडी, इत्यादीची बाजारपेठ जागतिक असते.हे मॉडेल अन्य देशांनीही स्वीकारावं जेणेकरून त्या देशांतील शेती व शेतकरी सुखी व संपन्न होतील अशी मांडणी जागतिकीकरणानंतर केली जाऊ लागली. शरद जोशी आणि त्यांचे अनुयायी तीच मांडणी करतात.हा गाढवपणा आहे. अमेरिकेत गाई पाळणारे केवळ गाईच पाळतात. बाकी कोणतीही शेती करत नाहीत, केलीच तर परसातला भाजीपाला वा फळं घरगुती उपभोगापुरतीच करतात.
भारतात लोक पोटासाठी शेती करतात, तळ्यात मासे पाळतात,चार-दोन गाई वा शेळ्या पाळतात,
थोड्या पाण्यावर बागायती करतात, कोंबड्याही पाळतात त्याशिवाय शेतमजूरी करतात.
यातील वरकड उत्पादन बाजारात विकून इतर गरजा भागवतात.
अवर्षण वा अतिवृष्टीमुळे होणारं नुकसान त्यामुळे कमी होतं.कोणतं ना कोणतं उत्पादन हाती लागतं.
सरकार सर्व कायदे कानून बदलून शेतकरी व कामगार यांच्या शोषणाचे मार्ग मोकळे करतं
भारतात या प्रकारच्या शेतकर्य़ांची संख्या मोठी आहे.त्यामुळे भारतातील शेतीचे व शेतकर्य़ांचे प्रश्न सोडवायचे तर वेगळी रचना हवी. कारण एवढ्या प्रचंड लोकसंख्येला (सुमारे ५० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे) शेतीतून बाहेर काढायचं तर उद्योगांमध्ये प्रचंड गुंतवणूक गरजेची आहे. ही गुंतवणूक करायला कोणताही देशी वा परदेशी भांडवलदार, कंपनी पुढे येत नाही. या गुंतवणूकीतून होणार्या उत्पादनांना बाजारपेठ नाही. स्वस्त मनुष्यबळ, कमी व्याजदराने कर्ज हे उपलब्ध केल्यावर भांडवल गुंतवणूक वाढते परंतु एका मर्यादेपर्यंतच. ही मर्यादा बाजारपेठेने ठरवलेली असते. त्यापुढे गुंतवणूक वाढत नाही.
परंतु त्यासाठी सरकार सर्व कायदे कानून बदलून शेतकरी व कामगार यांच्या शोषणाचे मार्ग मोकळे करतं.
याला मी गोरी भांडवलशाही म्हणतो. त्या विरोधातली आंदोलनं दडपण्याला शेतकरी संघटनेचे,
एके काळी छात्र युवा संघर्ष वाहिनी, युवक क्रांती दल या संघटनांमध्ये काम केलेले कार्यकर्ते पाठिंबा देत असतात.
कारण ते गोर्य़ा भांडवलशाहीचे पुरस्कर्ते असतात.
उत्पादनाचा खर्च वसूल होईल एवढी किंमत शेतकर्य़ाला मिळायला हवी, त्यानुसार बाजारपेठेची रचना करायला हवी.
केवळ देशी नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची. त्यासाठी गावापासून संयुक्त राष्ट्रसंघापर्यंत बांधणी करायला हवी.
तसं झालं तर केवळ शेतीच नाही तर कारखानदारी, सेवा उद्योग यांचीही न्याय्य व्यवस्था निर्माण होऊ शकेल.
त्यासाठी थिंक टँक हवेत, उद्योजक हवेत, व्यापारी हवेत, शेतकरी व कारागीर हवेत.सर्वांनीच त्यामध्ये योगदान द्यायला हवं.
BY – सुनील तांबे
( लेखक जेष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)
हे ही वाचा.. धुवांधार वॉटर फॉल : त्यांच्या जीवाची किंमत फक्त ५० रूपये
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
Comments 3