‘जयंती’ चित्रपट बघितला आणि ती सायंकाळ सार्थकी लागल्याचे अतीव समाधान लाभले. ऊरात केवढा अभिमान, आनंद घेऊन थिएटरच्या बाहेर पडलो! एक दशकापासून अधिक काळ चित्रपट बघण्याची माझी उदासीनता ‘जयभीम’ किंवा ‘जयंती’सारखे चित्रपट झपाट्याने दूर करू लागले आहेत.
बातम्या ऐकण्यापलीकडे टी.व्ही.च्या वाटेला चुकूनही न जाणाऱ्या मी केवळ २२ दिवसांच्या अंतराने हे दोन्ही चित्रपट बघितले आहेत. चित्रपट हे सामाजिक संदेश-विचार रुजविणारे प्रभावी माध्यम आहे आणि वर्तमानात त्याचा योग्य प्रकारे वापर होतोय हे ‘जयभीम’ वा ‘जयंती’ सारखे चित्रपट निशंक: सिद्ध करतायत.
दोन्ही चित्रपटात तुलना वगैरे करण्याचे कारण नाही कारण दोन्ही चित्रपटांची स्वतंत्र उंची, वैशिष्ट्य व स्थान आहे. मात्र दोन्ही चित्रपटांमध्ये एक साम्य जोरकसपणे अधोरेखित होते ते म्हणजे दोन्ही चित्रपट अत्यंत प्रभावीपणे आपल्याला ‘विवेक’ वाट दाखवतात, विचार करायला भागच पाडतात आणि आपण निधर्मी होऊ शकतोय ही जाणीवही चेतवतात.’महामानव आणि ग्रंथ’ हेच आपले मार्गदाते मग ते कोणत्याही जात समूहातील असो वा पंथातील असो त्यांचा धर्म केवळ ‘माणूस’ असतो म्हणून ते साऱ्यांचे असतात आणि सर्वसमावेशक असतात.
जगण्यास खरी दिशा देणारा ‘मास्टरपिस’ म्हणजे ‘जयंती’
‘जयंती’ म्हणजे काय तर? भेदाच्या भिंतींना नष्ट करणारी कलाकृती म्हणजे ‘जयंती’. जातीधर्मातून ‘माणूस’ मुक्त करणारी जयंती. विचार आणि आख्खं जग आणि जगणं बदलविणारा चित्रपट म्हणजे ‘जयंती’. जगण्यास खरी दिशा देणारा ‘मास्टरपिस’ म्हणजे ‘जयंती’.
मेंदूची मशागत-विवेकाची पेरणी करणारा चित्रपट म्हणजे ‘जयंती’.
जयंती चित्रपटाचे संपूर्ण महाराष्ट्रच काय ? तर अमेरिका व मेलबर्न इथेसुद्धा हाऊसफुल होणारे खेळ हेच सिद्ध करतात की,
‘चित्रपट व माध्यमे ही कुणा एका वर्गाची मक्तेदारी नाही.” संधी वा साधनांची उपलब्धता झाली तर
शेवटच्या स्तरातील माणूसही अनेक आव्हाने पेलू शकतो ‘जयंती’ हा मराठी चित्रपट बघताना जाणवते.सर्वच पात्र नागपुरी लेहजाची मधाळ, कर्णमधुर बोली बोलतात.
विशेषतः ‘संत्या’ ती ज्या स्वाभाविकपणे ती बोलतो ती कानातून थेट काळजात उतरते , त्याच्या शब्दाशब्दाला गोडी आहे तेवढीच धारही आहे. उत्तरार्धतला ‘संत्या’ मला प्रचंड आवडला आणि आजच्या तरुणांनाही तो प्रभावित करतोय. संत्याचे संवाद ऐकण्यासाठी खास पुन्हा एकदा ‘जयंती’ पाहण्याची तीव्र इच्छा आहे. पदार्पणाच्या पहिल्या चित्रपटातच सहजी ‘परफेक्ट’ व्यक्तिरेखा उभा करणारा ‘संत्या’ बनलेला ऋतुराज, आपण थिएटरच्या बाहेर पडल्यावरही आपल्या डोक्यातून अजिबात बाहेर पडत नाही तर तो अस्वस्थ करत राहतो. आपल्या सभोवतालचे वास्तव प्रश्न, आपले अनुभव आणि चित्रपटातील सर्व घटना-प्रसंग यांची सांगड घालत साम्य अधोरेखित करत जातो. सर्वसामान्य माणूस ते गाडीमाडीवाला यांचा वैचरिक स्तर, वास्तविक जगणे, प्रश्न, समस्या चित्रित करणारा हा चित्रपट आहे. (©डॉ.प्रतिभा जाधव)टीम जयंती छोट्याछोट्या गावखेड्यांपासून मोठमोठ्या शहरांपर्यंत सर्वस्तरीय लोकांची अलोट गर्दी खेचते आहे हे प्रागतिक विचारांसाठी फार आश्वस्त करणारे असे चित्र आहे.
