बाबासाहेब आणि धर्मांतर: सदर विषयाची मांडणी करत असताना धर्मांतरापुर्वीचे बाबासाहेब प्रामुख्याने विचारात घ्यावे लागतील.यामध्ये खालील भागात मांडणी केली आहे.
बाबासाहेबांना बालपणीच बुद्ध तत्व भेटले
डॉ.बाबासाहेबांचे आजोबा मालोजी हे रामानंदी पंथाचे आणि वडिल कबीर पंथी होते. कबीरपंथी असल्यामुळे पिता रामजी यांना मूर्तीपूजा मान्य नव्हती. पण कबीरांच्या विचारांच्या प्रभावामूळे चिकित्सक दृष्टिकोन त्यांच्यात होता. बोधिसत्व संत कबीर यांच्यावर बुद्धांचा प्रभाव असल्याचे अनेकठिकाणी पहायला मिळते त्यामुळे पिता रामजी यांच्यावर अप्रत्यक्षपणे बौद्ध परंपरेचाच प्रभाव होता असे म्हणता येईल. पिता रामजी यांनी त्यांच्या सर्व लेकराना रामायण, महाभारत वाचून दाखवले, त्यातील गोष्टी सांगितल्या, त्याना वाचायला सांगीतले खरे, पण त्यातील प्रेरणादायी पात्रे आत्मसात करायला सांगितली. रामायण, महाभारतातील अनेक पात्रांबाबत भीमरावांनी लहानपणी पिता रामजी यांच्यासमोर शंका उपस्थित केल्या त्या रामजी बाबांनी मान्य केल्या आणि पुढे गेले. लहानपणी इंग्रजी चौथ्या वर्गाची परीक्षा पास झाल्यावर भीमरावांचा सत्कार करण्यात आला नव्हे तो कृष्णराव अर्जुन केळूसकर गुरूजींनी घडवून आणला आणि सत्काराप्रीत्यर्थ त्यांनी भीमरावाना स्वतः लिहिलेले ‘गौतम बुद्धाचे चरित्र’ सप्रेम भेट दिले. केळूसकर गुरुजी म्हणजे त्याकाळचे ‘बुध्दफूल’ होते. या फुलाचा सुगंध भीमरावांपर्यंत दरवळत आला आणि लहानपणीच बाबासाहेबांना बुद्ध भेटले. केळूसकर गुरुजींनी हे चरित्र ‘सयाजीराव ओरिएंटल सिरीज, बडोदा’ करिता लिहिलेले होते. त्यांनी बुद्धच नव्हे संत तुकाराम, छ. शिवाजी महाराज यांचीही चरित्रे लिहिली आहेत. ज्या प्रकाशनासाठी त्यांनी बुद्ध चरित्र लिहिले ते प्रकाशन छ. सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या संस्थानाचे होते. सयाजीराव गायकवाड महाराजही बुद्धप्रेमी होते हे सर्वश्रुत आहे. त्यांनी नंतरच्या काळात बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली होती. याचा अर्थ कबीरपंथी पिता रामजी बाबा, छ. सयाजीराव गायकवाड महाराज आणि केळूसकर गुरुजी यांची थेट नाळ तथागत बुद्ध, संत तुकाराम आणि छ. शिवाजी महाराज यांच्याशी जोडलेली आपल्याला दिसून येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “दादा केळूसकरांनी दिलेल्या पुस्तकामुळे मी बुद्धाकडे वळलो. त्या लहान वयातसुद्धा रिकाम्या डोक्याने मी बुद्धाकडे गेलो नाही. मला पार्श्वभूमी होती आणि बुद्धाच्या जीवनावरील पुस्तक वाचताना मी तुलना व भेद करीत असे. बुद्ध आणि त्यांचा धम्म यांच्यात रस घेण्याची ही माझी सुरुवात होती”.
