Jhund Film Marathi Review झुंड सिनेमा पाहून तुमच्यातला क्रीडाप्रेमी सुखावतो, की बच्चनप्रेमी सुखावतो, की आंबेडकरप्रेमी सुखावतो, की लव्हस्टोरीप्रेमी सुखावतो, की मानवताप्रेमी सुखावतो, की सिनेमाप्रेमी सुखावतो, हे ठरवणं कठीण आहे.
कुठलाही ठराविक परिप्रेक्ष्य (perspective) सोबत न घेता, निव्वळ एक टिपिकल बॉलिवूड चित्रपटांचे चाहते म्हणून थेटरात गेलात, तर झुंडचा शेवट तुम्हाला थोडासा वेगळा अनुभव देऊ शकतो. पिक्चर रिलीज व्हायच्या पूर्वसंध्येला, नागराज अण्णांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर जो व्हिडियो पोस्ट केला आहे, त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे- हा सिनेमा तुम्हाला फुटबॉल बद्दल वाटत असेल; पण खरंतर तो फुटबॉल खेळणाऱ्या माणसांबद्दल आहे. त्यांचं हे म्हणणं तुम्हाला आठवावं लागतं थेटर सोडताना.हा चित्रपट अशा माणसांची गोष्ट सांगतो.
सगळे परिप्रेक्ष्य बाजूला ठेवून, बॉलिवूडच्या सिनेमाकडून निव्वळ करमणुकीची अपेक्षा असलेला एक सामान्य प्रेक्षक म्हणून विचार करता, झुंड आपल्यासाठी कदाचित कधी महत्त्वा चं वाटलं नसेल अशा जगातील लोकांच्या जगण्याच्या धडपडीला चितारणारा सिनेमा वाटतो. आमिर खान यांचा दंगल पाहताना एक वेगळा अनुभव मिळतो तोही एका रिअल-लाईफ आयकॉनच्या जीवनावर आधारित होता. त्याची मांडणी अगदी साचेबद्ध होती. शेवटी एक भव्य-दिव्य कुस्तीचा सामना पाहायला मिळाला होता, ज्यात प्रेक्षकांच्या राष्ट्रप्रेमाच्या ज्वराला जोरदार हवा देण्याची पूर्ण ताकद होती. दंगल हा एक आउट-अँड-आऊट ब्लॉकबस्टर होता. त्याची कमाईही रेकॉर्डब्रेकिंग होती. त्यामुळेच की काय, आमिर खानसारख्या बँकेबल सिनेमावल्याने गीता-बबिता आणि महावीर सिंघ फोगट यांच्या कथेची निवड केली असावी.
झुंडची दंगलशी तुलना करण्याचं किंवा इथं आठवण्याचं एक कारण आहे. विजय बारसे हे नाव झुंडमुळे चर्चेत आलं खरं, पण त्यापूर्वीही मीडियात त्यांना एक चांगली स्पेस मिळाली होती. ती म्हणजे, आमिर खान यांच्या सत्यमेव जयतेच्या तिसऱ्या सीझनच्या पहिल्या एपिसोडची ओपनींग स्टोरी जी होती, ती विजय बारसे यांच्यावर आधारित होती. सत्यमेव जयतेचा तिसरा सीझन किती लोकांनी पाहिला असेल याबद्दल आशंका आहे, कारण तोवर या सिरियलची लोकप्रियता घटत गेली होती. याच एपिसोडमध्ये दुसरी स्टोरी होती गीता-बबिता आणि महावीर सिंघ फोगट यांची. नेमकी ही दुसरी स्टोरी घेऊन आमिर खान यांनी दंगलची निर्मिती केली होती.
झुंडचं स्पेशल स्क्रीनिंग पाहून आमिर खान म्हणाला,
‘वीस-तीस वर्षांत सिनेमाक्षेत्राबद्दल आम्ही जे शिकलो, ते नागराज यांनी झुंड बनवून फुटबॉलप्रमाणे लाथाडलं.’
आमिर खान यांच्या या म्हणण्यामागे ही जाणीव नक्कीच असेल की
बारसेंना सत्यमेव जयतेसारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आणणारे आपण नक्कीच होतो,
पण त्यांना महावीर सिंघ फोगट यांच्याइतकं ग्लॅमर मिळवून देणं आपल्याला शक्य झालं नाही.
महत्त्वाचं हे की, झुंड पाहिल्यावर आमिर यांचेही डोळे पाणावले होते.