चित्रपटातील छोटे-छोटे संवाद फारच बोलके
मला ह्या चित्रपटात सर्वात जास्त जे भावलं ते म्हणजे ,’संत्याचं रडणं.’ तो सबंध चित्रपटात दोनदा रडलाय, तो रडतो तेव्हा प्रेक्षक म्हणून आपण नक्कीच सुखावतो कारण त्याचे ते अश्रू पश्चातापाचे, उपरतीचे, वैषम्याचे, स्वतःच्या प्रमाद जाणिवांचे आणि बदलाचे आहेत. खरे तर रुबाबदार, ऐटदार, हसरा नायक सर्वांना आवडत असतो आणि रडका नायक कुणालाच आवडत नसतो पण संत्या उत्तरार्धात जेव्हा जेव्हा रडतो तेव्हा तेव्हा तुम्हाला तो नायक म्हणून खूप आवडतो हे मात्र नक्की!
पल्लवी त्याचे प्रेम स्वीकारून लग्नास तयार होते तेव्हा त्याचे रडणे, बाबासाहेबांचे चरित्र वाचल्यानंतरचे त्याचे धाय मोकलून रडणे हे सारे वैशिष्ट्यपूर्ण व आवडणारे आहे. पल्लवी, राहुल हे ठाम, आत्मविश्वासू आंबेडकरी विचारधारा मानणारे पात्र चित्रपटात आहेत. माळी मास्तर आशावादी, प्रयत्नशील असे पात्र आहे. साठे निर्णायक टप्प्यावर सहकार्य करणारा आमदाराचा पी.ए., मैत्रीला जागणारे संत्याचे मित्र, बेरकी आमदार, लबाड कुकरेजा, मृत रेखाचा लोभी नवरा, तिचे भाबडे लेकरू, संत्याची रागिष्ट आई, चहाच्या टपरीवरले दोन विनोदी पात्र ह्या साऱ्या वैविध्यपूर्ण व चिरकाल लक्षात राहणाऱ्या व्यक्तिरेखा ‘जयंती’ मध्ये आपणास भेटतात.
चित्रपटातील छोटे-छोटे संवाद फारच बोलके आहेत हे संवाद फार कौशल्याने लिहिले आहेत.
उदा. पल्लवी रामटेके ह्या मुलीवर प्रेम करणाऱ्या पण शिवभक्त असणाऱ्या संत्याला जेव्हा राहुल म्हणतो की,
“आमच्या जातीची पोरगी चालते का तुला?” त्यावर संत्या म्हणतो, “पण ती वाटत नाही तुमच्या जातीची!”
त्यावर राहुल म्हणतो की, “बाबासाहेबांना मानणाऱ्या लोकांची हीच तर खासियत आहे ,त्यांची जात माहीत पडत नाही.”
किंवा पल्लवी जयंतीच्या कार्यक्रमात संत्याला उद्देशून म्हणते की, ”गुलामांची भीती वाटत नाही मला. मालकासाठी लोकांचा जीव घेणारे गुलाम असतात आणि आम्ही गुलामांना भीक घालत नाही.” हा करारी बाणा, निर्भयता, आत्मविश्वास तिला तिच्या शिक्षणाने दिला आहे. आमदाराच्या इशाऱ्यावर नाचणारा, दहावी नापास मवाली ‘संत्या’ तिच्या ह्या बोलण्याने चिडतो आणि नंतर विचारही करू लागतो आणि अंतर्बाह्य बदल घडून “आम्ही न्यायासाठी लढतो अत्याचार कोणावर झालाय त्याची जात बघून नाय लढत.” हे ठामपणे बोलतो त्याचा हा प्रवास अवास्तव ,अशक्य अजिबात वाटत नाही.
