मान्यवर कांशीराम
कांशी तेरी नेक कमाई,तुने सोती कोम जगाई!
बहुजनांच्या म्हणजे मागासवर्गीय,ओबीसी,आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाचे राष्ट्रीय पातळीवर समर्थपणे नेतृत्व करेल अशी एक ही व्यक्ती आज राजकीय पातळीवर नाही.हा सर्व बहुजन समाज विविध पक्षात स्वार्थासाठी विभागला आहे, कोणती ही एक ठोस विचारधारा न मानणारा हा बहुजन समाज आज पुन्हा पुन्हा विखुरलल्या जात आहे. आणि त्यांच्यात प्रचंड असंतोष आहे.राज्यात व केंद्रात त्या त्या समाजांचे प्रतिनिधित्व आहे,पण ते स्वाभिमानी नाही,लाचार,गुलामगिरी पत्कारलेल वैचारिक दृष्ट्या अपंगत्व असलेलं आहे.मान्यवर कांशीरामजी यांनी ज्या विश्वासाने बहन मायावती यांच्या कडे बहुजन समाज पक्षाचे नेतृत्व दिले होते.ते कुठे तरी कमी पडले.आज उत्तर प्रदेशाच्या बाहेरच्या राज्यात कांशीराम जी सारखे पक्ष संघटन उभे करण्यास कमी पडते.त्याची सामिक्षा मान्यवर कांशीरामजी यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त झाली पाहिजे.म्हणून हा लेख प्रपंच.
आज भारतात बहुसंख्य बहुजन समाजातील सर्व जाती मध्ये राजकीय स्पर्धा निर्माण झाली.ते निर्माण करणारे मान्यवर कांशीराम जी यांनी मागासवर्गीय समाजात प्रबोधन केले म्हणून झाली.त्यासाठी ते भारताच्या काश्मीर ते कन्याकुमारी पर्यत गावागावात फिरले. असा माणूस ज्याने ४००० हजार किलोमीटर सायकल चालवुन फुले,शाहू, आंबेडकरांचे विचारांचे प्रबोधन करून आंदोलन उभे करून यशस्वी राजकारण केले.व देशातल्या विमान आणि हेलिकॉप्टर मध्ये फिरून राजकारण करणाऱ्या नेत्यांना निवडणुकाद्वारे आपली ओळख निर्माण करून दाखविली,बहुजन समाजात आत्मविश्वास निर्माण केला. त्यामुळेच एक जोश पूर्ण घोषणा तयार झाली होती.
“कांशी तेरी नेक कमाई तुने सोती कोम जगाई” मात्र आज या घोषणेचा अर्थ आणि सत्यपरिस्थिती पूर्ण बदलली आहे.
बहुजन समाजातील जाणकार, राजकारणी काय म्हणतात “कांशी तेरी नेक कमाई,किस किस किसने बेच के खाई” मान्यवर कांशीराम यांनी खूप मेहनत करून मागासवर्गीय समाजाला बहुजन समाज म्हणुन संघटित केले त्यासाठी त्यांनी क्रांतिकारी घोषणा दिल्या. त्यामुळे समाजात प्रचंड प्रबोधन झाले.त्या त्या घोषणा सत्ता मिळविण्याच्या स्पर्धेत अर्थपूर्ण बदलल्या त्या घोषणा मुळे बहुजन समाजात जनजागृती झाली.त्याच घोषणांचा आज प्रत्येक मतदारसंघात बहुजन समाज म्हणजे आपला बिकाऊ गुलाम मतदार आहे. असा समज वरिष्ठ पक्ष नेतृत्वाला झाला आहे.जिसकी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी म्हणायचे आणि ज्याचा पैसे भारी त्याला उमेदवारी देऊन मतदार संख्येच्या हिशेबाने रुपये रोख घ्याचे,हा धंदा झाल्यामुळे बहुजन समाज पक्षा पासुन विचारधारे पासुन दूर गेला आहे. जाती तोडो,समाज जोडो, सर्व जातीचा वैचारिक भाईचारा संपला, आता स्वार्थासाठी युती आघाडी होत आहे.
