आज माणिपूरमध्ये दोन समाजामध्ये दंगली होत नसून लढाई होतेय. होय त्याला सिव्हिलवार चे स्वरूप प्राप्त झाले आहे. परिस्थिती इतकी टोकाची का झाली ? त्यासाठी याचे कारणे आणि तेथील सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल.मणिपूर या राज्याची रचना एखाद्या फुटबॉल, क्रिकेट मैदाना सारखी आहे. मध्यभागी सखल भाग आहे,तर चहुबाजूने डोंगर दऱ्या आहेत. सखल भागात बहसंख्य मैतीय समाजाची वस्ती आहे तर डोंगरदऱ्यात कुकी आणि नागा यासारख्या ट्रायबल समाजाची वस्ती आहे.
डोंगराळ भागात जमिनी विकत घेण्याच्या मुद्यावरून सुरू झाला वाद
मैतीय समाज मुळातील वैष्णव समाज आहे पण पुढे त्याचे रूपांतर हिंदू समाजात झाले. यांचे लोकसंखेचे प्रमाण सर्वसाधारण साठ टक्के आहे तर कुकी समाजाचे प्रमाण सर्वसाधारण पणे विस टक्के आहे. आणि विस टक्के नागा व इतर समाज आहे हे सर्वसाधारण मणिपूर च्या समाजरचनेचे स्वरूप आहे. कुकी ह्या मागास ट्रायबल समाजाने प्रामुख्याने ख्रिश्चन धर्म स्विकारला आहे.
एबीपी माझा च्या प्रतिनिधींनी मणिपूर मध्ये जाऊन जो ग्राऊंड रिपोर्ट तयार केला आहे व ज्या मुलाखती घेतल्या आहेत त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की मैतीय समाज उच्चशिक्षित, वेलसेटल्ड समाज आहे. भारतातील एक चांगल्या सुस्थितीत असलेला प्रगत समाज आहे. ह्या समाजाचे दुखने हे आहे की मनिपूर मध्ये डोंगराळ प्रदेश अधिक आहे व तेथे कुकी व नागा ह्या ट्रायबल समाजाची वस्ती आहे . येथील भूप्रदेश त्यांचा असल्यामुळे कायद्दा प्रमाणे आम्हाला तेथील जमीनी विकत घेता येत नाहीत त्या जमिनी आम्हाला विकत घेता याव्यात म्हणून आम्हाला ट्रायबलचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी मैतीय समाजाने सरकारकडे केली. तेथील मुख्यमंत्र्यांनी यावर विचार करता येईल अशी भूमिका घेतली आणि तेथूनच वादाची ठिणगी पडली.
एका फेक फोटो मुळे पेटलं मणिपूर
मैतीय समाजाला ट्रायबलचा दर्जा देण्याविरोधात कुकी समाजाने ३ मे रोजी आंदोलन केले.कुकी समाजाचे यामागे असे म्हणने आहे की जर प्रस्थापित मैतेई समाजाला ट्रायबल दर्जा दिला तर त्यांचे डोंगराळ भागातील अस्तित्व धोक्यात येते.तसेच सरकारी नोकऱ्यांमधील जागा कमी होतात.३ मे रोजी आंदोलन केले त्याला हिंसक स्वरूप प्राप्त झाले.या हिंसाचारात अनेक मैतीय समाजाचा घरांना आगी लावण्यात आल्या असा आरोप मैतीय समाज करतो आहे. दंगलींना सुरवात कुकी समाजाने केली असे अरोप मैतीय समाज करीत आहे. ह्या ३ मे च्या आंदोलनाचा फायदा समाजविघातक शक्तींनी घेतला आणि एका युवतीचा २०१७ मधील फोटो सोशियल मिडियावर व्हायरल केला. त्यात लिहिले की कुकी समाजाच्या लोकांनी मैतीय तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या केली.
वास्तविक पाहता हा फोटो जुना फोटो होता त्या फोटोचा आणि आंदोलनाचा काहीही संबंध नव्हता. असा अत्याचार तिथे घडला नव्हता. हा मेसेज खरा की खोटा याची कोणतीही शहानिशा केली गेली नाही आणि मैतीय समाज हा मेसेज पाहून पेटून उठला. हा मेसेज इतका व्हायरल झाला की चार तारखेला हजारो लाखो मैतीय समाज रस्त्यावर उतरला. तो पर्यंत मणिपूरची इंटरनेट सेवा बंद केली गेली होती. आणि जे व्हायला नको अशा घटना घडू लागल्या.
