चाळीस वर्षांपूर्वी घडलेली घटना नांदेड शहरातल्या गोविंद नगरात राहणाऱ्या धोंड्याबाईला आजही ठळक आठवते… नजर पैलतीरी लागलेल्या 80 वर्षाच्या धोंड्याबाई पोचिराम कांबळे सगळं काही अगदी काल घडलंय इतक्या सहज सांगू लागतात…
“त्यावेळी नामांतराचं आंदोलन सुरू झालं होतं साहेब, 4 ऑगस्ट 1978 चा दिवस होता, अजून नीट उजडलं सुद्धा नव्हतं, गावातल्या लोकांच्या आरोळ्या ऐकू येऊ लागल्या, रात्रभर त्यांची दादाराव पाटलाच्या वाड्यावर मिटिंग झाली होती. हळूहळू गावातले लोक आमच्या वस्तीवर चालून येऊ लागले, आमच्या वस्तीतले लोक घाबरले माझा नवरा गावच्या नजरवर आला होता. गावाचा रंग बघून मीच त्याला ‘आमचं होईल कस बी’ म्हणून रात्रीच घराबाहेर काढून दिलं होतं, येडापिसा झालेला जमाव वस्तीवर चालून आमच्या घरावर चढला, सबली घुसे घालून आमचं घर पाडलं त्याईनी राकेल संगच आणलं होतं घरात वतलं नी घर पेटवून दिलं असं करत करत त्याईनी सगळ्या बौद्ध वस्तीतले घरं पेटीवली… आम्ही लेकरं बाळ घेऊन रानात पळून गेलो तवा आम्हाला अंगावर जी कापडं होती तीच काय शिल्लक राहिली, मूठभर धान्य सुद्धा घरात शिल्लक ठिवलं नव्हतं, सगळं जळून गेलं,”
पोचिरामाने त्याचं घर सोडलं
सुरकूतलेल्या चेहऱ्यान आणि म्हतारपणामुळे जड झालेल्या आवाजात धोंड्याबाई हे सगळं सांगत होत्या…
धोंड्याबाई सध्या त्यांच्या लहान मुलाकडं राहतात, त्यांच्या मुलाला अण्णाभाऊ साठे महामंडळात शिपायाची नोकरी मिळाली आहे.
आणि नांदेडच्या गोविंद नगरात एक कच्च घर..! स्वतःच्या आयुष्यात नवरा
आणि मुलाची जातीयवादातून क्रूर हत्या झालेलं पाहणारी ही बाई आता शेवटच्या घटका मोजत आहे.
नवऱ्याला लोक मारतील म्हणून धोंड्याबाईने पोचिराम कांबळेला घरातून काढून दिलं खरं
पण मरणातून त्याची काही सुटका होऊ शकली नाही.
पोचिराम रात्री घरातून बाहेर पडला आणि एका मुस्लिम मित्राच्या घरी जाऊन थांबला,
पण सकाळी जेंव्हा जमाव बेभान झाल्याचं पाहिलं तेंव्हा मुस्लिम मित्रानं पोचिरामच्या हातात एक जांबिया दिला
आणि त्याला आपलं घर सोडायला सांगितलं.
पोचिरामाने त्याचं घर सोडलं आणि गावाशेजारी असलेल्या मुस्लिमाच्या कडब्याच्या गंजीत दबा धरून बसला
पण तिथेही त्याला कुणीतरी पाहिलं आणि बोंब ठोकली, पोचिराम तिथून पळाला चौकी, धानोरा, असं करत
गावापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या राउतखेडा परिसरात आला इतका वेळ तो नुसता धावत होता.
महिलांची अपमान होईल म्हणून पोचिराम आपली जागा बदलू लागला
ऑगस्ट महिना असल्यामुळे सगळीकडे चिखल झालेला आणि पाणी साचलेलं,
इतका वेळ दीडशे ते दोनशे लोकांचा जमाव पोचिराम कांबळेचा भीषण पाठलाग करत होता.