क्रीडाप्रेमीच्या परिप्रेक्ष्यातून झुंड
एक चपखल क्रीडा-केंद्रित सिनेमा तयार करायचा म्हणजे, त्यासाठी उपयुक्त अशा विशिष्ट तंत्राची सखोल समज असावी लागते. उदाहरणार्थ, हॅरी पॉटरची क्विडीच मॅच. ती मॅच पाहण्यासाठी तुम्ही जर हॉग्वर्ट्समधल्या प्रेक्षागृहात बसला असाल तर तुम्हाला जादुई झाडूवर बसून हवेत इकडून तिकडे उडणारी मुले दिसतील. पण त्या मॅचचा जेव्हा तुम्ही सिनेमा पाहता, तेव्हा तिचे चित्रीकरण करणारा सिनेमॅटोग्राफर तुम्हाला खेळाडूंसोबत झाडूवर बसवून हवेत घेऊन जातो. झुंडमधल्या फुटबॉल मॅचचे चित्रीकरणही तितकेच जितेजागते आहे. त्याचे श्रेय सिनेमॅटोग्राफर सुधाकर रेड्डी यक्कंटी यांना तर जातेच, पण त्याचबरोबर या मॅचचं स्क्रिप्टिंग ज्यांनी केलं आहे, म्हणजेच, कुठलं पात्र कशाप्रकारे किक मारेल, गोली कशाप्रकारे बॉल अडवेल, याचं संयोजन ज्यांनी केलं आहे, त्यांनाही ते श्रेय जातं.
या मॅचमध्ये झोपडपट्टी टीमचा कॅप्टन डॉन एक सोलो गोल स्कोर करतो. फिल्डच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत कोणाकडेही बॉल पास न करता, एकटाच तो डिफेन्ड करत नेतो, आणि गोल करतो. ह्या गोलच्या डिझाईनिंगबद्दल मुरलेल्या फुटबॉलप्रेमींनी बोलावं.हे गोल मात्र तुम्हाला मोठ्या स्क्रीनवर पाहण्यातच मजा आहे.एक सामान्य प्रेक्षक म्हणून हा फुटबॉल सामना मला खूप भावला. लाईव्ह मॅच चाललेली नाही हे कळत असूनही, गोल्सना टाळ्या वाजवण्यावाचून राहवत नव्हतं, एवढं जितंजागतं टेकिंग आहे या मॅचचं. नागराज अण्णा लाख म्हणत असतील, की झुंड फुटबॉलबद्दल नाही, पण फुटबॉलप्रेमी हा सामना खूप मनापासून एन्जॉय करतील.
बच्चनप्रेमीच्या परिप्रेक्ष्यातून झुंड
म्हातारे झाले बच्चन. त्यांचं तारुण्यातलं चार्म तुम्हाला नक्कीच झुंडमध्ये पाहायला मिळणार नाही.
शहंशाह-दीवार तर सोडाच, साधा पिंकमधला ‘नो-मीन्स-नो’ टाईप रुतबापण नाही झुंडमध्ये.
खूप डाऊन-टू-अर्थ, विनम्र विजय बोराडे साकारले आहेत त्यांनी. ‘म्हातारे झाले’ ही काही त्यांच्या वयाबद्दलची खोडसाळ कमेंट नाही,
तर त्यांनी त्यांच्या पात्राची जी समज दाखवली आहे, त्यासाठी स्वतःचं स्टारडम ज्याप्रकारे त्यांनी बाजूला ठेवलं आहे,
त्याची प्रशंसा म्हणून आहे. म्हणजे इथं नेहमीचे अमिताभ तुम्हाला भेटत नाहीत.
त्यांचे तसे एक-दोनच सीन आहेत ज्यात त्यांचं बच्चनपण दिसून येतं.
एक, ज्यात ते पोरांना ताटकळत ठेवतात फुटबॉलसाठी,
आणि दुसरा ज्यात ते डॉनची बाजू मांडतात न्यायालयात. न्यायाधीशाच्या भूमिकेत, द जेम, ज्योती सुभाष आहेत.
न्यायालयाच्या सीनमध्ये वकिलाच्या उजव्या हाताला बसलेले बच्चन त्यांचा मोनोलॉग डिलिव्हर करण्यासाठी वकिलांना ओलांडून सेंटर-स्पॉट घेतात. हे थोडं ऑड वाटतं- न्यायालयात इतक्या मोकळेपणाने वकिलाखेरीज कुणाला वावरता येतं, यावर विश्वास बसत नाही – पण शेवटी ते बच्चन आहेत. अशी एखादी सूट त्यांना माफ आहे. निव्वळ बच्चनप्रेमींसाठी हा एक सीन आहे.