मध्यंतरी सोशल मिडियात ज्या तरूणींच्या व्हायरल व्हिडीओने जगभर खळबळ उडवली तो व्हिडीओ ४ मे चा आहे. पुढे जो हिंसाचार आणि जाळपोळ झाली ते सर्व वर्णना पलिकडे चे आहे. घरादाराची राखरांगोळी करणे, गावे बेचिराख करणे हा शब्दच तिथे लागू पडतो. अक्षरशः गावे,घरे बेचिराख केली गेली आहेत.अनेक स्रियांवर अत्याचार झाल्याचे स्वतः मुख्यमंत्री म्हणत आहेत तर आतापर्यंत १५० च्या आसपास हत्या झाल्या आहेत. दोन्ही समाजाचे प्रचंड नुकसान झाले आहे. दोन्ही समाज हातात अत्याधुनिक शस्रे घेऊन लढत आहेत.
मणिपूर ची परिस्थिती भयानक आणि विदारक
सैनिक आणि सुरक्षा दलाचे हजारो सैनिक संपूर्ण मणिपूर मध्ये तैनात करण्यात आले आहेत.
प्रत्येक गावाच्या वेशीवर गावकऱ्यांनी खंदक खणले आहेत. तरुण आणि स्रीया हातात शस्त्रे घेऊन गावाचे रक्षण करीत आहेत.
त्यांच्याकडे रायफल व इतर अत्त्याधुनिक शस्रे आहेत. त्यांच्या सोबतच लष्करी व निमलष्करी दले ही पाहरा देत आहेत.
स्थानिक लोकांचा विश्वास पोलिस व लष्करी दलावरही राहिला नाही.
असाम रायफलदल जेव्हा तैनात करण्यात आले तेव्हा त्या दला विरोधात मैतीय समाजाने आवाज उठवला. त्यांच्या म्हणण्यानुसार असाम रायफलदल कुकींना सपोर्ट करतात तर कुकी समुहाचा मणिपूर पोलिसांवर विश्वास नाही. कुकींचा पूर्ण प्रशासनावरून विश्वास उडाला आहे त्यामुळे ते वेगळ्या प्रशासनाची मागणी करीत आहेत. मणिपूर मध्ये बीजेपी चे सरकार आहे आणि बीजेपी मधून जे आमदार निवडून आले आहेत ते मैतीय आणि कुकी ह्या दोन्ही समाजाचे आहेत. कुकी समाजाचे मंत्री ही आहेत. पण सद्या प्रशासनात ही विभागणी झाली आहे. कुकी समाजाच्या विभागात सर्व प्रशासन कर्मचारी व अधिकारी केवळ कुकी समाजाचे आहेत तर मैतीय विभागात मैतीय समाजाचे आहेत.
मणिपूर ची परिस्थिती इतकी भयानक आणि विदारक झाली आहे की कुणाचा कुणावर विश्वास राहिला नाही.
शत्रूत्व तर अगदी टोकाचे निर्माण झाले आहे. एखादं कुटुंब, गाव पूर्णतः बेचिराख झालं असेल
आणि त्यांना उभं राहण्यासाठी शून्यातून सुरुवात करावी लागणार असेल,
घरातील माणूस त्यांना गमवावा लागला असेल तर ते बेचिराख करणाऱ्याला शेवटच्या श्वासापर्यंत विसरू शकतील काय ?
सर्वच अत्यंत कठीण आहे.
दोन्ही बाजूचे समुह अत्याधुनिक हत्याराने सुसज्ज
दोन्ही बाजूचे समुह अत्याधुनिक हत्याराने सुसज्ज आहेत. कुठून आणले ही हत्त्यारे ? यातील किती हत्त्यारे लायसन्स ची आहेत ? हा प्रश्न आहेच. कुकी समुहाकडे कुठून आले हत्त्यारे ? याचे उत्तर शोधावे लागेल. कुकी समाज हा मुळचा भारतीय नाही. त्याचे ओरीजीन मॅनमार मध्ये आहे. इंग्रजांनी त्यांना मॅनमार मधून आणून ह्या डोंगराळ भागात वसविले आहे. ह्या आदिवासी जमातीला ख्रिश्चन बनविले. ह्यांना मिळणारी हत्त्यारे सीमेबाहेरून म्हणजे मॅनमार मधून मिळतात असे येथील स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. शस्त्र/हत्यारे जवळ बाळगणे हा अपराध आहेच पण त्यांच्याकडे हत्यारे असल्यामुळे काही प्रमाणात ते स्वसंरक्षण करीत आहेत हे ही खरे आहे. तिच गोष्ट मैतीय समाजालाही लागू पडते. मैतीय समाजाने तर सशस्रदलाची/पोलिसांची हत्यारे पळविले असे सांगितले जाते.तर काही जण आरोप करतात की ते पोलिसांनीच त्यांना दिली आहेत.
