पुणे : भिडेवाडा स्मारक वाद : महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी पुण्यातील भिडेवाडा येथे देशातील पहिली मुलींची शाळा 1 जानेवारी 1848 रोजी सुरू केली होती.फातिमा शेख या त्यांच्या सहकारी शिक्षिका म्हणून तिथे कार्यरत होत्या.याच क्रांतिकारी शाळेमुळे महाराष्ट्र अन देशातील मुली-महिला शिक्षण घेऊ शकल्या,मात्र कालौघात या शाळेची,भिडेवाडा वास्तूची पडझड झाली.समाजाने या ऐतिहासिक वास्तूकडे साफ दुर्लक्ष केले. ज्या वाड्याने बहुजन समाजाला शिक्षणाची दारे खुली केली,त्या वाड्याकडे बहुजन समाजाने पाठ फिरवली.त्यांनंतर काही जागरूक नागरिक भानावर आले आणि त्यांनी या भिडे वाड्याची दखल घेण्यास सुरुवात केली.
हा वारसा जतन झाला पाहिजे म्हणून समाजातील अनेक संस्था संघटना कार्यरत झाल्या.त्यांच्यानंतर पुढे यासंदर्भात खटला उभा राहिला.उच्चन्यायालयात सुनावणी सुरू झाली.आज पुणे महापालिका म्हणजेच पर्यायाने राज्य सरकारनं हा खटला जिंकला असून सामाजिक चळवळींच्या लढ्याला मोठं यश आलं आहे.लवकरच भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक म्हणून आकाराला येईल अशी आशा करूया.त्यासंदर्भात लवकरच पुढील काम सुरू केले जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलीय.या ऐतिहासिक स्मारकाच्या माध्यमातून अनेकांना समाजकार्याची प्रेरणा मिळणार आहे.

भिडेवाड्याच्या प्रश्नावर अनेक संघटनांचा प्रदीर्घ लढा
भारतातील स्त्री शिक्षणाचे उद्धारकर्ते महात्मा जोतीबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी अनेक हालअपेष्टा सहन करत अनेक अडीअडचणींवर मात करत स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री शिक्षणाचं महान कार्य केलं. समाजातील तथाकथित उच्च जातीयांनी त्यांच्या अंगावर शेणाचे गोळे,दगड फेकून मारले.त्यांना रक्त बंबाळ केलं. त्यांची मुलींना स्त्रियांना शिकवू नये यासाठी मनुवादी आटोकाट प्रयत्न करत होते.
प्रसंगी त्यांच्यावर मारेकरी घालण्यात आले होते.मात्र कोणत्याही आव्हानाला भीक न घालता फुले दाम्पत्यानी स्त्रियांसाठी शिक्षणाचं द्वार खुलं करून वर्षानुवर्षांच्या अज्ञानाच्या श्रृंखला तोडल्या. अशा या क्रांतिकारी ऐतिहासिक भिडे वाड्याचं राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करावं, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक संस्था,संघटना यांच्याकडून करण्यात येत होती.परंतु कायदेशीर अडचणींमुळे या स्मारकाचं काम रखडलं होतं. समता परिषदेच्यावतीनेही भिडेवाड्याच्या प्रश्नावर प्रदीर्घ लढा देण्यात आला होता.
पुना मर्चंट बॅंक ची सकारात्मक भूमिका
भिडेवाडा नंतर काही भाडेकरूंनी व्यापला. त्यांना जागा सोडण्यासाठी रोख मोबदला हवा होता. त्यासंदर्भातील तयारीही महापालिकेनं दर्शवली होती. मात्र,नंतर हा वाद कोर्टात गेला. त्यामुळे भिडेवाडा ताब्यात घेण्याच्या कामाला विलंब होत राहिला.अखेर आज हा खटला पालिकेनं जिंकल्यानं भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक करण्याचा मार्ग मोकळा झालाय.