मान्यवर कांशीराम यांचा जन्म १५ मार्च १९३४ ला पंजाब राज्यातील मुक्काम पोस्ट खवासपूर जिल्हा रोपड येथे एका मागासवर्गीय रविदासीय म्हणजेच शीख चर्मकार समाजात झाला होता. त्यांच्या आईचे नांव बिशन कौर आणि वडिलांचे नांव हरिसिंग होते.रोपड येथील शासकीय महाविद्यालयात बी एस्सी पर्यत शिक्षण झाले होते.उच्च ऊर्जा पदार्थ संशोधन प्रयोग शाळा पुणे येथे नोकरीला लागले होते.१९६५ ला केंद्र सरकारने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल जन्म दिनाची सार्वजनिक सुट्टी रद्द करण्याचा आदेश काढला होता. त्या आदेशाच्या विरोधात भारत सरकारच्या सेवेत असणाऱ्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. त्या आंदोलनात कांशीरामजी उच्च पदस्थ अधिकारी असून सुद्धा सहभागी झाले. तोच त्यांच्या जीवनातील क्रांतिकारी बदल होता.
तिथूनच त्यांचा संघर्ष सुरू झाला.त्यांनी १९७८ साली त्यांनी ऑल इंडिया बॅकवर्ड अँड मायनॉरीटीज कम्युनिटीज एम्प्लेयईज फेडरेशन (बामसेफ)
All India Backward and Minority Communities Employees Federation (BAMCEF)
स्थापना केली होती.
६ डिसेंबर १९८१ साली त्यांनी दलित शोषित समाज संघर्ष समिती (डी एस-4) ची स्थापना केली.
तेव्हा त्यांचा एक लोकप्रिय नारा होता.
“ब्राम्हण,ठाकूर,बनिया चोर है बाकी सब डीएस फोर है.”
१४ एप्रिल १९८४ बहुजन समाज पक्षाची स्थापना झाली.हर समस्या कि चाबी सत्ता होती है,
म्हणनूच “जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी” व्होट हमारा राज तुमारा नही चलेगा,नही चलेगा.
न बिकने वाला समाज बनविण्यासाठी त्यांनी चार हजार किलोमीटर सायकलवरून यात्रा कडून प्रबोधन केले.
एक नोट एक व्होट,प्रयोग यशस्वी करून दाखविला.होऊ शकत नाही,म्हणणाऱ्यांना होऊ शकते हे करून दाखविले.
सर्व समस्या ची ८५ बनाम १५ टक्के ची चाबी कुठे हरवली आहे.
ती शोधण्याची इच्छाशक्ती आज राजकीय नेतृत्व करणाऱ्या मायावती यांच्यात राहिली नाही.
एकेकाळी देशात तीन नंबरचा राजकीय पक्ष म्हणून बसपा आणि राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व म्हणून बहन मायावती कडे पहिले जात होते.या नांवाचा एक प्रचंड दबदबा होता.तो पुन्हा निर्माण करण्यासाठी या सर्व घटनाची प्रामाणिकपणे आत्मचिंतन परीक्षण किंवा समीक्षा करण्याची तयारी नेत्यांनी ठेवली पाहिजे.तरच बहुजन समाज पहिल्या पेक्षा जास्त प्रमाणात पक्ष संघटनेकडे आकर्षित केला जाऊ शकते.होऊ शकते इच्छाशक्ती नेतृत्वात हवी.बहन मायावती ने एका राज्यावर लक्ष केंद्रित केल्या पेक्षा देशातील सर्व राज्यावर लक्ष द्यावे.देशातील राजकीय पटलावर मायावती च्या नेतृत्वातील बसपा ही मजबूत पर्याय होऊ आणि देऊ शकतो.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे करारावर प्रतिक्रिया देताना सांगितले होते कि संयुक्त मतदार संघ म्हणजे एक गलिच्छ उपनगर ज्या नगराचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार उच्चवर्णीय लोकांना आहे.आणि त्याचा समाजाचा सत्यानाश करण्यासाठी वापर करने म्हणजेच कांशीरामजीच्या शब्दात चमचा.(आजचे राष्ट्रपती) चमचा हा घराघरात वापरल्या जाणारे हत्यार आहे.जे स्वत: कोणतेही काम करू शकत नाही.पुणे करारा नंतर राजकारण्यांनी असेच चमचे मागासवर्गीय, असंघटित, कष्टकरी शोषित पीडित,आदिवाशी आणि अल्पसंख्याक समाजात निर्माण केले.चमचाचा वापर नेहमी आपल्या फायद्या साठीच होतो.त्यामुळे तो कोणाचे नुकसान स्वत: करीत नाही कोणाच्या सांगण्या वरून करतो.कांशीराम यांच्या बसपा ची बहुजन हिताय बहुजन सुखाय घोषणा जेव्हा मायावतीने सर्वजण हिताय केली तेव्हा सत्ता आल्यावर चमचा आणि हत्यार कसे वापरले जाते हे दिसून आले.