स्त्रिया सुद्धा हाती शस्त्र घेऊन उतरल्या
एक वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही समाजातील स्रीया लढवय्या आहेत.आपल्या गावात येणारे जाणारे वाहणे त्या स्वतः तपासतात.
चोवीस तास पाहरा चौकाचौकात, गावाच्या वेशीवर दिला जातो त्यावेळी तरूणांच्या ख्यांद्याला खांदा लावून त्या मैदनात उतरल्या आहेत.
पाहारा देणार्यांमध्ये अल्प शिक्षितांपासून उच्चशिक्षित डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक यासारखे ही मंडळी हातात बंदुका घेऊन सहभागी झाली आहे. हा त्यांचा जगण्या मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन्ही समाजासाठी मदत कॅम्प उभारण्यात आले आहेत. लहान मुले, गरोदर स्त्रिया आणि विस्थापितांची त्यात व्यवस्था करण्यात आली आहे. हवे तसे जेवण, स्वछतागृहे याची वानवा आहे.
काही दिवसांपूर्वी हजारो मैतीय समाजाच्या महिलांचा शांती मोर्चा निघाला होता.
कुकी समाजाला वेगळे प्रशासन देवू नये ही एक मागणी इतर मागण्यांसोबत त्यांची होती.
तर कुकी समाजाच्या महिला जगभर आंदोलन करीत वेगळ्या प्रशासनाची मागणी करीत आहेत.
अशा मागण्या जर वेगवेगळ्या समाजातून येऊ लागल्या तर देशाच्या अखंडतेबद्दल प्रश्न निर्माण होतील.
देशाच्या अखंडतेसाठी हे विघातक असेल.
दोन्ही समाज केंद्र सरकारवर नाराज
वेगवेगळी माध्यमे या दोन ही समाजातील प्रतिनिधींच्या मुलाखाती घेत आहेत.
त्यातून दोन्ही समाजाचा रोष केंद्र आणि राज्य सरकारांवर असलेला दिसतो आहे.
केंद्राने वेळीच हस्तक्षेप केला असता तर प्रकरण इतके चिघळले नसते
व त्याला सिव्हिलवार चे स्वरूप प्राप्त झाले नसते असे दोन्ही बाजूचे मत दिसते आहे.
आता महत्वाचे प्रश्न म्हणजे व्हायरल व्हिडीओ बाहेर आला तेव्हा सरकार कडून कार्यवाही ला सुरवात झाली.
अशा घटना राज्यात घडताहेत हे राज्य सरकार व केंद्र सरकार ला माहीत नव्हते काय ?
राज्यसरकार कडून केंद्राला अपडेट मिळत नव्हते काय ?
आणि हे सर्व माहिती असेल तर कार्यवाही नकरता दंगल भडकू दिली काय ?
कुणाचे हितसंबंध त्याआड दडले आहे काय ? ह्या प्रश्नांची उत्तरे येत्या काळात मिळतील याची अशा करूया.
की खरी माहिती जनतेपासून लपविली जाईल याचे उत्तर काळच देईल.
मैतीय समाजातील लोकांनी मिझोरम मधून पळ काढला
मणिपूर चे पडसाद इतर नॉर्थइस्ट राज्यात पसरण्याचा धोका आहेच.
मिझोरम मधील एका अतंकवादी संघटनेने मैतीय लोकांनी मोझोरम मधून निघून जा असा आदेश सोडला
आणि लागोलाग मैतीय समाजातील लोकांनी मिझोरम मधून पळ काढला.त्यांनी मिझोरम सोडले.
एकंदरीत हा संघर्ष एका राज्यातील दोन समाजातील न राहता ट्रायबल विरोधी प्रस्थापित समाज असा झाला आहे
किमान नॉर्थइस्ट मधील राज्यात तरी. त्याचे पडसाद पूर्ण देशात उमटू नयेत अशी अपेक्षा बाळगूया.
मोस्ट वॉंटेड मोनू मानेसार व्हिडिओ बनवून पोलिसांना आव्हान देतोय
मणिपूर धुमसत असतांनाच आणखी दोन हादरवणाऱ्या घटना घडल्या आहेत. हरियाणातील नूह आणि गुरूग्राम जिल्ह्यात मुस्लिम आणि हिंदू समुहात धुमचक्री झाली आहे. ह्या दंगलीत आतापर्यंत सहा माणसे मृत्युमुखी पडले आहेत.याला कारणीभूत ही सोशियल मीडियावरील मोनू मानेसार चा एक व्हिडिओ ठरला आहे. मोनू मानेसार हा बंजरंग दलचा पदाधिकारी आहे.अनेक भडकावू व्हिडीओ बनवून तो प्रसारित करीत असतो व समाजात वैमनस्य पसरवित असतो असे त्यावर आरोप आहेत. स्वतःला तो गोरक्षक संबोधितो. मुस्लिम समाजातील जुनेद आणि नासिर यांच्या हत्या त्याने केल्या आहेत तशा त्याच्यावर केसेस आहेत. तो वांटेड आहे पण अद्याप त्याला अटक केली गेली नाही.