चित्रपटातील संवाद तरुणाईस आकलनाच्या पातळीवर समजणे अत्यंत गरजेचे आहे.
“पैसे के सीवा पोलिस स्टेशन में किसी की नही चलती.” तसेच ‘”३४० वे कलम, ओबीसी सवलती, कामगार मंत्री असताना सर्वच कामगारांसाठी निर्माण केलेल्या सुविधा इ. बाबासाहेबांचे अफाट देणे प्रसंगानुरूप माळी मास्तरांच्या तोंडून येते ते संयुक्तिकच वाटते. एकेकाळी जातीमुळे बाबासाहेबांचा द्वेष करणारा ‘संत्या’ जेलमधून बाहेर पडल्यावर ‘शूद्र कोण होते?’ हे पुस्तक झपाटल्यासारखे वाचू लागतो तेव्हा त्याला घराबाहेर काढले जाते तोही पुस्तकासह बाहेर पडतो आणि त्याच्या बहिणीला जाता जाता म्हणतो की, “मनिषे तू शिकतंस ते ह्यांच्यामुळं!” ते संत्याचं बदललेलं रूप बघून बाबासाहेब हा हिमालय आपल्या डबडबल्या डोळ्यातून आपण बघू लागतो.
‘शिवाजी राजांनी बघितलेलं ‘स्वराज्याचं’ स्वप्न संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी वास्तवात आणलं’ हे समाजाला कधी कळणार आहे कुणास ठाऊक? महाराज मुस्लिमद्वेषी नव्हते तर अठरापगड समूहातील गोतावळा प्राणपणाने जपणारे होते हा खरा इतिहास आजही दडवला जातो अर्थात त्यामागील उद्देश घातक आहेत हे आजच्या तरुणांना कळणे जरा अवघड होऊन बसले आहे. त्यांच्याकडे असणारी ऊर्जा योग्य ठिकाणी वापरली गेली पाहिजे. “महापुरुष विशिष्ट जातीचे नसतात तर ते समग्र मानवजातीचे असतात आणि त्यांचे कार्यच त्यांना महापुरुष बनवते.” हा चित्रपटातील संवाद तरुणाईस आकलनाच्या पातळीवर समजणे अत्यंत गरजेचे आहे.
‘जयंती’च्या रूपाने जे दमदार, जबाबदार पाऊल
“चित्रपट व माध्यमे ही कुणा एका वर्गाची मक्तेदारी नाही.” संधी वा साधनांची उपलब्धता झाली तर शेवटच्या स्तरातील माणूसही अनेक आव्हाने पेलू शकतो जसे जयंतीचे दिग्दर्शक शैलेश नरवाडे ,कार्यकारी निर्माता वैभव छाया, समीर शिंदे, संजय भानुशाली , आंनद बनकर, दशमी स्टुडियोच्या नितीन-निनाद वैद्य, अपर्णा पाडगावकर यांनी लीलया पेलले आहे. चित्रपट क्षेत्रातल्या आधुनिक ‘छुअछुत’चे राजकारण भयंकर असल्याने प्रतिभा, क्षमता असूनही पण साधने-माध्यमांच्या अभावी मुख्य प्रवाहात सामील करून घेतले जात नाही पण ‘जयंती’ ने हा इतिहास निश्चितच फोल ठरवला आहे.
कथानक
चित्रपटातील विविध व्यक्तिरेखा प्रत्येक अभिनेत्याने चोख बजावल्या आहेत. रुपेरी पडद्यावर सर्वच बाबतीत पहिले नवखेपण असणाऱ्या टीमने ‘जयंती’च्या रूपाने जे दमदार, जबाबदार पाऊल टाकले आहे त्यामुळे ह्या टीमकडून प्रेक्षक व रसिकांच्या अपेक्षा निश्चितच अधिक उंचावल्या आहेत. रेखा टेकाम ही आदिवासी महिला बडा व्यावसायिक कुकरेजाच्या घरी मोलकरीण असते, मुलाला शिकवून ‘साहेब’ बनवायची स्वप्न बघते पण तिचा बलात्कार होतो. तिच्या मृत्यूचे खोटे कारण, तिच्या नवऱ्याला देऊ केलेले लाखो रुपये हे सारे नाट्य घडते.