बाबासाहेबांचे विद्यार्थीजीवन बुद्धमय होते
डॉ.बाबासाहेबांचे विद्यार्थीजीवन हे आदर्श विद्यार्थीजीवन होते. ग्रंथांना सोबती मानणारे बाबासाहेब विद्यार्थीदशेतच जगविख्यात संशोधक म्हणून नावारूपास आले. “भारतातील जाती” या शोधनिबंधातून त्यांनी भारतातील जाती आणि वर्णव्यवस्थेची कैफियत जगासमोर मांडली होती. ‘शिलाविन विद्या फुकाची’ यातून त्यांनी शिल आणि शुध्द चारित्र्याबाबत सांगीतले. आयुष्यभर त्यांनी स्वतः शिलाचरण केले. विद्यार्थीदशेत त्यांनी राजकारणाला बाजूला ठेवले आणि अस्पृश्योद्धाराची चळवळ हाती घेतली. विद्या, विनय, शिल आणि करुणा विद्यार्थीदशेत त्यांच्याठायी होती. बाबासाहेब म्हणतात, माझ्या मतानुसार बुद्धाचा धम्म श्रेष्ठ आहे. दुसऱ्या कोणत्याही धर्माची त्याच्याशी तुलना केली जाऊ शकत नाही. जर एखाद्या विज्ञाननिष्ठ आधुनिक व्यक्तिला धर्म हवा असेल तर त्याला बुद्धाच्या धम्माशिवाय पर्याय नाही, असे माझे पक्के मत आहे व ते सर्व धर्माचा पस्तीस वर्षे सखोल अभ्यास केल्यावर तयार झाले आहे”. ही पस्तीस वर्षे कोणती याचा शोध घ्यायला गेल्यास लक्षात येईल की 1956 पूर्वीची पस्तीस वर्षे जरी विचारात घेतली तरी 1921 पासून बाबासाहेबांनी विविध धर्मांचा निरंतर अभ्यास करायला सुरुवात केली होती असे वरवर म्हणता येईल पण नेमकी कोणती पस्तीस वर्षे हे सांगता येणार नाही. यावरून इतकेच सांगायचे आहे कि धम्माचरण करतच बाबासाहेब सर्व धर्मांचा अभ्यास करत होते असे म्हणण्याचे धाडस आम्ही करतो. कारण “गौतम बुद्धाचा धर्म आपल्या देशात जरी आज फारसा प्रवृत्त नाही, तरी तो तेथे सुमारे हजार बाराशे वर्षे एकसारखा चालू होता व त्याच्यामुळे भारत भूमीवरील निरनिराळ्या धर्मपंथांवर अनेक परिणाम झाले आहेत. पुनः त्याच्या धर्मपंथाचा प्रसार आज सरासरी एक तृतीयांश मनुष्य जातीत कमीजास्त प्रमाणात झाला आहे आणि कित्येक पाश्चात्य पंडितांच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा पुरातन ख्रिस्ती धर्मावरही पुष्कळ परिणाम झाला आहे.” असे केळूसकर गुरुजी म्हणतात. ह्या तत्वांचे बाळकडू बाबासाहेबांना विद्यार्थीदशेतच मिळाले होते.
बाबासाहेबांचे एकही आंदोलन हिंसक नाही
माणगांव परिषदेतून बाबासाहेबांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात झाली. “काय करूं आतां धरूनियां भीड। निःशंक हे तोंड वाजविलें॥ नव्हे जगी कोणी मुकीयांचा जाण। सार्थक लाजून नव्हे हित॥” या बोधीसत्व तुकोबारायांच्या वाणीने ‘मूकनायक’ वृत्तपत्राची सुरुवात करून अन्यायी, धर्ममार्तंडांवर आसूड ओढायला बाबासाहेबांनी सुरुवात केली. चवदार तळे रणसंग्राम असो कि काळाराम मंदिर प्रवेश असो, खोती-शेतकऱ्यांचे आंदोलन असो कि पुणे करारावेळची परिस्थीती असो बाबासाहेबांनी त्यांच्या आंदोलनात सम्यक वाटचाल केलेली दिसून येते. आपल्या लोकांना मारहाण झाली तरी हिंसेला हिंसेने प्रतिकार बाबासाहेबांनी केलेला नाही. अन्यायाला प्रतिकार करण्याचे आणि दुःखमुक्ती करण्याचे साधन त्यांनी ‘ज्ञानमार्ग’ हेच निवडलेले आपल्याला दिसते जे तथागत बुद्ध आणि महात्मा फुलेंनी निवडले. लोकांना शहाणे करण्याची बौद्ध परंपरा त्यांनी त्यांच्या समग्र आंदोलनात जपलेली दिसते. याचे कारण त्यांच्या पुढील वक्तव्यात दिसून येते. बाबासाहेब धर्मांतर प्रश्नी म्हणतात, “अलिकडे तरुणांत धर्माबद्दल औदासिन्य दिसते. धर्म हा गांजा असे म्हणतात. परंतु माझ्यात ज्या काही चांगल्या गोष्टी असतील व माझ्या शिक्षणाचा जो काही जनतेसाठी उपयोग झाला असेल तो सर्व माझ्यात असलेल्या धार्मिक भावनेमुळेच होय. मला धर्म हवा आहे परंतु धर्माचे ढोंग नको.” धर्मांतराची घोषणा केल्यानंतरचे बाबासाहेबांचे हे वक्तव्य आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे कि बाबासाहेबांना ‘धर्म प्यारा आहे’. प्राचिन काळापासून भारतामध्ये भेदभावाचे जे बंड माजले होते त्याला बुद्धाच्या उपदेशामूळे प्रतिकार होऊन तो भेदभाव नरमी आला होता याची पुरेपूर कल्पना बाबासाहेबांना होती.