भिडेवाडा येथे राष्ट्रीय स्मारक करण्याच्या अनुषंगाने चंद्रकांत पाटील यांनी भिडेवाड्याचे मूळ जागामालक असलेल्या पुना मर्चंट बॅंके चे चेअरमन विजय ढेरे यांच्यासोबत चर्चा केली होती. भिडेवाड्याचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेत तिथे राष्ट्रीय स्मारक होणं महत्वाचं आहे.हे स्मारक राज्यातीलच नव्हे तर देशातील तमाम महिलांचं प्रेरणास्थान ठरणार असल्यानं पुना मर्चंट बॅंकेनंही सहकार्याची भूमिका घ्यावी, असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलेलं होतं. त्यांच्या आवाहनाला ढेरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
फुले दाम्पत्यांच्या कार्याचा थोडक्यात जीवन परिचय
जोतिराव फुले हे त्यांचे गुरु तसेच सावित्रीबाई फुले यांचे जीवनसाथी होते. जोतिराव फुले आणि सगुणाबाई यांच्या देखरेखीखाली प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी अहमदनगरमध्ये औपचारिक शिक्षण घेतले. त्यानंतर पुण्याच्या शिक्षक प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षण शाळेत त्यांच्यासोबत फातिमा शेख यांनीही अध्यापनाचे प्रशिक्षण घेतले. येथूनच त्यांची घट्ट मैत्री झाली. फातिमा शेख ही उस्मान शेख यांची बहीण होती, जी जोतिराव फुले यांचे जवळचे मित्र आणि सहकारी होते. पुढे दोघांनी मिळून अध्यापनाचे कामही केले.
फुले दाम्पत्याने 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा उघडली.
15 मे 1848 रोजी जोतिराव फुले यांनी भिडे वाडा, पुणे येथे शाळा उघडली तेव्हा सावित्रीबाई फुले त्या मुख्य शिक्षिका झाल्या.
या शाळांचे दरवाजे सर्व जातीधर्मासाठी खुले होते.
जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी उघडलेल्या शाळांची संख्या वाढत होती.
आणि चार वर्षांत त्यांची संख्या १८ वर पोहोचली.
ब्राह्मणवादाला थेट आव्हान
फुले दाम्पत्याची ही पावले ब्राह्मणवादाला थेट आव्हान देणारी आणि त्यांचि मक्तेदारी संपविणारी होती . जोतिराव फुले यांचे वडील गोविंदराव यांच्यावर पुरोहितांनी जोरदार दबाव आणला. गोविंदराव यांनी महात्मा फुले यांना पुरोहीताच्या पुजारी यांच्या दबावामूळे त्यांनी जोतिराव फुले यांना एकतर त्यांच्या पत्नीसह शाळा सोडण्यास नाहीतर घर सोडुन जाण्यास सांगितले. या इतिहास निर्मात्या दापंत्यांने , दुःखी आणि जड अंतःकरणाच्या जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शूद्र-अतिशुद्र आणि स्त्रियांच्या मुक्तीसाठी घर सोडण्याचा निर्णय घेतला.
कुटुंबातून बहिष्कृत झाल्यानंतर ब्राह्मणी शक्तींनी सावित्रीबाई फुले यांचा पाठलाग सोडला नाही. सावित्रीबाई फुले शाळेत शिकवायला गेल्यावर गावकरी त्यांच्यावर दगड आणि शेण फेकायचे. सावित्रीबाई थांबल्या आणि नम्रपणे म्हणाल्या, ‘भाऊ, तुझ्या बहिणींना शिक्षण देऊन मी चांगलं काम करत आहे. तुम्ही फेकलेले दगड आणि शेण मला थांबवू शकत नाहीत, परंतु ते मला प्रेरणा देतात. जणू तुम्ही फुलांचा वर्षाव करत आहात. मी माझे कार्य निश्चयाने अविरत करत राहीन .”
महिलांसाठी बालकासाठी बालहत्या बंदी गृह आधार केंद्र
सावित्रीबाई फुले यांची साडी सनातनी लोकानी फेकलेल्या शेणामुळे घाण व्हायची,
या परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्या दुसरी साडी सोबत ठेवत आणि शाळेत जाऊन त्या माखलेली साडी बदलत आणि मुलांना शिकवत.
फुले दाम्पत्याने शिक्षणासोबतच समाजाच्या इतर समस्यांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.सर्वात वाईट अवस्था विधवांची होती.
त्या बहुसंख्येने तथाकथित उच्चवर्णीय.त्यातील बहुतांश ब्राह्मण कुटुंबातील.