शेवटी दम लागल्यामुळे राउतखेडा गावाच्या परिसरात एक पाण्याने भरलेल्या आणि बेसरमाणे वेढलेल्या उकांड्यात पोचिरामाने आश्रय घेतला…
इकडे आसपास लोक शोधत होते पण पोचिराम सापडत नव्हता…
पण तेवढ्यात त्या उकांड्याच्या परिसरात काही महिला प्रातविधीसाठी आल्या.
आपल्या इथं असण्यामुळे त्या महिलांची अपमान होईल म्हणून पोचिराम हळूहळू हळूहळू आपली जागा बदलू लागला
पण जागा बदलत असताना पाण्याबर बुडबुडे आले त्याचा आवाज झाला.
जमावाने पोचिरामला ताब्यात घेतलं
आणि महिलांनी निरखून पाहिलं तर कुणीतरी माणूस निघून जात असल्याचं त्यांना दिसलं त्या महिलांनी आरडा ओरडा केला
आणि राउतखेड्याच्या शिवारात जमलेला शेकडो जमाव उकिरड्याच्या दिशेने धावला…
पोचिराम कांबळे हा आयता जमावाच्या तावडीत सापडला…
सुरुवातीला हातात जांबिया असल्यामुळे त्याला पकडण्याचं धाडस कुणी करेना,जमावाने पोचिरामला जांबिया टाकायला सांगितला,
पोचिरामाने जांबिया टाकला आणि नंतर जमावाने पोचिरामला ताब्यात घेतलं.
त्याच्याच डोक्याचं पटकर काढलं आणि त्याचे हात बांधले.
आणि त्याला चालवत सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या चौकीच्या शिवारात भागवत वाघमारे यांच्या शेतात आणलं,
भीषण छळ होत असताना सुद्धा जयभीम म्हणायचं सोडत नव्हता
या सहा किलोमीटर अंतरावर त्याला भीषण मारहाण आणि अमानवीय छळ सुरू होता. वैतागलेला पोचिराम माझं मुंडकं छाटा पण माझा छळ करू नका असं सांगत होता. पण बेभान झालेला जमाव याचकाचं ऐकतो कुठे…लोक पोचिरामला सारखं जय भीम म्हणायचं नाही आणि आमच्या पाया पड असं सांगत होते पण पोचिराम मात्र भीषण छळ होत असताना सुद्धा जयभीम म्हणायचं सोडत नव्हता आणि मी कुणाच्याच पाया पडणार नाही असं सांगत होता.
चौकीच्या शिवारात आल्यानंतर पुन्हा पोचिराम कांबळे याला गावकऱ्यांच्या पाया पडण्याची आणि जय म्हणायचं नाही आम्ही तुला सोडुन देऊ अशी सवलत देण्यात आली… पण पुन्हा पोचिराम याने कुणाच्याही पाया पडायचं नाकारून जय भीमचा नारा दिला. संतापलेल्या गावकऱ्यांनी शेजारीच लाकडांवर पोचिराम कांबळे याला झोपवलं त्याच्या उरावर काही जाडजूड लाकडं ठेवली आणि राकेल ओतून जीवंत देह पेटवून दिला…
मृत्यू समोर असताना सुद्धा हा माणूस झुकत नाही की साधं जय भीम म्हणायचं सोडत नाही यामागची प्रेरणा काय असावी?
या घटनेवेळी पोचिराम कांबळे यांचे हातपाय तोडले होते किंवा त्यांना विष्ठा पाजवली होती या प्रकाराला दोन्ही बाजूकडून कुणीही दुजोरा दिला नाही. घटना साडेआठ वाजता घडली आणि 9 वाजता पोचिराम कांबळे च्या बायकोला हा सगळा प्रकार कळला आणि जिवाच्या आकांताने आक्रोश करत धोंड्याबाईने गावशिवारातून पळ काढला. पुढे पोलीस आले चौकशी सुरू झाली तेंव्हा धोंड्याबाई गावात गेल्या पण त्यांना पोचिरामाचं साधं हडुक सुद्धा भेटलं नाही…
मृत्यू समोर असताना सुद्धा हा माणूस झुकत नाही की साधं जय भीम म्हणायचं सोडत नाही यामागची प्रेरणा काय असावी
आणि त्याला मारणाऱ्या तथाकथित उच्चजातीय समाजची आजची मानसिकता काय आहे हे समजून घेण्यासाठी मी पोचिराम कांबळे यांच्या गावात गेलो.