मायावती सत्ता चालविण्यास, समाजाच्या आणि राज्याच्या हिताचे निर्णय घेण्यास समर्थ होत्या.
केवळ अनेक विद्यालयाला महाविद्यालयाला महापुरुषाच्या नांवे देऊन वैचारिक समाज क्रांती होत नाही.
जिल्ह्याचे नांव सर्व महापुरुष संत महामाताच्या नांवे केले.त्यामुळे मागासवर्गीय समाजात विशेष चर्मकार समाजात काय बदल झाला?
हे कांशीरामजीचे तत्वज्ञान मायावतीने केवळ सत्ता मिळवण्यासाठी मातीमोल करून ठेवले.
हे आता सर्वच कॅडर बेस, बामसेफ चे उच्चशिक्षित अधिकारी खाजगीत म्हणतात.
त्यामुळे चमचा युग काय करू शकते २०१२ च्या निवडणुकीने बहुजन समाजाला दाखवून दिले.
मुझे पढे लिखे लोगोने धोका दिया असे.डॉ बाबासाहेब आंबेडकर खेदाने मत व्यक्त केले होते.पण त्याच पढे लिखे लोकांना संघटीत करून कांशीरामजी यांनी बामसेफ संघटना बनविली आणि त्याच्या कडून सक्तीने आर्थिक मदत मिळविली त्यातूनच त्यांनी डीएस फोर DS4 दलित शोषित समाज संघर्ष समिती द्वारे समाजात जनजागृती केली.त्याची सुरुवात हि सायकलवरून झाली. ते कार्यकर्त्यानां सांगत सायकल ही माझ्या साठी एकमात्र साधन आहे.ते केवळ साधनच नाही तर बहुजन मिशनचे सर्वात महत्वाचे साधन आहे.यावरच त्यांनी भारत भर सायकल यात्रा काढली.आज कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या घरी दोन तीन चारचाकी गाड्या आहेत तरी जिल्हाभर फिरण्याची तयारी नाही.कांशीराम जी यांनी आपल्या पन्नास वर्षात बहुजन समाजात जनजागृतीसाठी चाळीस दिवसात चार हजार किलोमीटर सायकलवरून यात्रा केली.देशातील नव्हे तर जगातील कोणत्याही समाज सुधारक,राजकिय नेत्याने असे धाडस केले नाही.
कांशीराम जी ने रात्र दिवस मेहनत करून वाढविलेली बसपा मायावतीने चमच्या लोकांच्या सल्ल्याने देश भरातील कॅडर बेस कार्यकर्ते संपवले.मायावतीचे सर्व निर्णय अचूक असतील तर प्रत्येक राज्यात पक्ष संघटन का वाढत नाही यांची समीक्षा बैठक प्रामाणिकपणे झाली पाहिजे.कांशीरामजीने मायावतीवर जो विश्वास दाखविला त्याला तडा गेला आहे.मिशनरी कार्यकर्त्यांना चमचा समजून पक्षातुन बेदखल करून बसपाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.काही चमच्यांना त्याच्या समाजाच्या विरोधात उभे केले जाते.तर मिशनरी कार्यकर्त्यांना त्यांच्या समाजाच्या हिता साठी उभे केले जाते.चमचा आपल्या समाजाच्या नेत्याला कमजोर बनवितो तर मिशनरी कार्यकर्ता आपल्या समाजातील सच्या नेत्याला मजबूत बनवितो.कांशीरामजीची संघटन कौशल्य आणि मायावतीचे संघटन कौशल्य यातील फरक आज प्रत्येक राज्यात दिसून येत आहे.गरीब प्रामाणिक,वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व करणाऱ्या कार्यकर्त्यांची आज पक्षाला गरज नाही.त्यामुळे तो बाहेर फेकल्या गेला आहे.काही कार्यकर्ते नोकरी धंदा करायला लागले.तर काही वैफल्यग्रस्त झाले आहेत.
महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर लक्ष्मीपुत्र विलास गरुड यांनी एका ही तालुक्यात, जिल्ह्यात नेतृत्व निर्माण होऊ दिले नाही.एकाही विधानसभा,लोकसभा मतदारसंघात उमेदवार हक्क सांगेल असा नेता निर्माण होऊ दिला नाही. मुलगा तरुण झाला,सुशिक्षित झाला म्हणून आईवडीलानां घराच्या बाहेर काढत नाही,वेळोवेळी त्यांचा मानसन्मान ठेऊन सल्ला घेतच असतो.पक्षात माजी अध्यक्ष झाला तर नवीन अध्यक्षांनी त्याला सोबत ठेऊ नये त्याला कोणत्याही कार्यात सहभागी होऊ देऊ नये, ही पद्धत आज खुद्द गरुड बाबत वापरली जात आहे. म्हणजे निसर्गाचा नियम आहे,जे पेरले तेच उगवते. जे विचारधारा मानणारे कॅडर बेस कार्यकर्ते असतात ते कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही. आणि गेले तर जास्त दिवस टिकू शकत नाही.
एक वेळ पक्ष बदलला तर त्यांना समाजात काम करता येत नाही. मग ते सामाजिक,धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्या कडे वळतात.तिथे ही त्यांना सारखा वैचारिक संघर्ष करावा लागतो.बहुजनांच्या म्हणजे मागासवर्गीय,ओबीसी,आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाच्या कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पक्ष व पक्षांचे कार्यकर्ते जनांदोलन करून न्याय मिळवून देण्यासाठी काम करत नसतील तर त्यांना निवडणूकीत मतदान मागण्याचा काय अधिकार आहे. महापुरुषांच्या नांवावर मत मागायचे तर त्यांनी ज्या असंघटित कष्टकरी मागासवर्गीय,ओबीसी, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाला सहा मूलभूत अधिकार मिळवून दिलेअन्न,वस्त्र,निवारा, शिक्षण, रोजगार आणि आरोग्य त्याबाबत पक्षाच्या वतीने कोणतेच काम होत नाही.
राज्य व केंद्रांच्या अनेक योजना या बहुजन समाजाला मिळत नाहीत.तथाकथित उच्चजातीय सरकारी अधिकारी आणि तथाकथित उच्चजातीय शासन मान्यता असलेले ठेकेदार या बहुजन समाजाचे मुक्त शोषण करतांना दिसतात.त्यातही राजकीय चमच्याची रोजीरोटी यांचे आर्थिक शोषण करूनच चालते.त्यावर महापुरुषांच्या विचारांचा वारसा सांगणारा पक्ष कोणत्या ही ठोस कृती कार्यक्रम राबवीत नाही.
बहुजनांनी म्हणजे मागासवर्गीय,ओबीसी,आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजानी बसपाचा मतदार का राहावा आणि बसपाला मतदान का करावे?
यांचे अभ्यासपूर्ण आत्मचिंतन झाले पाहिजे.मान्यवर कांशीराम यांनी जागी केलेली कोम
(बहुजन समाज) पुन्हा पुन्हा दिशाहीन होऊन का झोपतो.त्याची चिकित्सा झाली पाहिजे.
त्यासाठी कांशी तेरी नेक कमाई तुने सोती कोम जगाई या घोषणाचा
मान्यवर कांशीराम यांच्या जयंती दिनी बहुजन समाजाला विसरता येणार नाही.
मान्यवर कांशीराम यांच्या क्रांतिकारी विचारांना व प्रतिमेला त्रिवार वंदन आणि बहुजन समाजास जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा
लेखन – सागर रामभाऊ तायडे,
भांडूप मुंबई – ९९२०४०३८५९
Email:- srt1961@gmail.com
अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य.
(लेखक माजी बसपा पदाधिकारी आहेत)
हे ही वाचा.. जेव्हा स्टीफन हॉकिंग्स ना बनवलं ब्राह्मण
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on March 15, 2021 09:30 AM
WebTitle – Manyawar Kanshiram