एकत्र कुटुंबाची मिळकत, स्त्रियांची मिळकत,हिंदू स्त्रियांचे मिळकतीचे वारस,
वारसा हक्क आणि इतर.
एकत्र कुटुंबाची मिळकत
हिंदू कोड बिलाच्या कायद्याच्या सुरुवातीच्या कालावधीत आणि त्यानंतरच्या काही कालावधीत एकत्र कुटुंबाची मिळकत ही त्या कुटुंबातील सर्व व्यक्ती आणि सर्व भागीदार यांच्याबद्दल या कायद्यात हक्क आणि अधिकार सांगितले आहेत.एकत्र कुटुंबात राहणाऱ्या व्यक्तींचा त्या कुटुंबाच्या स्थावर आणि जंगम मालमत्ता यामध्ये कुटुंबाच्या नातेसंबंधांच्या पायऱ्या प्रमाणे हिस्सा असतो.यामध्ये आजोबा त्यांचा मुलगा अथवा मुलगी त्यांचा नातू अथवा नात अशा पद्धतीची नातेसंबंधांची साखळी असते. आजोबा च्या नावावर ती असलेली स्थावर आणि जंगम मालमत्ता यावर त्यांच्या मुलाचा अथवा मुलीचा समान हक्क असतो. त्यानंतर त्या मुलाला अथवा मुलीला झालेल्या इतर अपत्यांचा नातेसंबंधांच्या पायरी प्रमाणे हक्क असतो. जसा स्थावर आणि जंगम मालमत्ता मध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांचा अधिकार असतो तसाच कुटुंबासाठी घेतलेल्या कर्जावर ही त्यांची जबाबदारी असते
स्त्रियांची मिळकत
हिंदू कोड बिल बनवत असताना बाबासाहेबांनी भारतीय स्त्रियांच्या हक्काचे आणि अधिकारांचे पालन अत्यंत चांगल्या प्रकारे केलेले दिसून येते. हिंदू कोड बिलाच्या कायद्या अगोदर आणि नंतर एखाद्या महिलेने मिळवलेली कोणती ही मिळकत ती तिच्या पूर्ण मालकीची असेल असे स्पष्ट बाबासाहेब सांगतात. या कलमात मिळकत याचा अर्थ त्या स्त्रीने मिळवलेली स्थावर-जंगम मालमत्ता असा आहे.यामध्ये लग्नाअगोदर अथवा लग्नानंतर किंवा ति विधवा झाल्यानंतर जी मिळकत तिला मिळते त्याचे हक्क तिच्याकडेच राहतील असे बाबासाहेबांनी सांगितले आहे. मृत्युपत्राने , वाटणीपत्राने, बक्षीसपत्राने, तिच्या कष्टाने, चातुर्याने , खरेदी केलेल्या किंवा वहिवाटी नुसार आलेल्या सर्व प्रकारच्या मिळकतीवर तिचा अधिकार असेल. अठरा वर्षाच्या कमी वयात लग्न झालेल्या स्त्रियांचे लग्नामध्ये किंवा हुंड्याच्या स्वरूपात आलेले स्त्रीधन यावर तिचा अधिकार असेल. तिच्या हितासाठी एखादी व्यक्ती विश्वासू म्हणून त्या स्त्रीच्या स्थावर आणि जंगम मालमत्तांचे रक्षण करील आणि जेव्हा ती 18 वर्षे पूर्ण करेल तेव्हा तिच्या हक्काचे स्त्रीधन तो तिला परत करेल.
वारसा हक्क
वारसा हक्कांमध्ये दोन प्रकारचे वारसाहक्क येतात यामध्ये मृत्युपत्राने लागलेला वारसाहक्क आणि विना मृत्युपत्र लागलेला वारसाहक्क.
मृत्युपत्राद्वारे जे लोक आपला वारस नेमतात त्यांना मृत्युपत्रात उल्लेख केलेल्या स्थावर अथवा जंगम मालमत्ता यांचे वितरण करावे असा दंडक आहे.
विना मृत्युपत्र जे लोक मरण पावतात अशा लोकांच्या वारसदारांच्या बाबत बाबासाहेबांनी सविस्तर वर्णन केली आहे.
१) गोत्रज नातेवाईक (पुरुषाकडून) जेव्हा एखाद्या व्यक्तीचा संबंध रक्ताने अथवा दत्तकाने आलेला असतो तेव्हा त्यांना गोत्रज नातेवाईक असे म्हटले जाते.