पोचिराम कांबळेचं बेवारस असलेलं घर उदास दिसतंय
टेम्भुर्णी… नांदेड पासून 50 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव, गावात पोचिराम कांबळेचं बेवारस असलेलं घर उदास दिसतंय,
घरावर धूळ चढलीय आणि पोपडे उडालेत अंगणात सगळीकडे कचरा पसरलाय,
तिथेच पोचिराम कांबळे यांच्या स्मारकाचे काम सुरू आहे.ते पूर्ण कसं होत नाही असा अनेकांना पडलेला प्रश्न, मलाही पडला.
जीव जाईपर्यंत लढलात तुम्ही काय कारण होतं.?
गावात पोचिराम कांबळेचा भाचा मला भेटला गणपत लक्ष्मण दुबिले…त्यांनीही आता वयाची सत्तरी ओलांडलीय,
पोचिराम कांबळेच्या खांद्याला खांदा लावून गणपत दुबिले यांनी काम केलं होतं,
पोचिराम कंबळे यांच्या स्मारकाच्या ओट्यावर बसून मी त्यांना जेंव्हा विचारलं की,जीव जाईपर्यंत लढलात तुम्ही काय कारण होतं.?
माझ्या बाबासाहेबांनी माझ्या हातात इद्रोहाची काठी दिलीय
हा प्रश्न विचारताच गणपत दुबिले यांच्या आसवांचा बांध सुटला आणि डोळ्यातून पाणी काढत पण करारी आवाजात गणपत दुबिले म्हणाले माझ्या बाबासाहेबांनी माझ्या हातात इद्रोहाची काठी दिलीय आन मी ती गरागरा फिरवितो…गणपत दुबिले आणि पोचिराम कांबळे हे दोघेही अशिक्षित विचारांचं त्यांना फार काही कळत नाही पण कुणाचा अन्याय खपवून घ्यायचा नाही, हा बाबासाहेबांचा विद्रोही विचार मात्र त्यांना समजला होता आणि त्यासाठीच ते झगडले होते.
गणपत दुबिले यांच्या हाताला आता कंप सुटतोय, वय थकलय पण आवाजातला निडरपणा अजूनही जशास तसा आहे. पूर्वी आम्ही बैलगाडीत जयंती काढायचो लोक आमच्यावर दगडं घालायचे पण आम्ही घाबरलो नाही. आता आमची पोरं डीजे लावून जयंती काढतात अडवायची कुणाची टाप नाही साहेब..! महारवाड्यातून उठता उठता गणपत दुबिले यांनी सांगितलेलं हे वाक्य मनात घर करून गेलं..!
पोचिराम कांबळे यांना मारलं म्हणून त्यांचा मुलगा चंदर कांबळे याने बापाचा बदला घेण्यासाठी शेषराव पाटील यांचा खून केला.
बापाचा खून केला म्हणून पुन्हा शेषराव पाटलाचा मुलगा बालू पाटील यांनी चंदर कांबळे यांचा खून केला. याच बालू पाटलांना भेटण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो. गावाच्या मधोमध उजव्या बाजूला बालू पाटलांच घर आहे.
बोलण्यात पश्चाताप जाणवला
घर जुनंच माळवदाचं, चारी बाजूला मातीच्या भिंती त्याही ढासळू लागलेल्या…पण बालू पाटलाचा चेहरा मोठा करारी, चेहऱ्यावर दाढी वाढलेली अंगापिंडाने मजबूत देह करारी डोळे. पहिल्या पहिल्या मलाही भीती वाटली…बोलावं की नाही मनात शंका आली पण अचानक दारात थांबलेलं त्यांनी पाहिलं… आणि जाडशीळ आवाजात विचारलं कोण पाहिजे.?