अनेकदा गरोदर असताना या विधवा एकतर आत्महत्या करतात किंवा त्यांनी जन्म दिलेल्या मुलाला फेकून देतात.
1863 मध्ये फुले दाम्पत्याने या महिलांसाठी बालकासाठी बालहत्या बंदी गृह आधार केंद्र सुरू केले.
येथे कोणतीही विधवा येऊन आपल्या मुलाला जन्म देऊ शकत होती.
या बालहत्या बंदी गृहाचे पोस्टर ठिकठिकाणी लावण्यात आले होते. या पोस्टर्सवर लिहिले होते,
‘विधवांनो! येथे अनामिक राहून कोणत्याही अडथळ्याशिवाय आपल्या मुलाला जन्म देवू शकता .
आणि आपल्या मुलाला सोबत घ्या किंवा इथे ठेवा, ते तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे.
‘सावित्रीबाई फुले बालहत्या प्रतिबंधक गृहात येणाऱ्या महिला आणि जन्माला येणाऱ्या मुलांची काळजी घ्यायच्या.
त्याचप्रमाणे ब्राह्मण विधवा काशीबाईच्या मुलाला फुले दांपत्याने स्वतःचे मुल म्हणून वाढवले ज्याचे नाव यशवंत होते.
सामाजिक परिवर्तनासाठी जोतिराव फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
त्यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाची सूत्रे सावित्रीबाई फुले यांच्याकडे सोपवण्यात आली.
1891 ते 1897 पर्यंत त्यांनी त्याचे नेतृत्व केले. सत्यशोधक विवाह पद्धतीच्या अंमलबजावणीतही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
सावित्रीबाई फुले या आधुनिक मराठीतील महत्त्वाच्या कवयित्री
सावित्रीबाई फुले या आधुनिक मराठीतील महत्त्वाच्या कवयित्री होत्या. त्यांचा पहिला कवितासंग्रह काव्य फुले या नावाने 1854 मध्ये प्रकाशित झाला, जेव्हा त्या २३ वर्षांच्या होत्या. 1892 मध्ये त्यांचा ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. हा बावन्न कवितांचा संग्रह आहे. जोतिराव फुले यांच्या स्मरणार्थ त्यांनी ते लिहून त्यांना समर्पित केले आहे. सावित्रीबाई फुले यांची भाषणेही 1892 मध्ये प्रकाशित झाली. याशिवाय त्यांनी लिहिलेली पत्रेही खूप महत्त्वाची आहेत. या पत्रांतून त्यावेळची परिस्थिती, लोकांची मानसिकता, सावित्रीबाईंची फुलेंप्रती असलेली विचारसरणी आणि त्यांचे विचार समोर येतात.
मृत्यूनंतरही त्यांचे कार्य आणि विचार देशाला प्रकाशाप्रमाणे प्रमाणे मार्ग दाखवत आहे
1896 मध्ये पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात पुन्हा एकदा दुष्काळ पडला.
सावित्रीबाई फुले यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अहोरात्र एक केले.
दुष्काळग्रस्तांना मोठ्या प्रमाणावर मदत साहित्य पोहोचवण्यासाठी त्यांनी सरकारवर दबाव आणला.
शूद्र-अतिशुद्र आणि स्त्रियांच्या शिक्षिका आणि आद्य माता सावित्रीबाईंचे जीवन अन्यायाविरुद्ध
आणि न्यायाच्या स्थापनेसाठी अखंड लढण्यात व्यतीत झाले. समाजसेवा करताना त्यांचा मृत्यूही झाला.
1897 मध्ये प्लेगमुळे पुण्यात साथीचा रोग पसरला. त्यामध्ये लोकांना आरोग्यासाठी मदत करीत होत्या
अशातच स्वतःही या आजाराची शिकार झाल्या.10 मार्च 1897 रोजी त्यांचं निधन झालं.
त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे कार्य आणि विचार देशाला प्रकाशाप्रमाणे प्रमाणे मार्ग दाखवत आहे.
सावित्रीबाई फुले देशाच्या प्रथम महिला शिक्षिका
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 16,2023 | 20:20 PM
WebTitle – Bhidewada dispute The municipality won the case