मिलिंद कांबळे चिंचवलकर यांना वृत्तपत्र व सोशल मिडीयाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे ओळखत होतो. तसे ते चळवळीतही सक्रिय होतेच. पण, सन २०१६ मध्ये रत्नाकर गायकवाड यांनी आंबेडकरी चळवळीचे केंद्र ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन’ उध्वस्त केले त्या कालावधीत आमच्या ओळखीचे रुपांतर दृढ मैत्रीत झाले. त्यानंतर भेटीगाठी होत गेल्या तेव्हा त्यांना जवळून अनुभवता आले. ते स्वभावाने अबोल, शांत असले तरी अन्याय अत्याचारा विरोधात त्यांची निर्भिड लेखणी आवाज आणि जन जागृती करीत असते. त्यांच्या लेखणीत, स्वभावात स्पष्टपणा व परखडपणा जाणवतो.
वृत्तपत्र लेखना व्यतिरिक्त स्मरणिका मनोगत, चारोळ्या, काव्यसंग्रहाचे परिक्षण, राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धांचा परिक्षक, गीत संग्रहाला प्रस्तावना आणि त्यांनी एक मुलाखतही घेतली आहे. सन २००५ मध्ये त्यांचा ‘व्यथा’ काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून, त्यांची ‘मसनवटा’ कादंबरीही लवकरच प्रकाशित होणार आहे. कोरोना काळात त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या निःस्वार्थी सामाजिक कार्याची व वृत्तपत्र लेखनाची दखल घेऊन बौध्दजन पंचायत समिती शाखा क्र. ८२८ व संघमित्रा महिला मंडळ जुईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल इंटीग्रिटी सोशल फाऊंडेशन रजि. च्या माध्यमातून समाज भूषण पुरस्कार देऊन मी त्यांचा यथोचित असा सन्मान केला होता. तसेच, इतर अनेक संघटनांनीही त्यांच्या कार्याची व लेखनाची दखल घेऊन पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे.
मिलिंद चिंचवलकर वृत्तपत्रातून लिखाण करीत असतांनाच त्यांनी सामाजिक संघटन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. सामाजिक संघटनांच्या माध्यमातून त्यांनी विविध उपक्रम आखले, अनेक विषयांवर पत्रव्यवहार केला. त्याचे आयोजन, नियोजन व रुपरेषाही त्यांचीच असायची. ज्ञाती बांधवांचे संघटन, बौध्दजन सेवा संघ (रजि.) खारेपाटण विभागाच्या पुनर्बांधणीसाठी पुढाकार, सहकाऱ्यांच्या मदतीने कोकणरत्नभूमी सामाजिक संघटन’ची निर्मिती अस बरेच काही करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या गावच्या स्मशानभूमी प्रकरणी त्यांना काही मंडळींनी नाहक बदनाम केल्यामुळे गेली काही वर्षे चळवळीपासून ते दूर राहिल्याने, त्यांच लिखाणही कमी झाले आहे.
माझ्याकडे अनेक ध्येय धोरणे, संकल्पना असल्यामुळे मी प्रामाणिकपणे सामाजिक संघटन करण्याचा प्रयत्न केला. पण, बोल बच्चन करता न आल्यामुळे काही लोकांनी मला नाहक त्रास दिला, नाहक बदनाम केल्यामुळे मी सर्वांनाच माझ्यापासून दूर ठेवले असे त्यांनी मला अनेक वेळा बोलून दाखविले. पण, चिंचवलकर यांच्यासारख्या चळवळीत सक्रिय असणाऱ्या होतकरु कार्यकर्त्याच अस खच्चीकरण होणार असेल, त्यांना संपविण्याचा प्रयत्न होणार असेल तर चळवळीसाठी ते नक्कीच पोषक नाही. मात्र, चळवळीपासून ते दूर राहिले असले तरी, सामाजिक जाणीवा त्यांना कधीच स्वस्थ बसू देणार नाहीत एवढ मात्र नक्की.
सामाजिक क्षेत्रात काम करतांना चिंचवलकर यांनी कधी पदाची अपेक्षा न करता निःस्वार्थीपणे, प्रामाणिकपणे ते काम करत राहिले.
तर, लोकांना सढळ हस्ते मदत करतांना त्यांच्यातील सेवाभावी, परोपकारी वृत्ती जाणवते.
सामाजिक बांधिलकी आणि समाज भावना जपत कोविड सेंटर, पुरग्रस्त, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, शाळा, बुध्द विहारे,
अडचणीतील तसेच कोरोना कालावधीत काही मंडळींना त्यांनी मदतीचा हात दिला. तर संजयकुमार सुर्यवंशी,
कॅप्टन विनायक इंगळे, डॉ. शैलेश पाटील, प्रविण मोहिते अशा काही दानशूर मान्यवरांकडूनही काही मंडळींना त्यांनी आर्थिक मदत मिळवून दिली.