मी म्हटलं बालू पाटलांना बोलायचं, मी दारात थांबलेला ते तिथूनच म्हणाले हं बोला की… न राहवून मी म्हटलं आता येऊ का बसून बोलतो त्यांनी या म्हटल्यावर आत गेलो. बालू पाटील हे सध्या घरी शेतीच करतात, जुनाट माळवदाच्या दोन खोल्या आहेत. बाहेर अंगणात सात आठ पत्र घातले आहेत हीच काय ती बालू पाटलांची त्यांच्या आयुष्यातली कामगिरी…
बोलायला सुरुवात केली तेंव्हा त्यांच्या बोलण्यात पश्चाताप जाणवला पण काय करावं पर्याय नव्हता अशीही भावना दिसली. ” वडील आमचे चांगले होते, त्यांना मारलं तेंव्हा माझे मामा खांद्यावर बसवून घेऊन आले इतका मी लहान होतो. वडिलांना खूप वाटायचं आम्हाला शिकवावं चांगलं ठेवावं पण अशी घटना घडली. आमचा वनवास झाला साहेब.”
बालू पाटलांनी चंदर कांबळेचा खून केला असा आरोप आहे.केसमधून ते निर्दोष सुटले.
पुढे बालू पाटलांनी चंदर कांबळेचा खून केला असा आरोप आहे. या आरोपाखाली बालू पाटील हे तीन महिने जेल मध्ये राहून आले.
आणि 2003 मध्ये ते या केसमधून निर्दोष सुटले.
आता निर्दोष सुटलेत म्हटल्यावर मलाही त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून प्रश्न विचारणं कठीण झालं. तरीही मी बोलत गेलो.
आणि बालू पाटील सांगत गेले की, लई तरास झाला साहेब ह्या प्रकरणाचा, लई पैसे गेले आता पोराबळांना शिकवायचं म्हटलं तर पैसे राहिले नाहीत. कुनतीच गोष्ट टायमावर मिळेना, या सगळ्या भानगडीचा मुलांवर परिणाम होऊ नये म्हणून मी त्यांनाही बाहेर शिकायला ठेवलं आहे. माझा लहान मुलगा बाबासाहेबांच्या वसतिगृहात शिकायला आहे असं त्यांनी सांगितलं.
मी दर जयंतीला मिरवणूक आली की बाबासाहेबांना हार घालतो असं सांगितलं.
तुम्ही बाबासाहेबांना मानता का असं विचारलं तेंव्हा गळ्याला हात लावून गळ्याशपथ खूप मानतो, त्यांचे विचार आपल्याला पुढं नेणारे आहेत. त्यांच्यासारखं आपण चाललं पाहिजे, मी बघा दर आंबेडकर जयंतीला आणि भीमजयंतीला दोनशे दोनशे रुपयांची पट्टी सुद्धा देतो साहेब. असं म्हणत बालू पाटील घरात गेले आणि दोन तीन वर्षाच्या पावत्या घेऊन आले.
ते खरंच पट्टी देतात याचा विश्वास पटला.आता काही भानगडी नको साहेब असं म्हणत मी दर जयंतीला मिरवणूक आली की बाबासाहेबांना हार घालतो असं सांगितलं.मन मारून मुटकून का असेना पण बालू पाटील यांच्यात झालेलं परिवर्तन विचारात घेण्यासारखं आहे.
बालू पाटलांच्या घरातून बाहेर निघून मी दुसऱ्या शेषराव पाटलांच्या घरी गेलो,या पाटलांवर गावातील दलितांची घरं जाळल्याचा आरोप आहे.गावाच्या थोडं बाहेर कॅनॉलला लागून शेषराव पाटलांचा वाडा आहे.वाडा चांगला मोठा, वाड्याच्या सुरुवातीला ढाळज आहे.पुढे भरपूर मोकळी जागा आणि त्यानंतर इतर काही खोल्या.
गावातल्या पोरांनी घरं जाळली
घरी 45 एकर जमीन दहा पंधरा गाई, दोनचार बैल जोड्या गड्यामाणसांचा राबता अजूनही या पाटलाच्या घरी आहे. पण शेषराव पाटील हा मोठा चाणाक्ष माणूस…त्यादिवशीच्या हल्ल्याचा कट यांच्याच घरात शिजला असं पीडित लोक सांगतात, पण शेषराव पाटील मात्र हा आरोप सपशेल नाकारतात, हे असलं काहीच घडलं नाही असा त्यांचा पहिला पवित्रा आणि नंतर ते पहिल्या पासून घटना सांगू लागतात.
