जगातील अब्जावधी जीवजंतुची सर्वात मोठी गरज म्हणजे भूकेची अन् देहाची तृप्ती,त्याला माणूस तरी कसा अपवाद असणार? भूकेसाठी काय काय केले नाही मानवानं. भूकेसाठी कोणत्याही थराला तो जाऊ शकतो. स्वत:चा जीव धोक्यात घालण्यापासून ते दुसऱ्याचा जीव घेण्यापर्यंत.भूक शमविण्यासाठी इतरांचा जीव घेणे हे जसे अश्लाघ्य आहे तसे स्वत:च्या जीवाची जोखीम पत्करणे हेही भंयकर आहे पण त्याहीपेक्षा त्याला तसे करण्यासाठी प्रवृत्त करणे ही विकृती आहे.
मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्हयात भेडाघाट हे पर्यटनस्थळ आहे. नर्मदा नदी भेडा घाटातीलशंभर फूट खोल संगमरवरी खडकातून वाहतानां तिचे रूपही संगमरवरी दिसतं. पूढे याच नदीवर ‘धँूवाधार’ नावाचा धबधबा (Dhuandhar Water Fall) पर्यटकाचे आकर्षण स्थळ आहे.नर्मदा नदीचा प्रवाह या ठिकाणी प्रचंड आवाज करत दिडशे फूटावर झेप घेतो ज्याच्या आवाजाने छाती दडपून जाते.. नर्मदा नदीचा उल्लेख नेहमीच ‘माँ नर्मदा’ असा केल्या जातो. ती आई आहे म्हणजे तिला पुत्रपूत्री असणं ओघानं आलंच.
माँ नर्मदा जितकी समृद्ध दिसते तितकेच या घाटावर येणारे तिचे सुपूत्र विपन्न दिसतात.
हे चित्र मनाला अजिबात विलोभनीय नाही दिसत जितके घाट व नदी दिसते.
जगातील सर्वच मानवी संस्कृती नदीकाठावरच विकसीत झाल्या.
नदया मानवाचे जीवन समृद्ध करतात हे मान्य करूनही मी असे म्हणेन की भेडाघाटावर येणाऱ्या या १० -१५ वर्षांच्या मुलांचे जीव रोज पणाला लागतात तेही फक्त ५० व १०० रूपयांसाठी.
या घाटांवर पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. जवळपास वस्तीत राहणारी जी मुलं पैशा अभावी शाळेत जाऊ शकत नाहीत ती इथे येतात.
त्यांची शाळा त्यांचे पोट भरू शकत नाही पण घाटावर मात्र उपजिवीकेचे साधन त्यानां मिळाले आहे.
१०० फुट खोल पात्रात उडी मारण्याचे ५० रुपये
पण हे साधन प्रत्येक संवेदनशील मनाला ओरबाडून काढणारे आहे.ही मुलं घाटावरून माँ नर्मदेच्या १०० फूट खोल पात्रात उडी घेतात
व वर आल्यावर तेथील पर्यटक त्यानां प्रत्येक उडीचे ५० रूपये देतात.
या उत्पन्नावर त्यांच्या कुटूंबाच्या पोटाची खळगी कशीबशी का होईना थोडीशी भरत असावी.
घरातल्या बाथरूम मधील शॉवरखाली डोके भिजवताना शॉवरचा फ्लो जास्त होताच गडबडून जाणारे महाभाग या पोरानां उडी मारण्याचे ५० रूपये देतात आणि माँ नर्मदेचा आशीर्वाद प्राप्त करतात. नदीकाठच्या मानवी समृद्धीचे आयाम आता असे बदलले आहेत. एखाद्या मानवी जीवाची किंमत ५० रूपये असणे हे कोणत्या विकसीत संस्कृतीचे लक्षण म्हणावे? जीवघेणा सूर मारणाऱ्या या मुलांत एखादा उत्कृष्ट पोहणारा वीर नाही का बघता येणार?
काही काळापूर्वी ही मुलं भक्तांनी नदीत अर्पण केलेले पाच रूपये शोधण्यासाठी नदी तळ गाठत असत.
आता मात्र रोज ८०० ते ९०० रूपये त्यानां मिळतात. त्यांचे आई वडील त्यांना इतके जोखमीचे काम का करू देतात?
कारण ही रक्कम त्यांच्यासाठी खूप मोठी असावी.पण मला असा प्रश्न पडतो
एखादया पर्यटकाचा जलतरण तलावात पोहण्याचा सराव करणाऱ्या मुलालां एका उडीचे पाच हजार रूपये देवू म्हटल्यावर उडी मारू देतील का? नाही ना.
कारण तो त्यांचा स्वत:चा मुलगा आहे त्याच्या जीवाची किमत कशी होणार?
मदत करण्याचा ही अघोरी प्रकार नाही का? याला पर्याय शोधता येणार नाही का?
धुवांधार वॉटर फॉल : धबधबा
हे तर काहीच नाही या नदीवर जो ‘ धुवांधार ’ धबधबा (धुवांधार वॉटर फॉल )आहे. येथे येणारे पर्यटका माँ नर्मदेत एक रूपयाचे नाणे फेकतात.अत्यंत किरकोळ शरीर असलेला विशीतला एक तरूण थेट नदी पात्रात झेप घेतो आणि ते नाणे शोधून वर आणून देतो ज्याचा मोबदला म्हणून त्याला शंभर रूपये मिळतात.गुरू या नावाने तो पर्यटकात प्रसिद्ध आहे. हा गुरू दुहेरी व धोकादायकपणे आपला जीव पणाला लावत असतो.अगोदर दिडशे फूट खोल उडी मारायची व नंतर श्वास रोखून नदी तळ गाठायचा आणि नाणे शोधायचे. मला वाटतं हे सर्व अमानवीय आहे.निसर्ग हा शेवटी निसर्गच असतो तो काहीही घडवून आणू शकतो. खरं तर ही मुलं प्रशिक्षण दिल्यास उत्कृष्ट गोताखोर होऊ शकतात.
हेही वाचा… दिलीप कुमार ; भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – भाग
आज धुवांधार वॉटर फॉल मध्ये जे ५०-१०० रूपयासाठी स्वत: जीव धोक्यात घालत आहेत ते या प्रशिक्षणामुळे इतरांचा जीव वाचवू शकतात.सत्ता राबविणाऱ्यानां हे सर्व दिसत असतानांही डोळ्यावर पट्टी बांधायला आवडत असेल तर काय करणार?
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 30, 2021 17:50 PM
WebTitle – Dhuwandhar Waterfall: Their lives cost only Rs 50 2021-07-30