२) वारस म्हणजे कोणतीही व्यक्ती पुरुष किंवा स्त्री मृत्युपत्र नुसार मेलेल्या व्यक्तीच्या मिळकतीस वारस होण्याचा अधिकार आहे.
३) विना मृत्युपत्र एखादा व्यक्ती मरण पावला असेल तर त्या व्यक्तीची मिळकत त्यांच्या वारसास मिळेल.
यामध्ये प्रथमता अग्रहक्कात्मक वारस नंतर जे लोक ,अग्रहकात्मक वारस नाहीत असे लोक,
त्यानंतर गोत्रज नसतील असे लोक यांच्यामध्ये स्थावर आणि जंगम मालमत्तांचे वितरण होईल.
४) मृत्युपत्र न करता मरण पावलेल्या व्यक्तीच्या प्रत्येक मुलाच्या तसेच त्याची विधवा यांचा समान अधिकार असेल.त्याचसोबत त्याला असणारी मुलगी हिचा ही अधिकार असेल.
हिंदू स्त्रियांचे मिळकतीचे वारस
हिंदू कोड बिलाच्या कायद्याच्या कलम 2 च्या तरतुदीस पात्र राहून मृत्युपत्र न करता मरण पावलेल्या हिंदू स्त्रीची मिळकत पुढील प्रमाणे विभागली जाईल
१) एखादी हिंदू स्त्री पती आणि तिची मुले मागे ठेवून मरण पावते अशा वेळेस तिची इस्टेट तिच्या पती आणि मुलांमध्ये समान वाटणी केली जाईल.
२) जेव्हा एखादी हिंदू स्त्रीचा पती आधीच मरण पावला आहे आणि नंतर ती मरण पावली तर तिच्या मालमत्तेचे तिच्या मुलांमध्ये समान वाटप केले जाईल
३) जर एखादा मुलगा ती मरायच्या आधीच मेला असेल आणि त्या मुलग्याला त्याची स्वतःची मुले असतील तर त्या मुलांमध्ये मरण पावलेल्या त्यांच्या वडिलांचा हिस्सा मिळेल.
४) एखाद्या हिंदू स्त्रीला जर मुले नसतील तर त्या स्त्री ची सर्व मालमत्ता तिच्या पतीच्या नावे वारसाने जाईल.
५) हिंदू स्त्रीचे मिळकतीचे दुसरे वारस म्हणजे ती जेव्हा कोणताही वारस न ठेवता व मृत्युपत्र न करता मरण पावते अशा वेळेला तिच्या आई बापा कडे नंतर तिच्या पतीच्या वारसांकडे तिच्या मालमत्तेचे वाटप होईल.
वैराग्याचा मिळकतीचा वारसा
१) एखादा व्यक्ती वैराग्य धारण केलेला असेल तो तपस्वी होऊन निरंतर धार्मिक शिष्य होऊन पूर्णपणे अखेर जगास त्यागून जातो तेव्हा त्याची मिळकत संन्यास घेण्याच्या अगोदर त्याचे जे वारस आहेत त्यांना मिळते.
२) संन्यास घेतल्यानंतर त्या व्यक्तीने संपादन केलेली मालमत्ता त्याच्या आश्रमातील त्याचे अध्यात्मिक बंधूकडे जाईल.
३) तो कोणतीही चाल अगर रूढी मानत असेल आणि त्याचे नियंत्रण करत असल्यास त्याच्या शिष्याकडे वारसाहक्काने जाईल
३) जर तो शिष्य असेल तर गुरूकडे वारसाहक्काने जाईल.
वारसा हक्क संबंधी इतर काही महत्त्वाच्या तरतुदी
१) सावत्र नात्यापेक्षा सख्या नात्यांना या कायद्यामध्ये पहिला हक्क आहे त्यानंतर सावत्र नात्यांना हक्क आहे.
२) सावत्र भाऊ अथवा बहीण यापेक्षा सख्खा भाऊ आणि बहिण यांचा अधिकार पहिला असेल.
३) परंतु सख्ख्या भावाच्या मुला पूर्वी सावत्र भाऊ वारस होतो भावाच्या मुलापेक्षा सख्खा भाऊ जवळचा वारस ठरतो.
४) चुलत्याच्या मुलापेक्षा आधी जवळचा असणारा चुलता असतो त्यानंतर सख्ख्या चुलत्याच्या मुलापेक्षा सावत्र चुलता आधी स्वीकारला आहे.