शेषराव पाटील म्हणाले की हा पोचिराम लहान असताना माझ्या घरी ढोरं राखायचा पण अंगापिंडानं मजबूत, आणि लई आवचिंद होता. जसा जसा मोठा होत गेला तसा तो गावाला लईच त्रास करू लागला. नंतर आमची नोकरी सोडली अन ठोक्यानं शेती करू लागला. पण तिथंही तो नीट काम करत नव्हता.
तुम्ही पाटलांनी आम्हाला असं केलं तसं केलं म्हणून आम्हाला शिव्या घालायचा, माणूस वडील म्हणू नको थोर म्हणू नको कुणालाही श्या द्यायचा. भांडणं तर रोजच पार ईट येऊन गेलाता सगळं गाव वैतागलं होतं साहेब.मग विद्यापीठाच आंदोलन आलं जळकोटला एक पोलीस लोकांनी मारला.
बौद्धवाड्यातली लोक गळ्यात पडून रडलो
त्याची प्रतिक्रिया गावात उमटली अन गावातल्या काय येड्या पोरांनी घरं जाळली, न तिकडं लांब शिवारात पोचिरामला मारलं. ही घटना गावात धुमसून धुमसून घडली साहेब.अचानक घडलं नाही.ही त्यांची बाजू पाटलांनी सांगितली पण आता गावात कसं आहे विचारलं तेंव्हा
“अहो आता काय आधी बी आमच्या गावात काही नव्हतं सगळे चांगले आहेत. ती घटना घडून गेल्यावर आम्ही अन बौद्धवाड्यातली लोक गळ्यात पडून रडलो तर…ते फक्त पोचिरामच तेवढं आवचिंद होतं, पुन्हा कैबि नाही आमच्या गावात” पुढे याच शेषराव पाटलांनी बाबासाहेबांच्या विचाराशिवाय पर्याय नाही असंही सांगितलं आणि दर जयंतीला मी मिरवणुकीत जातो त्यांच्यासोबत राहतो असं सांगितलं.
जयंती निघाली तर आम्हाला काहिबी वाटत नाही उलट चांगलं वाटतं आम्ही कसलाच विरोध करत नाही असंही सांगितलं. शेषराव पाटलांच्या बोलण्यात थोडा चाणाक्ष पणा होता. पण नाविलाजनाने झालेला बदल हा पोचिराम कांबळे यांचं हौतात्म्य आणि गावातल्या दलितांनी आपला ताठ ठेवलेला बाणा याचा परिपाक होता.
जुने प्रश्न बाजूला पडलेत आणि आता जगण्याच्या नव्या वाटा इथे प्रत्येकाला शोधाव्या लागत आहेत
आज गावात पोचिराम कांबळे यांच्या हौतात्म्याच्या जखमा ओल्या आहेत, मात्र भीम जयंतीचा विरोध मावळला आहे तरी, गावातल्या दलितांची आर्थिक परिस्थिती आजही बिकट आहे. रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे तर मराठा समाजही शेतीच्या असंख्य प्रश्नांनी गांगरून गेला आहे. जुने प्रश्न बाजूला पडलेत आणि आता जगण्याच्या नव्या वाटा इथे प्रत्येकाला शोधाव्या लागत आहेत.
गावासमोर नव्या प्रश्नाचं एक भीषण कोंडाळ उभं राहिलं आहे. गावातून परतीला निघालो तेंव्हा कधीकाळी भरून वाहणारा कॅनॉल कोरडा ठाक पडला होता. आणि शेतात रानभर पसरलेला दुष्काळ पाठ धरून नाचत होता.
हेही वाचा.. इंडिया दॅट इज कास्ट
हेही वाचा.. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ मराठवाडा नामांतर दिन निमित्ताने..
हेही वाचा.. रोमन साम्राज्य आणि भारतीय समाज
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)