कुकरेजावर हल्ला करण्याच्या आरोपखाली संत्या जेलची हवा खातो, आमदार ना सोडवायला येतो, ना घरचे. अशावेळेला माळी मास्तरांनी तुरुंगात पाठवलेल्या वृत्तपत्रांच्या वाचनापासून शिवाजी कोण होता? गुलामगिरी ते धनंजय किर ह्यांनी लिहिलेले डॉ.बाबासाहेबांचे चरित्र इथवरचा संत्याचा वैचारिक प्रवास आणि परिवर्तन बघताना आपणही त्याच्याशी एकरूप होत संत्याबरोबर रडत जातो, चकित होतो, दुःखी होतो आणि अवघ्या अंधभक्तीतून बाहेर पडण्याची त्याला योग्य वाट सापडते तेव्हा आनंदीतही होतो.
आपण स्वतःला ‘संत्या’त शोधू लागतो. संत्या तरी दहावी नापास होता,
मुळात तो अज्ञानी होता म्हणून तो समता सांगणाऱ्या शिवाजीमहाराज वा बाबासाहेब यांच्याबद्दल चुकीची,
अपुरी माहिती बाळगून होता पण आज जे उच्चशिक्षित ज्ञानी आहेत त्यांची तरी काय वेगळी कथा आहे?
हा प्रश्न हजारदा मनात येतो. साधारण सवर्ण घरात ‘जयंती’ बद्दल जे वातावरण ,
जो द्वेष भरलेला असतो तो याही चित्रपटात दाखवला आहे त्यात वेगळे काही वाटत नाही
कारण आंबेडकरी समूह ते खुप आधीपासून अनुभवतो आहे.
अज्ञानी मेंदूला जागं करीत मनमेंदूची झापडं बेमालूमपणे दूर करणारी कलाकृती
‘जयंती’ म्हणजे अंधभक्त, अज्ञानी मेंदूला जागं करीत मनमेंदूची झापडं बेमालूमपणे दूर करणारी कलाकृती. तुमच्या माझ्या गल्लीत घडावी अशी चित्रपटाची सुरुवात आहे. त्यात सहज आपला परिसर वा घटना आपण शोधू लागतो एवढं नैसर्गिक आहे सारं चित्रपटात, मग ती ‘संत्या’ म्हणजेच ऋतुराजचा अभिनय असो वा अशोक माळी म्हणजे मिलिंद शिंदे ह्यांनी साकारलेला मास्तर. मराठा समूहातील नायकाच्या घरात ‘जयंती’ ला वर्गणी देण्याची उदासीनता असो वा ‘भाई’ बनण्याच्या क्रेझमधील अर्धवट ज्ञान पाजळणारे गल्लीतील पोरंटोरं. सारं काही अगदी झकास जमून आलेला आविष्कार म्हणजे ‘जयंती’ चे उदाहरण देता येईल.
कोरोना काळात अठरा महिन्यानंतर जिथे एकही मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याची कुणीही जिगर दाखवली नाही तेथे ‘जयंती’ हा चित्रपट तिसऱ्या आठवड्यातही तिकीट खिडकीवर ‘हाऊसफुल’ चा बोर्ड घट्ट रोवून उभा आहे. ‘नावात काय असतं?’ हे आपण नेहमी ऐकत असतो . नावापलीकडे जाऊन अनुभवायला आपण बहुतेकवेळा धजावतच नाही. डोक्यात अविचार, शंका, पूर्वग्रहदूषितता आणि इच्छाशक्तीचा अभाव ह्या साऱ्या कारणांमुळे आपण कैकदा ‘सोच, नजर और नजरिया’ बदलणाऱ्या अनेक गोष्टींना मुकत असतो अर्थात हे आपले बौद्धिक आणि वैचारिक दारिद्र्य असते.
अमुक गोष्ट केली तर ”समाज काय म्हणेल???” हा बागुलबुवा समाजानेच तर आपल्या मनात वर्षानुवर्षे पोसलेला असतो.