५) जो व्यक्ती मृत्युपत्र न करता मरण पावतो पण त्याच्या बायकोच्या पोटात गर्भ वाढत असेल आणि पोटातील बाळ तो मेल्यानंतर जन्माला आले असेल तरीही त्या मुलाचा अधिकार त्याच्या मालमत्तेला लागते.
६) वैराग्य धारण केलेले लोक वारसा हक्क बाबत अपात्र आहेत.
७) लग्नानंतर अपवित्र झालेली स्त्री ज्या स्त्रीला तिच्या नवऱ्याने माफ केले नाही अशी स्त्री वारसा हक्कापासून वंचित राहू शकते
८) जो व्यक्ती खून करतो किंवा खून करण्यास मदत करतो अशा व्यक्तींना वारसा हक्कापासून वंचित केले आहे.
९) एखादा व्यक्ती धर्मांतर करतो तो हिंदू म्हणून राहत नाही त्याने हिंदू समजणे बंद केले आहे त्यानंतर त्याला आणि त्याच्या मुलांना वारसा हक्कापासून वंचित केले आहे.
१०) जे लोक रोगी आहेत दोषी आहेत अशा व्यक्तींना मिळकती पासून अपात्र ठरवले जाऊ शकत नाही.
लेखकाचे मनोगत
गेली चौदा दिवस मी सलगपणे हिंदू कोड बिल याविषयी सोशल मीडियातून लिहीत आहे. हिंदू कोड बिलाविषयी मी सातत्याने बाबासाहेबांच्या भूमिका मांडत आहे. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी मांडत असताना बाबासाहेबांना झालेला त्रास आणि बाबासाहेबांनी केलेले कष्ट हे वाचताना अक्षरशः डोळे भरून आले. बाबासाहेबांनी केलेल्या कार्याची महती लक्षात आली. समस्त भारतीय महिलांच्यावर बाबासाहेबांनी अनंत उपकार केले आहेत. हिंदू कोड बिल वाचत असताना त्याची महती पानोपानी वाक्यावाक्याला दिसून येते. बाबासाहेबांचे लेखन म्हणजे एक धगधगता अग्निकुंड आहे. या अग्नीकुंडामध्ये बाबासाहेबांनी हजारो वर्षापासून ज्या स्त्रियांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या धर्मग्रंथांना आणि त्यांच्या मान्यतांना जाळून टाकले आहे.
आभार
ही लेखमाला लिहिताना माझ्या मित्रांनी मला प्रोत्साहन दिले. तसेच काही ज्ञानी आणि अनुभवी मित्रांनी मला सहकार्य केले, काही सूचना केल्या त्या सर्वांचा मी आभारी आहे. या लेखमालेचे पुस्तकरूपी संकलन करून ते प्रकाशित करावे असेही काही लोकांनी मला सुचवले आहे त्याबाबत मी जरूर विचार करत आहे. काही मित्रांनी मला या लेखमालेची पीडीएफ स्वरूपात फाईल बनवून देण्याची विनंती केली पण लेखमाला पूर्ण झाल्याशिवाय असे करणे चुकीचे होईल म्हणून मी तशी पीडीएफ बनवली नाही. मी जे काही लिहिले आहे ते डॉक्टर बाबासाहेबांच्या लेखणीतून उतरले आहे.मी फक्त माझ्या शब्दात शब्दबद्ध केले आहे.या लिखाणामध्ये काही त्रुटी चुका आढळल्यास त्याची जबाबदारी मी माझी समजतो.बाबासाहेबांच्या लेखन यामध्ये एकही चूक किंवा त्रुटी आढळत नाही. त्यामुळे नजरचुकीने किंवा अनावधानाने काही चूक किंवा त्रुटी आढळल्यास मी आपली क्षमा मागतो. आपण या लेखमालेला उदंड प्रतिसाद दिला बऱ्याच लोकांनी या लेखमालेच्या पोस्ट सोशल मीडिया वरती शेअर केल्या कॉपी-पेस्ट केल्या त्या सर्वांचा मी आभारी आहे.माझ्या या लेखमालेत वर कमेंट रुपी प्रतिसाद देणार्यांचे आभार. ज्यांनी ही लेखमाला लाईक केली त्यांचेही मनापासून आभार.अशा लेखमाला पुढेही करील तुमचे सर्वांचे सहकार्य आणि प्रोत्साहन सदैव लाभेल अशी अपेक्षा करतो.
धन्यवाद.
तुमचाच,
सतीश भारतवासी
~ समाप्त ~
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी 2
First Published on APRIL 13 , 2021 16 : 33 PM
WebTitle – hindu code bill law and dr b r ambedkar 2021-04-13