वृत्तपत्रातून विविध विषयांवर लिखाण करतांना अन्याय अत्याचार, विषमता, जातीयतेच्या विरोधात त्यांच्या मनात असलेली चिड प्रकर्षाने दिसून येते.
ते अबोल आणि शांत दिसत असले तरी त्यांना प्रत्येक गोष्टीचे, सामाजिक प्रश्नांचे उत्तम भान, आकलन, अभ्यास असतो.
लिखाणाच्या माध्यमातून ते मोजक्या शब्दात स्पष्ट भूमिका मांडतात. सन १९९५ पासून आजतागायत त्यांनी शेकडो लेख लिहिले असून,
अनेक आघाडीच्या वृत्तपत्रांनी त्यांना प्रसिद्धी दिली आहे. माहे फेब्रुवारी २०१९ मध्ये श्रध्देय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पुण्यात गोलमेज परिषद आयोजीत केली होती. त्यासाठी सोशल मिडीयावर महाराष्ट्रातील एक्टिव असणाऱ्या काही मंडळींना निमंत्रीत करण्यात आले होते, त्यात मिलिंद चिंचवलकर यांचा समावेश होता.
मिलिंद चिंचवलकर यांच्यासारखा एक प्रामाणिक, सेवाभावी, निःस्वार्थी व्यक्तीमत्व, कवी, समाजसेवक, विचारवंत होत असलेल्या नाहक बदनामी व आरोपांमुळे जेव्हा चळवळीपासून दूर राहतात तेव्हा खूपच वाईट वाटते. पडद्याआड, प्रसिद्धीपासून दूर राहून त्यांनी चळवळीत स्वतः जेवढ शक्य होत तेवढं करण्याचा निःस्वार्थी, प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आणि त्याचमुळे, त्यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त गेल्यावर्षी त्यांचे काही लेख मी पुस्तक रुपाने प्रकाशित केले.
सन २०१६ मध्ये युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आद. आनंदराज आंबेडकर साहेबांच्या उपस्थित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन’ येथे चिंचवलकर यांचा आम्ही वाढदिवस साजरा केला होता, त्याच ठिकाणी त्यांचा लेख संग्रह ‘एक दृष्टीक्षेप’चा प्रकाशन सोहळा रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब, मुंबई महानगर पालिकेच्या उपायुक्त चंदा जाधव, माजी पोलिस अधिकारी ॲड. विश्वास काश्यप, सुप्रसिद्ध कवी संजय गायकवाड, उद्योजक संजयकुमार सुर्यवंशी, डॉ. शैलेश पाटील, समाजभूषण भगवान साळवी, जेष्ठ पत्रकार संजय बोपेगावकर अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला होता. त्यामुळे आपण कोणाच्याही वायफळ, शुल्लक वक्तव्यांकडे लक्ष न देता आपल्या लिखाणाकडे, कर्तृत्वाकडे, तब्बेतीकडे, कुटुंबाकडे लक्ष केंद्रित करावे.
कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसतांना तुम्ही विविध क्षेत्रात जो ठसा उमटवला आहे ते तुमच्या स्वकर्तृत्वाने निर्माण केलेले यश आहे.
प्रामाणिक, सौजन्यशील, अडचणीत धावून जाणाऱ्या, सहकार्य करणाऱ्या तसेच एखादी गोष्ट मर्यादा पलीकडे गेली की, तुम्ही स्पष्टपणा दाखविला आहे.
नेहमीच तुमच्या वाट्याला संघर्ष आला आहे. परकीयांपेक्षा तुम्हांला स्वकीयांशीच जास्त संघर्ष करावा लागला हे सर्वज्ञात आहे.
तुम्हांला भाषणबाजी करायला जमलं नाही म्हणून तुम्ही नेहमीच दुर्लक्षित, उपेक्षित राहिलात, बदनाम झालात.
त्यामुळे खचून न जाता, हतबल न होता, यापुढे माणसं जोडण्यापेक्षा आता तुम्हांला माणस ओळखणच जास्त महत्वाच आहे,
भले एकट राहण्याची वेळ आली तरीही चालेल. जिथे आपल्या भावनांचा, विचारांचा, मांडलेल्या मतांचा,
कर्तृत्वाचा विचार होत नाही तिथे थांबणे उचित नाही.
तुर्तास एवढ पुरेस आहे. वाढदिवसानिमित्त पुढील यशस्वी, उज्वल वाटचालीस आणि निरोगी दीर्घायुष्यासाठी तसेच तुमच्या लेखणीस मंगलमय सदिच्छा व्यक्त करतो.
सिद्धार्थ सोनू साळवी
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 18,2024 | 11:12 AM
WebTitle – Milind Chinchwalkar A marginalized worker in the movement