त्यातूनच अज्ञान निर्माण होतं, माहिती मिळत नाही, जिज्ञासा मरून जाते आणि अनेक अज्ञानमूलक समज-गैरसमज,
अर्धवट माहिती यातून आपण द्वेषाचे पालक आणि अंध वाहक होतो. खुजे, संकुचित, स्वार्थी होतो.
मला माहिती आहे ते आणि तेवढेच सत्य आहे, वास्तव आहे.
आणि तेच अंतिम आहे मानून जगणारे स्वतःची घोर फसवणूक करत असतात.
प्रत्येक तरुणास ‘जयंती’ नकळत भानावर आणि ध्यानावर आणतो.
पुस्तक वाचून भानावर आलेले मस्तक अवघ्या आयुष्याचे कसे सोने करते आणि वाया गेलेल्या, जातीपातीत महापुरुषांना वाटून त्याच गढूळ दृष्टीने बघणाऱ्या प्रत्येक तरुणास ‘जयंती’ नकळत भानावर आणि ध्यानावर आणतो. सत्याला सामोरे जायला उद्युक्त करतो. सारे भेदाभेद मानवी आयुष्यात अडचणी, समस्या आणि प्रश्नच निर्माण करतात. ‘माणूस’ होणं जमलं पाहिजे त्यासाठी रंगांचे, जातींचे राजकारण मेंदूत कोंबणाऱ्या स्वार्थी कट्टर धर्मांध शक्ती ओळखल्या पाहिजेत. त्या व त्यांचे ‘काळे’ मनसुबे एकदा ओळखता आले की ‘संत्या’ सारखे आयुष्य सन्मार्गी लागून काळाच्या पटलावर आपले नाव नक्कीच कोरता येते.
चित्रपट सृष्टीतील एक महत्वपूर्ण असा मैलाचा दगड
अजूनही ‘जयंती’ ह्या नावावरून चित्रपटाच्या कथा आशयाबद्दल संभ्रम असेल
वा आपले बौद्धिक मागासलेपण चित्रपट विशिष्ट समूहाचा असे मानत असाल तर तुम्ही मोठ्ठी चूक करत आहात मित्रहो!
तेव्हा ‘जा! बघा! अनुभवा! स्वीकारा! मोकळे जगा!!’
एवढेच सांगेन. ‘जयंती’ मराठी चित्रपट सृष्टीतील एक महत्वपूर्ण असा मैलाचा दगड आहे, राहील याचा आनंद आणि अभिमान वाटतोय.
ज्या ज्या कुणाचे हात ह्या कलाकृतीस साकार करण्या लागले त्या साऱ्यांची नोंद इथला इतिहास ठेवणार आहे.
तिसऱ्या आठवड्यातही मोठे बॅनर, बडी स्टारकास्ट असणाऱ्या हिंदी चित्रपटांना
‘काटे की टक्कर’ देणारा जयंती दररोज ‘हाऊसफुल’ होतोय यातच ह्या चित्रपटाचा वेगळेपणा आणि यश आहे;
तर जा, चित्रपट बघा आणि एका ऐतिहासिक चित्रपटाचा प्रेक्षक म्हणून ह्या इतिहासाचा भाग व्हा.
कारण समाजात परिवर्तन होत नाही म्हणून गळे काढणारेही समाजाचाच भाग असतात
आणि समाज बदलायचा असेल तर तुम्हाला सारे चांगले आहे ते कवेत ,डोक्यात घ्यावे लागेल.
शेवटी एवढेच म्हणेन की, “तुम्ही बदललात तर देश बदलेल!” आणि ‘जयंती’ चित्रपट हीच बदलाची दृष्टी देतो आहे. चित्रपटात नायकाची कमालीची घालमेल, अस्वस्थता ‘माझी लायकीच नाही तुला वंदण्याची…’ ह्या गीतातून दिसते, हीच अवस्था आपल्यापैकी कित्येकांची होत असेल तर ‘जयंतीचा’ उद्देश्य सफल होतोय हे निश्चित!
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
सिनेमा: ‘जयभीम’, ‘जयंती’, सोशल मिडिया आणि समीक्षक
Jai bhim film Review – इरुलर जमातीचे भेदक चित्रण करणारा सिनेमा ‘ जयभीम ‘
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 29, 2021 15:40 PM
WebTitle – A film that awakens the conscience of man Jayanti