आंबेडकरप्रेमीच्या परिप्रेक्ष्यातून झुंड
आंबेडकरप्रेमींचे सरळ सरळ दोन गट पडतात. एक जयंतीला नाचणारे, आणि एक विचारी. झुंड सिनेमा मध्ये जयंतीच्या मिरवणुकीत नाचणाऱ्या आंबेडकरप्रेमींचे मुबलक प्रतिनिधित्व आहे. पण विचारी आंबेडकरप्रेमींचे सुद्धा जे एक मोलाचे प्रतिनिधित्व आहे, ते तुमच्या मनाला हलकेच स्पर्श करून जाईल. उदाहरणार्थ, पोरं नुसताच डीजे लावून धांगडधिंगा करतात म्हणून जयंतीची वर्गणी न देणारे काका जेव्हा गरजेला नोटांचा बंडल समोर टाकतात…
बाय द वे, तुम्ही विचारी आंबेडकरप्रेमी असा, किंवा जयंतीला नाचणारे- थेटरमध्ये जेव्हा ‘लफडा झाला’ वाजतं, तेव्हा तुमचे पाय थिरकल्यावाचून राहत नाहीत. त्यामुळे, ज्यांच्यासोबत झुंड बघायला जाल, त्यांच्यासोबत ऑकवर्ड वाटणार नाही याची काळजी घ्या. शक्यतो, एखादा शो फक्त तुमच्या गँगसोबत ‘लफडा झाला’वर नाचण्यासाठी पाहा.ही मजा फक्त थेटरमध्येच अनुभवता येईल.
लव्हस्टोरीज आवडणाऱ्यांसाठी झुंड
भाईगिरी करणारा सडकछाप हिरो, आणि चकचकीत चारचाकी चालवणारी हिरोईन हा फॉर्मुला तसा जुनाच आहे.
म्हणूनच की काय,चित्रपटात डॉन आणि भावनाच्या लव्हस्टोरीला नागराज अण्णांनी फार फुटेज दिलेलं नाही.
पण, जस्ट फॉर अ चेंज, ज्याप्रमाणे मुलं मुलींना स्टॉक (stalk) करतात त्याप्रमाणे हिरोला स्टॉक करणारी,
लपूनछपून त्याचे फोटो काढणारी हिरोईन जर तुम्हाला पाहायची असेल तर झुंड नक्की बघा.
हिरोईनला गुंडांपासून वाचवणारा हिरो बघून बघून जर तुम्ही पकला असाल,
आणि तुम्हाला हिरोला गुंडांपासून वाचवणारी हिरोईन पाहायची असेल,तर झुंड नक्की पहा,
पुढे त्यांच्या लव्ह स्टोरीचं काय होतं ते चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
मानवताप्रेमींच्या परिप्रेक्ष्यातून झुंड
फुटबॉलची मॅच जिंकल्यावर विजय बोराडे पोरांना त्यांच्या घरी नेतात. त्यांना बोलतं करतात. नागराज अण्णांनी ह्या सीनचं टेकिंग कसं केलं असावं याचा अंदाज लावणं कठीण आहे. पोरांनी अभिनय केलाय, की मनातलं बोलून दाखवलंय हे सांगता येत नाही. पोरं बोलतात, बाबू सुरुवात करतो – डोळ्यात हलकेच पाणी येतं त्याच्या. आपलेही डोळे ओले होतात त्याक्षणी. पोरांचे क्लोझ-अप्स घेतले आहेत. ह्या झाडपट्टीतील पोरांना आपण कधी डोळा भरून पाहिलंही नसेल. रंगवलेले केस, विचित्र कपडे, आचकट-विचकट बोलणं या सगळ्यामुळे आपण कायमच त्यांचा तिरस्कार केला असेल. पण नागराज अण्णा आपल्याला त्यांचे चेहरे मोठ्या पडद्यावर क्लोझ-अप लावून दाखवतात. आपल्याला वाटतं- अरे ही पोरं पण किती सुंदर आहेत. या सीनमध्ये योगेश बुलबुल वाजवतो. त्याचे डोळे बुद्धाच्या डोळ्यांची आठवण करून देतात.
