भारतीय चित्रपट सृष्टीत १९४० चा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. या दशकात भारतीय चित्रपट सृष्टीत तीन महान कलाकारांनी एंट्री केली होती. संपूर्ण भारतालाच नाही तर जगाला अक्षरशः वेड लावले होते. त्या तिघांची वेगवेगळी स्टाईल होती. भारतीय जनता त्यांच्या अभिनयाची वेडी होती आणि आजही आहे. आपण त्या तिघांमधील एका महान व्यक्तिमत्वाचा परिचय करून घेणार आहोत. ते व्यक्तिमत्व म्हणजे राज कपूर.
प्रवास
१४ डिसेंबर १९२४ रोजी पेशावर इथे राज यांचा जन्म झाला.राज यांचे वडील पृथ्वीराज कपूर हे नाटक आणि सिनेमा कलावंत होते. अभिनयाचा वारसा घरातूनच लाभला होता.राज यांनी १९३५ मध्ये बाल कलाकार म्हणून चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. त्यांचा मुख्य अभिनेता म्हणून १९४७ साली प्रदर्शित झालेला निलकमल हा चित्रपट होता.राज हे विलक्षण सुंदर होते. निळ्या डोळ्यांचा हिरो म्हणून त्यांची ख्याती होती. कपूर खानदानातील अत्यंत कुशल अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक म्हणून राज यांचे नाव घेतले जाते.बोलके निळे डोळे, गोरा रंग, मुद्राअभिनयात पारंगत असणारे राज कपूर त्याकाळी प्रचंड प्रसिद्ध होते.
विशेष म्हणजे राज यांच्या फिल्मी कारकिर्दीतील सुरुवातीची काही वर्षे कोल्हापुरात गेली आहेत. ४० च्या दशकात पृथ्वीराज कपूर हे कोल्हापूर येथे वास्तव्यास होते. भालजी पेंढारकर यांच्यासोबत त्यांचा स्नेह होता.भालजी पेंढारकर राज यांच्या मातोश्रींना बहिण मानत.भालजी पेंढारकर यांच्या वाल्मिकी सिनेमात राज यांनी बाल कलाकार म्हणून काम केले.त्यावेळी भालजी पेंढारकर यांनी राज यांना मानधन म्हणून चार हजार दिले होते पण पृथ्वीराज कपूर यांनी ते नाकारले होते तेव्हा भालजी पेंढारकर यांनी सांगितले की ते पैसे मी माझ्या भाच्याला दिले आहेत आणि ते परत घेणार नाही.नंतर त्याच पैशातून पृथ्वीराज कपूर यांनी चेंबूर येथे तीन एकर जागा घेतली.नंतर याच जागेवर राज यांनी त्यांचा आर.के स्टुडिओ निर्माण केला. भारतात कदाचित कुठेही राज कपूर यांचा पुतळा नसेल पण कोल्हापूर येथे रंकाळा तलावाच्या पूर्वेला राज यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा त्यांच्या एका चाहत्याने उभारला आहे.
अनेक चित्रपट गोल्डन ज्युबिली हिट
राज कपूर यांनी त्यांच्या अभिनयाने, निर्माता म्हणून, दिग्दर्शक म्हणून भारतीय चित्रपट सृष्टीला समृध्द बनवले आहे.
राज यांनी अनेक अजरामर भूमिका केल्या आहेत.त्यांचे अनेक चित्रपट गोल्डन ज्युबिली हिट झाले आहेत.
प्रामुख्याने निलकमल, आग, अमरप्रेम, बरसात, अंदाज, मदारी,आवारा,आह,बुट पॉलिश,
श्री ४२०, अनाडी, जिस देश में गंगा बहती है, संगम हे चित्रपट खूप गाजले.मेरा नाम जोकर हा सिनेमा मल्टीस्टारकास्टवाला होता.
वैयक्तिक जीवनात खूप साधेपणाने राहत
या सिनेमात राज यांनी जोकरची भूमिका केली होती. या सिनेमात परदेशी कलाकार पण होते. सुंदर कथानकही होते पण हा चित्रपट काही कमाल करु शकला नाही. अपयशाने खचून न जाता त्यांनी दिग्दर्शनाची नवी इनिंग सुरू केली.आधीपासून ते दिग्दर्शक म्हणून काम करत होतेच पण १९७३ साली त्यांनी आपल्या मुलाला म्हणजेच ऋषी कपूरला लाँच करण्यासाठी बॉबी हा सिनेमा बनवला. या सिनेमाने अक्षरशः धुमाकूळ घातला. या चित्रपटात ऋषी कपूर, डिंपल कपाडिया यांना त्यांनी संधी दिली. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे संगीत खूप गाजले. सुमधुर संगीत, गाणी, सेट्स, चित्रपट कथा सर्वच बाबतीत बॉबी या चित्रपटाने टिकाकारांची तोंडे बंद केली.
राज यांच्या सिनेमांची खासियत म्हणजे त्यांच्या सिनेमात दर्जेदार गाणी असत.
सुंदर लोकेशन्स असत.राज हे वैयक्तिक जीवनात खूप साधेपणाने राहत पण त्यांच्या सिनेमात मात्र लोकेशन्स, पेहराव, श्रीमंती दिसे.त्यांचे दिग्दर्शक म्हणून खूप छान चित्रपट आहेत. ज्यात बॉबी, सत्यम शिवम सुंदरम,प्रेमरोग, हिना (काही भागाचे शूटिंग झाल्यानंतर राज यांचे निधन झाले, नंतर तो सिनेमा त्यांचा मुलगा रणधीर कपूर यांनी पुर्ण केला) हे आहेत.
राज कपूर याना तीनदा राष्ट्रीय पुरस्कार, ११ वेळा फिल्मफेअर पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार मिळाले आहेत.राज यांना ‘शोमॅन’ देखील संबोधले जायचे. २ जून १९८८ रोजी त्यांचे निधन झाले. भारतीय चित्रपट सृष्टीत राज कपूर सारखे कलाकार विरळ आहेत.
1 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने –
2 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने –
भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 3
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 29, 2021 19:05 PM
WebTitle – Obstacles to soybean self-sufficiency in pulses