संविधान निर्मितीनंतर धर्मांतर
बाबासाहेब धर्मांतर,बाबासाहेबांनी ‘मी हिंदू म्हणून मरणार नाही’ हा सम्यक संकल्प 13 ऑक्टोबर 1935 रोजी केला होता. पुढच्याच दशकात भारतीय राजकारण ढवळून निघाले, भारतीय संविधान निर्मितीच्या मसुदा समितीवर जाऊन बाबासाहेबांनी ज्याप्रमाणे धर्मांचा अभ्यास करण्यात आयुष्य वेचले तसे जगभरातील लिखित घटनांचा अभ्यास करून 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान घटना समितीकडे सुपूर्द केले. संविधानात बाबासाहेबांनी न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मानवीमूल्ये अंतर्भूत केली आणि सांगितले कि ही मानवीमूल्ये दुसरी-तिसरीकडून आपण स्वीकारली नसून ती भारताच्या मातीतलीच मूल्ये आहेत आणि ती बुद्धांनी इथे पेरली आहेत, वाढवली आहेत. आपल्याला ती नव्याने रूजावावी लागतील आणि ती प्रामुख्याने जबाबदारी संविधानाची अंमलबजावणी करणाऱ्या लोकांची राहील. अस्पृश्योद्धाराची चळवळ चालवत असताना बाबासाहेबांना जे कटू अनुभव आले त्याची मूळे इथल्या धर्मव्यवस्थेत आहेत, धर्मातील वर्णव्यवस्थेत आहेत, इथल्या अस्पृशांना माणसासारखी वागणूक मिळत नाही. मानवी जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे तर तो बुद्धाचा मार्ग आहे हे ओळखून त्यांनी केलेल्या संकल्पाप्रमाणे ब्राह्मणी धर्म त्यागून बौद्ध धम्माची दिक्षा घेतली, धर्मांतर केले. काय नाकारायचे हे स्पष्ट असताना काय स्वीकारायचे हेही त्यांच्यासमोर स्पष्ट होते. जे नाकारायचे ते त्यांनी लेखणी, वाणीतून आयुष्यभर नाकारले आणि जे स्वीकारायचे आहे त्याचा स्विकार त्यांच्या जीवनभरातील आचरणात दिसून येतो. बौद्ध धम्म सर्वोत्तम आहे हे जाणून त्यांनी त्यादृष्टीने रचनात्मक कार्य करायला धर्मांतरापूर्वीच सुरुवात केलेली होती. अनेक ग्रंथातून त्यांनी “भारताचा इतिहास म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून तो ब्राह्मणी धर्म आणि बौद्ध धम्म यांच्यातील मरणांतिक संघर्षाचा इतिहास आहे” असे वारंवार सांगितले आहे. प्राचिन काळापासून बुद्धांच्या प्रभावाने, विचाराने जे काही दिलंय ते माझ्या किंवा माझ्या बांधवांच्या कल्याणाचेच नव्हे तर अखंड मानवी प्रजातीच्या कल्याणाचे आहे हे त्यांनी जाणले होते. धर्मांतर करण्याचा निर्णय त्यांनी लोकांवर लादला नाही तर तो मार्ग अंधारातून प्रकाशाकडे आणि प्रकाशातून प्रकाशाकडे नेणारा कसा आहे हे तळमळीने पटवून सांगितले. माणसांत जाती नसतात तर त्या पशु-पक्षी-वनस्पतीत असतात हा तथागत बुद्धांचा उपदेश त्यांनी लोकांना पटवून दिला. लाखो लोकांनी त्यांच्यासमवेत धर्मांतर केले, सर्वजण मिळून बुद्धांसमोर नतमस्तक झाले. बाबासाहेबांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा जगविख्यात बौद्ध धम्म ग्रंथ लिहिला, बुद्ध पूजा पाठ दिले. आपल्याला बुद्ध देण्यासाठी बाबासाहेबांनी स्वतःची तब्बेत हलाखीची असतानासुद्धा अफाट अभ्यास केला, जगाशी आपली नाळ जोडण्यासाठी अनेक विदेश धम्मदौरे केले आणि धम्म प्रचार प्रसाराची अनेक साधने आपल्याला दिली. तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हृदयाची स्पंदने एकच आहेत हे बाबासाहेबांच्या समग्र जीवन आणि कार्यावर प्रकाश टाकता आपल्या लक्षात येईल, त्यामुळे बाबासाहेब हे आधुनिक बुद्धच आहेत असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही.
हेही वाचा.. डॉ.आंबेडकरांचा जगातील पहिला पुतळा स्थापन करणारा मराठा
हेही वाचा.. जयभीम वाले टिळक
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 10 , 2020 06 : 46 AM
WebTitle – ambedkar conversion into the buddhism 2020-12-10