रिंकू राजगुरूने मोनिका साकारलीय. तिच्या वडलांचं पात्र ज्यानी साकारलं आहे,त्यांचे त्याचे डोळे इरफान खान यांच्या डोळ्यांची आठवण करून देतात.एवढे बोलके आहेत,हे चेहरे आपण पहिल्यांदाच पाहतो,त्यामुळे हे पहिल्यांदाच अभिनय करत असावेत असे वाटते पण त्यात नवखेपणा कुठेही जाणवत नाही.त्याची भाषाही आपल्याला कळत नाही, पण त्याच्याबद्दल आपल्याला कळकळ वाटते.हे दिग्दर्शनाचे कौशल्य आहे.
सिनेमा प्रेमींसाठी झुंड
भरपूर मसाला आहे पिक्चरमध्ये. पण झुंड मसाला फिल्म अजिबात नाही. तिच्यात कुठल्या एका मसाल्याचा भडीमार नाही. प्रत्येक ऐवज योग्य प्रमाणात वापरून एका रुचकर सिनेमाची निर्मिती केलेली आहे. मी या सिनेमाकडे ओढलो गेलो ते नागराज अण्णांच्या प्रेमाखातर.त्यांनी एका पाठोपाठ एक दर्जेदार कलाकृती सादर केल्या आहेत. अगदी अलीकडची शॉर्ट फिल्म वैकुठंही खूप दर्जेदार आहे. झुंड अनाऊन्स झाल्याझाल्या ठरवलं होतं, फर्स्ट डे-फर्स्ट शो पाहणार.पाहिला.नागराज अण्णा काहीतरी महत्त्वाचं सांगू पाहताहेत. जे फुटबॉलपेक्षाही खूप महत्त्वाचं आहे.
झुंड सिनेमा विजय बारसेंबद्दल आहे असं मार्केटिंग केलंय. पण खरंतर झुंड त्यांच्याबद्दलही नाही. त्यांची भूमिका दुय्यम आहे. सिनेमाच्या केंद्रस्थानी अखिलेश पॉलची गोष्ट आहे. कोण अखिलेश पॉल? सत्यमेव जयतेचा सीझन ३, एपिसोड १ पाहा. अखिलेश पॉल एक खूपच सामान्य फुटबॉल कोच आहे. गीता फोगटसमोर किस झाड की पत्ती. भारत देशाने त्याचा अभिमान बाळगावा असं त्याने काहीच मिळवलेलं नाही. पण सत्यमेव जयतेच्या त्या एपिसोडमध्ये जेव्हा विजय बारसे समोर येतात, तेव्हा अखिलेश त्यांना जसा एखाद्या लहान मुलाप्रमाणे बिलगून रडतो, त्या रडण्यामागच्या खडतर ट्रान्सफॉर्मेशनची महत्त्वाची गोष्ट नागराज अण्णांनी खूप कष्टाने इथं उभी करून सादर केलीय. हे ट्रान्सफॉर्मेशन समजून घेणं का महत्त्वाचं आहे? तर, ही जी झाडपट्टीतील पोरं आपण आपल्या आस-पास पाहतो, त्यांचाबद्दल कायम संशय न वाटता, सद्भावना वाटावी म्हणून.
सिनेमा आहे हिंदी, पण बच्चन यांच्या व्यतिरिक एकही हिंदी सिनेसृष्टीतला चेहरा नाही.सगळे मराठी चेहरे आहेत.
त्यांच्या तोंडची हिंदी मराठमोळी वाटते. त्यामुळे हा चित्रपट अस्सल महाराष्ट्रातल्या मातीतला वाटतो.
एकच नाही तर असे अनेक अनुभव प्रत्यक्ष घेण्यासाठी तुम्हाला ते मोठ्या पडद्यावरच पाहावं लागेल.नक्की पाहा.
झुंड सिनेमा : सुपरस्टार धनुष म्हणाला “निःशब्द झालोय”
Jhund film।झुंड चित्रपट,आंबेडकरांचे पोस्टर व्हायरल,पाहा रिलीज डेट
जयभीम चित्रपट थांबायचे नाव घेईना ,चीन मध्ये ठरतोय लोकप्रिय
Pushpa movie box office collection|पुष्पा फिल्म बॉक्स ऑफिस
बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिवजयंती च्या मिरवणुकीत सामील होतात
आंबेडकर आणि पेरियार यांचं भगत सिंग यांच्या बलिदानावर मत..
व्हॅलेंटाईन डे – मर्दानी लढवय्यी वीर सूपुत्री भीमाच्या लेकीला समर्पित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 04, 2022 23:18 PM
WebTitle – Jhund Cinema : A movie to watch from three or four perspectives