चल धन्नो:रेश्मा
आपण या चित्रपटसृष्टीला कितीही मायावी म्हटले तरी तिने अनेकांची पोटं इमाने इतबारे भरण्याचे काम प्रमाणिकपणे केले आहे हे विसरता कामा नये. पूर्वी एक काळ असा होता की नटनट्या जोखिमीचे दृष्ये स्वत:च करीत असत कारण काहीच पर्याय नव्हता. मग हळूहळू हे लक्षात यायला लागले की अशा नटनट्यांचा जीव धोक्यात घालून त्यांच्या जीवावर बेतले तर चित्रपट कसा पूर्ण करायचा? ही समस्या सोडवली ती चित्रपटसृष्टीतील स्टंटमॅन आणि स्टंट वुमननी. स्व:तच्या जीवाची जोखीम पत्करून मग यात अनेक पुरूष व स्त्रिया येऊ लागल्या.
अर्थात बहुतांश वेळा ही जोखीम पत्करण्याचे खरे कारण आर्थिक समस्येत गुंतलेले असते. १९६८ मध्ये अवघ्या १४ वर्षांच्या एका मुलीने हा धोका पत्करायचे नक्की केले कारण त्यावेळी तिच्या कुटूंबाची आर्थिक् अवस्था खूपच नाजूक झाली होती. तिचा हा निर्णय अत्यंत अवघडच होता कारण एक तर ती मुलगी होती आणि त्यात परंपांरीक मुस्लिम परीवारातील होती. रेश्मा हे त्या मुलीचे नाव. जी पूढे या चित्रपटसृष्टीतील नामांकित स्टंट वुमन म्हणून गौरविली गेली.
चित्रपटसृष्टीत रेश्मा ही एकमेव घोडा चालवू शकणारी स्टंट वुमन होती.
भारतीय चित्रपटाचा इतिहास ज्या अनेक चित्रपटांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही त्यापैकी एक म्हणजे “शोले”. तर या चित्रपटाचा क्लायमॅक्स सुरू होतो तो हेमामलिनीच्या एका प्रसंगाने. तलावाकाठी वीरूची वाट पहाणाऱ्या बसंतीला पाण्यात डाकूचे चेहरे दिसतात आणि ती अदमास घेत त्वरेने टांग्याकडे धाव घेते व म्हणते- ‘चल धन्नो….आज बसंतीके इज्जत का सवाल है……’आणि सुरू होते टांगा आणि घोड्यांची रेस. पडद्यावर इनमिन ३ मिनीटे आणि ६ सेंदाचा हा थरारक प्रसंग संकलक एम.एस. शिंदे यानी अत्यंत मेहनतीने संकलीत केलाय….मला हे माहित होते की अशी दृष्य नायक नायिका करत नाहीत. स्टंटमन ते करत असतात. एकदोन स्टंटमनची नावही मला माहित होती.
वरील शोले या प्रसंगाची खरी नायिका ही रेश्मा होती. हेमामालिनीची डुप्लीकेट म्हणून तिने यातील हा प्रसंग साकारला होता. यातील टांगा चालविण्याचे सर्वच प्रसंग रेश्माने केले आहेत. मुळात या प्रसंगात टांग्याचे दोन्ही चाकं असे तयार करण्यास सांगितले होते की एकाच वेळी दोन्ही निखळतील आणि टांगा पडेल. प्रत्यक्षात मात्र एकच चाक निखळले आणि टांगा रेश्मावर उलटून गंभीर अपघात झाला. अनेक दिवस ती बेडवर होती. बरी झाल्यावर परत तिने आपले काम पूर्ण केले. त्यावेळी चित्रपटसृष्टीत रेश्मा ही एकमेव घोडा चालवू शकणारी स्टंट वुमन होती. रेश्माला या कामाचे रोज १७५ रूपये मिळत असत.
पित्याने तिला व आईला बेदम चोप दिला
खरे तर तीला या क्षेत्रात अभिनय करायचा होता पण एक्सट्रॉ आर्टीस्ट म्हणून काम मिळत गेले. ‘तू स्टंट कर तूला अभिनय नाहीच जमणार’ असे वारंवार सांगितले जाई. एकदा ज्युनिअर आर्टीस्टचा शिक्का लागला की मग मूख्य प्रवाहात कोणीच विचार करत नाही….”तुला नाही जमणार’ हे वाक्य या क्षेत्रातल्या माजोरड्या संस्कृतीचे प्रतिक आहे. “कास्टींग काऊच” हा प्रकार तर एखाद्या सडक्या गळू सारखा आहे जो आजही जगभर सुरू आहे. रेश्मा पण याला अपवाद कशी ठरणार?काही दिग्दर्शक व कलावंतानी कोपराने जमीन खणून पाहिली. एखादा सणसणीत गुद्दा देण्या इतपत रेश्मा मजबूत होती पण कुटूंबं नावाची संस्था वेळोवेळी मजबूर करत असते. ती चलाखीने बाजू सांभाहून घ्यायची व म्हणायची- ‘कि ऐसा कुछ न करें जिससे मेरी नजर में आपकी इज्जत कम हो जाए’
वडील कायम आजारी असत व आई नेहमीच घरी असे. ती नेहमीच पर्दा वापरीत असे.