मात्र व्हिडिओ बनवून तो पोलिसांना देखील आव्हान देत आहे.विश्वहिंदू परिषद आयोजित जलाभिषेक यात्रेला / मिरवणूकिला मी येत आहे असा मोनू मानेसर याचा एक व्हिडीओ प्रसिद्ध झाला, बघता बघता तो व्हायरल झाला. मुस्लिम समाजाला एक प्रकारे अव्हान दिले गेले हे समजून मुस्लिम युवकही प्रतिकारासाठी सज्ज झाले आणि त्याची परिणती दोन समाजाच्या दंगलीत झाली. नूह हा मुस्लिम बहुल एरीया आहे. या विभागातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीतील युवकांकडे तलवारी व इतर हत्त्यारे होती. ही हत्यारे त्यांच्याकडे कशी आली असा प्रश्न केंद्रीय मंत्री मा. राव इंद्रजित सिंह यांनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत देतांना उपस्थित केला. ते स्वतः हरियाणातील गुडगाव येथील खासदार आहेत.
ह्या दंगलिचे लोण इतर जिल्ह्यात पसरूनये म्हणून आजूबाजूच्या जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आला आहे. त्यासोबतच हरियाणाची बॉर्डर असलेले राज्य राजस्थान व उत्तर प्रदेशातील जिल्ह्यात ही १४४ कलम लागू करण्यात आले आहे. विश्वहिंदू परिषद व बजरंग दल यांनी दिल्ली व इतरत्र विविध मोर्चे आयोजित केले आहे . एकंदरीत वातावरण तापते आहे.
देश सिव्हिल वॉर च्या उंबरठ्यावर
तर दुसरी घटना जयपूर मुंबई एक्सप्रेस मध्ये घडली आहे. चेतन सिंह नामक आर पी एफ जवानाने प्रथम आपला वरीष्ठ अधिकारी मिना यावर गोळ्या झाडून त्याची हत्त्या केली. मिना हा आदिवासी समाजातील अधिकारी होता आणि नंतर त्याने वेगवेगळ्या बोगीत जाऊन तीन मुस्लिमांची हत्त्या केली. आणि त्या नंतर भारतात राहायचे असेल तर मोदी, योगी यांना फॉलो करा किंवा मतदान करा अशा अशयाचे वक्तव्य केले असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
असाच एक ट्रेन चा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.एक मुस्लिम वयस्कर गृहस्थ वरील बर्थवर नमाज पढत आहे तर खलील बर्थ वरील हिंदू तरुण टाळ्या वाजवत मोठ्याने हनुमान चाळीसा म्हणत आहेत. अलीकडे संभाजी भिडे यांची आलेली वक्तव्य ह्या सर्वांचा विचार करता ह्या सर्व घटना एकामागोमाग एक घडता आहेत हा योगायोग आहे काय ? की त्याच्यामागे निश्चित अशी काही व्युहरचना आहे ? अशी शंका घ्यायला जागा निर्माण झाली आहे.
हा सर्व योगायोग जरी समजला तरी एक मात्र निश्चित धर्मा धर्मात , जाती जातीत विष पेरले गेले आहे. एक दुसऱ्या विषयी प्रचंड द्वेष निर्माण झाला आहे. मनामध्ये द्वेष खदखदतो आहे.जर त्याचा देशपातळीवर स्फोट झाला तर अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. यापासून वेळीच सर्वांनी सावध होण्याची आवश्यकता आहे. मनामनात वाढणारा द्वेष कसा कमी करता येईल यासाठी सुजाण व शांतताप्रिय नागरिकांनी व राजकारण्यांनी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा देश कधी सिव्हिलवारच्या उंबरठ्यावर येऊन उभा राहील ते कळणार देखील नाही.
अशोक हंडोरे
नाट्यकर्मी,सामाजिक चळवळ विश्लेषक
मणिपूर महिलांवरील लैंगिक अत्याचार हे बंगालमध्येही घडले असे सांगून समर्थन करता येणार नाही: न्यायालय
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 03,2023 | 18:46 PM
WebTitle – Incidents like Manipur to Noah are creating a threat of civil war in India