स्टंट दिग्दर्शक अजीम यांनी तिला सर्वप्रथम संधी दिली.
सर्वप्रथम रेश्माने लक्ष्मीछाया या अभीनेत्रीसाठी बॉडी डबल केला व त्याचे १०० रूपये तिला मिळाले.
हे १०० रूपये जेव्हा तिने आपल्या पित्याला उदिले व त्याची परतफेड म्हणून पित्याने तिला व आईला बेदम चोप दिला…..आपल्या हाताला पडलेल्या जखमा तिने बापाला दाखविल्या व सांगितले “मी हे पैसे मिळविण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत” तेव्हा कुठे त्यांचा आत्मा शांत झाला…
शोले ने मात्र तीला प्रसिद्धी मिळवून दिली.
शोले ने मात्र तीला प्रसिद्धी मिळवून दिली. जवळपास तीन दशके काम केल्यानंतर तिचे सर्वत्र नाव झाले. कोणत्याही प्रसिद्ध कलाकृतीचे जे कोणी साक्षीदार असतात त्यांच्यावरही प्रकाश झोताचे काही कवडसे पडत असतात. रेश्माने चित्रपटसृष्टीतल्या जवळपास सर्वच अभिनेत्रीसाठी बॉडी डबलचे काम केले. चित्रपटात पडद्यामागेही अनेकजण चित्रपट चांगला व्हावा म्हणून रात्रं दिवस झटत असतात. त्याचे चेहरे मात्र आम्ही बघू शकत नाही. स्टंटमन/वुमूनचे दूर्देव हे की ते पडद्यावर तर दिसतात पण स्वत:ची ओळख लपवून… एका मुलाखतीत रेश्मा म्हणते- “कसमे वादे” या अमिताभ राखी अभिनीत चित्रपटाच्या शुटींग दरम्यान ४० फूट उंच डोंगरावरून मी खाली कोसळली आणि पायाला चांगलाच मार लागला. मला हॉस्पिटलमध्ये अडमिट व्हावे लागले. त्यावेळी “मीरा” चित्रपटाचे शुंटीग करत असलेली हेमा मालिनी वेळ काढून आवर्जुन मला भेटली पण जिच्या साठी मी काम करत होते ती राखी मात्र मला भेटायला आली नाही.”
मात्र प्रत्यक्ष चित्रीकरणाच्यावेळी ट्रक ड्रायव्हरने खरेच रेश्माला उडवले.
रेश्माने मीना कुमारीसाठी ‘मेरे अपने’ मध्ये बॉडी डबल केले. यात एक प्रसंग असा होता ज्यामध्ये विनोद खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यात मारामारी सुरू होते. त्यावेळी मीनाकुमारी मध्ये येते व तिला धक्का लागून तिचे डोके भिंतीवर आदळते. रेश्माने एका मुलाखतीत सांगितले की- हा प्रसंग झाल्यावर मीना कुमारी धावत तिच्याकडे आली व म्हणाली “ हे अशी कामे तू का करतेस.. त्यापेक्षा दुसरे काम का करत नाहीस.” सायरा बानू, रेखा, डिम्पल, श्रीदेवी, राख्, हेमा मालिनी,मिनाक्षी शेषाद्री सारख्या सर्वच् प्रसिद्ध अभिनेत्रीसाठी अनेकदा बॉडी डबलचे काम केले. धाडशी स्टंटचे सर्वच प्रसंग रेश्मा निडरपणे साकार करत गेली. ज्योती चित्रपटात हेमा मालिनीसाठी बॉडी डबल करतानां ती थेट बैलाशी भिडली होती..सुलतान अहमदच्या ‘गंगा की सौगंध’ या चित्रपटात तिला ज्युनिअर आर्टीस्ट म्हणून घेतले आणि काम मात्र स्टंटचे दिले.. तिला केवळ ९० रूपये देऊ केले होते. नतंर १७५ रूपये दिले. त्यावेळी ९० रूपये ज्युनिअर आर्टीस्टला दिले जात.
टीव्ही वरील मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’…यात तिने दादीचा बॉडी डबल केला आहे.
तेव्हाही आणि आजही स्टंटमॅन-वुमन यांना सुरक्षा म्हणावी तशी मिळत नाही.
त्यामुळे शुटींग दरम्यान जखमी होने हे नित्याचे.
“कर्ज” या चित्रपटात दुर्गा खोटे या अभिनेत्रीला ट्रक उडवतो असा एक प्रसंग चित्रीत करायचा होता.
चित्रीकरणाच्या वेळी रेश्मा रस्त्यात उभी असते आणि ट्रक जवळ येताच बाजूली उडी मारणार असते.
मात्र प्रत्यक्ष चित्रीकरणाच्यावेळी ट्रक ड्रायव्हरने खरेच रेश्माला उडवले.
डोक्याला जबरदस्त मार लागला. रक्तच रक्त झाले चित्रीकरण मात्र चालूच होते.
दिग्दर्शकाने कट असे म्हटल्यावर मग युनिटचे लोक धावत आले.
काहीनी त्या ट्रक ड्रायव्हरला झोडपून काढले. मग अनेक दिवस पुन्हा हॉस्पिटल मध्ये रहावे लागले.
८० च्या दशकात रेश्मा चित्रपटसृष्टीतील मोस्ट वॉन्टेड स्टंट वुमन होती
काचेच्या खिडकीला धडक देऊन उडी मारणे, आगीचे प्रसंग, घोडा वेगाने पळवणे, उंच इमारती वरून खाली झोकून देणे,
नदीत उडी मारणे, डोंगरा वरून घरगंळत येणे, एका इमारती हून दुसऱ्या इमारतीवर उडी मारणे
असे अनेक जीवघेणे प्रसंग स्टंटमन-स्टंटवुमनला करावे लागतात.यात जीवाची जोखीम कायम असतेच.
आजू बाजुला मृत्यू दबा धरून बसलेला असतोच. नेहमीच त्याला हुलकावणी देता येईल याची शाश्वती नसते.
१९७० ते ८० च्या दशकात रेश्मा चित्रपटसृष्टीतील मोस्ट वॉन्टेड स्टंट वुमन होती.
सन २००० पर्यंत रेश्मा स्टंट वूमन म्हणून कामे करत राहिली.
कुटूंबातल्या आठ सदस्यांचे पोट तिने निवडलेल्या या कामामुळेच भरत होते.
हार्बर लाईनच्या रे रोड स्टेशनवर उतरून तुम्ही कधी दारूवाला चाळ कुठे
असा प्रश्न रस्त्यावरील विक्रेत्यानां विचारला तर कुणीच सांगणार नाही पण ‘शोले पिक्चरकी हिरोईन कुठे राहते?’
असे विचारताच ते पत्ता सांगतात जो याच चाळीचा.
तिच्या मुलाने एकदा तिच्या वाढदिवसाला होंडा अॅक्टीव्हा भेट दिली होती
तेव्हा रेश्मा म्हणाली मी बुलेट सारख्या बाईकवर राईड करणारी…
ही टू व्हीलर एकदम शेळपट वाटते…… रेश्माला बॉलिवुडची पहिली स्टंट वुमन म्हटले जाते.
फियरलेस नादिया
खरेतर जुन्याकाळची नायिका नादीया स्वत:च अत्यंत धाडशी स्टंट करीत असे. तिची “फियरलेस नादिया” अशी जाहिरातही केली जात असे. पण तिला अनेक प्रमूख भूमिका मिळत गेल्या. रेश्माच्या बाबतीत असे झाले नाही. तिचे नाव जरी रेश्मा असले तरी रेशमी आयुष्याने तिच्याकडे पाठच फिरवली. ती कायम स्टंट वुमनच राहिली. रेश्माच्या आयुष्यावर बेतलेली १०६ मिनीटांची एक फिल्म ‘द शोले गर्ल’ ८ मार्च २०१९ ला महिला दिना निमित्त झी-५ या वाहीनीवर प्रसारीत झाली होती. सुप्रसिद्ध छायाचित्रकार देबू देवधर यांची पत्नी व प्रसिद्ध दिग्दर्शीका श्रावणी देवधर आणि मुलगी सई देवधर यानी निर्मिती केली होती. आदित्य सरपोतदार याचे दिग्दर्शक आहेत. तर रेश्माची भूमिका बिदीता बाग या अभिनेत्रीने केलीय. नायिकचा बॉडी डबल करणाऱ्या रेश्मा पठाणला याचा आनंद आहे की तिच्यासाठी कुणीतरी बॉडी डबल केला. बिदीताने रेश्माच्या भूमिकेला न्याय दिलाय. रेश्मा पठाण आज ६४ वर्षांची आहे. ती स्टंटची कामे आता करत नाही.
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
हेही वाचा… दिलीप कुमार ; भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – भाग – 5